विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जनहितार्थ २

‘जनी जनार्दन’ या भावनेतून जनसेवेत समर्पण !

संपादक – वृंदा आशय


धनुर्मास सुरु झालेला आहे. आध्यात्मिक शक्तीच्या उपासनेसाठी आणि सत्कर्मासाठी हा शुभ मानला जातो. या धनुर्मासात आपले संकल्प सिद्धीस जावोत यासाठी हार्दिक शुभेच्छा ! – वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु !

प्रिय कृष्णा,

एक पसायदान देतोस का रे?

 या मर्त्य जगामध्ये 'देव' आहे किंवा नाही यावर वाद घालणारे अनेक बुद्धिवादी तुला सहजतेनं सापडतील. देव सर्वत्र कसा आहे आणि देव कुठेच कसा नाही या दोन्ही गोष्टी इतक्या सबळ पुराव्यांनी आणि अचूकतेने सिद्ध केल्या जातात की तुला तुझ्यावरच शंका निर्माण झाली पाहिजे, इतकी आम्ही माणसं प्रगत झालेले आहोत. 

लोक तुला भजतात रे, नाही अशातला भाग नाही. पण खरं सांगू का? त्यामध्ये ना निखळ भक्तीपेक्षा भीतीचा भाग अधिक असतो. माझं कसं होईल, माझ्या लोकांचं कसं होईल या विवंचनेत असणारा माणूस, ‘तुझं कसं होईल’, याचा कसा विचार करू शकेल? शिवाय लोकांना जर या प्रश्नाचा विचार करावा लागला ना तर खरंच सांगते जगातून तुझी भक्ती वगैरे ताबडतोब संपुष्टात येईल.

एखादेच स्वामी विवेकानंद असतात रे जे निरागस बालक म्हणून तुझ्यावर श्रद्धा ठेवतात, कठोर चिकित्सक म्हणून तुला प्रश्न विचारतात आणि रामकृष्णांच्या सहवासाने धन्य होऊन काली मातेच्या मंदिरात कठीण परिस्थितीतही कोणत्याही भौतिक गोष्टींची मागणी न करता, सलग तीन वेळा

“शक्ती दे ,भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे” हीच मागणी करतात.

स्वतःच्या नावातील ‘विवेक’ आणि ‘आनंद’ ही दोन्ही पदं त्यांनी अक्षरशः सिद्ध केली आणि ते त्यानुसार जगले. आज ते युवकांचे चिरंतन प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात. बघ, त्यांना विचार कसं चाललंय म्हणून?

असो. साऱ्या जगाला सांभाळतोस तू; स्वतःची काळजी घे बाबा. तुझी रुक्मिणी ही तुझ्यावर रुसून निघून गेली. तिच्या शोधात पंढरपुरात जाऊन विठ्ठल झालास. तिथेही तुझं वेगळं मंदिर! बघ बाबा , विचार कर ; सोपं नसतं रे दुखावलेल्या स्त्रीला पुन्हा आपलंसं करणं. शेवटी १६,१०८ जणी तुझ्यासोबत असल्या तरी रुक्मिणी ती रुक्मिणीच, हे मी तुला सांगावं असं थोडंच आहे?

मला माहिती आहे रे, तूच कर्ता – करविता आहेस. कधीतरी तुलाही विसाव्याची गरज वाटत असेल ना. एरवी तर येतोसच, दुःखात आम्ही बोलवतोच तुला तेवढ्या आर्ततेने आणि हक्कानेही ! पण एक वर दे देवा, सुखाच्या क्षणीही तुझा कधीच विसर न व्हावा. कुंतीसारखं सतत दुःख मागावं, हे सामर्थ्य नाही रे माझ्यात. खरं सांगू का कृष्णा, खूप थकले रे मी आता. अनेक पातळ्यांवर एकाच वेळी तू लढायला लावलंस मला. खरं म्हणजे अनेक ठिकाणी तूच लढलास, मी हतबल झाले की तुझ्या गळ्यात पडून ढसढसा रडायचे. पहाटेच्या किलकिल्या अंधारात ते अश्रू कोणाला दिसू नयेत याची व्यवस्था तूच तर करत होतास. तुला माहिती आहे का पण, त्याची जाणीव ठेवत नाही रे कोणी! असो. मी काय इतरांसारखी तक्रारी करायला लागले तुझ्याजवळ ? वेडीच आहे मी सुद्धा.

