१.संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक – डॉ. कुमुदताई गोसावी, पुणे.

भाग – १६ संत एकनाथ चरित्र-चित्रावली नमस्कार ! संत एकनाथांनी शके १५०५ मध्ये आळंदीला जाऊन केलेला “ज्ञानेश्वर समाधीचा उद्धार तर शके १५०६ साली “ज्ञानेश्वरी” ग्रंथाचं प्रतशुद्धीकरणाचं अविस्मरणीय महाकार्य ! करणाऱ्या मराठी भाषेतील पहिले संशोधक, संपादक नाथांचं हे आगळं- वेगळं कार्यक्रम जाणून घेणं, हा आपलाही आनंदानुभव असणं, नाथांच्या युगसंजीवक, कांतदर्शी कार्याची साक्ष गावबानं केलेल्या “भावार्थ रामायणाची उत्तरार्थ रचनाही देते! हे पाहणंही लक्षणीयच !
Eknath’s restoration of Sant Dnyaneshwar Samadhi during visit to Alandi in shake 1505 ( CE 1583 ); his monumental work in editing and authenticating the sacred volume ‘Dnyaneshwar’ in shake 1506 (CE 1584); understanding and experience significance of Eknath’s phenomenal role as Marathi language’s first researcher, editor and authenticator; Eknath’s epoch-making and revolutionizing contribution epitomized by Gavba’s authorship of the latter part of the volume ‘Bhavarth Ramayan’, all these awe-inspiring episodes to visualize is exceptional.
२. सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात 22 वर्ष प्राचार्य पद भूषवलेले –
माजी प्राचार्य श्री. जीवन देसाई, छत्रपती संभाजीनगर.
आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे/
तोषोनी मज द्यावे
पसायदान हे/
आता म्हणजे ज्ञानेश्वरीतील निरूपण झाल्यावर.माऊलींनी श्रीगुरूंना ‘
‘विश्वात्मक देवा ‘ असे संबोधले आहे, त्यातून भगवंताचे म्हणजेच ब़म्हाचे आणि सद्गुरूंचे स्वरूप
विश्वव्यापक आहे हे सांगीतलं आहे. सद्गुरू म्हणजेच ईश्वर -ही भावना द्रढ झाली की गुरू हेच माता-पिता, परमात्मा आणि परब़म्ह,तो शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला प़चीती घडवून देतो. माऊलींनी हे पसायदान आपल्या परब़म्हस्वरूप असलेल्या सद्गुरूंकडे मागीतलंआहे.माऊलींनी ज्ञानेश्वरीतील आपल्या निरूपणाला ‘वाग्यज्ञ ‘ असं म्हटलं आहे. सर्वसामान्य साधकाला या निरूपणाने अध्ययनाचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे ,म्हणूनच हा एक ज्ञानयज्ञ आहे.हे निरूपण मुखातून केलेलं असल्याने वागयज्ञे तोषावे आणि’ तोषोनी मज द्यावे पसायदान हे ‘ अशी प़ार्थना केली आहे.माऊलींनी जो प़साद दान म्हणून मागीतलाआहेतो विश्वातील भूतमात्रांसाठी, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी हवा आहे. सत्पृवृत्त असणाऱ्यांचा उद्धार त्यांच्या मंगलाचरणाने होणार याची खात्री असल्याने माउलींना त्यांची आठवण न होता प़थम खलांची आठवण झाली.वास्तविक पाहता माउलींना समाजातील खलांचा जास्त उपद़व झालेला असूनही त्यांच्याबद्दल क़ोध
किंवा सूडबुद्धी मनात उत्पन्न न होता त्यांच्याविषयीचा कळलाच असल्याचे दिसून येते. म्हणूनच त्यांनी म्हटले आहे –
जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो/
भूता परस्परे जडो
मैत्र जीवांचे.
व्यंकटी सांडो म्हणजे वक़बुद्धी नाहीशी व्हावी आणि त्यांचा दुष्टपणा, त्यांच्यातील दुर्जनता नष्ट होवून सत्कर्माची आवड त्यांना लागावी.असे झाले तर सर्व जनांमध्ये मैत्र म्हणजेच परस्परांबद्दल प़ेम , स्नेह वृद्धिंगत होईल. आजच्या काळात आणि विश्वातील परिस्थितीत ही प़ार्थना अत्यंत संरक्षक आणि कल्याण साधणारी ठरेल.
-जीवन देसाई
३. बलभीम महाविद्यालयातून प्रदीर्घ काळ सेवा दिलेले , निवृत्तीनंतरही अभ्यास हीच प्रवृत्ती जपणारे संत साहित्याचे अभ्यासक व भागवत ग्रंथाचे ज्येष्ठ भाष्यकार – डॉ. विद्यासागर पाटंगणकर* , बीड
अनुभवामृत : एक तत्त्वकाव्य

प्रास्ताविक :
संत ज्ञानेश्वरांचा ' अनुभवामृत' एक स्वतंत्र तत्त्वग्रंथ आहे . ज्ञानेश्वरांनी ज्ञानदेवी किंवा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी च्या निमित्ताने भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य केले, तर चांगदेव पासष्टीतून पत्रात्मक पद्धतीने एका योग्याशी संवाद साधला आणि अभंगातून आत्माविष्कार केला ! या सर्व कलाकृतीं मधून रचनेचे विविध काव्यबंध त्यांनी हाताळले , आकृतिबंध रूपाविष्कृत केले . भावकाव्य, प्रबंध काव्य, पत्रात्मक संवाद आणि आत्मसंवाद अशा वैविध्य पूर्ण पद्धतींनी त्यांनी नाथसंप्रदायाचे -काश्मिरी शैव संप्रदायाचे तत्त्वज्ञान विश्वचैतन्यवादी भूमिकेतून मांडले . डॉ अ. ना देशपांडे म्हणतात -
” अनुभवामृत व चांगदेव पासष्टी हे स्थितप्रज्ञ दर्शन, अभंगवाङ्मय ही ज्ञानलक्षणा चौथी भक्ती तर भावार्थदीपिका हे समग्र तत्त्वज्ञान होय” . ( मराठी वाङ्मय कोश – प्राचीन खंड, नागपूर विद्यापीठ प्रकाशन – १९७४ प्रथम आवृत्ती )
ज्ञानदेवांनी स्वतःच्या अनुभूतीला प्रमाण मानून चिद्विलासाचा गाभा प्रकट केला तो अनुभवामृतात ! दहा प्रकरणात ८०४ ओव्यांतून त्यांनी सैद्धांतिक मांडणी केली ती अत्यंत चपखलपणे !
ग्रंथनाम चर्चा . :
या ग्रंथाला” अमृतानुभव” म्हणावे की” अनुभवामृत” म्हणावे ? स्वतः माऊलींनी आपल्या ग्रंथातच अनेकदा
” अनुभवामृत” असाच शब्द वापरला आहे .
