विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

सृष्टीज्ञान ते तंत्रज्ञान :

प्रवास गतीचा की अधोगतीचा ?

कृष्ण देई सृष्टीज्ञान, आत्मभान

फिके त्यापुढे सारे तंत्रज्ञान !

जो देतो दीक्षा त्यालाच हक्क फक्त घेण्याची परीक्षा !

•|ॐ|•

कृष्णमर्म

कृष्ण असा एकदा पटला की
पूर्णपणे स्वीकारावा लागतो
थोडं तुझं… थोडं माझं…
असं नाही चालत त्याला

स्वीकारायचा पूर्ण कृष्ण
समर्पित राहायचं परिपूर्ण
अन् सोडवायचे सारे प्रश्न

करत भक्तियुक्त ज्ञानयुक्त कर्म
प्राणपणाने पाळावाच स्वधर्म
ना दुखवावे कधी कोणाचे वर्म
हेच आहे जीवनाचे कृष्णमर्म!

संपूर्ण समर्पण!
शुभं भवतु!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!



कृष्ण-कबुतर


अरुणाताई , वरील कार्यक्रमात आपली भेट झाली आणि मूर्तिमंत सुसंस्कृततेला भेटल्याचे सुख मिळाले. धन्यवाद!

कृष्ण किनारा – अरुणा ढेरे प्रकाशक – सुरेश एजन्सी, पुणे. पहिली आवृत्ती जानेवारी 1992 बारावी आवृत्ती फेब्रुवारी 2024 किंमत 190 रुपये

अर्पण पत्रिका
स्त्री-पुरुषांमधील सर्जक, सुंदर आणि समर्थ नात्याला –

हे का लिहिलं – लेखिकेचं मनोगत –

परंपरेचे जग किती अद्भुत आहे हे अप्रतिम अशा उपमांनी, स्वतःच्या प्रसन्न लेखणीने व्यक्त करून लेखिका सांगतात. या पृष्ठभागावरच्या नवलाई खाली तळघरंही आहेत अंधाराची आणि त्यातलं एक मला थोडंसं दिसलं. पुष्कळ बायका तिथं मरून पडलेल्या मी पाहिल्या. कुणाच्या गळ्याला
देवत्वाचं नख लागलेलं,तर कुणी पातीव्रत्याचं विष प्यालेलं, कुणी निरागसतेचाच कलंक लागून मेलेली तर कुणी समाज पुरुषाच्या कठोर मिठीत घुसमटून गेलेली. काही झगडल्या होत्या, काही ताठ मानेने जगल्या होत्या, काही अबोल सोसणाऱ्या होत्या.

या तळघराच्या अंधारातून वेळी -अवेळी येणारा मृत्यूचा वास त्यांना अस्वस्थ करून टाकतो. कधी कोणी नाटक सिनेमातून भेटतं, कधी कथा कादंबऱ्यातून आणि कुणीतरी चक्क आपल्या ओळखीचं जवळचं माणूस झालेली ! अनुभवाच्या या अस्वस्थतेतून बाहेर येण्यासाठी म्हणून हे त्यांना लिहावं वाटलं.

…. कुंती, द्रौपदी महाभारतातल्या आणि राधा भागवत प्रेरित पुराणातली. तिघींच्या ‘बाई’ असण्याबद्दल मी लिहिलं तरी कृष्ण तिथे आलाच, पूर्ण पुरुष म्हणून. तो येणं मला स्वाभाविक वाटलं. म्हटलं तर या बायकांच्या आयुष्यातून कृष्णाच्या त्या अथांग व्यक्तित्वाचा किनारा कुठे दिसतो का, याचा हा अस्पष्टच शोध असू शकतो. आणि म्हटलं तर या बायकांच्या अस्तित्वाशी असलेल्या काजळकाळया अंधाराचाही.

गुह्यं ब्रह्म तदिदं ब्रवीमि ।
न हि मानुषात् श्रेष्ठतरं हि किंचित् ।।

(महाभारत, शांतिपर्व, १८०.१२)

मी तुम्हाला हे गहन तत्त्व सांगतो की, या जगात माणूसपणाहून अधिक श्रेष्ठ असे काही नाही.


राधा मला उमजलेली की भावलेली ? _ वृंदा आशय

अरुणा ढेरे लिखित ‘कृष्णकिनारा’ या पुस्तकामध्ये राधा, कुंती आणि द्रौपदी अशा ओळीने तीन दीर्घकथा यामध्ये आहेत –

इथे मांडत आहे मला आकालन झालेली राधा.

