विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

आंतरराष्ट्रीय महिला दिन

स्त्री’ ने ‘इस्त्री’ आणि ‘इ – स्त्री’ होऊ नये असे वाटत असेल तर कुटुंब व समाज व्यवस्थेने तिच्या हक्काच्या अवकाशावर आक्रमण करू नये , एवढीच कळकळीची विनंती ! – संपादक वृंदा आशय


कधी कधी माणसाने फक्त स्वतःचे व्हावे,
सोडून काळजी पर – जनांची स्वतःला गवसावे.
सोय स्वतःची ही पहावी कधी,
कधी स्वतःचेच लेकरू व्हावे
आई प्रमाणे आपणच आपल्याला जवळ घ्यावे
- श्रिया आशय जोशी

||ॐ||

तिने पेरली मनी
ती झाशीची राणी

दिवस होते असे
होत होते हसे

तिजपर्यंत पोहोचायचेच
कसेही हे सारे कवडसे

कळवळे जीव टाकी उसासे
विचारी देवा का रे हे असे कसे

उजवली होती तिची कूस
आहे ती फार सोसलेली मूस

मज मात्र सांगे तू आहे गुणी
म्हणू दे तुला काही कोणी

मज ठाऊक ती नेहेमी बोलते खरे
…..मग वाटेना का कोणाला बरे

मजसाठी ती प्रार्थे रात्रंदिन…..
तिच्या कृपेने अवतरला हा सुदिन

मी मानते मातेस माझ्या दत्तरूप
जिने दाखविले मज माझे स्वरूप!

संपूर्ण समर्पण!

  वृंदा आशय

🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻


वंदना धनेश्वर, जनसंपर्क अधिकारी, दत्ताजी भाले रक्तपेढी

‘Girl’s Girl’ –


ईर्ष्येकडून सक्षमीकरणाकडे… – वंदना धनेश्वर

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलं, तरी स्त्रियांना भेडसावणारे प्रश्न, समस्या सारख्याच असतात. घर आणि करिअरचा समतोल, समाजाच्या अपेक्षा आणि स्वतःचे अस्ति­­त्व टिकवण्याची धडपड अशी तिपेडी कसरत सगळ्याच स्त्रियांना करावी लागतेय. अशा वेळी जर स्त्रियांनी आपल्यासारख्याच धडपडणाऱ्या इतर स्त्रियांच्या पाठिंशी राहण्याची भूमिका स्वीकारली तर प्रत्येक स्त्रीसाठी हा प्रवास थोडा तरी सुसह्य होईल. हाच ‘Girl’s Girl’ या संकल्पनेचा गाभा आहे. आज महिला दिन. वर्षातल्या एवढ्या एकाच दिवशी महिला सक्षमीकरणाचे गोडवे गाण्यापेक्षा, हारतुरे देऊन कौतुकाची उधळण करण्यापेक्षा एकमेकींबद्दलचा भगिनीभाव जपणं हे अधिक कालसुसंगत होईल नाही का..?


पदवीपर्यंतच शिक्षण ‘मी’ आणि माझी मैत्रीण ‘विशाखा’ने सोबतच पूर्ण केले. नंतर पदव्युत्तरसाठी वेगवेगळे विषय निवडल्यामुळे आमच्या वाटा भिन्न झाल्या. तिच्या लग्नाला मी नव्हते. म्हणून मी नंतर तिच्या घरी गेले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी विचारले, ‘‘नोकरी करायला परवानगी दिली का गं सासूबाईंनी?’’यावर विशाखा म्हणाली, ‘‘माझ्या चहापोह्याच्या कार्यक्रमातच सासूबाईनी सांगून टाकलं होतं, लग्नानंतर नोकरी करायची. मी देखील केली आहे. आईवडिलांनी तुला एवढं शिकवलंय. तुला शिकवण्यासाठी त्यांनी लावलेला पैसा आणि तुझे श्रम-वेळ वाया घालवायचं नाही…’’

सासूबाईंच्या अशा भक्कम पाठिंब्यामुळे विशाखा ने केवळ नोकरीच केली नाही तर लग्नानंतर नोकरी करत करत पीएच.डी. देखील पूर्ण केले. आम्ही ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच महाविद्यालयात आज विशाखा ‘मराठी विभाग प्रमुख’ म्हणून कार्यरत आहे. अनेक कार्यशाळा, परिषदांमधून तिने प्रबंध वाचन केले आहे. मराठी भाषेवरच्या अपार प्रेमामुळे याविषयावरच्या अनेक दर्जेदार कार्यक्रमांना देखील ती आवर्जून उपस्थित असते. एकुणातच, कुटुंब आणि विशेषतः सासूबाईंच्या प्रोत्साहनामुळे विशाखा स्वतःचं करिअर घडवण्यासोबतच स्वतःला सर्वार्थाने आशयसंपन्न करू शकली.