” ज्ञानदेव म्हणे श्रीमंत । हे अनुभवामृत”/ ( १० . १९ )
” मुक्ती कीर असे वेल्हाळ । अनुभवामृत निखळ”(१०.२०) किंवा
” ययालागी हे बोलणे । अनुभवामृतपणे” तसेच
” म्हणौनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृत येणे
सणु भोगिजे सणे । विश्वाचेनि ॥ ( १०.३०)
” अनुभवामृतस्वाद” ( १० . २५ ) अनुभवामृतपणे ( १० . २४ ) असेही उल्लेख दिसतात . हे सर्व लक्षात घेता या ग्रंथाला ” अनुभवामृत” म्हणणेच संयुक्तिक होईल ! परंतु संत नामदेवांनी मात्र समाधी प्रकरणात” अमृतानुभव” असा निर्देश केलेला दिसतो . तसेच “योगवासिष्ठात”
” अमृतानुभव” हा शब्द आलेला असल्याने माऊलींनी तोच शब्द स्वतंत्र तत्त्वज्ञान विवेचना साठी निवडला असावा असेही वाटते ! श्रीमद्भागवत ग्रंथावर असलेली लोकप्रिय आणि महत्वाची टीका श्रीधराची आहे, त्याला श्रीधराने भावार्थ दीपिका” संबोधले आहे . माऊलींनी तोच शब्द आपल्या गीता टीकेसाठी स्वीकारून परंपरेशी असलेली निबद्धता प्रकट करून एक नाते जोडण्याचा प्रयत्न केला असावा असे वाटते ! ही डॉ अ .ना . देशपांडे म्हणतात तशी उसनवारी म्हणता येणार नाही !
काही मराठी टी का :
अनुभवामृत किंवा अमृतानुभव या ग्रंथाच्या नामनिर्देशावर चिंतन करताना मला स्वतःला ‘अमृतानुभव’ म्हणजे “अमृताचा अनुभव” या पेक्षा “अनुभवाचे अमृत” या अर्थाने “अनुभवामृत” हे नावच सार्थ वाटते !’ अनुभवामृत’ या ज्ञानदेवांच्या मराठी ग्रंथावर मराठीतून विवरणात्मक व ओवीबद्ध भाष्य केल्याचे आढळते ,त्यात” अमृत पद बोधिनी ही निरंजन रघुनाथ यांची गद्य टीका आहे ,तर संत मुक्ताईच्या परंपरेतील शिवकल्याण यांची” नित्यानंदैक्य दीपिका” नामक ओवीबद्ध रचना आहे ! तसेच हंसराज यांची “अमृतानुभव टीका “शिवाय आधुनिक कवी ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांनाही त्याचे अर्वाचीनी करण केलेले दिसते ! एका मराठीतील ग्रंथावर मराठीतूनच पुन्हा भाष्य लिहिण्यास कवींना प्रेरणा मिळावी अशी आवाहनक्षमता असलेले ज्ञानदेवांचे हे एकमेव काव्य असावे ! अनुभवामृत या मराठी ग्रंथावरील इतर मराठी भाष्य रचना हा स्वतंत्र अभ्यास विषय ठरावा .
अनुभवामृत हा ज्ञानदेवांचा स्वतंत्र प्रज्ञा – प्रतिभेचा विलास असलेला तत्त्वग्रंथ ! ज्ञानदेवी आणि अनुभवामृत यातील प्रतिपाद्य एकच ते म्हणजे आत्मतत्त्व ! परंतु ज्ञानेश्वरीत भाषिक मिरास – भाषा वैभव – कल्पना प्रतिमांची उपमा अलंकारांची ” कोंदाकोंदी” तर अनुभवामृतात फक्त निरुपाधिकतेचे सोलीव दर्शन आहे ! प्रसिद्ध अभ्यासक डॉ. शं .दा . पेंडसे यांनी” श्री ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान” या त्यांच्या प्रबंधात ज्ञानेश्वरीला महत्त्व दिले आहे, तर श्री. भा. पं . बहिरट यांनी” द फिलॉसॉफी ऑफ ज्ञानदेवा” या ग्रंथात अनुभवामृताचे श्रेष्ठत्व अधोरेखित केले आहे .
संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतातत्व कृष्ण मुखातून कथन केले मात्र अनुभवामृतात काश्मिर शैव तत्वज्ञान स्वमुखातून मुखरित केले ! सिद्धांताचे प्रतिपादन करणारा हा ग्रंथ असल्याने” दर्शनकार” म्हणून त्यांना मान्यता मिळावी असा हा सिद्धग्रंथ आहे . पूर्वी हा ग्रंथ सलग असावा, नंतर शिवकल्याणाने त्याची १० प्रकरणात विभागणी केली असावी असे मानले जाते
अनुभवामृताचा आकृतिबंध :
अनुभवामृत हे प्रबंध शैलीचे काव्य आहे . प्रसिद्ध समीक्षक डॉ. वि . रा . करंदीकर यांनी अनुभवामृताला ” ज्ञानदेवांचा आत्मसंवाद ” म्हटले आहे ! प्राचीनकाळी गीतप्रबंध, नाट्य प्रबंध व चतुरंग प्रबंध असे रचना प्रकार होते . त्यात भाष्यप्रबंधात्मक ज्ञानेश्वरी तर तत्व चिंतनपर प्रबंधरचना म्हणजे अनुभवामृत होय . प्रसिद्ध समीक्षक डॉ . चंद्रशेखर जहागीरदार यांनी” तत्त्व काव्य” ही संज्ञा वापरली आहे . तसेच प्रसिद्ध कवी – समीक्षक ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर हेही” तत्त्व काव्य” असेच संबोधतात !
ज्ञानदेवांच्या प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे रम्य दर्शन घडवणारा हा स्वतंत्र ग्रंथ ! तत्त्वज्ञान विवेचनासाठी प्रस्थानत्रयी वर भाष्य करण्याची भारतीय परंपरा होती . त्या पैकी गीतेवर भाष्य लिहून ज्ञानदेवांनी परंपरेचा आदर केला, मात्र मराठीतून लिहून सामान्यांना न्याय दिला . पण अनुभवामृतात मात्र स्वतंत्रवाट चोखाळली !
” स्वानुभवाच्या सुवर्णाने अनुभवामृताची मूर्ती त्यांनी घडविली” असे विधान डॉ. अ . ना देशपांडे करतात ! ( प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास भाग १ उत्तरार्ध – पृ ३१५ – व्हीनस, पुणे )
डॉ. शं . दा पेंडसे लिहितात” उपनिषदे, गीता, गौडपाद कारिका, योगवासिष्ठ, शांकर मत, काश्मिरी शैव संप्रदाय व गुरुपरंपरेने आलेले नाथपंथीय तत्त्वज्ञान अशा सप्त सिंधूंचे ओघ त्यांच्या चिंतनात एकवटले आहेत”. ( उनि )
सारस्वतकार श्री वि . ल भावे म्हणतात” हा ग्रंथ म्हणजे एक शुद्ध रसायन आहे . यात शर्करा नाही आणि यास अनुपान नाही” ( महाराष्ट्र सारस्वत – आ. ५ . पुरवणीसह )
अनुभवामृतात काव्यात्म दृष्टांत, प्रकटोपमा ,लुप्तोपमा कशा प्रकारची सूचकता अभिव्यक्त करतात यावर सखोल व सूक्ष्म विवेचन विंदा करंदीकरांनी त्यांच्या” अमृतानुभवाचे अर्वाचीनी करण” ग्रंथाला लिहिलेल्या ‘ अहो ज्ञानेश्वर’ या प्रस्तावनेत केले आहे ! माऊलींनी सुंदर कल्पनाचित्रे रंगविली आहेत त्यातून अध्यात्माचे महावस्त्र विणले आहे .