छान पैकी मोडतोड झालेल्या गच्चीमध्ये खुर्ची टाकून सांजवेळी बसलेली आहे. मोबाईल मध्ये सहा वाजून तेरा मिनिटे झाली आहेत. राधेचं नाव घेता क्षणी असा काही मंद वारा वाहायला लागलाय की जणू काही या राधेचं नाव घेताच माझा कृष्ण अवतीर्ण झालाय. या सनातन आणि शाश्वत नात्याला विनम्र अभिवादन ! कसं प्रसन्न झालं आहे क्षणार्धात वातावरण. पक्षांचे थवे उडायला लागलेत. सारं काही कसं ‘कृष्णमय’ वाटतंय.

या कथेची सुरुवात होते ती म्हातारी झालेली ‘राधा’ कृष्णाला भेटायला येते, या प्रसंगांने. काही सांगूच नये, फक्त अनुभवावा असा त्यातल्या साधेपणासह अतिकोमल, अतिमधुर असा हा सुरेख प्रसंग. राधा झरकन भेटून जाते आणि कृष्ण कमालीचा थकतो.

… अजूनही विश्वास बसत नाही की, ती आली होती इथे…. कृष्णानं पेला हातात धरत स्वतःशीच एक सुस्कारा सोडला. पण हा रिकामा पेला तेवढं सांगेल…..’तू दिलंस तर विष देखील घेईन मी कृष्णा!’ म्हणायची नेहमी, आणि आत्ता तरी काय दूध थोडंच प्यायलं तिनं?…

कृष्णाची अशी ‘राधामय’ मनोवस्था असतानाच रुक्मिणी आत येते. कृष्णाचं मन जाणणार नाही तर ती रुक्मिणी कसली?

… गवाक्षातून काळया वाऱ्याचा एक झोत झणदिशी आत आला आणि रुक्मिणी शहारली. (झणदिशी हे जे गतिवाचक विशेषण लेखिकेने वाऱ्याच्या झोतासाठी वापरलेलं आहे, हे रुक्मिणीला आपली सवत येऊन गेल्याचं जे काही खोलवर जाणवलं ते केवळ अप्रतिम पद्धतीने व्यक्त करतं)

कोण येऊन गेलं याची चौकशी रुक्मिणी करते आणि कृष्ण उत्तरतो ‘राधा!’

पुन्हा त्या दोन शब्दांचा अस्पष्ट उच्चार करताना रुक्मिणीचा श्वास मध्येच अडकला. वीज झोंबावी तशी तिची अवस्था झाली. हातापायातलं जणू बळच गेलं. आधारासाठी हात धरावेत तसे हात हवेतच हलवून ती खाली बसली. कितीतरी वेळ लागला तिला पुन्हा गेलेला धीर गोळा करायला.

इथे कथा पुढे फ्लॅशबॅक पद्धतीने येते. कृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या विवाहानंतरच्या गाढ प्रणयाच्या ज्या रात्री असतात अशाच एका रात्री तिला राधेविषयी प्रथम कळतं.
… ती तिला झालेली राधेची पहिली ओळख होती हे मागाहून तिला कळलं, त्या ओळखीचं वर्णन करताना अरुणाताई लिहितात –
“फक्त डोळे मिटून घेताना त्याचा जो चेहरा तिनं क्षणभर पाहिला त्या चेहऱ्यावर होता एक अतिकोवळा भाव. जन्मभर लक्षात राहावा असा भाव. दुःख नाही म्हणता यायचं त्याला…. ते काय होतं कोण जाणे!”

तशा कित्येक रात्री रुक्मिणीनं कृष्णाला पाहिलं होतं. एकट्यानं अंधारात विरघळताना पाहिलं होतं. पण तिने त्याला कधीही काही विचारलं नव्हतं. एवढंच कशाला ‘राधा’ या शब्दाचा उच्चार त्याच्या इतकाच तिलाही कधी सोपा वाटला नव्हता. दोघांपैकी कुणीच तो शब्द कधी उच्चारला नव्हता. अगदी आजपर्यंत.
हे कृष्ण रुक्मिणीच्या नात्याचं जे एक विश्वासू आणि समंजस मन आहे त्या मनाला हात घालून लेखिका वर्णन करतात आणि आपण भावविभोर होतो.
………………………………………