मात्र विशाखा सारखी स्वप्नवत वाटणारी उदाहरणे खूप विरळ असतात. कारण वास्तव खूप वेगळे आहे. अनेकींच्या आयुष्यात विवाह हा शिक्षण, नोकरी आणि करिअरचा शेवटचा थांबा ठरतो. वर्षानुवर्षे मनावर असलेला पारंपरिक विचारसरणीचा प्रभाव, पुरुषप्रधान मानसिकतेमुळे तर हे घडतेच पण याच व्यवस्थेतल्या इतर स्त्रियांनी दुसऱ्या स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे न राहणे यामुळेही हे घडते. वर्षानुवर्षे आपण ज्या चक्रातून गेलो त्याच चक्रातून किमान आपल्यासारखीच दुसरी स्त्री तरी जाऊ नये असे व्यवस्थेतल्या स्त्रियांना कधीच का वाटू नये?

स्त्रियांच्या सर्वंकष उन्नतीसाठी पूरक ठरणाऱ्या या भगिनीभावाबद्दल प्रत्यक्षात प्रचंड अनास्था का दिसते? पुरुषप्रधान मानसिकतेने वर्षानुवर्षे स्त्रियांच्या मनावर हेच बिंबवले की, “एक स्त्रीच दुसरीची शत्रू असते. शाळेपासून ते कॉर्पोरेट जगतापर्यंत अनेकदा स्त्रियांना एकमेकींविरुद्ध उभे केले जाते. “तिने कसे कपडे, दागिने घातले आहेत?”, “तिला प्रमोशन कसे मिळाले?”, “ती माझ्यापेक्षा सुंदर दिसते का?” तिची जीवनशैली इतकी आधुनिक कशी? अशा विनाकारणच्या स्पर्धेत स्त्रियांना गुंतवून ठेवले जाते. स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या विनोदांना फॉरवर्ड केले जाते. एखादीच्या चारित्र्याबद्दल विनाकारण संशयाचे धुके पसरवले जाते. एकमेकीच्या मनात परस्पराबद्दल असूया, ईर्ष्या निर्माण केली जाते. विनाकारण तुलना केली जाते. स्त्रिया या यश-अपयश, चांगली-वाईट परिस्थिती यामध्ये एकमेकींचा आधार होण्याऐवजी एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत असे चित्र रंगवले जाते. अर्थात, याची दुसरी बाजू देखील आहे. काही स्त्रिया उच्च पदावर पोहोचल्या, त्यांच्या हातात सत्ता-अधिकार आले, समाजात प्रसिद्धी-मानमरातब मिळाला, पत निर्माण झाली की अशा स्त्रिया तुलनेने आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरील, प्रतिकूल परिस्थितीतील स्त्रियांना कमी लेखतात हे ही कटू वास्तव आहे.

स्पर्धेपेक्षा सहकार्य महत्वाचे…

Girls’ Girl

‘Girls’ Girl’ ही संकल्पना स्त्रियांबद्दलच्या सामाजिक दुष्टचक्राला छेद देते. स्त्रियांनी स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याला, स्त्रियांनी स्त्रियांसाठी ठोस भूमिका घेण्याला प्राधान्य देते. ‘गर्ल्स गर्ल’ म्हणजे, अशी स्त्री जिला इतर स्त्रियांच्या प्रगतीबद्दल असूया वाटत नाही. अशी स्त्री यशस्वी स्त्रियांच्या यशात सामील होते. जी स्पर्धेपेक्षा सहकार्याला महत्त्व देते, जिथे जिथे शक्य असेल तिथे दुसऱ्या स्त्रीला साथ देते. जेव्हा एखादी मुलगी, एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या सौंदर्याचे, तिच्या बुद्धिमत्तेचे किंवा तिच्या यशाचे मनापासून कौतुक करते, तेव्हा ती ‘गर्ल्स गर्ल’ असते. ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या स्त्रीला कमी लेखत नाही. उलट, ती हे जाणते की एका स्त्रीचा विजय हा संपूर्ण स्त्री जातीचा विजय आहे. भगिनीभावावर विश्वास असणाऱ्या स्त्रीच्या ऑफिसमध्ये एखादी नवी सहकारी आली, किंवा कुटुंबात नवी सून आली असेल तर अशी स्त्री तिला सावरून घेते. मार्गदर्शन करते. अशा स्त्रियांजवळ एखादीने मन मोकळे केल्यास त्या स्त्रिया त्या बोलण्याची सार्वजनिक जीवनात विनाकारण वाच्यता करीत नाहीत. एखादीच्या अनुपस्थितीत तिच्याबद्दल वाईट बोलले जात असेल तर ‘गर्ल्स गर्ल’ असणाऱ्या स्त्रिया अनुपस्थित महिलेची पाठराखण करतात.

