विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जनहितार्थ ३

शुभेच्छा शाकंभरी नवरात्राच्या ! – वृंदा आशय

कृषिवल कृषिकर्मी राबती दिनरात | कष्ट हे करोनी वस्तू या निर्मितात | स्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल | उदर भरण आहे चित्त होण्या विशाल || (एका प्रार्थनेतून )


शाकंभरी नवरात्र

शाकंभरी नवरात्री दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीला सुरु होते आणि पौष पौर्णिमेला (शाकंभरी पोर्णिमा) समाप्त होते. या वर्षी २८ डिसेंबर २०२५ ते ०३ जानेवारी २०२६ या काळात शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव आहे. शाकंभरी उत्सव हा शाकंभरी देवीच्या (दुर्गेचे रूप) पूजेसाठी साजरा होतो. यामध्ये देवीला अन्न आणि वनस्पती अर्पण करून तिची पूजा केली जाते.  

शाकंभरी उत्सवाची माहिती:

  • देवतेचे स्वरूप: शाकंभरी देवी, जी शताक्षी म्हणूनही ओळखली जाते. ती दुर्गा देवीचा अवतार असून पोषण आणि धान्याची देवी आहे.
  • वेळ: पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ते पौर्णिमा या काळात हा उत्सव साजरा होतो, जो साधारणपणे जानेवारी महिन्यात येतो.
  • महत्त्व: या काळात देवी अन्नपूर्णा आणि पालनकर्ती म्हणून पूजली जाते. देवीला भाज्या, फळे आणि हिरवी पाने अर्पण केली जातात, कारण ती दुष्काळात जगाला अन्न पुरवण्यासाठी प्रकट झाली होती.
  • उत्सवाचे दिवस: हा उत्सव ८ दिवसांचा असतो, ज्याची सांगता शाकंभरी पौर्णिमेला होते.
  • पूजा: या काळात देवीला शाक (भाज्या) अर्पण केल्या जातात, म्हणून याला शाकंभरी म्हणतात. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आणि कुलाचार केले जातात.
  • स्थान: उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे या देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे, जिथे वर्षातून दोनदा मोठा मेळा भरतो. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथेही हा उत्सव साजरा होतो.
  • अधिक माहितीसाठी गुगलवर खालील स्त्रोत उपलब्ध आहेत –
  • https://www.thedivineindia.com/hi/shakambhari-navratri.html
  • https://www.thedivineindia.com/hi/shakambhari-navratri.html

जय शारदे वागीश्वरी,
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्स्नेपरी कांती तुझी
मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनी
चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे
नित वर्षु दे अमुच्या शिरी !

वीणेवरी फिरता तुझी
चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे
जडता मतीची भंगली
उन्मेष कल्प तरुवरी
बहरून आल्या मंजिरी !

शास्त्रे तुला वश सर्वही
विद्या, कला वा संस्कृती
स्पर्शामुळे तव देवते
साकारती रुचिराकृती
लावण्य काही आगळे
भरले दिसे विश्वान्तरी !


गीत – शांता शेळके, संगीत- श्रीधर फडके, स्वर – आशा भोसले


संदेश वागेश्वरीचा !

वाणी असो अशी लाघवी

वठल्या झाडा फुटो पालवी 

सामर्थ्य वाणीचे तू जाण 

तो आहे गं रामबाण !

वाणीने स्थापावे ऋत 

व्हावे अमृताचे दूत 

वाणीने वदावे सत्य 

त्यजावे सारे मर्त्य

मधुर असावी वाणी

गावी चैतन्याची गाणी

वाणी असो व्रतस्थ 

होवो साऱ्यांची हृदयस्थ !

वृंदा आशय


तहान – कवी म.म. देशपांडे – सादरीकरण वृंदा आशय


अनैतिक संबंध

                                       –  ना.रा.खराद

श्री. ना. रा. खराद

जीवनाचे आणि जगण्याचे काही नीती नियम आहेत, ते पाळणे ही मानवी संस्कृती आहे.जशी नैतिकता ही कौटुंबिक नात्यांमध्ये असते, तशी ती इतर सर्वच ठिकाणी असते.आपले प्रत्येक ठिकाणी नैतिक संबंध येतात, आणि जेव्हा ते नाते पाळले जात नाही, तेव्हा ते संबंध हे अनैतिक ठरतात, अनैतिक हा शब्द फक्त विशिष्ट बाबतीतच वापरला जातो, परंतु जिथे कुठे आपण नीती सोडून संबंध ठेवतो , ते सर्व अनैतिक संबंध आहेत.

