विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

वय कोवळे उन्हाचे !

श्रीकृष्णार्पणमस्तु !

अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !

https://www.facebook.com/share/1DXrdQbJna/

दत्तरूप – परा विद्या आणि अपरा विद्या – फेसबुकवरून साभार !


•|ॐ|•

निसर्ग हा माणसाचा गुरु आहे

म्हणे सायली,
सूर्यप्रकाशी जी न्हाली
प्रकटेल क्षणात कृष्ण
अन् सोडवेल सारे प्रश्न
फडकतो विजयध्वज हा
शुभसंकेत सांगे पाहा !

त्या लिंबावर किरण कोवळे
का कृपा करती देव सावळे
या झाडाचे आहे मजशी नाते
पाहून त्याला मन हे फुलते !

वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!



आदिशक्ती

निळ्या आकाशी सूर्यप्रकाशी
का स्तब्ध हे झालेत मेघ
शांत गुपचूप नभाभोवती
का उदास ही अरुण रेघ ?

निरखून पाहती ते ही पृथ्वी
तप करत आलेली साध्वी
घडू नये ते का कुठे घडले
का वाऱ्याचे श्वास अडले ?

आज जरी रे असेल आवस
उगवेल उद्या पुन्हा चंद्रमा
कलेकलेनेच वाढतो तो
अन् होते पुन्हा पौर्णिमा!

हे दयाघना, तुज प्रार्थना
तू नको उदास होऊ ना
आळव रे ती आदिशक्ती
जग निरंतर करे जिची भक्ती

शक्तिदायिनी ती विवेकदर्शिनी
सौंदर्यवासिनी ती उत्साहवाहिनी
सौदामिनी रे ती तुझी कामिनी
बोलाव रे देवा, तुझी अर्धांगिनी !

वृंदा आशय

🙏श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏


 •| ॐ |•
     आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी,परमेश्वर काटा ही टोचू देणार नाही.  
       आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर ‘स्वाद’ आणि ‘वाद’ या दोन्ही गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा. आणि वाद सोडला तर संबंधाला.
 
कुमुदताई गोसावी, पुणे
(संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक)
 
         ‌ •|ॐ|•
    पैसा कमवता येतो, मान मिळवता येतो, ओळख निर्माण करता येते.पण नि:स्वार्थपणे आपलं मन जपणारं नातं नशिबवानांनाच भेटतं.
सुखात देव लक्षात असला ना, तर दुःखात त्याला बोलावावं लागत नाही, तो आपोआप कुणाच्या ना कुणाच्या रुपात येतो.
 
कुमुदताई गोसावी, पुणे
(संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक)
 
🙏श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏

भोग आणि त्याग

✍️ डॉ.ज्ञानेश्वर थोरात.

आपल्या ध्येय साधनेच्या आड येणाऱ्या अनेक आकर्षक गोष्टींचा साधकाला मोठ्या कठोरपणे त्याग करावा लागतो; हे परमार्थाच्या वाटेवरील सत्व आणि तत्त्व आहे.

एक तरुण साधू होता. ज्या वयात विषयसुखाची परमावधी वाटावी, त्या वयात त्याला वैराग्य आलं आणि त्यांने जंगलाची वाट धरली. गंगा नदीच्या काठावर एक पर्णकुटी बांधून तो स्वतःला साधनेमध्ये सदैव गर्क ठेवू लागला. प्रत्येक क्षणी भगवंताशी संलग्न कसं राहायचं , अनुसंधान कसं टिकवायचं आणि आत्मानंदात कसं रमून जायचं ; याचे त्याला  ज्ञान अवगत झाले. साधना सिद्ध होत गेली. परंतु पोटापाण्याचं काय? भूकेच्या वेळी भूक लागणारच. शरीर अन्नमय कोष आहे; त्याच्या पूर्तीवाचून ते शांत राहणार कसं ? म्हणून पोटाची भूक शमवण्यासाठी तो जंगलातून थोडा काळ लोकवस्तीत येत असे. चार घरी भिक्षा मागून पदरात पडणाऱ्या अन्नाला पवित्र समजून आपला उदरनिर्वाह करत असे. कधी कधी भिक्षा मागत असताना काही घरीदारी त्याला विचित्र अनुभव यायचा. काही गृहिणी घराच्या बाहेर येऊन भिक्षा घालण्याऐवजी ,”पुढे चला, महाराज,” असं म्हणत. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा  पडत असे आणि झोळी मात्र रिकामी राही .