तू मला भेटलास आणि माझं दुःख सुद्धा तू सुखरूप केलंस ही वस्तुस्थिती आहे. तुझी कृतज्ञच आहे रे मी. तुझ्याइतकं हक्कानं, प्रेमानं कोण काळजी घेणार माझी? म्हणूनच मी आता तुझी होऊन गेले बघ. इतर कोणाशी आणि कशाशीही मला काही घेणं देणं नाही.

पण गंमत सांगू का कृष्णा, असा विचार मनात आला की लगेच संत ज्ञानदेव समोर येतात त्यांचा ‘चिद्विलासवाद’ घेऊन. माऊलीच ती. त्यांच्या एका ओवीचा जरी डोक्यावरून हात फिरला ना की भाग्यरेषाच बदलून जातात बघ. म्हणून म्हणते तुला तू ये आपण दोघेही त्यांच्याचजवळ राहू आणि सुखी होऊ. माय मराठी पासून आणि माऊलींपासून कधी अंतर पडू नये एवढेच एक वरदान दे बाबा. मग मागायचं काही बाकी राहात नाही बघ.

तुझीच मी.


||ॐ||

       || ॐ गं गणपतये नम: ||

    || ॐ नमो भगवते वासुदेवाय ||

   आयुष्य आणि पुस्तकाचं व्याकरण सारखंच आहे. शब्दाची निवड चुकली की, वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकली की, आयुष्य बिघडतं.

कुमुदताई गोसावी, पुणे
(संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक)

         🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏

धनुर्मास – प्रा. श्रीकांत काशीकर

१६ डिसेंबर २०२५ ला धनुर्मास सुरू झाला. आता तो १३ जानेवारी २०२६ ला संपेल. तर १७ मे ते १५ जून २०२६ या काळात अधिक ज्येष्ठ मास आहे. या दोन्ही मासांचा विचार केला की ही काय भानगड आहे? असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. पण पूर्वी हे प्रश्न फारसे पडत नसत. कारण कुटुंब व्यवस्था भक्कम होती, घरात ‘आजीआजोबा गुरुकुल’ सक्षम होतं. संस्कृतीचा अभिमान होता. त्यातील आचारसंहितेचे पालनही होत होतं. आता हे दुर्मीळ होत चालल्याने असे प्रश्न नव्या पिढीला पडतात.


सूर्य वर्षभरात बारा राशींमधून भ्रमण करतो. तो धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून ‘धनुर्मास’ सुरू होतो. ‘धुंधुरमास’, ‘झुंझुरमास’ अशीही नावे याला आहेत. साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात सुरू होऊन संक्रांतीच्या आधी म्हणजे भोगीला संपतो. हा पुण्यकारक मानला जातो. या महिन्यात झुंजुमुंजु होण्याच्या आधी देवाला मुगतांदळाची खिचडी, लोणी यांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. जेणेकरून पुण्यप्राप्ती होते. अनेक मंदिरांमध्ये आजही या काळात आपल्याला पहाटे खिचडीचा प्रसाद मिळतो. आयुर्वेदाचा विचार करून ही सांगड आपल्या विचारवंत पूर्वजांनी घातली असणार यात शंका नाही. कारण हे दिवस थंडीचे असतात, पांघरुणातून बाहेर यावं असं वाटतं नाही. पण हेच देवाला नैवेद्य म्हटलं की आळस झटकून घरातले सारेच काम करणार. नेहमीपेक्षा लवकर उठणार. देवाचा प्रसाद म्हणून गरमगरम खिचडी सगळेच खाणार. लोणीही खाणार. साहजिकच थंडीच्या वातावरणात शरीराचं पोषण होण्यास हा प्रात:कालीन आहार अगदी योग्य.