रुक्मिणीने ‘राधा’चं नाव एकदा द्रौपदी सोबतच्या भेटीत उच्चारले होते. त्या भेटीची तिला आठवण होते. रुक्मिणी जेव्हा ‘कृष्ण’ माझाच कसा आहे हे द्रौपदीला अगदी भरभरून सांगत असते ; तेव्हा आपण जे सांगतो आहोत ते द्रौपदीला खरं वाटत नाही, असं तिच्या लक्षात येतं. आणि द्रौपदी जेव्हा, “तसं नाही, तुमच्या आत्मविश्वासाचं उलट कौतुक वाटतं आहे मला. किती तृप्त आहात तुम्ही.”; असं तिला सांगते तेव्हा रुक्मिणीला जाणवतं, माझं प्रेम, शृंगार, संसार हे सगळं हेवा करण्याजोगं असलं तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी चुकत आहे आणि ती द्रौपदीला विचारते, “खरं सांग, आता तुझ्या मनात काय विचार आला द्रौपदी? द्रौपदी सांगते ‘तिचा – जिनं कदाचित् फार पूर्वीच आपल्या पदरात सगळं बांधून घेतलं आहे.’
..‌‌………………………

संध्याकाळी राधेची आणि कृष्णाची समुद्रावरच्या मंदिराजवळ भेट होते. खरंतर या उत्कट भेटीला शब्दांनी स्पर्शच करू नये असं वाटतं. पण अरुणाताईंच्या लेखणीने या भेटीचा सहज सुंदर वर्णन केलेलं आहे, हे शिव धनुष्य लीलया पेललेलं आहे ; ते पाहून (हो. आपण कथा वाचत असलो तरी जणू काही राधाकृष्ण आपल्यासमोर एकमेकांना भेटत आहेत असाच भास निर्माण होतो.) शब्दांच्या कोमल सामर्थ्यापुढे आपण विनम्र होतो.

राधेचा निसर्ग संवाद आणि स्वतःच्या शाश्वत रूपाचा तिला लागणारा शोध हा मुळातूनच वाचण्यासारखा आहे. कृष्णाशी संवाद साधत असताना ती बासरीची आठवण काढते तेव्हा कृष्ण म्हणतो –

…. गोकुळानंतर पुन्हा कधी बासरी आलीच नाही माझ्या हातात. मला वाजवायची नव्हती, म्हणून मग मिळविलीही नाही मी ती फार अट्टहासानं.

…. किती अलवार बोलला कृष्ण. आपण आजही बासरीला कृष्णापासून वेगळं करू शकत नाही. त्याच्या हातात बासरी नसली की हा सुदर्शन घेणार की काय हे भय मनाला व्यापतं. आपल्यासाठी ‘कृष्णबासरी’ ही अनेक अर्थवलयं घेऊन मनात फुलते ; कृष्णाने मात्र अत्यंत प्रामाणिकपणाने बासरीला राधेचा समानार्थी शब्द मानला.

खरं म्हणजे कृष्णाला त्याच्या आयुष्यात राधा गवसत राहिली अनेक जणींमध्ये, अनेक ठिकाणी! तो हे सारं राधेजवळ मनमोकळेपणानं मान्य करतो, रुक्मिणीला रथातून घेऊन येताना रुक्मिणी एका स्वप्नील तंद्रीत होती. पण तिचा तो धुंद चेहरा पाहून कृष्णाला मात्र आठवली ‘राधा’ स्त्री किती उत्सुक होऊ शकते, किती अर्पण करू शकते आणि भावनेच्या एका विलक्षण झोक्यावर किती उंच टोकाला जाऊ शकते, हे कृष्णानं फक्त राधेत पाहिलं होतं. त्याला मान्य होतं रुक्मिणीची धुंदी खोटी नव्हती पण त्याला वाटलं राधेइतकी धुंदावलेली दुसरी त्यानं कुणीही पाहिली नाही अगदी आजपर्यंत. तशी टोकाला जाऊनही न घाबरणारी न कोसळणारी तू! आणि मनात आणलं तर सोसण्याच्या कमाल मर्यादेपर्यंत स्वतःला ताणणारीही तूच राधे!त्याच्या या कथनानं साहजिकच राधा सुखावते.
……………………………………….