” प्रिया सावलिए होये । ते अंगीचे अंगी न समाये ।
एरवी तेथेचि आहे । तारुण्य की ॥” ( १० .२२)
एक फक्त तरुण स्त्री आणि दुसरी प्रियाच्या सहवासात असलेली युवती – असे हे लोभस दर्शन अर्थाच्या किती तरी अर्थांच्या छटा उत्पन्न करते !
दुसऱ्या प्रकरणात संत निवृत्तिनाथांना विष उतरविणाऱ्या मांत्रिकाची सुप्तोपमा ( २ .१४ ) तर ३ . २२ मध्ये ऋणको ची सुप्तोपमा दिसते . अध्याय ७ मध्ये १८० व्या ओवीत पति पत्नीच्या नाजूक भावबंधाचे प्रणय प्रसंगाचे सूचन एका लुप्तोपमेतून केलेले दिसते . दृष्टी हे द्रष्टा व दृश्य यांचे अपत्य मानणे हे तत्वविचार सुसंगतच आहे ! शिवशक्ति समावेशनाच्या निमित्ताने तर नवपरिणत दांपत्याचे विलोभनीय संसारचित्र माऊलींनी अल्पाक्षरात पण नेमकेपणाने संवेद्यपणे साकारले आहे !
अनुभवामृतातील प्रतिपाद्य :
अनुभवामृतातील तत्त्वज्ञानाचा गाभाच निरुपाधिक आहे ! विश्वचैतन्य, विश्व स्फुरण यात अद्वयानंदाची अनुभूती त्यांना येते ! बाह्यात्कारी दिसणारे द्वैत हे मूलतः अद्वैतच आहे . ही अद्वयानुभूती आहे . हा भाषा मायावाद – विवर्त, आवरण – विक्षेपाची नसून एकात्म प्रतीतीची आहे .
पहिल्याच प्रकरणात किंबहुना त्यांनी रचलेल्या संस्कृत पंच श्लोकीत ” सार्धं केनच कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः
ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतान् छलान् मुहुः ।
असा जो उल्लेख दिसतो, त्यातच शिवशक्ति समावेशनाची भूमिका स्पष्ट झाली आहे . जसे कल्पनास्फुरण आणि तत्वज्ञान हे एकात्म तसेच स्त्री पुरुषही एकजीवच !
” प्रियूचि प्राणेश्वरी” असा उल्लेख माऊली करतात !” देवो देवी” हा शब्दही अन्वर्थक आहे माऊलींनी ईश्वर आणि माया हे शब्द जाणीवपूर्वक टाळले ! कोण कोणाचा अर्धाभाग हे कळत नाही, एवढे ते समरूप आहेत ! माया ही आवरण विक्षेप कारक पण ही शक्ती ईश्वराला” प्रकट “करणारी आहे ! म्हणून हे जग खोटे, आभासात्मक, मिथ्या नसून ती “वस्तुप्रभा” आहे .” जग असकी वस्तुप्रभा” असा माऊलींचा सिद्धांत आहे .” फुलेचि झाली भ्रमर । तरुणीच जाहले नर” अशी माऊलींची भोग, भोगी आणि भोग्य अशा त्रिपुटीच्या मावळलेपणाची परिभाषा येथे व्यक्त होते . हे विश्व चैतन्यमय असून हीच विश्व चैतन्यवादी – चिद्विलासवादी भूमिका त्यांच्या नव सिद्धांताचे स्पष्टपणे प्रकटीकरण येथे करताना दिसते ! जड तत्वातही चैतन्याचे कोंभ त्यांनी अनुभवले . हा अद्वयानुभव अनुभवामृताचा चिंतन विषय आहे . येथे अज्ञान जसे बाधक तसेच ज्ञानही बंधनकारकच ! म्हणून” अज्ञान खंडना नंतर ते ज्ञान खंडन ते करतात ! ज्ञानदेवीतील” कीर्तिमुख” येथे आठवतो ! शब्दांचे ऋण प्रकट करण्यासाठी ते एक प्रकरण खर्ची घालतात पण नंतर शब्द खंडन करून शब्दांची मर्यादा लक्षात आणून देतात . हे शब्दवाच्य नाही, हा शब्दाचा विषयच होऊ शकत नाही, शब्दही मौनावतात, शब्द ते प्रमाण असले तरी त्यांच्या द्वारे प्राप्त होणारे ज्ञान यथार्थ असतेच असे नाही ! ते फसवे असू शकते ! शिवाय शब्दनिष्ठता इंद्रियनिष्ठतेशी संलग्न असल्याने इंद्रिय व इंद्रियजन्य ज्ञानाला मर्यादा आहे . म्हणून अतींद्रिय अनुभूती हेच प्रमाण होय ! या प्रमाणाला इतर प्रमाणांची आवश्यकता नाही ! “स्वतः प्रमाणं परतः प्रमाणः” असे त्याचे निरपेक्षत्व असते . येथे फलव्याप्ती सिद्ध होते !
” एवं शब्दैक जीवने । बापुडी ज्ञान अज्ञाने ।
साचपणे वने । चित्रीची जैसी ॥(६.१०१)
चित्रातील वनश्री आणि शब्दज्ञान सारखेच !असे माऊली म्हणतात . या दृष्टीने वेदही शाब्द प्रामाण्यवादी म्हणून तोही खोटा ठरतो .
” वेदु कायी कायी न बोले । परी नावचि नाही घेतले ।
ऐसे काही जोडिले । नाही जेणे ॥(७.१०७)
आत्मतत्त्व हे वेदांच्या चिमटीत, पकडीत कसे येणार ? म्हणून माऊली अनुभवामृताच्या प्रारंभीच
” ऐसी हें निरूपाधिके । जगाची जिए जनके ।
तिए वंदिली मिया मूळिके । देवो देवी” ।( १ . १ )
असे नमनात म्हटले आहे . यातील” निरुपाधिके” हे विशेषण मार्मिक आहे . उपाधिरहितता” हेच आत्मतत्व आहे तसेच आत्म दर्शन आहे ! अहंशून्यता अहंताशून्य स्थिती हेच निरुपाधिकत्व ! हाच स्वरूप साक्षात्कार !! नाहीपणात – आत्मविस्मृत अवस्थेत व्यक्तिगततेचा लोप होतो तेथे परिमित प्रमातृत्व विगलित होऊन जे विश्वात्मक भान येते तीच समाधिस्थिती !
माऊलींनी म्हटले आहे :
” सांडूनि मिठपणाचा लोभु । मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेवि अहं देवोनि शंभु । शांभवी झाला ।”(१.६३)
प्रसिद्ध आधुनिक विचारवंत जे . कृष्णमूर्ती म्हणतात :
” To look at the totality of life at the whole
immense marvellous picture of life, there must be no platform from which you look no background of belief experience of knowledge either conscious or unconscious !”
थोडक्यात ” अहं” चे ” ‘सोहं” मध्ये विसर्जन होणे म्हणजेच मुक्ती ! आपल्या ” स्व” रूपाचा साक्षात्कार म्हणजेच”
शिवशक्ति समावेशन” ! येथे साधन भक्ती न उरता ती साध्य भक्ती अर्थात पराभक्ती आकार घेते ! आता प्राप्तव्य काहीच नसते ! ‘परानुरक्ति ईश्वरे ‘ही ती स्थिती !