अधिक मास हा दर तीन वर्षांनीच का येतो तर चांद्र वर्ष व सौर वर्ष हे आपण शालेय भूगोलात शिकलोय. चांद्र वर्ष २५४ दिवसांचे तर सौर वर्ष ३६५ दिवसांचे. दोन्हीत ११ दिवसांचा फरक. तीन वर्षांत हा फरक ३३ दिवसांचा होतो. हा भरून काढण्यासाठी अधिक मास जोडला जातो. हा जादा महिना असल्याने त्यास ‘अधिक’ म्हटले जाते. यालाच ‘धोंडा महिना’, ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हणतात. असा फरक भरून काढल्याने आपली संक्रांत फार पुढेमागे होत नाही. याउलट जे फक्त चांद्र मास मानतात त्यांचे सण दरवर्षी अलिकडे येतात हे आपण पाहतो.


अधिक महिना हा विष्णूला समर्पित असतो. याकाळात अनेक तऱ्हेची व्रतवैकल्ये केली जातात. दानधर्म करतात, जावयाचा व कन्येचा भेटवस्तू देऊन सन्मान करतात. महिलाही वाण देतात. या काळांत वाण वा दान यात ३३ ला महत्त्व आहे. ३३ दिवे लावणे, ३३ बत्तासे/अनारसे दान करणे वगैरे. गणिताचा आधार घेत काल गणनांची सांगड कशी व्यवस्थित घातलीय पहा. यावर्षी अधिक ज्येष्ठ व निज ज्येष्ठ असे दोन ज्येष्ठ महिने आहेत. ज्येष्ठात जन्मलेल्यांची चंगळ आहे. कारण दोनदा वाढदिवस.


ही माहिती थोडक्यात द्यायचा प्रयत्न केलाय. जिज्ञासू अधिक संदर्भ शोधू शकतात. भारतीय संस्कृती ही विज्ञानाच्या भक्कम पायावर उभी आहे यात शंकाच नाही. वाईट एवढंच वाटतं की प्रगतीच्या नावाखाली ‘घरच्या म्हातारीचे काळ’ होण्यात आम्ही धन्यता मानतो.

( काशीकर सरांनी माझी चूक यथोचीतपणे दाखवली व मला या पृष्ठात तात्काळ दुरुस्ती करता आली यासाठी व विनंतीवरून त्यांनी लगेचच वरील लेख लिहून दिला त्यासाठी मी प्रा. श्रीकांत काशीकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.)



पैसा अमाप झाला – डॉ. अलका काथार

पैसाअमाप खिशात आला खिसा गरम झाला

हव्यास खरेदीचा वाढला बाजार वस्तूंचा फुलला

भौतिक सुखाच्या शोधात गरजा गेल्या वाढत

माणूस त्याच्या लोभात राहिला पैशामागे धावत

पैसा माणसापेक्षा किमती झाला इथेच सारा मामला हुकला

माणूस माणसाला मुकला माणुसकी विसरला

जणू पैशासाठीच तो जन्मला पैशापायी जगणेच विसरला

सुखाच्या खोट्या भ्रमात जगला भौतिक आकर्षणात फसला

ना कौटुंबिक नाते सुखात भिजला ना मित्रांच्या मैफिलीत रंगला

जीवन एकाकी जगला भ्रमनिरास झाला

पैसा अमाप आला ना सुख देऊन गेला

भौतिक जगात शाश्वत सुखाच्या शोधात माणूस भ्रमित

खरे सुख अंतरात्म्यात गवसते जे ईश्वर – भक्तीत



परोपकार

✍️ डॉ.ज्ञानेश्वर थोरात

भगवान व्यास महर्षींनी आपल्या असामान्य प्रज्ञा आणि प्रतिभेच्या सामर्थ्याने अष्ठादश पुराणांची निर्मिती केली आणि ह्या सर्व पुराणांमध्ये केवळ दोनच गोष्टी विविधतेने आणि विस्ताराने प्रतिपादन केल्या .एक परोपकार अर्थात पुण्य आणि दुसरी परपीडा अर्थात पाप .त्यांच्याच शब्दांत आपण हे समजून घ्यायचं जर ठरलं तर