अरुणाताईंच्या लेखणीचं हे काव्यात्मसौंदर्य अगदी सहजपणे चिंतन सौंदर्याकडे वळतं. संवाद साधता साधता थांबून कृष्णाची नजर दूरवर जाते आणि दाट काळोखात उसळणारं पाणी पाहताना त्याला वाटतं –

..‌. एकट्या राधेच्याच सोसण्याचा प्रश्न नव्हे हा. प्रत्येकीलाच सोसावा लागणार हा अटळ भोगवटा आहे. केव्हापासून बाईच्या पदरात हा आला ? कदाचित सृष्टीचा जन्मच तसा झाला असणार. माती त्याची पहिली बळी असेल किंवा कदाचित् सर्जनाच्या वरदानाचीच ही दुसरी बाजू असेल चटका लावणारी बाजू…

…………………………………..

कृष्ण राधेला द्रौपदीबद्दल काही सांगू इच्छितो. त्यानं स्वतःची काही सांगण्याची इच्छा व्यक्त करता क्षणी ‘तू कृष्णेबद्दल सांगणार आहेस मला? हा प्रश्न विचारून राधा कृष्णाला चकित करते. राधेला सुवर्णकंकण दिलं होतं ती आठवण कृष्णाला येते. ‘हे मला द्यावं असं तुला वाटलं, यात केवढं सुख आहे माधवा !’ ही राधेची प्रतिक्रिया खरं म्हणजे प्रतिसाद तिची तृप्तता व्यक्त करणारा. मात्र त्याच आठवणीतली काळजाच्या वेदनेची बाजू वाचकाला अबोल आणि अंतर्मुख करून जाते.

…. त्याला वाटलं एका क्षणी राधेच्या प्राक्तनाकडे त्यानं सरळ पाठ फिरवली खरी , पण मग फिरून द्रौपदीच्या रूपानं, राधेचाच भोग त्याच्यापुढे विराट होऊन उभा ठाकला, त्यानं कृष्णाला तसं पाठ फिरवून जाऊ दिलं नाही ; हे विवेचन अंगावर केवळ काटा आणत नाही तर ‘भोग भोगल्यानेच संपवता येतात’ हे कटू वास्तव सत्य अधिक प्रखरपणे घेऊन आपल्यासमोर उभे राहतं. तसंच द्रौपदी कृष्णाला जे म्हणते, ‘तू आलास तो भक्ताच्या हाकेला धावून जाण्याचं तुझं ब्रीद पाळण्यासाठी. माझ्यासाठी नव्हे.’ तिचे हे उद्गार माणसाला एका विचारव्युहात नेऊन सोडतात.

कृष्ण द्रौपदीला वनामध्ये भेटतो आणि युवराज्ञी द्रौपदीपेक्षा तिचं ते अलंकारविहीन रूप त्याला अधिक भावतं. या प्रसंगाच्या निमित्ताने कृष्णाच्या स्वगतातून लेखिकेने व्यक्त केलेलं पुरुषमन तर केवळ अप्रतिम –

….. बहुतेक पुरुषांना स्त्री आवडते ती अशीच. तिचा अभिमान, तिचा तेजस्वी वावर, तिचा लख्खपणा थेट सोसत नाही पुरुषाला. ती थोडी मऊ असावी , आपण तिच्यासाठी जे केलं त्यानं तिचा कडकपणा थोडा मोडावा, सूत जरा तलम व्हावं , सोसण्यानं तिला जरा दुखवावं, असं तर मला नाही ना वाटत? – मी खरंच चमकलो.

कृष्णा, तू करू शकलास रे आत्मपरीक्षण. मात्र तुझा हा जो शाश्वत वारसा पिढ्यान पिढ्या पुरुषांना मिळालेला आहे ना, त्यानं बाईचं काय होत असेल रे? ….. सारं सोसण्याच्या निमित्ताने तिला पुन्हा यावं लागतं तुझ्यासारख्या एका पुरुषाकडेच ! कृष्णा, बाईच्या या दुर्दैवाला अंत नाही का रे?
………………………………..

राधाचं समंजसपण आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देऊन जातं. जणू काही घडून गेलेल्या घटनेला असंख्य बाजू असतात. मात्र तिच्या घडून जाण्याला पर्याय नसतो हे सांगताना ती म्हणते –

” दरवेळी आपल्याला कापतं नव्या बाजूच्या धारेनं शहाणं व्हायचं म्हणजे तरी काय रे दरवेळी नवी बाजू, नवी धार.”

