विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

२१ मार्च विशेष


ये वक्त की आवाज है मिल के चलो ….

जागतिक वन दिनाच्या, ईद या सणाच्या आणि जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जीवन हे विधिलिखित महाकाव्य आहे; ही असीम श्रद्धा बाळगणा-यांना सानंद समर्पित !- ज्ञानोत्सव समिती

🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻

२१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे २८ नोव्हेंबर २०१२ रोजी हा घोषित करण्यात आला. दरवर्षी, वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या फायद्यासाठी, सर्व प्रकारच्या जंगलांचे आणि जंगलाबाहेरील झाडांचे महत्त्व साजरे करण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त, वृक्षारोपण मोहिमेसारखे , जंगले आणि झाडांशी संबंधित स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रम आयोजित करण्यासाठी देशांना प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले जाते . संयुक्त राष्ट्र वन मंचाचे सचिवालय , अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने , सरकारे, वनांवरील सहयोगी भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक संस्थांच्या सहकार्याने अशा कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची सोय करते . हा दिवस पहिल्यांदा २१ मार्च २०१३ रोजी साजरा करण्यात आला होता.


वाचे बरवे कवित्व | कवित्वी बरवे रसिकत्व | रसिकत्वी परतत्त्व | स्पर्शु जैसा ||
(ओवी क्रमांक ३४७, अध्याय १८ , श्री ज्ञानेश्वरी.)

•| ॐ |•

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा स्थापनादिन

सरस्वतीची वीणा हाती खड्ग बनूनी आली

पेटूनी उठला मराठवाडा अद्भुत किमया घडली

मराठमोळी माय मराठी तिचेच गाणे ओठी

हुतात्म्यांच्या बलिदानाचे पुण्य आमच्या हाती

हे सोनेरी पान लिहाया स्वये शारदा आली

अद्भुत किमया घडली

पिढ्यापिढ्यांची संघर्षाची ऊर्जस्वल गाथा

पुरुषार्थाला सीमा नाही सदैव उन्नत माथा  

काळासंगे पडले पाऊल शतकपूर्ती ही झाली

अद्भुत किमया घडली

जुलमी खुनशी राजवटीला केले देशोधडी

अन्यायावरी विजय मिळविला  उभारली ही गुढी

वाटचाल ही सुरूच असुनी नवलाई पाझरली

अद्भुत किमया घडली

स. भु. संस्थागीत, गीतकार – लक्ष्मीकांत तांबोळी, संगीत – पं. नाथ नेरलकर.

सरस्वती भुवन शिक्षण संस्था गीत , गीतकार – श्री. लक्ष्मीकांत तांबोळी, संगीत – पं. नाथराव नेरळकर


🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻

विश्व कविता दिवस from Peedeequotes – साभार !

https://www.facebook.com/share/p/1DsYfJMB5N/


आम्ही कोण? –
कवी केशवसुत – आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी?

आम्ही असू लाडके-देवाचे

दिधले असे जगत ये आम्हांस खेळावया;

विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,

दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;

पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -सौंदर्यातीशया,

अशी वसतसे जादू करांमाजि या; फोले पाखडिता तुम्ही,

निवडितो ते सत्त्व आम्ही निके !

शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?

पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच,

सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे; ते आम्हीच शरण्य,

मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते !

आम्हांला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे;

आम्हांला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे!


    https://share.google/Ysl1l1JJ0genjxHF8

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे – साने गुरुजी


    कविता गुरूंच्या

    नववर्षाच्या आगमनातील नव्या जाणिवा, नवा उमाळा

    स्पर्शातूनही नवा जिव्हाळा आनंदाचा स्रोत आगळा.

    नववर्षाचा रंग नवा अन् नवीन आशा, नवी स्पंदने,

    अभिनव नाते, नव आव्हाने भेटीसाठी नवे बहाणे.

    नववर्षातील नवीच संगत नव्या युतीची नवी बंधने,

    सहवासाचे मधुर आकर्षण नवे गीत अन् नवे तराणे.

    नववर्षातील हाक नवी ही नवीन आर्जव आणि आळवण

    साद्य सोहळा शृंगाराचा नवा भोग अन् अपूर्व मीलन.

    कवी – माजी प्राचार्य जीवन देसाई ,

    अनिवार काव्यसंग्रह , मे २००५


    गंधवेडी भावना

    गंधवेड्या भावनांना, शब्दामध्ये बांधू कशी

    निसटत्या ओल्या क्षणांना, हातात मी घेऊ कशी.

    काय मी शोधीत होते, त्या क्षणी वेडीच होते

    वेड लागे हाय तरीही, कोण मी माहीत नव्हते.

    गंधला स्वरशब्द अन्, मी इथे लपलेच होते

    शोधताना मी स्वतःला, भोवती फिरलेच होते.

    गीतामध्ये स्वरशब्द फुलला, माझ्या मनी गुंतून गेला

    गुंतल्या शब्दसुरांना, मी तिथे आळवीत होते.

    कितीक केले यत्न तरीही, माझ्याकडे काहीच नव्हते

    नवल वेड्या शब्द कुसूमा फक्त मी ओवीत होते.