एकदा तो एका धनिकाच्या दारात उभा राहिला. ‘ ॐभिक्षां देहि,’ अशी आरोळी ठोकली आणि काय नवल ! एक सुंदर युवती भरलेलं ताट घेऊन त्याच्यासमोर उभे राहिली. क्षणभर ताटातील ती भिक्षा त्याच्या झोळीत घालण्याचे विसरून गेली. त्या तरुण साधूच्या सुंदर मुखमंडलाला ती न्याहाळू लागली.साधूच्या डोळ्यातलं तेज तिला प्रसन्न करत होतं. त्या तरुण साधूच्या सौंदर्याचा मोह अनावर होऊन तिने मोठ्या आस्थेने जिज्ञासा केली ” कुठे राहता, महाराज आणि काय करता ?”

साधूने आपला परिचय दिला.” भिक्षेसाठीच काय तो लोकसमूहात येतो.अन्यथा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,पक्षींही सुस्वरे आळविती’ या संतभावाने आम्ही एकांतवासात गुणदोषांपासून वेगळे रहातो.” त्या त्यागपूर्ण उद्गारातून आश्चर्यचकित आणि आनंदित होऊन ती म्हणाली, “ठीक आहे ,महाराज पण भिक्षेसाठी लोकसमूहात येता ना ? तर मग असं करा, रोज माझ्या घरी या.मी तुम्हाला पोटभर भिक्षा वाढेल.जेणेकरून तुम्हाला कुणाच्या घरी जाण्याचा प्रश्न पडणार नाही, तुमची वेळ वाचेल  आणि तुम्हाला रोज रोज भिक्षा घालून तुमच्या दर्शनाने आम्ही पवित्र होऊ, यालं ना, महाराज ?”

तिच्या लाघवी बोलण्याचा साधूवर फारसा परिणाम झाला नाही परंतु भिक्षा मिळण्याची खात्री मात्र झाली आणि साधूने आपला पाय काढता घेऊन जंगलाची वाट धरली.

दिवसांमागून दिवस जात होते. साधूच्या तपस्येचे तेज प्रखर होत होते. कुणीही त्यांच्या तेजस्वी देहाकृतीकडे पाहिले की कुणाच्याही मनात साधू दर्शनाचा भाव जागा होई. कारण तो त्या वैराग्यपूर्ण तपस्येचा परिणाम असे. तरीही कुणाचं मन विषय वासनेने बरबटून जाई. त्या स्त्रीचे तसंच झालं. कधी सकाळ होते? कधी बारा वाजतात आणि तो तरुण साधू भिक्षेच्या निमित्ताने आपल्या हवेलीसमोर उभा रहातो आणि मी त्याला डोळे भरून कधी पहाते; असं तिला वारंवार वाटत असे.

जंगलात साधूने उत्तरोत्तर तपसाधनेची वेळ वाढवली होती, परिणामतः ईश्वराच्या ध्यान धारणेत तहान भूक तो विसरून जाई आणि कधीकाळी भूक लागली तर भिक्षा मागण्यासाठी तो बाहेर पडत असे ; त्यामुळे साधूच्या त्या तरुण युवतीच्या हवेलीकडे येण्याच्या वेळा मागेपुढे होऊ लागल्या. त्याचा परिणाम त्याची वाट पहाणा-या युतीवर होऊ लागला आणि ती अस्वस्थ होऊ लागली.