कृष्ण इथे सांगतो, ‘पण जखमांचे अर्थ दरवेळी तेच नसतात राधिके. म्हणून मग त्या जखमेचं काय करायचं याचा निर्णयही दरवेळी वेगळा असतो. तिला नकार द्यायचा, की तिचा स्वीकार करायचा? तिचा प्रतिशोध घ्यायचा, की तिला क्षमा करायची, हे सगळं दरवेळी निराळ ठरतं आणि ते ठरवताना मात्र त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आपण असतो. आपणच.’

कृष्णाच्या या विवेचनाच्या निमित्ताने राधा त्याला विचारून घेते, ‘तू कर्णाला द्रौपदीची लालूच दाखवलीस त्याची जबाबदारी कोणाची आहे रे? कृष्ण जबाबदारी स्वीकारून क्षमा मागतो. मात्र त्याला क्षमा करणाऱ्या आपण कोणी नाहीत हे राधेला आधीच उमजलेलं असतं. काय हे व्यक्तित्वाचं‌ विसर्जन! राधा त्याला सांगते कृष्णेपेक्षा म्हणजेच द्रौपदीपेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजते. कारण तू निघाला तेव्हा माझ्याकडे वळूनही न पाहता गेलास, पण माझ्याजवळ एक जुन्या क्षणांची पुरचुंडी होती दिवस काढायला आणि त्या क्षणांना तू मोहोळ होण्याची जादूही दिली होतीस. माझ्याजवळ एक विरहाचं दुःख होतं लसलसणारं आणि तू माझ्यासाठी कुठेतरी आहेस जगाच्या पाठीवर याचा निदान दिलासा होता.

राधा असं म्हणते खरी आणि आपल्याला जाणवतं कृष्ण हे मोहाचं एक मोहोळ आहे. हे मोहोळ उठून त्यानं डंख मारण्याआधी कृष्णाचाच मोह सोडून दिलेला बरा.

महाभारताच्या युद्धामध्ये जिच्या केसांची आठवण ठेवून कृष्ण शिष्टाईला गेला होता, जिच्या मनात आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघाला होता तिचाच की रे सौदा केलास ! तिच्यासाठी हा अपमान केवढा असेल ! आणि यासाठी तू युद्ध, धर्म, राजनीती यांच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या असशील पण तिला या प्रसंगाचा अर्थ समजलाच नसेल का तिनं तेही गिळलं माधवा…

द्रौपदीचं मन जाणलेलं राधामन आपण वाचतो आणि एका स्त्रीला दुसरी स्त्री किती कळू शकते ती किती कळवून घेते यानं आपण थक्क होतो.

ती म्हणते प्रेम फार जहरी असतं रे… फार कडू असतं गिळायला……. मला विचार. तुला गिळता गिळता माझा रंग बदलून गेला आहे बघ . पाहतो आहेस ना?

राधा हे बोलून जाते खरं. आपल्याला मात्र लक्षात यायला लागतं कृष्ण हा ‘प्रेम स्वरूप’ आहे तर राधा ‘ज्ञान’ आहे; हे लक्षात येतं आणि आजवरच्या आपल्या पारंपरिक समजुतीला एकदम धक्का बसतो. कारण भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण कृष्णाला ज्ञानस्वरूप मानलेलं आहे तर रासलीलेच्या माध्यमातून राधाला कृष्णाची युगायुगांची प्रेमिका मानलेलं आहे. त्यांच्या भूमिका बदलण्याचं काम ही कथा फार उत्तमपणानं करते. इथे कदाचित सातत्याने ज्ञानध्यास घेतलेली लेखिका व्यक्त होते की काय असाही एक प्रश्न मनाला स्पर्श करून जातो. राधा-कृष्णाचा एकत्रित विचार करताना यांचं नातं म्हणजे ‘ज्ञानाने भक्तीवर केलेलं प्रेम आहे’, असं एक नवंच सूत्र गवसतं. शिवाय याच्यावर कहर करत राधेला, लोक कृष्णाचा ‘पूर्णपुरुष’ म्हणून विचार करतील याचं जे हसू येतं, त्यातली मार्मिकता वाचकाच्या मनाला अबोलपणे स्पर्श करून जाते. ती पुढे म्हणते,
” …..तुझ्या पूर्ण होण्याशी माझा अगदी संबंधच नाही राहिला, ही किती गमतीची गोष्ट आहे ! इतक्या अलिप्तपणे पूर्ण पुरुष होत गेलेल्या तुला मी पाहू शकते आहे, याचंच मला हसू आलं तुझ्या फक्त अपुरेपणाशीच माझं नातं होतं. सत्य समजलं म्हणून हसू आलं”

