अभ्यासयोग
(ज्ञानेश्वरी अध्याय सहावा)
©प्रतिभा मिस्त्री
(मजकुराचे हक्क राखीव आहेत. )
(माझे पूर्वी प्रसिद्ध चिंतन)
आरंभी आद्य गुरु महर्षी व्यास यांचे आदरपूर्वक नमन करते कारण श्रीकृष्ण मुखातील गीतेला त्यांनी शब्दबद्ध केले आणि एक दिशा भारतीय तत्त्वज्ञानाला दिली. त्यानंतर दुसरे नमन महर्षी पतंजली यांना करते ज्यांनी योगसूत्रे लिहून आपल्याला आत्मसाधनेकडे कसे सुनियोजित पद्धतीने जाता येईल त्याचे दर्शन दिले. महर्षी पतंजलींचा काळ इ स पू दोनशे वर्षे किंवा त्या अलीकडे मानला जातो. अशा हजारो वर्षांच्या अनुभवी अध्ययन व अध्यापन परंपरेतून योगविद्या सिद्ध झाली आहे. योग विद्येचे आद्यगुरू म्हणून भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी श्रद्धापूर्वक नमन.
आता गुरू म्हटले की प्रसंगी शिष्याचे कान पकडणे आलेच. अर्जुन जरा चाचरतच साक्षात भगवान समोर असल्याने, योगसाधनेचे सामर्थ्य अंगी नसल्याचे आणि ती योग्यता नसल्याचे सांगतो, त्याला देवांनी येथे सरळ बगल दिलेली आहे.
पुढे जाऊन अर्जुन म्हणतो आहे,
सहजे आंगिक जेतुले आहे।तेतुलेयाचि जरी सिद्धी जाये।तरी हाचि मार्गु सुखोपाये।अभ्यासीन।।३३४।।(माझ्या अंगच्या बळाप्रमाणे जो साधेल तो योग मी करेन!)
आता मात्र देव जरासे दटावताहेतः(श्लोक १९ वा)
तू प्राप्तीची चाड वाहसी।परी अभ्यासु दक्षु न होसी।ते सांग पा काय बिहिसी। दुवाडपणा।।३६०।।(अभ्यासाचे कष्ट करायला सिद्ध तर नाहीस आणि कार्यसिद्धीची मात्र लालसा आहे! असं काय कठीण आहे की त्याला तू भितो आहेस? मग जरा समजुतीने सांगताहेतः)
तरी पार्था हे झणें।सायास घेशी हो मनें।वायांबागूल इयें दुर्जनें। इंद्रिये करिती।।३६१।।(ही खोडसाळ इंद्रिये लहानसहान गोष्टींचा उगीच मोठा बागूलबोवा करून दाखवितात!)(कडू औषध जीव वाचविते पण जीभ त्याला वैरी म्हणून पाहाते.)
ऐंसे हितासि जें जें निके।तें सदाचि या इंद्रियां दुखे।एऱ्हवी सोपे योगासारिखें। काहीं आहे।।३६३।।(उच्च कल्याणकारी कर्म इंद्रियांना नेहमीच त्रासदायक वाटते, एरवी योगसाधनेसारखे सोपे काही नाही.)
कठीण काम टाळण्याकडे सरळ कल असतोच इंद्रियांचा!
पुढे जाऊन मग ‘तोचि योगु बापा।एके परी आहे सोपा।’ ते स्पष्ट करतात.(श्लोक २४)
आणि मनासाठी दुसरा सोपा मार्ग सांगतात(अर्जुनाची इच्छा!) उत्तम संकल्प आणि बुद्धीबरोबर धैर्य जोडीला आले तर, (श्लोक २५-२६)
आता नियमुचि हा एकला।जीवें करावा आपुला।
जैसा कृतनिश्चयाचिया बोला।बाहिरा नोहे।।३८०।।
पाठी केतुलेनि एके वेळे।तया स्थैर्याचेनि मेळे।आत्मस्वरूपाजवळें।येईल सहजे।।३८३।।
मन मन तरी असे काय! भरकटेल! भरकटू दे! सोड त्याला मोकाट! ते अनुभव घेऊन मग एके वेळी स्थिरतेकडे वळेलच. तू निश्चय कर आणि तो अंमलात आण फक्त!
कां जें मनाचे एक निके।जें देखिले गोडीचिया ठाया सोके।म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें।दावीत जाइजे।।४२०।।(श्लोक३५) -या मनाची एक अशी चांगली खोड आहे की याने ज्याची गोडी चाखली, त्याची याला चाट लागते(ते चटावते पुन्हा पुन्हा त्यासाठी.)
चंचल मनाचा हा अर्जुनप्रश्नही देवांनी सहज उडवला आहे! नंतरही सर्व चराचरात मी आहे, हे सांगून साम्य धारण केलेस तर तुला ही आत्मसिद्धी लाभेल अशी खात्री ते अर्जुनाला देतात.
योगसिद्ध असा पुरुष साक्षात मीच आहे असे सांगून
अध्याय अखेरीस देव म्हणतात, (श्लोक ४६)
म्हणोनि ह्याकारणें।तूतें मी सदा म्हणें।योगी होईं अंतःकरणें।पांडुकुमरा।।४८१।।
सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगाला ज्ञानेश्वरांनी असे बारीक सारिक तपशिलांसह खुलविले आहे. अर्जुनाच्या सर्व शंकांचे निरसन त्यांनी निरसन केले आहे. योग्यता नाही, मन चंचल आहे, ही साधना पेलणार नाही जमेल ती साधना सांगावी अशा अर्जुनाच्या म्हणजे आपल्या शंकांना सहजपणे ते उत्तरे देताहेत. हे साधन कोणालाही कसे निरपेक्ष वृत्ती राखून साधता येईल हे त्यांनी पुन्हापुन्हा सांगितले आहे. श्रीकृष्ण आणि व्यास यांचा हा अध्याय मला फार मार्गदर्शक वाटतो.
स्वतः ज्ञानदेव या अध्यायाच्या प्रस्तावनेत म्हणताहेतः
तो गीतेमाजि षष्ठीचा।प्रसंगु असे आयणीचा(तत्त्वचिंतनाचा)।जैसा क्षीरार्णवी अमृताचा।निवाडु
जाहला।।१०।।
तैसे गीतार्थाचे सार।जें विवेकसिंधूचें पार।नानायोगविभव भांडार।उघडले कां।।११।।(क्षीरसागरातील अमृत, विवेकसागराचे पैलतीर, योगसंपत्तीचा उघडा खजिना असा हा अध्याय आहे.)
जें आदिप्रकृतीचें विसवणें(आदिमाया विसावते)।जें शब्दब्रह्मासि न बोलणें(वेदांची भाषा खुंटते)।जेथूनि गीतावल्लीचे ठाणें। प्ररोहो पावे।।१२।।(जेथून गीतारूपी वेल बहरते.)
तो अध्याय सहावा।वरि साहित्याचिया बरवा।सांगिजेल म्हणोनि परिसावा। चित्त देऊनी।।१३।।
शुभं भवतु।
© प्रतिभा मिस्त्री
(विशेष सूचना – दीप – पृष्ठ भाग २ लवकरच प्रकाशित होईल. त्यामध्ये राहिलेल्या अन्य लेखकांचे लेखन समाविष्ट असेल. धन्यवाद.)