विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

चैत्र पाडवा _ वाढवो गोडवा !


https://share.google/T7b2ZDBDEjmswwn7c

आठवणीतली गाणी



शब्दवेध

की

कृष्णसंदेश

‘स्त्री’ आणि ‘रात्री’

मन जरा विचलित होतं. तब्येत साथ देत नव्हती. कुठेच न रमणारं मन पुस्तकात तरी रमेल, असं वाटलं. समोर पुस्तकांचा गठ्ठा ठेवलेला होता. त्यातून आपसूकच दोन-तीन आवडीची पुस्तकं बाजूला काढून घेतली. कारण नक्की कोणत्या पुस्तकात मन रमेल हे सुद्धा ठरवता येईना. खरं म्हणजे मला एका वेळेला दोन-तीन पुस्तकं वाचायला आवडतात. म्हणजे अगदी एका वेळी दोन-तीन असं नाही. मात्र एखाद्या पुस्तकातली कथा वाचायची, एखाद्यातली कविता वाचायची, एक दिवस अमुक पुस्तक वाचायचं, दुसऱ्या दिवशी तमुक वाचायचं हा माझा आवडीचा छंद. (अर्थात या गतीने आणि पद्धतीने जे पुस्तक जेव्हा पुरे व्हायचं तेव्हा होईल, त्याची मला चिंता नसतेच. पुस्तक मला आनंद देतं तोपर्यंत मी त्याच्या सोबत असते.) त्यामुळे अशी दोन-तीन पुस्तकं माझ्या बाजूला पलंगावर घेतल्याबरोबर मन थोडसं उल्हासितच झालं.

हातामध्ये आधी वाचायला घेतलं ते अरुणा ढेरे यांचं ‘सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा’ हे पुस्तक. अनुक्रमणिकेमध्ये नेमकी पहिली कोणती कथा वाचावी या विचाराने नजर टाकत होते. एवढ्यात ‘अज्ञात झऱ्यावर रात्री’ या कथाशीर्षकावर नजर खिळली. पण गंमत म्हणजे माझ्या मनामध्ये उमटलेले शब्द होते ‘अज्ञात झऱ्यावर स्त्री’. तेव्हा स्वाभाविक कुतूहलाने एकोणावीस कथांमध्ये हीच कथा पहिली वाचावी असं निश्चित झालं. त्याचा पृष्ठ क्रमांक पाहण्यासाठी म्हणून पुन्हा त्यावर नजर टाकली आणि लक्षात आलं अरे कथा शीर्षक आहे ‘अज्ञात झऱ्यावर रात्री’. आपसूक उद्गार निघाले अरे बापरे ! हे उद्गार बाहेर पडता पडताच ‘स्त्री’ आणि ‘रात्री’ या शब्दांनी मात्र मनामध्ये पंख पसरायला सुरुवात केलेली होती. या शब्दातल्या नादमयतेने आणि या शब्दातल्या अर्थसाम्यतेने सुद्धा. तेंव्हा त्याचाच आत्ता वेध घेत आहे.

‘स्त्री’ आणि ‘रात्री’ या शब्दांचा मी जेव्हा विचार करायला लागते तेव्हा स्वाभाविकच अंधार, काळा रंग, आल्हाददायक चांदणं, मनाला विसावा देणारी आणि उजेडाची हमी देणारी असे अनेक अर्थ दोन्ही शब्दांच्या अनुषंगाने मनामध्ये फेर धरून नाचू लागले. अंधाराच्या मागोमाग मिणमिणत तेवणाऱ्या पणतीची आणि ‘पण ‘ती” या दोघींचीही आठवण आपसूकच झाली.