एके दिवशी अशीच त्याला भिक्षा स्वीकारण्यासाठी येण्याला खूप वेळ झाला. त्यांची वाट पहात ती युवती त्रासून गेली होती, अन्न शिळे होऊ लागले होते, अवेळी उपस्थित झालेल्या तरुण साधूला पाहून तिचा तोल गेला आणि तिने भीतभीत काहीसे संकोचाने परंतु थोडेसे धाडस करून विचारले, “काय हे ?किती विलंब करून तुम्ही भिक्षेला येता ! पूर्वी असं होतं नव्हतं. तुमच्यावर कोणीतरी जीव टाकतयं, हे कसं तुमच्या लक्षात येत नाही? तुमची वाट तरी किती पहायची ? नाही कळणार पुरुषांना आम्हा स्त्रियांची मनं आणि जाऊ द्या, आज तुम्हाला खरं सांगून टाकते. तुमचे तेजस्वी डोळे ,मनमोहक मुखमंडल मला खूप आवडते. तुमचं मला वेड लागलंय, महाराज, खरंच.परंतु एक विचारू?, “ तुम्हा सिद्ध साधूंना भूत भविष्य आणि वर्तमान कळतं म्हणे, हो की नाही? मग  माझं तुमच्यावर प्रेम जडले आहे, हे कसं तुम्हाला कळत नाही. रोज तुमच्यासमोर नवानवा साजशृंगार करून उपस्थित होते पण कधी तुम्ही माझ्या सौंदर्याची तारीफ केल्याचे आठवत नाही. बोला ना महाराज ?”

 यापूर्वी असा संवाद कधी झाला नव्हता किंबहुना अशा संवादाची त्या साधूला सवय नव्हती. तिने वाढलेली भिक्षा त्याने आपल्या झोळीत ग्रहण केली आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता तो आपल्या पर्णकुटीच्या दिशेने झपझप पावले उचलून चालू लागला. असे कथन, अशी चर्चा त्यांच्या परिचयाची नव्हती . म्हणून त्याने काढता पाय घेतला होता परंतु त्याच्या पाठमोऱ्या देहाकृतीकडे पाहत ती युवती दारात कितीतरी वेळ उभे होती. अगदी साधू दिसेनासा होईपर्यंत.

साधूची पाऊले पर्णकुटीच्या दिशेने पडत होती खरी परंतु विचारचक्र त्या सुंदर युवतीच्या मानसिक पतनाच्या चिंतेने अधिक गतिमान झाले होते. आता तो गंगातटावर पोहोचला होता. गंगामाईला नैवेद्य द्यायचा ; गीतेचा पंधराव्या अध्यायाचे पठण करायचे आणि पर्णकुटीत श्रीहरीचे नाव घेत घेत वदनी कवळं घ्यायची , हा त्याचा परिपाठ होता. परंतु आज मात्र गंगातटाहून पुढे त्याचं पाऊल पडत नव्हतं .विचारान्ती क्षणार्धात सर्वच्या सर्व भिक्षा त्यांने गंगेला अर्पण केली; विवेकाचे वैराग्यात रूपांतर झालं आणि बाजूला उभ्या असलेल्या पर्णकुटीला त्यानं स्वतःच्या हाताने आग लावली. आगीचा भडका उडाला; ज्वाला आकाशाला भिडल्या आणि त्याची पावले पुन्हा त्या तरुण युवतीच्या दिशेने पडू लागली . स्थळ काळाचे अंतर संपले होते आणि आता तो त्या धनिकाच्या हवेली समोर पुन्हा एकदा उभा ठाकला होता. “ॐ भवति भिक्षां देहि”, अशी हाक त्याने मारली.आता त्याला वेगळीच भिक्षा हवी होती. अवेळी कानावर आलेली हाक ऐकून ती युवती लगबगीने हवेलीच्या प्रवेशद्वारावर आली. “महाराज ,तुम्ही?” आनंदित होऊन जणू काही महाराजांवर आपल्या कथनाचा परिणाम झाला ;अशा आविर्भावाने तिने आश्चर्य व्यक्त केले.