    कवयित्री – डॉ. मंगला वैष्णव

    स्वप्नकलीका प्रकाशन वर्ष, २०१५


    काय असते कविता?

    तापलेल्या भुईतील आर्द्र असते कविता
    अनोळखी माणसाचे हार्द असते कविता

    आपल्यांनी केलेला घात असते कविता
    न मागता पुढे येणारा हात असते कविता

    शेवटच्या श्वासातील आस असते कविता
    जीवनानुभवाचा उच्छवास असते कविता

    दुःखी होण्याचे खुळे वेड असते कविता
    अंधारानंतरचा उजेड असते कविता

    स्वतःला रमविण्याचा बहाणा असते कविता
    सांगत आता तरी हो शहाणा असते कविता

    अस्वस्थ रात्री स्वप्नीचा ध्यास असते कविता
    रसिक मनाचा सुगंधी श्वास असते कविता

    सागराची घनगंभीर गाज असते कविता
    कोलाहली शांततेचा आवाज असते कविता

    भंगलेल्या काळजाचा तळ असते कविता
    परपीडेशी एकस्पंद कळ असते कविता

    शिल्पाच्या भग्न पदाचा न्यास असते कविता
    वासंतिक वाऱ्याची रम्य रास असते कविता

    फाटक्या झोपडीचे काळीज असते कविता
    सुखी सदऱ्यातील शांत नीज असते कविता

    दरिद्र्याची श्रीमंत जाणीव असते कविता
    समाधिस्त क्षणाची नेणीव असते कविता

    यशातुर उंदराची घालमेल असते कविता
    तहानलेल्या यंत्रासाठी तेल असते कविता

    महालाची हरवलेली झोप असते कविता
    माळरानी रुजलेले रोप असते कविता

    मनी प्रकाशणारे विश्वाचे आर्त असते कविता
    रंजले गांजले आपुले म्हणत असते कविता

    एकाकी एकट्यास कवेत घेत असते कविता
    आवंढ्यास आनंदाश्रूकडे नेत असते कविता

    प्रमोद देशपांडे ‘पीडी’

    WorldPoetryDay #peedeedeshpande #PramodDeshpande #मराठीकविता #प्रमोददेशपांडे #पीडीदेशपांडे


    चिंतन गुरूंचे

    साधारणतः सन १९५५ ते १९७५ दरम्यान जन्माला आलेल्या मंडळींनी जेवढी सामाजिक, आर्थिक आणि भावनिक स्थित्यंतरे बघितली आहेत तेवढी त्याआधी आणि त्यानंतर जन्माला आलेल्या मंडळींनी पाहिलेली नाहीत असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. या कालावधीत जन्माला आलेलो आपण तसं म्हटलं तर भाग्यवान आहोत. आपल्या पालकांनी आपल्याला फारसं जपलं नाही, आपली जरुरीपेक्षा जास्त काळजी घेतली नाही, आपल्याला फारसा ऐशाराम मिळवून दिला नाही हे खरे आहे. अर्थात त्यांनी या बाबतीत उदासीनतादेखील दाखवली नाही. आवश्यक त्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतील याकडे पालकांचे लक्ष असे. आपला मुलगा कोणत्या शाळेत आहे, कोणत्या वर्गात आहे, काय शिकतोय, काय करतोय याकडे त्यांचं लक्ष असायचं पण तरी आपल्या भवितव्याबाबत नको तेवढा रस देखील घेतला नाही किंवा घेऊ शकले नाहीत. उलटपक्षी आजची तरुण मंडळी या सर्व बाबतीत जरुरीपेक्षा जास्त जागरूक असतात. आपल्या पाल्यासाठी ‘शक्य ते सर्वकाही’ करण्याचा ते प्रयत्न करतात. हे सगळं करत असताना वेळेअभावी त्यांचं काही गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष होत असतं हे अमान्य करता येणार नाही. पूर्वीच्या काळी घरात बरीच वडीलधारी माणसं असल्यामुळे मुलांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं ज्यामुळे त्यांच्या वर्तनावर चाप असायचा. आणि त्यामुळे मुलांवर अगदी नकळत काही विशिष्ट संस्कार घडत गेले. कोणतीही गोष्ट संपल्याशिवाय पुन्हा आणायची नाही, एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर ती आणायची नाही, गरज असेल तेवढीच आणि ‘खिशाला परवडेल तेवढीच’ आणायची असेच संस्कार आपल्यावर झाले. अशा गोष्टी किंवा वस्तू खरेदी करताना चार ठिकाणी चौकशी करायची, वस्तू बघायच्या, पारखायच्या आणि मग ‘स्वस्त आणि मस्त’ या उक्तीत बसणाऱ्या वस्तूंची खरेदी करायची अशा पद्धतीने आपल्या आधीची पिढी वागत होती. आणि त्यामुळे अर्थातच आपल्यावर देखील तसेच संस्कार झाले.


