विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

अध्यात्म हे विज्ञान आहे, अनादी _ अनंत आहे _ श्रीकृष्णार्पणमस्तु!

# कृष्ण संदेश

हृदयाला साक्ष आणि बुद्धीला प्रमाण मानून जीवनाबाबत डोळस श्रद्धा बाळगा .

अध्यात्मिकता हा भारताचा मूळ स्वभाव आहे. येऊ घातलेल्या मराठी नववर्षानिमित्त ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या शुद्ध ओढीने आपल्या संस्कृतीच्या मूळांकडे वळण्यासाठी ज्ञानोत्सव समितीतर्फे हार्दिक शुभेच्छा ! – संपादक वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!

वैज्ञानिक दृष्टीकोन

 – प्रा. सुहास पानसे, अध्यक्ष सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय

२८ फेब्रुवारी या ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’च्या आपणा सर्वांस माझ्यातर्फे वैज्ञानिक आणि तार्किक  शुभेच्छा !आजचा विज्ञान दिन फक्त विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी साजरा करायचा का सर्वांनीच साजरा करायचा हा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच उभा असतो. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी खरंतर रोजचा दिवस हा विज्ञानदिनच असतो. माझ्या मते विज्ञान दिन हा विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी किंवा अभ्यासकांसाठीच नसून तो खरंतर सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे. विज्ञान दिन हा दिवस आपण ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ जपण्याच्या उद्देशाने पाळला पाहिजे. ‘विज्ञानवाद’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या दोहोंमध्ये खूप तफावत आहे ती आज आपण समजून घेणे औचित्यास धरून होईल. विज्ञानवाद करायचा असेल तर आपल्याकडे विज्ञानाचं पुरेसं ज्ञान असणं अपेक्षित आहे. त्यासोबतच विज्ञानाचा अभ्यास आणि विद्वत्ता असणं देखील आवश्यक आहे. पण आपल्याला जर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायचा किंवा व्यवहारात वापरायचा असेल तर यापैकी तशी कशाची फारशी गरज नाही. गरज आहे तर ती फक्त ‘तर्कसंगत विचार प्रवृत्ती’ जपण्याची ! ही विचार प्रवृत्ती आपल्याला काय सांगते तर व्यवहारात आपण दररोज जी काही वर्तणूक करतो आहोत, जे काही आपण वागतो आहोत ती प्रत्येक गोष्ट एखाद्या तर्काशी सुसंगत असली पाहिजे. हे तर्क विज्ञानावर आधारित असलेच पाहिजेत हे खरे असले तरीसुद्धा त्याला प्रत्येक वेळी सिद्धता असलीच पाहिजे, असा आग्रह नसावा. बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की मी जे वागतो ते बरोबरच आहे आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरूनच आहे. पण अनेकदा असं असतंच असे नाही. अनेकदा आपण जे वागत असतो ते तर्कसंगत नसतंही. आणि जर ते तर्कसंगत नसेल तर ते विज्ञानवादी किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरून असं होऊच शकत नाही. तर्कसंगत वागणे आणि त्याद्वारे पर्यावरणाचे रक्षण करण्याचा, त्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करणे यालाच माझ्या मते ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ असे म्हणायला हवे. आणि म्हणूनच ‘विज्ञानवाद’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’  ह्या दोन्ही गोष्टी माझ्यामते सारख्याच आहेत. एखादी गोष्ट आपण स्वतः सिद्ध केलेली असेल तरच ती सत्य असते असे नाही तर ती इतर कोणी सिद्ध केलेली असेल, तर्कसंगत आणि जगन्मान्य असेल तर आपण वापरायला काहीच हरकत नाही. खरंतर हा दृष्टिकोन हजारो वर्षांपूर्वी आपल्या वेदांमधून, पुराणांमधून आणि संतसाहित्यामधून देखील सतत मांडला गेलेलाच आहे, पण केवळ त्याला वैज्ञानिक आधार नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले गेले !

मित्रांनो, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजेच विज्ञानदिन पाळणे !

विज्ञान दिनाच्या पुन्हा एकदा आपणा सर्वास माझ्यातर्फे हार्दीक शुभेच्छा !

( टीप – खरे म्हणजे भाषादिनापाठोपाठ विज्ञान दिनाचे पृष्ठ ज्ञानोत्सव मार्फत प्रकाशित करायचे होते. मात्र काही कारणाने ते राहून गेले. त्या पृष्ठासाठी मी विनंती केल्यावरून मा. पानसे सरांनी हा लेख लिहून दिला होता.आज तो सानंद प्रकाशित करत आहे. सरांचे मन:पूर्वक आभार.)


अभयदान

मला वाटले, मी झाले निर्भय !

पण कसचे काय
अन् कसचे काय ?
मनातल्या भीतीला
फुटले पाय !

कधी सावली, कधी चाहूली
पदोपदी दिसे भीती मनातली
सांगे नाते ती अंधाराशी
दचके कधी भक्क प्रकाशी !

खुल्या आकाशी
मंद प्रकाशी, मग
मी तुलाच पुसले
नक्की झाले काय?

नीरव शांततेत…
सृष्टीचाच होई कान
अन् ती ऐके, हे तर
परमेशाचे अभयदान !

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!



*क्षणोक्षणी हाचि करावा विचार*

✍️ डॉ ज्ञानेश्वर थोरात

     दुस-यांची कुचेष्टा करून स्वतःची प्रतिष्ठा वाढविणारे आपल्या देशात काही कमी नाहीत , पती मेल्याचे दु:ख नाही , सवत रंडकी झाल्याचा आनंद अधिक आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे सर्व विरोधक एकदम धुतल्या तांदूळासारखे  स्वच्छ आहेत, हा अनेकांचा भ्रम त्यांचे मातेरे करील. देव, देश आणि धर्मापायी प्राण हाती घेणारे शिवराय कोठे आणि त्यांचे विरोधक कोठे ? आदरणीय मोदींमुळे तुम्हाला काय त्रास होतो , हे प्रकट आहे आणि त्यामुळे तुमचा होणारा त्रागा स्वाभाविक आहे , परंतु देशासाठी हे सहन करावेच लागेल .”  तेरा वैभव अमर रहे मा , हम दिन चार रहे ना रहे .”

      हा देश विविधतेने नटलेल्या वैभवशाली  परंपरेचा  वारसा जतन करण्याचा सदैव प्रयत्न करत आहे परंतु स्वाभिमानाने, आत्मसन्मान गमावून नाही .परंतु ह्या ही गोष्टींचा विसर पडलेल्या तथाकथित महाभागांनी स्वतःच्या स्वार्थापोटी अनेक समस्यांना जन्म दिला आहे. त्या निपटण्यासाठी  आदरणीय मोदी, योगींना वेळ लागणारच परंतु मा भारतीची पूजा ते आपल्या सेवापूर्ण त्यागधर्माने ह्यापुढेही अखंड बांधतील ह्यात सुतराम शंका नाही , हे आता संपूर्ण  देश अनुभवत आहे.


श्रीकृष्णार्पणमस्तु!


यावर आपले मत नोंदवा