भक्ती ऐक्यात कशी शक्य आहे? द्वैतातच भक्तीची संकल्पना आकारास येते म्हणून आ द्य गुरू शंकराचार्यांनी अद्वैतात भक्तीला अमान्य केले .परंतु माऊलींनी “अद्वैती भक्ती आहे”
हे सिद्ध करताना अत्यंत समर्पक दृष्टांत योजला आहे !
” देवो देऊळ परिवारु । कीजे कोरोनि डोंगरू ।
तैसा भक्तीचा वेवहारू । कां न व्हावा ?”(९.४२)
आद्य शंकराचार्यांना अत्यंत नम्रपणे पण तेवढेच बिनतोड असे हे उत्तर आहे ! अनुभवामृताचा हा अनुभवविषय आहे .
गुरुशिष्य ऐक्य :
नाथपंथीय तत्त्वज्ञान गुरुभक्तीने भरलेले आणि भारलेले आहे . ज्ञानेश्वरीत गुरुभक्तीचा महापूर दिसतो . अनुभवामृताचे दुसरे प्रकरण हे गुरुवंदनाचे आहे . पण गुरु चे स्वरूपही आत्मस्वरूपच आहे ! आत्म्या प्रमाणे येथेही निर्द्वंद्वता आहे . संत निवृत्तिनाथ हे माऊलीचे गुरु ! ही निवृत्ती म्हणजे प्रवृत्तीच्या विरोधी निवृत्ती नसून सहजभाव म्हणून निवृत्ती आहे . द्वंद्वातीत निवृत्ती आहे . ती स्वयंभू आहे ! आधुनिक विचारवंत श्री . जे . कृष्णमूर्ती यांच्या शब्दात –
” Inaction is not opposit of action, it is quite व different state”
आत्मतत्त्व हे वाच्य नाही . वाच्य वाचकत्व येथे संभवत नाही . संत ज्ञानदेव म्हणतात –
” म्हणौनि चित्सुख । हे बोल वस्तुवाचक ।
नव्हती हे शेष । विचारांचे ॥(५.१८)
आत्मज्ञान हे प्रमाण विद् नाही .
” विषो नोहे कोण्हा ही । जया प्रमेयत्वचि नाही ।
तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होय ।”(५.१६)
गुरुचे वर्णन ही ते असेच करतात .
” आता जो तो येया शब्दी । कें मेळवू अनुमानाचि मांदी ।
हा प्रमाणा ये वो नेदी । कोण्हा ही मां” (“२.२७)
गुरु हे आत्मपदी विराजमान परमात्मस्वरूप आहेत . आत्मा हाच खरा आपला परमगुरु ! आत्मसाक्षात्कार हेच गुरुचे ज्ञान ! या गुरुला वापरलेली संबोधने ” उपाय वन वसंतु”,” आज्ञेचा अहेव तंतू”” अमूर्तपणा सुमूर्तु” अशी नमनाच्याच ओवीत वापरली आहेत . हा गुरु मायारूपी हत्तीला ठार करून” मुक्त मोतियाचा वोगरू” सेवन करणारा असून प्रवृत्तीच्या ओघाला गंगेत सागरात विश्रांत पावविणारा म्हणून’ निवृत्ति रूप’ आहे . गुरु आणि शिष्य हे खरे तर द्वैत नाहीच – तेथे एकत्वच आहे ; पण केवळ एक लीला आहे .
” जेया एकपणें नव्हे सुसास । म्हणौनि शिष्यपणा चे करोनि मिस । जें कीं पाहणेचि आपुली वास । पाहतसे ॥” (२.१३)
अशी अद्वैत सिद्धी ते प्रकट करतात . गुरु आकाशा प्रमाणे निरुपाधिक, समुद्रा प्रमाणे नद्यांचे प्रवाह सामावून घेणारा व चंद्राप्रमाणे शांत प्रकाशी आहे, तो अद्वय आहे . मात्र लौकिक भाषेमुळे त्याला उपाधी स्पर्शिल्या सारख्या भासमय होतात . माऊली प्रतिमांच्या भाषेत मांडतात :
” परि सूर्यासी अंधकारु । कैं जाला होता गोचरू ।
तरि तमारि हा डगरू । आलाचि कीं ॥ (२.३४)
” तमारी” म्हणजे अंधाराचा शत्रू ! वास्तविक सूर्याची आणि अंधाराची कधी भेट होत नाही, पण तरी सूर्याला’ तमारी’ संबोधले जाते . तद्वत गुरु अलौकिक असूनही लौकिक परिभाषेमुळे उपाधी चिकटतात !
” राती नुरेचि सूर्या । ना तरी लवण पाणिया ।
नुरेचि जेवी चेईलिया । नींद जैसी ॥” (२.४१)
माऊलींनी निवृत्तिनाथांसाठी” सूर्याची” प्रतिमा ज्ञानदेवीतही” नवल उदेला चंडांशु । मावळवितु विश्वाभासू” अशी प्रतिमा १६व्या अध्यायाच्या नमनात वापरली आहे !
चित्सूर्याची ही प्रतिमा निवृत्तिनाथांच्या संदर्भात त्यांना समर्पक वाटते ! निवृत्तिनाथ हे गुरू सर्वांचेच आत्मगुरु होत . ते कुणाचे प्रतिस्पर्धी नाहीत ! गुरु शिष्य हे द्वैत नाहीच !
” तैसा गुरुशिष्य मिसे । हाचि एकु उल्लासे ।
जरी काही दिसे । दोनी पणे ॥”(२.६४)
असे माऊली म्हणतात .
त्रिपुटी संपल्यावर निरंजन अद्वैत एकात्मतेने प्रत्ययाला येते . वृत्ती तदाकार बनते , ही एकमयता अमृतमयता होय ! लौकिक अनुभव नाशिवंत तर अलौकिक अनुभव अविनाशी – अमृतमय !! ही अमृतत्वाची प्राप्ती हेच खरे अंतिम लक्ष्य होय ! “तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतंगमय” ही आमची वैदिक प्रार्थना हेच सांगते !
माऊली भेद केवळ मानीव आहेत, खरे अभेदाचे सूत्रच सर्वत्र असल्याचे विविध दृष्टांतातून सांगतात !
” की राती हन गेलिया दिवस हन पातलिया ।
काय सूर्यपण सूर्या ।होवावे लागे ॥”(२.७७)
दिवस आणि रात्र सूर्यामुळे घडतात पण त्यामुळे सूर्यात काही बदल होतो का ? तर नाही !
” कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव ।
नुरेचि रूप नाव ।तैसे यया ” ।(२.४२)
कापुराची ज्योत जळून जाते , तेव्हा मागे काय उरते ? तो अग्निरूप होतो . तसे गुरुशिष्य हा भेद नंतर उरत नाही .
” म्हणौनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहो शब्दांचा अर्थु ।
श्रीगुरुचि परि होतु । दोहो ठाई ।”(२.६१)
किंवा
डोळ्याची डोळ्यांशी होणारी भेट आरशाच्या उपाधीमुळे होते, पण गुरु निरुपाधिक असल्याने तो उपाधीशिवाय भेटतो, पण त्यासाठी बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख करावी लागते .