कृष्ण मात्र तिला समजावून सांगतो, ती घटनेची अजूनही एकच बाजू पाहते आहे. आपलं स्वतंत्र जगणं अटळ आणि आवश्यक आहे, हे तू जेव्हा सहज स्वीकारलंस ना , तेव्हाच माझ्याबरोबर पुरेपणाशी तुझाही वायदा होऊन गेला हे तुला कळलंच नाही बहुदा. मग (पुरेपणाच्या) एका बिंदूकडे आपापल्या आयुष्यातून सरकत जात त्या बिंदूवर आपण भेटणारच होतो.

राधा त्याला विचारते मग तुला हे सगळं आधीच ठाऊक होतं तर मी आल्याचं कळल्यावर चकित का झालास तू? बिचारा प्रतिहरी मला म्हणाला, ” देव लगेच आत बोलावताहेत तुम्हाला. अगदी नवल वाटलं त्यांना तुमचं नाव सांगितल्यावर. कोण तुम्ही त्यांच्या?” कृष्ण अगदी सहज म्हणतो, ” मग सांगायचंस, ‘मी पहिली बायको आहे त्यांची आणि आपला वाटा मागायला आले हक्काचा.’ पण मी चकित झालो अगदी वेगळ्या कारणानं. आपली भेट अटळ आहे, याची कल्पना मला होती, पण तुला नव्हती. आणि स्वतः पुरेपणाच्या बिंदूवर आलो आहो, याची जाणीव देखील तुला नव्हती. अजूनही नाही. तरी तू आलीस. म्हणून मला नवल वाटलं, राधे. पण एक सांगू ? तुझा हा भाबडेपणा , जगण्यातला हा स्वाभाविकपणा यांनीच मला तुझ्यापाशी बांधून घातलं राधे.” (आपल्या मनात वाक्य उमटतं – तुझ्याशी बांधून घेतलं राधे.)

राधा मात्र कृष्णावर अवचितपणे खूप रागावते. तिला त्यानं ‘बायको’ म्हणलेलं मुळीच आवडत नाही. “इतक्या वर्षानंतर , स्वतःला पूर्ण म्हणवताना तू माझं सगळं कोणत्या पातळीवर नेऊन ठेवतो आहेस, हे समजतं आहे का तुला? थट्टेतही हे बोलू नये रे आपण.” या संवादातून राधाची तीव्रता जीवाभावे व्यक्त होते. कृष्ण पार प्रांजळपणे म्हणतो, “रागवू नकोस अशी. दुखू पण नकोस. फार वर्षांनी आज मी माझं मन मोकळं करतो आहे. हे तुला नाही का समजत?”

राधा म्हणते , “नाही कृष्णा, इतका भोळा, इतका सरळ नाहीस तू. कधीच नव्हतास तसा. तू तर आत्ता उट्ट काढलंस. मी तुझ्या द्वारकेत असं येणं, तुझ्या राजमहालात तसं येऊन उभं राहणं, यानंच मी तुला दुखवलं. मला माहीत आहे ते. तू त्याचं उट्ट फेडलंस.”

त्यानंतर जो राधेचा आणि कृष्णाचा संवाद होतो त्यामध्ये कृष्ण तिला विषादाने विचारतो, “तू अजून का जुने खेळ खेळतेस?” . राधा ही ते मोकळेपणाने मान्य करते आणि त्याही पुढे जाऊन ती सांगते मला कळतं रे की असे भास होणं बरं नव्हे पण कधी कधी वाटतं की, अशा भासांच्या खेळात तेवढे मी खरीखुरी जगते. तिथल्या तेवढ्या आनंदावर इतर सगळं तरुन जातं. तुला नाही रे कधी असं होत?”

कृष्ण म्हणतो, “…… माझ्या सगळ्या जगण्याला व्यापून उरण्याएवढं गोकुळ मोठं नव्हतं राधे ! आणि हे मी ओळखलं, तेव्हाच मी त्याच्या भासातून सुटून गेलो होतो.”