  ज्ञानी आणि तत्वज्ञानी लोकांनी नीती शास्त्र लिहिले आहेत, मनुष्य जातीला काही नियम घालून दिले आहेत, ते नियम म्हणजे नीती.भारताचे संविधान हे देखील एक नीती शास्त्र आहे,नियमांचा आलेख आहे.मानवाचे हक्क आणि कर्तव्य हे नैतिक अधिष्ठान आहे.

जे नैतिकतेच्या कक्षेबाहेर आहे, ते अनैतिक आहे,

मानवांचा आपसातील चुकीचा संबंध हा अनैतिक आहे, लायकी आणि पातळी सोडून वागणे बोलणे अनैतिक आहे.सामाजिक जीवन जगत असताना,इतर मानवांशी आपला संबंध येतो,तो संबंध हा नैतिकतेचे पालन करतो का आणि नसेल करत तर तो संबंध हा अनैतिकच मानावा लागेल.

 कुणी कुणाला काय सांगावे, काय बोलावे ह्याचे ताळतंत्र नसलेले लोक जे आचरण करतात ते अनैतिक असते.विवेक नसलेले मस्तावलेले आपली आणि इतरांची योग्यता न ओळखणारे माथेफिरू हे जे काही करतात ते अनैतिक म्हणजे नीतीला सोडून असते.

व्यवहारात दोन माणसे चुकीचा संबंध ठेवत असतील तर तो संबंध हा अनैतिक आहे. अनैतिक संबंध फक्त शारीरिक नसतात तर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक देखील असतात.खरे म्हणजे शारिरीक संबंध हे सहमतीने असले तर ते अनैतिक ठरत नाहीत, तरीही ते अनैतिक मानले जातात, परंतु इतर क्षेत्रात जे दिसते,जे संबंध आहेत, ते तर खूपच अनैतिक दिसतात.कुणी कुणावर वर्चस्व गाजवावे, कुणाला किती अधिकार असावेत आणि कोण किती नियम पाळतो आणि पाळायला लावतो हे सर्व नीती सोडून असेल तर ते अनैतिक आहे.

  नको त्यांच्याकडून नको ती कामं करुन घेणे किंवा ती करायला लावणे, नको त्यास डोक्यावर घेणे किंवा पायदळी तुडवणे हे संबंध अनैतिक संबंध आहेत.नको त्यांच्याशी सलगी करणे आणि नको त्याला दूर करणे हा अनैतिक व्यवहार आहे, जिथे संबंध आहेत, परंतु नियमबाह्य पद्धतीने आहेत, ते सर्व संबंध हे अनैतिक संबंध आहेत.

राजकीय संबंध तर इतके अनैतिक असतात की नीतीमत्तेला देखील लाज वाटते.अनैतिक संबंध म्हणजे संबंध आहे परंतु तो नाते आणि नीती सोडून आहे, आणि असले संबंध तर चोहीकडे दिसत आहेत.मर्यादा सोडून वागणारे बेछूट माणसे ज्यांच्याशी संबंध येतो तो अनैतिक असतो.संस्कार, सत्य आणि न्याय सोडून जे कृत्यकेले किंवा करुन घेतले जाते आणि जे करावे लागते, ते अनैतिक आहे.

अनैतिक संबंधाची व्याप्ती खूप मोठी आहे, अनैतिक संबंधातून हा समाज इतका कुरुप झाला आहे,मानवाला त्याच्या योग्यतेनुसार मान सन्मान जिथे दिला जात नाही,नालायकांना जिथे डोक्यावर मिरविले जाते आणि आपल्या स्वार्थासाठी मानवाचा वापर केला जात असेल तर हे संबंध अनैतिक संबंध आहेत.    सर्व प्रकारचे शोषण आणि छळ हा अनैतिक आहे.इतरांची गरज आहे, परंतु त्याचा सन्मान नाही,मन मानेल तसा मानवाच्या वापर करणे , त्याच्या लाचारीचा गैरफायदा घेणे , यासाठी जर ते संबंध असतील तर अनैतिक संबंध आहेत.

 नैतिकतेचे संबंध किंवा वर्तन हाच संस्कृतीचा पाया आहे,आपले इतरांशी संबंध हे नीती आणि नियम व मर्यादा सांभाळून असले पाहिजेत.

(लेखक ना.रा. खराद हे अंबड, जिल्हा जालना येथील मत्स्योदरी विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.)

——————————————————————————————–