” दर्पणेविण डोळा । आपुले भेटीचा सोहळा ।
भोगिता तरि लीळा । सांगतो हे ॥”(२.६८)
माऊली पुढे म्हणतात अंतर्मुख दृष्टीसाठी आरशाची नव्हे पण अनुभूतीची गरज आहे !
” दिठी मुखाचिए बरवे । पाठीकडौनि जे पावे ।
तै आरिसे धांडोळावे । लागती काई ?”(२.७६)
अशा निवृत्त बोधरूप गुरू बद्दल बोलताना ते म्हणतात –
” ऐसे करणियाविण । स्वयंभचि जे निवृत्तिपण ।
तयाचे श्री चरण । वंदिले ऐसे ॥”(२.७९)
अशा” निवृत्त बोधरूप” गुरूला वंदन करून माऊली वाचाऋण फेडतात -” वाचा” ही शब्दरूप असते ! ही शब्द पूजा करून ते भाषिक ऋणातून मुक्त होतात . अनिर्वचनीय ता प्राप्त करण्यासाठी वचनांच्या सीमा ओलंडाव्या लागतात याची सार्थ जाणीव ते प्रकट करतात ! गुरुशिष्याच्या अद्वैत सिद्धीचा हा सोहळा शब्दातीत झाल्या शिवाय लौकिकाच्या सीमोल्लंघना नंतरच शक्य आहे !
अद्वयानंदमयता : समारोप
मर्यादित अहंभाव ओलांडून अमर्याद पूर्णत्वाच्या जाणिवेने आपण निर्भर झालो आहोत, असे ज्ञानदेव सांगतात ! अशा स्थितीत हे निरूपण म्हणजे काय ? तर
” आपणया आपणपें ।निरोपण काय रोपे ।
किं उणेपण हारपे । ऐसें आहे ।(१०.१६)
म्हणौनि माझी वैखरी । मौनाते म्हणे मौन करी ।
हे पाणियावरि मकरी । रेखिली जैसी ॥”
ज्ञानदेव मूर्ताकडून अमूर्ता कडे, द्वैता कडून अद्वैता कडे आणि द्वंद्वात्मक जाणिवेकडून निर्द्वंद्व नेणिवेच्या पातळीवर अनुभवदर्शनाच्या पातळीवर जातात हीच अद्वयानुभूती तेच अनुभवामृत !” आतां आमोद सुनास जाहले” असा प्रारंभ करून दृष्टांत मालिका उभी करून आशय आणि अभिव्यक्ती यात एकात्मता साधतात ! शिवच शक्तीच्या रूपाने व्यक्त झाला हीच आशय अभिव्यक्तीची समरूपता ! ग्रंथारंभी वर्णन केलेली” दो दांडी एकी श्रुती । दो फुली एकी दृती किंवा दो वोठी एकी गोठी । दो डोळा एकी दिठी ( १ . १८, १९) ” ही द्वैतात अद्वैत पाहण्याची तत्वदृष्टी – जगाला वस्तुप्रभा म्हणण्या मागील द्रष्टा आणि दृश्य यांतील एकात्म जाणीव आणि शेवटच्या प्रकरणातील” फुलेचि झाली भ्रमर” , यात होणारा त्रिपुटीचा लय, भोग्य आणि भोक्ता यांची एकरूपता ही त्यांच्या तत्वविचारातील सुसूत्रता आहे . तत्वज्ञानाच्या ग्रंथात जी षड्लिंगे सांगितली आहेत, त्यातील उपक्रम उपसंहारातील एकरूपता, अपूर्वता, अभ्यास, अर्थवाद , उपपत्ती म्हणजे संयुक्तिकपणे मांडलेले सिद्धांत आणि शेवटी फल म्हणजे तात्पर्य निर्णय यांचा विचार करता अनुभवामृत या ग्रंथाला शास्त्रीय सैद्धांतिक ग्रंथाचे महत्व प्राप्त होताना दिसते .
” जाला देवोचि भक्तु । ठावोचि जाला पंथु ।” ( ९ .३५)अशा एकात्म स्थितीत” जाला भृत्यु भज्य कालोवा । भक्तीच्या घरी ।” (९.३०)अशी ज्ञानोत्तर भक्तीची देव आणि भक्त ऐक्याची चपखल मांडणी ते करतात ! अशा वेळी” विश्वच एकांत होते” आत्म जाणिवेत लीन होते ! ही सुलीनस्थिती म्हणजेच अनुभवरूपअमृताची प्रतीती होय !! अनुभवामृतात आहे ती निःशब्द ,निर्द्वंद्व, निःसीम, एकरस, नेणिवेच्या पातळीवरील आनंदानुभूती ! समग्र विश्वाला आपल्या कवेत घेणाऱ्या या आनंदयात्री माऊलींच्या चरणी कोटिशः विनम्र साष्टांग प्रणिपात !! इति शम् ॥
आधारभूत ग्रंथ :
१) मराठी वाङ्मय कोश – प्राचीन कालखंड – संपा. डॉ. अ. ना . देशपांडे व इतर – नागपूर विद्यापीठ प्रका. पहिली आवृत्ती १९७४
२) प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास – डॉ. अ. ना. देशपांडे ५वी आवृत्ती व्हीनस, पुणे
३) ज्ञानदेवांचा आत्मसंवाद – वि .रा . करंदीकर कॉन्टि . प्रका. पुणे – पुनर्मुद्रण – २०२०
४) अमृतानुभवाचे अर्वाचीनीकरण – करंदीकर गो . वि . (विंदा )
५) अनुभवामृत – संपा. तुकाराम गरुड – ठाकूरबुवा – २०१९
६) ज्ञानदेवांची वाणी -संपा. डॉ विद्यासागर पाटंगणकर – डॉ. अशोक देशमाने – कार्ति, प्रका. औरंगाबाद २०१४
७) नित्यानंदैक्य दीपिका ( श्री अमृतानुभव विवरण – शिव कल्याण, इस १९३३ प्रका केशव भिकाजी ढवळे
८) अनुभवामृत पदबोधिनी – निरंजन रघुनाथ – श्री निरंजन रघुनाथ यांचे ग्रंथ – आ. १ सन १९३५ प्रका. यशवंत व्यंकटेश कोल्टरकर सांगली
९) शांकर तत्त्वज्ञानात भक्तीचे स्थान . डॉ. वा. ना पंडित, नागपूर विद्यापीठ प्रकाशन,१९६७
डॉ. विद्यासागर पाटंगणकर - बीड
vpatangankar@gmail.com
9420087021
पूर्वप्रसिद्धी : . ” नमो ज्ञानेश्वरा ” श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज वाङ्मय दर्शन, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची – मे – २०२५ – संपा. डॉ. भावार्थ देखणे व इतर
४. महाराष्ट्रात सुविख्यात असलेले आणि मराठवाडा प्रदेशाबाबत आस्था असलेले संत साहित्याचे अभ्यासक आणि मराठी भाषा व साहित्याच्या संशोधन क्षेत्रात दीपस्तंभासारखे अनेकांचे मार्गदर्शक ठरलेले –
डॉ. सतीश बडवे, पश्चिम महाराष्ट्र.