यावर राधा म्हणाली,” तुझा विचार जेव्हा मी करायचे ना, तेव्हा तेव्हा फार बरं वाटायचं……… मी काय केलं इतके दिवस माहीत आहे? मी माझं मन पाठवून दिलं तुझ्याबरोबर. दरवेळी तुझ्याबद्दलचं काही ऐकलं की, मी तुझ्या वागण्याचे, बोलण्याचे, प्रतिक्रियांचे अर्थ लावायची. मनानंच तुझं मन जाणून बघायची.”

राधेला जे कळतं माझी मूळं तर गोकुळातच आहेत, आणि त्यामुळे आपण कृष्णाबरोबर गेलो नसतो. तिचे ते उत्कट संवाद अरुणाताईंनी फार सुरेख पद्धतीने व्यक्त केलेले आहेत. खरं म्हणजे ती इतकी अंतरीची आणि प्रामाणिक भाषा आहे की तिथे भाषेला कोणतंच विशेषण लावावं असं वाटत नाही.

कृष्ण तिला सांगतो, ‘पण तू गोकुळासकट वाढलीस राधे. त्या एवढ्याशा जगासकट उंच उठलीस. इथवर पोचलीस.

” ते तुझ्या दुःखाचं देणं आहे बाबा. असलंच काही तर तुझंच देणं आहे.” राधा मनापासून म्हणाली.

त्यानंतर कृष्णा सोबत वाळूमधून मूकपणानं चालताना तिला तिचा नवरा अनय याच्यासोबतचा एक प्रसंग आठवतो. मला त्या प्रसंगापेक्षाही महत्त्वाची वाटते ती राधेची प्रतिक्रिया
… आत्ता तिला अनयची आठवण झाली आणि वाटलं अनयमध्ये आपण पुन्हा कृष्णाला पाहण्याचा अट्टाहास केला नाही हे आपलं शहाणपण खरं… (अरुणाताईंनी अनयाबरोबर असा उल्लेख केलेला आहे. मला मात्र तो अनय बरोबर असाच लिहावासा वाटतो. कदाचित मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या मधल्या मराठी भाषेची ती तफावत असावी.)
…………………

कृष्ण तिला विचारतो, “एक सांग, मधल्या इतक्या वर्षात सुखी होतीस?”
इतका बालीश प्रश्न तिचा माधव तिला विचारू शकतो हेच मुळी राधाला पटेना. त्यावर आपण सुखी होतो हे सांगताना तिनं ताडताड दिलेली उत्तरं खरं म्हणजे स्त्री जातीचं वास्तव व्यक्त करणारी आहेत.

‘आणि नव्हतीसही.’कृष्ण हळूच म्हणाला. (मला वाटतं कृष्ण इथं राधेच्या वर्मावर बोट ठेवतो)

“फार भाबड्या कारणासाठी नव्हतेही- म्हणजे मला ती दोन्ही प्रेमं – ती दोन्ही सुखं घेऊन मिरवता नव्हतं येत. वाटायचं कालिंदीच्या त्या रायांमधून उंच आवाजात गात सुटावं. गाईच्या गळ्यातल्या घंटांनी गावं. आम्हा सगळ्यांच्या पायांतल्या पैंजणांनी गावं. हातांतल्या खळखळ कांकणांनी गावं – सगळ्यांनी नुसतं माझं सुखच गात राहावं.”
कृष्ण चकित होऊन तिच्याकडे पाहात राहिला.
“पाहतोस काय असा? खरंच तसं करता येत नाही, म्हणून खूप खंत केली आहे मी! पण मग दिवस जात राहिले तसं कळलं मलादेखील. कळलं की, सत्य माहीत असावं मनातून. जीवापाशी नेहमी असावा त्याचा उलगडा. पण ते उच्चारायचं असतं अगदी कधीतरी. वेळ आली तरच. तशी वेळ आज आली. शेवटी आज आली.”

कृष्ण फार सुंदर सांगतो यावर,” तू स्वतःच तुझ्या सुखाचं मिरवणं आहेस बये. हे तुला कळतं तर तू खंत केली नसतीस.

