विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जनांचा जनार्दन निवर्तला !

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक कै. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

– संपादक वृंदा आशय

ज्यांचे शब्द, विचार आणि साहित्य आपल्या जीवनात अर्थ निर्माण करते
त्यांच्याबद्दल आपण निरंतर कृतज्ञ असावे !

मी कला शाखेत ११ वी च्या वर्गात शिक्षण घेत असताना कोल्हापूर येथे एका वक्तृत्व स्पर्धेसाठी गेले होते. कदाचित ती राजर्षी शाहू महाविद्यालयात होती. तत्कालीन प्राचार्य जीवन देसाई सरांच्या आग्रहपूर्वक आदेशामुळे राज्यशास्त्र विषयाच्या मगर बाई मला आणि अविनाश मधाळे याला घेऊन गेल्या. तेव्हा ‘राजर्षी शाहू महाराज’ यांच्यावर भाषण करून कोल्हापूरकरांची शाबासकीची थाप मी मिळवली होती. ते भाषण मी वाघमारे सरांच्या एका पुस्तकातून जसेच्या तसे घेतले होते. माझा फक्त आवाज होता. मात्र त्या भाषणाने, त्या शाबासकीच्या थापेने आणि त्याच स्पर्धेत उत्स्फूर्त वक्तृत्वामध्ये अधोरेखित झालेल्या माझ्या उणीवेने मला अधिकच सजग केले. ……पुढच्या दिशा स्पष्ट केल्या. वाघमारे सरांची पहिली भेट अशी त्यांच्या लेखनातून झाली. पुढे मी अधिव्याख्याता म्हणून काम करत असताना, ‘मराठवाड्यातील लेखकांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे’ या विषयावर एक लघु प्रकल्प केला. सर शहरात आलेले असताना त्यांच्याशी याबाबत संवाद झालेला होता. आमचे तत्कालीन विभागप्रमुख डॉ. ऋषीकेश कांबळे लातूरला गेल्यावर सरांनी आवर्जून माझ्या अभ्यासासाठी त्यांचे व्यक्तिचित्राचे पुस्तक उत्स्फूर्तपणे व आस्थेने पाठवले. त्यांच्यातल्या या माणुसकीच्या झऱ्याने मला दिलेले दान प्रवाहित ठेवता यावे, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना ! शिक्षण कार्यातून व साहित्यातून संवेदनशील माणुसकी पेरणा-या या जनी जनार्दनाला विनम्र श्रद्धांजली !


स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील लेखात ‘जीवनवेध’ या आपल्या व्यक्तिचित्रणपर पुस्तकामध्ये ‘जातीय राजकारणाबाबत’ लेखक जनार्दन वाघमारे लिहितात,

” भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक व सामाजिक प्रश्नांची व्याप्ती, उग्रता व गुंतागुंत अधिकच वाढली . भारतीय लोकशाहीचा सर्व डोलारा नोकरशाहीवर व पक्षीय राजकारणावर अवलंबून राहू लागला. जवळपास सर्वच राजकीय पक्ष जातीयवादाच्या आश्रयाने राजकारण करू लागले आणि म्हणूनच त्यांना या देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनता आले नाही. जातीच्या आधारावर सत्ता मिळू शकते पण आर्थिक व सामाजिक बदल घडवून आणता येत नाहीत. शेवटी सत्ता मिळविणे व तिचा भरपूर उपभोग घेणे याशिवाय दुसरे कसलेही प्रयोजन जातीचा आधार घेऊन सत्तेवर आलेल्या पक्षासमोर उरत नाही. हा अनुभव आता जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांच्या पदरात पडलेला आहे. आमची सांसदीय लोकशाही भरडली गेली ती अशा राजकारणामुळे. ज्या संसदीय लोकशाहीचा आम्ही श्रद्धेने अंगीकार केला तिच्या मर्यादा अल्पावधीतच प्रकर्षाने जाणवू लागल्या. जनतेमध्ये परावलंबी प्रवृत्ती अधिकच प्रमाणात वाढल्या आणि विस्तारल्या. सामाजिक परिवर्तनाचे कार्य जवळजवळ बंदच पडले. ज्या समाज रचनेचे स्वप्न जयप्रकाशजींनी पाहिले होते ते दुभंगू लागले.”

‘जीवनरेखा’ – लेखक जनार्दन वाघमारे ( या व्यक्तिचित्रांच्या पुस्तकातून साभार!)