माऊली हा शब्द केवळ शब्द नाही. त्यापाठीमागे विशाल अर्थ दडलेला आहे. जन्मदात्रीला माऊली संबोधले जाते पण आईचे प्रेम,माया,पाखर, तिने घेतलेले कष्ट, मूल वाढवताना सोसलेले हाल, पेललेले दु:ख, जपलेला जिव्हाळा हे सारे लक्षात घेऊन माऊली असेच तिला संबोधले जाते. आई किंवा माय त्या त्या व्यक्तीची असते. पण माऊली मात्र जगाची असते. ‘ विठू माऊली तू माऊली जगाची’ असे म्हटले जाते ते याच अर्थाने. ज्ञानदेवांना वारकरी परंपरा माऊली म्हणते यापाठीमागेही अशीच विशाल अर्थच्छटा आहे. सामान्य माणूस, स्त्री, शूद्र या सर्वांना भक्तीच्या क्षेत्रात अधिकार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. धर्माचे अस्सल रूप व त्यातील तत्त्वज्ञान संस्कृतातील धर्मग्रंथात होते. सामान्य रयत यापासून दूर होती. कारण तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना अध्ययनापासून वंचित ठेवले होते. तो अधिकारच त्यांना दिलेला नव्हता. या साऱ्यांना त्यांच्या बोलीत गीतेचे तत्त्वज्ञान उलगडून सांगणारे ज्ञानदेव होते. यात माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ओतप्रोत भरला होता. ही आईचीच माया पण ती केवळ कुटुंबापुरती मर्यादित नव्हती. त्यामागे व्यापक समाजहित होते. लोककल्याणाची दृष्टी होती. एकाच्या कल्याणाचा हा विचार नव्हता, त्यात स्त्रीपुरूष असा भेद नव्हता अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलेले होते.हे करण्याची क्षमता कुणात असते? ती जिच्यात असते ती माऊली. ज्ञानदेवांनी दिलेल्या या सर्वव्यापी दृष्टिकोनामुळे सारेच त्यांना माऊली संबोधतात. या माऊलीच्या संस्काराने आजतागायत आपले जगणे विचारसंपन्न झाले. राग, लोभ, क्रोध , हेटाळणी, तिरस्कार सारे दूर लोटून जगावर प्रेमाची उधळण करुन, त्यांच्यावर मायेची सावली धरणाऱ्या माऊलीचे अंत:करणपूर्वक स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे….
– सतीश बडवे
५. ज्ञानेश्वरी निरूपणकार सौ. दीपाली काटे – धर्माधिकारी, पुणे

सौ दिपाली संतोषराव काटे
शिक्षण _ M A Economics, BED
आदरणीय गुरूवर्य श्री वासुदेवराव खंदारे गुरूजींची शिष्या
विनोबा- श्री रामकृष्ण परमहंस- विवेकानंद यांची भावधारेने संपन्न
ज्ञानेश्वरीचा कसल्याही प्रकारे अभ्यास न करता ,संथा न घेता केवळ गुरूआज्ञेवरून प्रवचनाची सेवा
अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरी , स्वामी विवेकानंद या विषयावर व्याख्यान ,प्रवचनसेवा
श्रीरामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान,केज या संस्थेतील आध्यात्मिक सेवेत सक्रीय सहभाग
६. साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात समर्पित कार्यकर्त्याच्या निर्लेप वृत्तीने वावरणारे -श्री. दिनेश प्रताप सिंह, मुंबई
सभी ऋषि-गुरु चरणों में,
मेरा है साष्टांग प्रणाम।
जिनके बिना न कुछ भी संभव,
होते स्वयं विधाता वाम ।।
जिन पर टिकी हुई शुचि संस्कृति,
गौरवान्वित सारा परिवेश।
सारे देव समाहित जिनमें,
शिरोधार्य नित गुरु-आदेश।।
हमें गर्व स्व-परंपरा पर,
जहाँ गुरु, ईश्वर का ही रूप।
अवर्णनीय है जिसकी महिमा,
खिलती जिससे जीवन- धूप।।
ज्ञान है जीवन-आधार,
गुरु जीवन के निर्माता।
सदा पूज्य होते हैं गुरुजन,
सारा जग नित यश गाता।।
गुरु आध्यात्मिकता का पोषक,
गुरु होते ज्ञानयज्ञ मर्मज्ञ।
शिष्य-गुरु के कर्म उच्च,
सफल दोनों का जीवन- यज्ञ।।
श्रद्धा, विश्वास गुरुओं के प्रति,
भरता जीवन में उत्साह।
लक्ष्य समर्पित सोच उभरती,
गुरु-महिमा की मिले न थाह ।।
गुरु-शिष्य सम्बन्ध शुचि- पावन,
ग्रंथों में अगणित दृष्टांत।
शिष्य, गुरु की प्रतिछाया है,
भावपूर्ण है श्रद्धा उर-प्रान्त ।।
दिनेश प्रताप सिंह – मुंबई

She worked as senior doctor in a big hospital in New York City
७ विशेष सहभाग: श्री अनिलकुमार भाटे. हे गेल्या ४० वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. ग्रंथाली प्रकाशनाच्या संस्थापकांपैकी ते एक आहेत. वेद, उपनिषदे, महाकाव्ये यांचा व्यासंग त्यांनी जोपासलेला आहे. आयआयटी पवई येथे दहा वर्षे प्रोफेसर म्हणून काम केलेले आहे. त्यांनी आवर्जून ‘ज्ञानोत्सवा’साठी लेख पाठवणे, ही विशेष आनंदाची बाब आहे. आम्ही त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो.
लेख येथे वाचा
कुणा एका इंजिनियर व तंत्रवैज्ञानिकाचा अध्यात्मप्रवास
खरेतर या विषयावर एक संपूर्ण पुस्तिका लिहिण्याचे माझ्या मनात आहे. पण इथे काही थोडे मुद्दे अगदी संक्षिप्त स्वरुपात लिहितो. या विषयावर सांगण्यासारखे बरेच काही मजपाशी आहे. पण ते सर्व इथे लिहायला जागा नाही. त्यातली माझी भूमिका अशी की ज्ञानेश्वरीच्या सहाव्या प्रकरणामध्ये दिलेले “कुंडलिनी जागृती” या विषयावरच्या विवरणामधले काहीबाही माझ्या स्वतःच्या ध्यानसाधनेच्या दरम्यान मी प्रत्यक्ष अनुभवले आहे म्हणूनच हा लेखनप्रपंच.
- माझा जन्म १९४७ सालच्या अक्षय्यतृतीया या शुभदिवशीचा. आजवरच्या ७८ वर्षांच्या जीवनामध्ये मी उणीपुरी ४५-४६ वर्षे प्राध्यापक म्हणून शिकवले सुरवातीची १० वर्षे मुंबईत आय.आय.टी.(पवई) व नंतरची अमेरिकेत. मी व माझा संपूर्ण परिवार गेली ४० वर्षे अमेरिकेत आहोत.
- सन १९७१ साली भारत-पाक युद्ध झाले त्याच्या थोडक्याच अलिकडे मी आय.आय.टी. मध्ये एम.टेक ची पदवी घेतली. तेव्हाच भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांच्यावर बसवण्याकरता अत्याधुनिक रेडार यंत्रणा विकसित करण्यासाठी भारतात त्याकाळी अस्तित्वात नसलेल्या अत्याधुनिक मायक्रो-इलेक्ट्रोनिक तंत्रविज्ञान विकसित करणे गरजेचे होते. संरक्षण खात्यातर्फे आलेल्या त्या प्रकल्पावर रिसर्च इंजिनियर म्हणून लगोलग माझी सर्वप्रथम नेमणूक झाली व ती माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी.