क्वीन बी सिंड्रोम नकोच…

पुरुषांच्या तुलनेत कॉर्पोरेट जगतात किंवा कोणत्याही व्यावसायिक कार्यक्षेत्रात ‘क्वीन बी सिंड्रोम’ (Queen Bee Syndrome) अधिक प्रमाणात पहायला मिळतो. ‘क्वीन बी सिंड्रोम’ म्हणजे वरच्या पदावर पोहोचलेली स्त्री खालच्या पदावरील स्त्रियांना त्रास देते. याशिवाय बऱ्याचदा स्त्रिया स्वतःच्या बाईपणाचा गैरवापर करून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर महिला सहकाऱ्याच नुकसान करतात. बाईपण वापरून मोठा हुद्दा, पगार पदरात पडून घेतात. पण ‘गर्ल्स गर्ल’ संकल्पना मानणाऱ्या स्त्रिया आपल्या हाताखालील स्त्रियांना देखील पुढे जाण्यासाठी मदत करतात. त्यांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात.

‘पिक मी’ (Pick Me) संस्कृती कशासाठी?

‘Pick Me Girl’ म्हणजे अशी स्त्री जी पुरुषांच्या नजरेत ‘वेगळी’ दिसण्यासाठी इतर स्त्रियांना कमी लेखते. “मला मुलींमध्ये राहायला आवडत नाही, त्या खूप गॉसिपिंग करतात” असे म्हणणाऱ्या स्त्रिया नकळत स्वतःच्याच स्त्रीजातीला कमी लेखतात. याउलट, ‘Girl’s Girl’ मानसिकता असणाऱ्या स्त्रिया म्हणतात, “माझ्या मैत्रिणी माझी ताकद आहेत आणि मी त्यांच्यासोबत सुरक्षित आहे.”

महिला दिन म्हणजे केवळ सवलती, गिफ्ट्स आणि शुभेच्छांचा दिवस नाही. ज्या दिवशी, आई, बहिण, सासू, नणंद, मैत्रीण, जाऊ, व्यावसायिक सहकारी अशा नानाविध भूमिकेतल्या स्त्रियांना एकमेकींबद्द्ल सुरक्षित वाटू लागेल, ज्या दिवशी या नात्यातल्या स्त्रियांमधली ईर्ष्या संपून प्रेम निर्माण होईल, जेव्हा स्त्रिया एकमेकांना स्पर्धक म्हणून बघण्याऐवजी सहकारी म्हणून पाहतील तो खऱ्या अर्थाने महिला दिन असेल. कारण स्त्रिया जेव्हा एकमेकींना आधार देतात तेव्हा त्या एक अशी ‘इकोसिस्टम’ तयार करतात जिथे कोणालाही कोणाची भीती वाटत नाही. ‘She believed she could, so she did’ हे वाक्य प्रसिद्ध आहेच, पण त्याला ‘Because her friends cheered for her’ ही जोड मिळाली की त्याचे महत्त्व दुप्पट होते. जेव्हा स्त्रिया एकमेकींना पाठिंबा देतात, तेव्हा त्या केवळ एका संस्थेची, कुटुंबाची, समाजाची प्रगती करत नाहीत, तर त्या येणाऱ्या पिढीसाठी आदर्श निर्माण करतात. “ मी संघर्ष केला म्हणून तूही केलाच पाहिजे ” हा विचार सोडून “मी संघर्ष केला. निदान तुला तरी तो करावा लागू नये “ हा विचार करणे म्हणजे खरा स्त्रीवाद आहे. या महिला दिनी ‘हॅप्पी विमेन्स डे’ म्हणण्याआधी स्वतःला विचारा…“ मी ‘गर्ल्स गर्ल’ आहे का..?





आवडलेले काही …




यावर आपले मत नोंदवा