अष्टादशपुराणानां व्यासस्य वचनं द्वयमं |परोपकार: पुण्याय पापाय परपीडनं ||

प्रस्तुत श्लोकाचा अनुवाद अत्यंत मार्मिक आणि समर्पक शब्दांत संत तुकाराम महाराजांनी केला आहे

“पुण्य परोपकार पाप ते परपिडा | आणिक नाही जोडा दुजा याशी ||”
जगातील सर्व धर्मग्रंथ आणि संत सज्जन सदा सर्व काळ जर कोणता एक बोध जगाला देत आले असतील तर तो आहे केवळ परोपकाराचा !
संत तुलसीदास यांची वाणी या संदर्भात अधिक पुलकित झालेली पाहायला मिळते. ते लिहितात

“परहित बस जिन्ह के मन माही तिन्ह कहूॅं जग दुर्लभ कुच नाही ||
परहित सरिस धरम नही भाई |परपीडा सम नही अधमाही||”

आणि म्हणून ‘ जगाच्या कल्याण संतांच्या विभूती| देह कष्टविती परोपकारी||’

हा जगाप्रतिचा संतांचा व्यवहार किती उदात्त भावनेचा आहे ,नाही का ?
इतके अनन्यसाधारण महत्त्व परोपकाराला का दिल ; याचं विवेचन आणि विवरण विशेषतः भारतीय संस्कृतीत आमच्या पुर्वसुरींनी केंद्र स्थानी ठेवले ,हे आपणास प्रकर्षाने पहावयास मिळतं.ही आपल्या उदार आणि उदात्त तत्त्वज्ञानाची विशेषता या ठिकाणी अधोरेखित करताना कमालीचा आनंद होतो. जीवनामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत .एक स्वार्थ आणि दुसरा परार्थ .दुसऱ्याच्या अहिताचा विचार करून किंबहुना त्याचे हित अलक्षित करून केवळ आणि केवळ स्वतःच्या हितासाठी जागृत असणारी माणसं स्वार्थी असतात परंतु इतरांचे हित करण्याच्यासाठी स्वतःच्या जीवनाची किंमत मोजून जगाच्या कल्याणासाठी चंदनापरी झिजण्याचा दृष्टिकोन ज्यांच्या कृतियुक्तिचा धर्म होतो, त्याला परोपकार म्हणतात ; त्याला परार्थ म्हणतात आणि त्यालाच पुण्य म्हणतात.सहाव्या शतकात भगवान गौतम बुद्धांनी आपल्या शिष्योत्तमांना जनसामान्यांच्या कल्याणार्थ आणि सौख्यार्थ बहुजन हिताय बहुजन सुखायअसा मंत्र दिला होता.

आधुनिक काळात मनुष्य निर्माणाचा आणि राष्ट्र उभारणीचा ध्यास घेतलेल्या स्वामी विवेकानंदांनी इ.स.१८९७ मध्ये रामकृष्ण मठ आणि मिशन संस्थेची स्थापना केली .आत्मनो मोक्षार्थ जगद्हितायच ,” हे ऋग्वेदांतर्गत प्रबोधित वाक्य संस्थेचे ब्रीदवाक्य म्हणून निश्चित केले .अर्थात स्वतःच्या आत्म्याच्या मोक्षार्थ साधना करताना जगाच्या हितार्थ कृतीशील असले पाहिजे,असा विश्वकल्याणाचा विचार आपल्या गृहस्थ आणि विरक्त अनुयायांसमोर सदैव अभिव्यक्त केला आहे.संत ज्ञानदेवांची विश्वप्रार्थना पसायदान ह्याच भावविश्वातून उदित झाले आहे.
आजच्या काळात या दृष्टिकोनांची आणि आपल्या क्षमतेनुसार उदारतेचे वर्तन काळाची गरज निर्माण झाली आहे.अशा अर्थाच्या कीर्तनांनी आणि वर्तनांनी उद्याचे जग अधिक सुंदर होईल,असा विश्वास वाटतो.