- पण हे काम कमालीचे कठीण होते तरीही कमालीची एकाग्रता साधून मी ते करत होतो, तोपर्यंत ७१ सालचे भारत-पाक युद्ध सुरु झालेले होते. दिवसाच्या २४ तासातले १८-१९ तास मी प्रयोगशाळेत काम करायचो, कमालीची एकाग्रता व क्मालीची ध्येयासक्ती. माझी अवस्था “झॉम्बी” सारखी झाली होती व मला इतर कशाची शुद्ध राहिलेली नव्हती व त्या अवस्थेमध्ये मला विचित्र अनुभव येऊ लागले. पण त्याकडे लक्ष न देता मी माझे काम पूर्ण केले. व्याख्याता म्हणून बढती मिळाली, मायक्रो-इलेक्ट्रोनिक तंत्रविज्ञान असा नवा विषय बनवला, जो भारतात इतर कुठेच शिकवला जात नव्हता, व एम.टेक. च्या वर्गाला शिकवायला लागलो.
- नंतर समजले की अशा विचित्र अनुभवांना अध्यात्मात “अतींद्रिय अनुभव” म्हणतात. तेव्हा मी अध्यात्माचा अभ्यास करायला लागलो, वेदांवर संशोधन करू लागलो, व जोडीला ध्यानसाधना करायला लागलो. १९७३ साली कै. गोएंका गुरुजींना बोलावून घेऊन १० दिवसांचे शिबीर आय.आय.टी. मध्ये भरवले व त्यांच्या समोर बसून विपश्यना करायला शिकलो. ती आजतागायत ५२ वर्षे चालू आहे, अमेरिकेतल्या प्रदीर्घ वास्तव्यामध्ये देखील..
- विपश्यना साधनेच्या द्वारे “सविकल्प” समाधिचा प्रत्यक्ष अनुभव अनेकदा घेतला. पण निर्विकल्प समाधि पर्यंत पोचता येईना. १९८० च्या दशकाच्या सुरवातीला काशीचे कै. पंडित गोपीनाथ कविराज यांच्या “काश्मीर शैवीझम” या परंपरेचा “शक्तिपात” मिळाला. व त्याद्वारे “निर्विकल्प समाधि” चा अनुभव मिळाला.
- ज्ञानेश्वरीच्या सहाव्या प्रकरणामधील कुंडलिनीचे जागरण व त्यात येणारे अनुभव, त्यांचा प्रभाव, इत्यादी सर्व अनुभवले व त्याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. पण विस्तारभयास्तव आता थांबतो.
- जिज्ञासू व्यक्तींनी प्रश्न विचारले तर मी उत्तरे देऊ शकेन. वरील सर्व अवघ्या दोन तासांमध्ये घाईघाईने लिहिले.व अमेरिकेतून इ-मेल द्वारे पाठवले.
डॉ. अनिलकुमार भाटे,
बर्कले हाइट्स, न्यू जर्सी राज्य, अमेरिका.
८.वाचनशिल्प – संकलक – 👇 श्री सुधीर शिरडकर
गीताका अर्थ जसा गोविंद जाने, तसाच ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्ञानेश्वर जाणे, इतरांनी कशाला अहंकार मिरवावा?
बादली कोरडी करण्याकरिता कधीतरी पालथी घालावी लागते . ती तशीच राहिली आणि नळ सोडला , ती उलथी केली नाही तर काय होणार ? पाणी वाहून जाणार !
आनंदाचे आवारू ज्ञानेश्वरांनी बांधले . पण तिथे जाण्याची इच्छा तर पाहिजे . आमचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्यासपीठावर सांगतात , मी ज्ञानेश्वरी वाचली नाही म्हणून ! खरे म्हणजे त्यांना खाली ओढले पाहिजे . मला एकदा प्रसंग आला . परिसंवादात बोलणार होतो . परिसंवाद ज्ञानेश्वरांवरचा . संमेलनाच्या अध्यक्षाने ज्ञानेश्वरी वाचली नाही म्हणून सांगितले . मी म्हटले , ‘ ज्या संमेलनाचा अध्यक्ष ज्ञानेश्वरी वाचली नाही म्हणतो त्या संमेलनात ज्ञानेश्वरांवर परिसंवाद कशाला ? साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘ मला ज्ञानेश्वरी कळली नाही ‘ असे म्हणाले असते तर चालले असते . कारण कुणीही मला ज्ञानेश्वरी कळली असे छातीवर हात ठेवून सांगू शकणार नाही – हयातभर ज्ञानेश्वरी वाचणारादेखील . गीताका अर्थ जसा गोविंद जाने , तसाच ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्ञानेश्वर जाणे , इतरांनी कशाला अहंकार मिरवावा ? असे ‘ मला ज्ञानेश्वरी आवडली नाही ‘ अध्यक्ष म्हणाले असते तरी चालले असते . आवडलीच पाहिजे असे नाही . ‘ भिन्नरुचिर्हिलोका: ‘ प्रत्येकाची आवड वेगळी आहे . पण मी वाचली नाही हे म्हणणे योग्य नाही . दादांनी , दासगणू महाराजांनी ज्ञानेश्वरीबद्दल सुंदर वचन लिहिले आहे.
महती ज्ञानेश्वरीची l प्राकृत ग्रंथी अनुपम साची ll ध्रु. ll
रत्ने शब्दाब्धीची l वेचून रचना केलि जियेची ll
उपमा उपमेयांची l गर्दी ज्याला गोडि सुधेची ll
आठवण करवित साची l शुचिपण ज्याचे गोदावरिची ll
वाणी दासगणूची l कुंठित झाली गति शब्दांची ll
तसेच
अमृत अमर करी परी ज्ञानेश्वरी करित त्यावरी ताण l
पावन करून सकलां ब्रह्मास्थिति माजि डोलवी जाण ll
ज्ञानेश्वरीचे हे महात्म्य अलौकिक आहे .
एक ओवी – ” अनुवाद ज्ञानेश्वरी “
अनुभवावी
👇
स्वर्गराज्याचा सहाय्यक l सर्वज्ञता ज्याची अलौकिक l
तो पुरोहितामधें मुख्य l बृहस्पति मी देवगुरू ll 261 ll
संदर्भ ग्रंथ – कर्मसंन्यासयोग
( अध्याय 5 )
आणि
अनुवाद ज्ञानेश्वरी
( अध्याय 10 )
स्वामी वरदानंद भारती
संग्रहातून –
श्रीगुरुपदाश्रित
गुरू समर्पित असे हे वाचनशिल्प समर्पित साधक श्री. सुधीर शिरडकर यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला दिले. आम्ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. दासगणू परिवार नेहमीच सात्त्विकतेची अनुभूती देतो. आम्हाला त्यांच्या सान्निध्यात राहण्यास आवडेल.
पूजनीय दासगणू महाराजांचे शिष्य स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांनी आज प्राकृतातील मुळ ज्ञानेश्वरी सर्व सामान्य लोकांना समजत नाही म्हणून मराठी मध्ये अनुवाद ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला.