हे तिला स्वतःला नाही पण यशोदा मातेला कळालं होतं, हे एका प्रसंगातून राधा कृष्णाला सांगते. यशोदा माता जेव्हा मृत्यूशय्येवर असते तेव्हा ती राधेला फार कळकळीने सांगते, ” पोरी, लक्षात ठेव. एक तू आणि एक मी. त्याला आपल्याशिवाय जगात दुसरं कुणी त्याचं म्हणून नाही. आपण दोघींनी केला त्याला एवढा ताडमाड उंच. आपल्यातून वाढला तो. नाही म्हणत मान हलवू नकोस. तुला कळत नाही. आता ऐक. मी काही त्याला परत पाहणार नाही. इच्छाच नाही उरलेली. पण तुला जर कधी काळी वाटलं….. वाटलं त्याला बघावंसं, तर पाय मागे घेऊ नको. मान – अपमान ठेवू नको. लक्षात ठेव की, ते उपकार नसतील त्याचे ! त्याला भेटलीस तर त्यालाच सुखानं मरता येईल.”

त्या भेटीमध्ये यशोदेने कृष्णाचं आंगडं-टोपडं, कुंच्या, वाळे – बिंदल्या असलेलं एक गाठोडं राधेकडे सुपूर्द केलं. तिनं हे न सांगताही सहाजिकच कृष्णाला ते कळतं. गाठोड्यात काय होतं हे विचारलं नाहीस कृष्णा , असं राधा म्हणता क्षणी , कृष्ण म्हणतो, “माहीत आहे मला, माझं लहानपण तिनं तुझ्या स्वाधीन केलं राधे.” तो राधेला म्हणतो,”… तूही यशोदेइतकी मोकळी होऊ नाही शकलीस. ती तिच्या प्रेमातूनही मोकळी झाली. माझ्यावरच्या तिच्या प्रेमाला अगदी कोणतंच बंधन उरलं नाही. ती तशी एकमेव बाई. माझी आई होती.”

हे खरं असल्याचं राधा पुटपुटत मान्य करते आणि म्हणते, ” मला माझ्या स्वतःच्या प्रेमाचाही एक वेढा पडला आहे. म्हणून तर आले इथवर. त्यातून मोकळं होण्यासाठी आले. पण कृष्णा, एक लक्षात ठेव. ती आई होती. बाई आई होते तेव्हा तिला मुक्तीची वाट जेवढी जवळ असते ना, तेवढी इतरांना नाही. हे सगळ्या जणींना न उमगलेलं सत्य आहे. पण जगून जगून सगळ्या बायांनी किती मऊ, किती उबदार केलं आहे त्याला! त्याची घोंगडी माझ्या अंगावर येती, तर मीही यापूर्वीच सुटले असते. पण तसं नाही घडलं. मी तशीच उरले. कुडकुडत राहिले.’

दुःखाची नस राधेच्या शब्दांमधून थाड्थाड् उडू लागली आहे हे कृष्णाला कळतं. ‘राधेs !’ अशी सांत्वनाची हाक तो मारतो आणि त्या हाकेने राधा अधिकच दुखरी होते. ती मनोमन कृष्णाला, ‘पुढच्या जन्मी पोटी ये कृष्णा! अशी तळमळीची प्रार्थना करते. (इथं आपल्याला मातृत्वाचं सुख आणि दुःख दोन्हीही कळायला लागतं.)

कृष्ण सारं जाणतो आणि एवढेच म्हणतो, “माझा शेला तुझ्या अंगावर आहे, तरी कुडकुडतेस? नाही ना? मग आता शांत हो राणी. मी आहे ना तुला! मी आहे.”

कथा इथे संपत नाही. पण मला मात्र इथेच थांबावंस वाटतं आहे. पुढच्या कथेबद्दल वाचकांना मी एकच नम्र विनंती करेल. आपण कथा अवश्य वाचावी. जमलं तर त्यातलं भावसौंदर्य समजून घ्यावं. पण उगाच नसते प्रश्न निर्माण करून राळ उठवू नये एवढेच.

अरुणाताई,
गेले तीन दिवस मी तुमच्या राधेसोबत जगती आहे. खरंच सांगते, तुमच्या या कथेने स्वतःलाच भेटण्याचं निर्मळ सुख मला दिलं आहे. माझ्या एखाद्या जरी वाक्यानं, मी चुकून जरी तुमचं मन दुखावलं असेल तर अगदी अंत:करणापासून क्षमा मागते.

श्रीकृष्णार्पणमस्तु!

…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

यावर आपले मत नोंदवा