” होय ,मीच तो.” तिचं कुतूहल जागा झालं.

“बोला ना ,पुन्हा कसं येण केलं?” तिने पृच्छा केली.

“तुझ्या दारी वारंवार येऊन भिक्षा ग्रहण करणं सर्वथा योग्य नाही आणि नव्हतं; असं मला माझी मनोदेवता सांगत होती परंतु भिक्षा मिळण्याची खात्री आणि तिही रुचकर ; त्यामुळे मी बेसावध राहिलो. विवेक आणि वैराग्याची एकसंघ साधना करताना मी नाही परंतु माझ्यामुळे कुणीतरी विकारांना बळी पडतंय ,याची जाणीवच मी गमावून बसलो होतो. ती चूक आता मी दुरुस्त केली आहे. मी आता हा प्रदेश कायमचा सोडून दूर जात आहे.

देवाच्या सख्यत्वासाठी, जिवलगांच्या पडाव्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही त्याजावा

अशा निश्चय आणि निर्धाराने माझी साधना चालू होती आणि चालू राहील. मी प्रगतीची शिडी चढत होतो आणि तू अधोगतीच्या खाईत उतरत होती. दिलेल्या आणि खाल्लेल्या अन्नाला जागण्यासाठी; तुला धन्यवाद देण्यासाठी माझी पावले तुझ्या हवेलीच्या दिशेने पडली. तुला माझ्या देह दर्शनाची नाही तर माझ्या तत्त्व दर्शनाची अधिक आवश्यकता आहे ; असं मला वाटतं. भिक्षा वाढण्याचे पुण्य कर्म जे तुझे हात करत होते, त्याचवेळी तुझे डोळे मात्र माझ्या दर्शनाने विकृत होत होते. कळत होतं मला ते परंतु मी तुझ्या हातातील दातृत्वाच्या संस्कारांकडे अधिक पहात होतो . काही हरकत नाही. आपल्या मनात विचारांची सुसंगती घडून आली की आपली इंद्रिये सुसंघटित होतात,एकसंघ होतात आणि त्यातूनच झोपडीला आग लागते. भोगांचा त्याग झाल्यावरच योगाचा अनुभव येतो. आणि योगाचा अनुभव आल्यावरच भोगाची इच्छा संपुष्टात येते. हे बघ, तू गृहस्थ आहेस आणि मी एक विरक्त. तुझे गृहस्थ असण्याचे भान सुटले तरीही तू गाफील आहेस आणि माझं विरक्त असल्याचं भान सुटू नये म्हणून मी सावध आहे.तू उत्तम गृहस्थ व्हावं आणि मी एक उत्तम विरक्त; या सद्भावनेसह मी तुझा निरोप घेतो. शुभं भवतु कल्याणं.”

साधूने प्रस्थान ठेवले  आणि तिने मस्तक लवून होत जोडून त्याला वंदन केले.ती पाठमोरी देहाकृती अदृश्य होईपर्यंत तिचे हात जुळले होते. कारण तिला ‘दिव्यत्वाची प्रचिती’ आली होती.


•|ॐ|•

शब्दवेध

‘ताठ’ आणि ‘ताठा’

हे दोन्ही शब्द आपल्याला अगदी सुपरिचित असे. खरं म्हणजे या शब्दांकडे पाहिलं तर आपल्याला सहज जाणवतं, ‘ताठ असावं, पण ताठा बाळगू नये’ अशी एक स्वाभाविक प्रतिक्रिया आपण व्यक्त करतो. या शब्दांचे रंग जरासे उलगडून पहावेसे वाटले.