हा ग्रंथ दासगणू प्रतिष्ठान गोरटे येथे व अन्य ठिकाणी उपलब्ध आहे
अधिक माहितीसाठी www.santkavidasganu.org या वेबसाईटवर वापरा
तसेच स्वामी वरदानंद भारती यांचे प्रवचन किर्तन varadvani या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत
- संपादन वृंदा आशय –
मार्गदर्शन – डॉ. लता मोहरीर
तंत्र सहाय्य – सोहम खांबेटे
संपादकीय
ज्ञानक्षेत्राशी एकनिष्ठ राहा !
1997 साली मी बी.ए .प्रथम वर्षाच्या वर्गात प्रवेश घेतला होता. सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयातला हा प्रवेश म्हणजे माझा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातला प्रवेश होता . विद्यार्थी म्हणून अत्यंत सजगपणाने मी त्यावेळेस पासून हे क्षेत्र पाहात, न्याहाळत आणि अनुभवत आलेली आहे. आज जवळपास २८ वर्षांनंतर या क्षेत्राबाबत माझे काही निश्चित असे मतंही तयार झालेले आहेत. अर्थातच ही मतं तयार होण्यामध्ये २० वर्षांचा प्रदीर्घ असा जो अध्यापनाचा अनुभव आहे, तो अधिक महत्त्वाचा ठरतो.
तेव्हा सर्वप्रथम मला शालेय जीवनापासून ते विद्यावाचस्पती पदवीपर्यंत विद्यार्थी म्हणून घडवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांविषयी मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करते. अध्यापनाच्या क्षेत्राचा विचार करत असताना मला जाणवतं मी बी.एड. ही पदवी घेतलेली नाही. या अभ्यासक्रमाला मी प्रवेश घेतलेला नव्हता . किंबहुना बी.एड. करायचे नाही याचा ठाम निर्णय घेतलेला होता. त्यामुळे नेट सेट या परीक्षांच्या माध्यमातूनच ‘अधिव्याख्याता’ होण्याची पात्रता मी प्राप्त केलेली होती. त्यानुसार माझ्या अध्यापन कार्याला मी सरस्वती भुवन मध्ये २००६ पासून सुरुवात केली .
विद्यार्थी जीवनातून एकदम शिक्षक म्हणून उभं राहणं तसं कठीण असतं. हळूहळू गोष्टी जमत जातात आणि शिकवणं रक्तातच आहे असं म्हणलं तर कदाचित वावगं ठरू नये. मात्र या तात्त्विक भूमिकेशी वास्तव जगाची सांगड घालावी लागते. मग हा शिक्षक परिस्थितीचे टक्के-टोणपे खात तयार होत असतो. माझ्यातला हा ‘शिक्षक’ ज्या ज्या संस्था पदाधिकाऱ्यांनी आणि प्राचार्य – उपप्राचार्यांनी घडवलेला आहे;
त्या सर्वांविषयी मी या ठिकाणी ऋण व्यक्त करते.
शिक्षणाच्या बाबतीत असं म्हणलं जातं की शिक्षण हे एक असं ‘ऋण’ आहे, असं ‘कर्ज’ आहे; जे मागच्या पिढीकडून घ्यायचं असतं आणि पुढच्या पिढीला परत करायचं असतं. पण ज्या वातावरणात माझं सबंध शिक्षण झालेलं आहे ते वातावरण , त्या शिक्षकांचे संस्कार मला शिकवतात, “शिक्षण हे एक संचित आहे, जे जपायचं , जोपासायचं आणि वृद्धिंगत करायचं असतं; आणि तो ठेवा पुढच्या पिढीला हस्तांतरीत करायचा असतो, कालानुरूप बदल स्वीकारत अधिक सशक्त होऊन प्रवाही राहण्यासाठी!”
हे बदल स्वीकारत वाटचाल करत असताना ‘शिक्षण धोरणं’ देखील खूप महत्त्वाची ठरतात. ज्या वेळेला मी पुणे येथील एमआयटी महाविद्यालयात पहिल्या राष्ट्रीय शिक्षक परिषदेसाठी गेले होते, त्या वेळेला शिक्षण धोरणांचा बऱ्यापैकी सखोल अभ्यास केला होता. तेंव्हा माझ्या लक्षात आलं की सगळी धोरणं सर्वसाधारणपणे एकसारखीच आहेत. प्रत्येक धोरण तात्त्विक पातळीवर ‘आदर्श’ म्हणावं असं आहे. फक्त वर्षानुवर्ष उलटत गेली तरी या धोरणांचे पडसाद प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीत. शिक्षणातले प्रश्न तसूभरही बदलले नाहीत , उत्तरांद्वारे हे प्रश्न पुढे गेलेले नाहीत; अर्थात हे मी टीका म्हणून म्हणत नाही. भौतिकदृष्ट्या फार मोठे बदल आपण अनुभवलेले आहेत. मात्र शिक्षणाच्या आत्मा ज्या पद्धतीने विकसित व्हायला हवा होता तसा तो झालेला दिसत नाही. माझा हा मुद्दा मला श्रीअरविंद यांच्या एका उद्धृताद्वारे स्पष्ट करण्यास अधिक आवडेल.
श्री अरविंद त्यांच्या ‘Essays on the Geeta (‘गीतेवरील निबंध’) या पुस्तकामध्ये लिहितात, “भौतिकदृष्ट्या जी घडते ती ‘प्रोसेस’ आणि आंतरिक दृष्ट्या जी होते ती ‘प्रोग्रेस’. जोपर्यंत आपण आंतरिक विकास ‘साधणार’ नाही तोपर्यंत आपली खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही. हा आंतरिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून मला विद्यार्थी हा ‘साधक’ म्हणून अधिक भावतो.
साधक शब्द येताच अगदी स्वाभाविकपणाने विचार होतो तो ‘साध्य आणि साधनाचा’. आपल्या संत तुकारामांनी या साध्य – साधनाच्या बाबतीत मूलभूत असा विचार १६ व्या शतकामध्येच व्यक्त केलेला आहे.
‘ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी!’
हे संतवचन, हा विचार भारतीय मनामध्ये इतका खोलवर रुजलेला आहे की ; त्याचं कोणतंही स्पष्टीकरण करण्याची मला आवश्यकता भासत नाही.
आजच्या विद्यार्थ्यांना या अनुषंगाने मी केवळ एवढंच सांगेल, आपण ‘साधना’च्या ऐवजी ‘यंत्रां’च्या आहारी चाललेलो आहोत. ‘यंत्र’ आपल्याला एका बटणावर क्लिक केलं की सगळं काही मिळवून देतं आणि ‘साधन’ मात्र आपल्यातला साधक घडवत घडवत साध्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो. जिथे व्यक्ती खऱ्या अर्थाने घडत साधते आंतरिक विकास ! त्यामुळे आज ‘श्री ज्ञानेश्वरी उत्सवा’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आणि समस्त जनांना एक कळकळीची विनंती ज्ञानक्षेत्राशी एकनिष्ठ राहा!
आजच्या या विशेष अंकात योगदान दिलेल्या सर्व गुरुवर्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते आणि आपलं सहकार्य सातत्याने लाभावे, ही प्रार्थना करते; कारण आपले आशीर्वादच ज्ञानक्षेत्राला पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावणार आहेत. शुभं भवतु!
वृंदा आशय