माहिती स्त्रोत – https://mr.wikipedia.org/s/4gzm

डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे, (जन्मदिनांक- ११ नोव्हेंबर १९३४, मृत्यू – दिनांक ०२ मार्च २०२६)

जन्मगाव – जानवळ, तालुका – चाकूर, जिल्हा – उस्मानाबाद, राज्य – हैद्राबाद.  

मृत्यू – लातूर, मराठवाडा प्रदेश, महाराष्ट्र.

< इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक < निग्रो साहित्याचे भाष्यकार < दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक < शिक्षणतज्ज्ञ

त्यांचे शिक्षण कौठा, लातूर, हैद्राबाद, औरंगाबाद येथे झाले. ‘The Problem of Identity in the Postwar American Negro Novel’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

प्रकाशित साहित्य

डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत लेखन केले आहे.

वैचारिक

  • ‘अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती’ (१९७८) हा पहिला अमेरिकन नीग्रोंचे विवेचन करणारा ग्रंथ.
  • ‘आजचे शिक्षण : स्वप्न आणि वास्तव’ (१९९३)
  • चिंतन एका कुलगुरूचे’ (१९९९)
  • ‘चिंतनयात्रा’ (२००४)
  • ‘दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी’ (२०१३)
  • ‘परिवर्तन : संकल्पना, वेध आणि वास्तव’ (१९९९)
  • ‘प्राथमिक शिक्षण : यशापयश आणि भवितव्य’ (१९८२)
  • ‘बदलते शिक्षण : स्वरूप आणि समस्या’ (२००९)
  • ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातिअंताचा लढा’ (१९९०)
  • ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारक शैक्षणिक विचार आणि कार्य’ (२०१५)
  • ‘महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण’ (१९८०)
  • ‘माझे मूळ : माझे कूळ’ (२०१५)
  • ‘लोकशाही आणि शिक्षण’ (२०१२)
  • ‘विमर्श’ (२०१५)
  • ‘विचारमुद्रा’ (२०११)
  • ‘शरद पवार : व्यक्तित्व, कर्तृत्त्व आणि नेतृत्व’ (२०१६)
  • ‘शिक्षण : समाज परिवर्तन व राष्ट्रीय विकास’ (१९८४)
  • ‘संपादन : कर्तृत्त्वाचा सह्याद्री’ (२०१३)
  • ‘साहित्यचिंतन’ (१९९६)
  • ‘स्वातंत्र्य : एक चिंतन’(२०१६)
  • ‘हाक आणि आक्रोश’ (१९८४)

प्रवासवर्णन

  • ‘ज्ञान – विज्ञानाच्या देशात’ (२००५)

कादंबरी

  • ‘बखर एका खेड्याची’ (२००५)

आत्मचरित्रात्मक कादंबरी

  • ‘चिंतन एका नगराध्यक्षाचे’ (२००६)
  • ‘मूठभर माती’ (२००६)

व्यक्तिचित्रणे

  • ‘जीवनरेखा’ (२००?)
  • मला माहित असलेले शरद पवार (संपदित, नऊ सहलेखक)
  • ‘व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व’ (२०१५)
  • ‘व्यक्तिवलये’ (२००५)
  • ‘स्वामी दयानंद सरस्वती : विचार, कार्य व कर्तृत्त्व’ (२०१०)

ललित लेखसंग्रह

  • बखर एका खेड्याची
  • ‘मंथन’ (२०१०)
  • ‘मातीवरच्या ओळी’ (२०१०)
  • यमुनेचे पाणी
  • राज्यसभेतील सहा वर्षे (२००८ ते २०१४)
  • ‘सहजीवन’ (२०१२)

अनुवादित ग्रंथ

  • ‘एक शिक्षाविद् का चिंतन’ (१९९९)
  • ‘ध्यास परिवर्तनाचा’ (२०११) हा गौरवग्रंथ
  • ‘महर्षि दयानन्द सरस्वती : विचार, कार्य और कृतित्व’ (२०१२)
  • ‘दलित साहित्य की वैचारिक पृष्ठभूमि’ (२०१३)
  • ‘समाज परिवर्तन कि दिशाएँ’ (हिंदी, १९९५)
  • ‘संवाद’ (२००६) : हा आकाशवाणीवरचा भाषणसंग्रह
  • ‘साहित्यचिंतन’ (२०१६)

इंग्लिश साहित्य

  • ‘My Days In Parliament’ (२०१७)
  • ‘The Horizons And Beyond’ (२००६)
  • ‘The Quest for Black Identity’ (२००२)
  • ‘Sharad Pawar : A Profile in Leadership’ (२००९)

यावर आपले मत नोंदवा