‘स्त्री’ आणि ‘रात्र’ अशा शब्दांचा एकत्रित विचार करताना कदाचित कोणाला वाटत असेल मी स्त्रीबद्दल नकारात्मक पद्धतीने विचार करत आहे. माझ्या मनामध्ये मात्र नकारात्मकतेचा लवलेश देखील नाही. याचं कारण मला मूळातच ‘काळा रंग’ किंवा ‘अंधार’ हे दोघेही सकारात्मक वाटतात. कदाचित काळया रंगाचा नेहमीच पाहात असलेला ‘विठ्ठल’, आणि आवर्जून तिरुपतीला जाऊन, अतिशय जवळून घेतलेलं आणि मनावर कोरलं गेलेलं काळया ‘बालाजी’चे दर्शन या पाठीमागे असावं असं मला वाटतं. तसंच काळा रंग , अंधार, रात्र हे सगळेच मला माणसाला निवांत करणारे, शांतपणे विचार करू देणारे, स्वतःची भेट घडवून देणारे असे आयुष्यातले फार सुंदर घटक वाटतात. मला पुण्या-मुंबईची रात्र कधीच आवडत नाही. कारण तिथे अगदी रात्रीच्या दोन आणि तीन वाजता सुद्धा लखलखीत दिव्यांमध्ये जनजीवन एवढं सुरळीत चालू असतं की रात्र झालेली आहे असं वाटतंच नाही. अशावेळी मी देवाचे मनातल्या मनात आभार मानते. बरं झालं देवा तू मला मराठवाड्यात जन्माला घातलंस आणि मराठवाड्याला अजूनतरी या असुरी प्रगतीच्या वाटेवर नेलं नाहीस. आपसूकच दुसरी इच्छा मनातल्या मनात व्यक्त होते, देवा, मराठवाडा भौतिकदृष्ट्या थोडा मागासलेला राहिला तरी चालेल पण इथलं ‘सृष्टी, समष्टी आणि व्यष्टी’ यांचे परस्पर नातं जे आहे ते बिघडू देऊ नकोस.

या चंचल स्वभावाने, मनाचे फुलपाखरू जिथे जिथे घेऊन जाईल तिथं तिथं आज मला नेलं. कारण हे लिहिता लिहिता जवळपास अडीच ते तीन तासानंतर मी पुन्हा इथे आले आहे. खरं म्हणजे या वेळेमध्ये ‘ज्ञानोत्सव’चे गुढीपाडव्यासाठीचे पृष्ठ पूर्णपणे तयार करून झालेले आहे. मध्ये एक दोन कामांसाठी म्हणून फोन हातामध्ये घेतला आणि दोन-तीन वेळा अगदी अपरिहार्यपणे झोप आली म्हणून दहा-दहा मिनिटांचे ‘स्लिप ब्रेक’ सुद्धा झाले.

मनी एकच भाव असतो परमेश्वराला जे हवं आहे ते तो माझ्याकडून घडवून घेतो आहे. त्यामुळे मी मला अडवण्याचा प्रश्न कुठे निर्माणच होत नाही. मला स्वतःलाच फार आश्चर्य वाटतं आहे, पण युट्युब वर काही शोधत असताना अवचितपणाने ‘ सुषुप्ती क्या है’ हा पंधरा मिनिटांचा व्हिडिओ बघायला मिळाला. योगशास्त्र हे मुळातच माझ्या जीवाभावाचं आहे. योगसूत्रांवरचं ब्लॉग लेखन मध्यंतरी पूर्णपणे थांबलेलं होतं. ते येत्या नवीन वर्षात पुन्हा सुरू व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

‘सुषुप्ती’ने मला झोपेचा अध्यात्मिकदृष्ट्या काय अर्थ होतो हे समजावून सांगितले. तिथेच ‘स्त्री’ आणि ‘रात्री’ या शब्दांचा वेध माझ्यासाठी अर्थपूर्ण झाला. त्यामुळे इथेच थांबते. अरुणा ताईंचे पुस्तक परमेश्वर जेव्हा पुन्हा हातात देईन तेव्हा अवश्य वाचलं जाईलच.

शुभं भवतु!

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!



यावर आपले मत नोंदवा