हा शब्द उच्चारताच आठवतं ते बालपण. सतत कोणी ना कोणी सांगत राहातं ताठ बसा. पीटीच्या तासाला तर प्रश्नच नाही. ऐकलं नाही तर छडीच ते आपल्याला सांगते.
जेव्हा आपण १५ ऑगस्ट २६ जानेवारीचे NCC चे संचलन आठवतो त्या वेळेला अगदी एका लयीत , एका तालात चालणारे विद्यार्थी आपल्यासमोर येतात. मनामध्ये देशाचा अभिमान जागवणारे आणि त्यासोबतचे बँड पथक मनातल्या अस्मितेला स्पर्श करणारे, असे असते.

योगशास्त्राचे शिक्षण घेताना ‘ताठ’ बसण्यामागचं स्पष्ट कारण कळालं. पाठीचा मणका ताठ ठेवला तरच शरीरातील ७२ हजार नाड्यांचे कार्य व्यवस्थितपणे चालवणारे श्वसन अगदी नेमकेपणाने आणि नीट करता येते. त्यासाठी ‘ताठ बसणं’ ही अगदी प्राथमिक पायरी आहे, हे लक्षात आलं. अर्थात ‘ताठ बसणं’ आणि ‘ताठा असणं’ यात फरक आहेच.

ताठ बसण्यामध्ये शिस्त, संयम, आत्मविश्वास एकत्र येताना दिसतात.
‘ताठा असणं’ हे मात्र अहंकाराच्या जवळ जाणारे असते. कशासाठी ताठा बाळगू शकतो आपण ? ज्या कारणांसाठी ‘ताठ बसणं’ महत्त्वाचे मानतो, कदाचित त्याही कारणासाठी आपण ताठा बाळगतो. म्हणजे शरीर शास्त्रामध्ये ‘ताठ बसणं’ ही जशी एक मूलभूत गरज मानली गेलेली आहे, तशी शिस्त असणं ही जीवनाची एक मूलभूत गरज आहे. आपल्याला मात्र त्या शिस्तीचा, ती शिस्त वेगळ्या पद्धतीने व्यक्त करणाऱ्या सौंदर्याचाही अहंकार असतो. आपल्याला या शिस्तीचा किंवा सौंदर्याचा अहंकार नाही असं वाटणाऱ्या निरहंकारी मनाला त्या अहंकार नसण्याचाही अहंकार असू शकतो. ताठा वाढला की तो ताठा आपल्या वर्तनातून व्यक्त होतो. ज्याला आपण काही ना काही कारणाने आपल्यापेक्षा कमी दर्जाचा, कनिष्ठ मानतो; या कमी मानण्यामागे कारण काहीही असू शकते. सत्ता, पद, संपत्ती, रूप, रंग, स्वभाव, गुण कौशल्ये काहीही….. (एकदा तर मी एका ‘सासू’ भूमिकेत असलेल्या स्त्रीला तिच्या सुनेबाबत तक्रार करताना ऐकले होते. काय तर म्हणे, ‘ती’ तिच्या मनासारखंच वागते. त्यांची ही तक्रार ऐकून मला हसावे की रडावे हेच कळेना. ‘स्व’भाव हा शब्दच मुळात हेच व्यक्त करणारा आहे ; हे मी त्यांना कुठे समजावत बसू?)

मला वाटतं ज्या ज्या गोष्टींवरून आपण तू तू-मी मी करतो ना ; त्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे फक्त समजावून घेण्याच्या आहेत. ‘जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत’ ही भूमिका विकसित होण्यासाठी ‘ज्ञानमन’ असावे लागते. भगवंत नाही पण किमान माणूस तर माना. की माणूस मानण्याइतपत ‘मानुषमन’ आमच्याकडे राहिले नाही का?’एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे आपण किती सहज विसरून जातो? सुपंथ विसरला की पुढे काय होते ते सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

प्रिय भाईजी, तुम्ही स्वराज्यानंतर सुराज्यासाठी आयुष्य खर्ची घातलंत. खरं म्हणजे आमच्या लढाया त्याही पुढच्या हव्या होत्या. पण इतिहासाची पुनरावृत्ती होते, यात दोष कोणाचा?

वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!


यावर आपले मत नोंदवा