    काळ बदलला. सामाजिक, नैतिक आणि आर्थिक परिस्थितीत झपाट्याने बदल झाले आणि बघता बघता नवीन पिढीही अपेक्षेपेक्षा खूप वेगाने बदलत गेली. बऱ्याच गोष्टी घडल्या. जीवनमानाविषयीच्या संकल्पना बदलल्या, पैसा सहज उपलब्ध होऊ लागला, पैशाची किंमत कमी झाली, खर्च जपून करणे आणि पैसे साठवणे यापेक्षा आहे तेवढा पैसा खर्च करून आज आयुष्यात शक्य तेवढा आनंद आणि ऐशाराम मिळवायचा, अशी वृत्ती बनत गेली. इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (अर्थात AI) या अत्याधुनिक अस्त्रांमुळे प्रगतीचा वेग भयानक वाढला आणि एकूणच जग अतिवेगवान झाले. अर्थात तेवढा वेग आणि चलाखी ही आपल्या अंगी हवी तेवढी आली नाही हे देखील बऱ्याच अंशी सत्य आहे.


    ही वृत्ती फक्त तुमच्या आमच्या घरात नाही तर साधारणतः संपूर्ण पिढीतच जोपासली गेली. आपल्यावरील संस्कारामुळे आपण त्यामध्ये बदल करू शकलो नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण फारसे त्या संस्कारांशी किंवा त्या नवीन गोष्टींशी एकरूप होऊ शकलो नाही ! काही मंडळींनी आपल्यात प्रयत्नपूर्वक बदल घडवून आणत तरुणांच्या वेगाने जाण्याचा प्रयत्न केला. पण बहुतांशी जेष्ठांना हे जमले नाही हे वास्तव आहे. तरुणांएवढा वेग, नवनवीन तंत्र समजून घेण्याची जिद्द आणि वागण्यातली चलाखी जर आपण आपल्यात आणू शकलो तर मात्र आपल्यालाही त्यांच्यासोबत आनंद मिळू शकतो. आणि म्हणूनच आपल्या पिढीमध्ये जनरेशन गॅप जास्त वेगाने वाढत चालला आहे असे दिसून येते. याला फक्त तरुण पिढीच जबाबदार आहे असे मुळीच नाही परंतु आपण त्यांच्याशी मिळून मिसळून घ्यायला कुठेतरी कमी पडतो हे नक्की. आपली जीवनविषयक मूल्ये आणि तत्वे वेगळी होती. त्यांची तत्वे वेगळी आहेत. आपली लाईफ स्टाईल वेगळी होती त्यांची लाईफ स्टाईल वेगळी आहे. आपण आपल्या ठिकाणी योग्य होतो आणि तरुण मंडळीही त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत असं एकदा मान्य केलं की बरेच प्रश्न सुटतात आणि हा जनरेशन गॅप फारसा दाहक ठरत नाही.


    उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आजकाल वेळेच्या कमतरतेमुळे वस्तू ऑनलाईन मागवणे हे क्रमप्राप्त झाले आहे. एखादी वस्तू ऑनलाईन मागवताना तरुण मंडळी बहुधा आलेले पार्सल उघडतानाचा (सॉरी, unwrap करतानाचा) व्हिडिओ बनवतात, आलेली वस्तू लगेच तपासून बघतात आणि काही गडबड असेल तर संबंधित कंपनीशी लगोलग ‘ऑनलाईन’ संपर्क साधून रितसर तक्रार नोंदवून वस्तू परत देखील करतात ! यथावकाश त्यांनी भरलेल्या रकमेचा परतावाही प्राप्त होतो !
    आपल्याला मात्र पुरेशी तांत्रिक माहिती नसल्यामुळे आणि वस्तू चुकीची आल्यास ती परत करण्याची एकंदर प्रक्रिया क्लिष्ट वाटत असल्यामुळे बरेचदा आपली फसगत होते. त्यामुळे मग आपल्याला ऑनलाईन खरेदी करण्याची भीती वाटते आणि म्हणून आपण त्या बाबतीत अनुत्सुक असतो.
    एकंदरीत ‘तरुण मंडळी करते त्या सगळ्याच गोष्टी वाईट’ अशी वृत्ती ठेवली नाही तर आपल्याला फारसा त्रास होत नाही एवढं नक्की ! मानसिक निरामयतेसाठी हे असे मान्य करणे नक्कीच आवश्यक आहे असे मला वाटते.
    हिंदू नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !

    प्रा. सुहास पानसे.
    २१ मार्च, २०२६.


    •|ॐ|•

    श्री मॉं

    https://pin.it/2z2bp2Q5J

    काही आकळत
    कधी नकळत
    आजवर होते किनारी
    ओळख पटूनी निजस्वरूपाची
    ओढ निजधर्मापरी प्रभुधामाची

    तो कधी जळातला मीन
    झाला कधी कासव उभयचर
    घेऊन दशावतार रक्षीले
    ज्याने चराचर मी त्याची सहचर

    देवा, मी अर्पिले तुला तन्मन
    तू केले रे कृपेने मला उन्मन
    आज येई आठव ज्ञानेशाचा
    कार्य संपन्न होता जो धरी
    मार्ग संजीवन समाधीचा

    श्रीकृष्णार्पणमस्तु !


    संपूर्ण समर्पण !


    यावर आपले मत नोंदवा