जनी जनार्दन !
देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आपले प्रत्येक कर्तव्य हे देशसेवा आहे हा संस्कार रुजवणाऱ्या साऱ्यांना समर्पित ! – संपादक वृंदा आशय

| ॐ ||
||ॐ गं गणपतये नमः||
||ॐ नमो भगवते वासुदेवाय||
तुझे नि माझे सूर जुळले
देवा तुला रे हे मन कळले
अर्पियले तुला हे तन-मन
वावरे मी होऊन तुझे धन
केले तू मला असे उन्मन
करमेना तुजविण एक क्षण!
वृंदा आशय
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏
एका उत्कट क्षणी
कृष्ण पेरला मनी
बीज रुजले रुजले
कोंभ हिरवे फुटले
सारी सृजन सुजन
एकवटली शक्ती
कृष्णा तुझ्या ठाई
माझी अपार भक्ती!
वृंदा आशय
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकूनगे माये सांगतसे ॥१॥
उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें
मढीन पाऊ ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥
दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो
येईल कायी ॥४॥
आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं ।
आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥
अर्थ:-
एक विरहिणी, विरहाने दुःखित होऊन बसली असता आपल्या घरांवर पलीकडच्या बाजूला कांवळा कोकू लागला. तो शुभ शकुन सांगतो आहे.असे समजून शुभशकुन सांगणाऱ्या कावळ्याला म्हणते उड रे उड काऊ, तुझे पाय सोन्याने मढविन पण एवढे सांग की माझ्या घरी पंढरीराव पाहुणे कधी येतील. दहीभाताची उंडी करून तुला खाऊ घालीन पण जीवाला प्रिय असणाऱ्या पंढरीरायांची गोडी केंव्हा प्राप्त होईल. ते लवकर सांग.दुधाने वाटी भरून तुझ्या ओठाला लावीन पण तो विठोबाराय माझ्या घरी येईल काय हे खरे सांग.आंब्याच्या डहाळीला आलेली रसाळ फळे ही चाख, पण आजच्या वेळी मला शुभशकुन सांग. अशा त-हेची तळमळ लागली असता पंढरीराजे भेटतील, असा शकुन सांग.असे माऊली ज्ञानदेव सांगतात
संत तुकाराम अभंग
वेढा वेढा रे पंढरी |
मोर्चे लावा भीमातीरी || १ ||
चला चला संतजन |
करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर |
धारा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला |
घाव निशाणी घातका || ४ ||
सद्गुरु – काव्यरचना – वृंदा आशय
काय मागावे परी म्या
आणि तू ही काय द्यावे
सद्भावे रे मी तुझे
सातत्याने नाम गावे
दाखविशी तूच दिशा
व्यापीशी तू उषा निशा
तूच करवून घेशी भक्ती
तूच देशी जीवन – शक्ती
आस मी काय धरावी
ओढ कोणती त्यागावी
अर्पित तुजला क्षण न् क्षण
उत्सव झाले माझे जीवन
असा लागला तुझा छंद
तू ह्दयी उभा केला गोविंद !
गुरु – काव्यरचना – डॉ. बी. वाय क्षीरसागर
गुरु नाही जप
गुरु नाही तप
गुरु एक भाव
भक्तीचा.
गुरु नाही मंत्र
गुरु नाही तंत्र
गुरु एक विश्वास
जीवाचा.
गुरु नाही व्यक्ती
गुरु नाही मूर्ती
गुरु एक शब्द
श्रध्देचा.
गुरु नाही मान
गुरु नाही सन्मान
गुरु एक सोपान
कैवल्याचा.
गुरु नाही मठ
गुरु नाही देऊळ
गुरु एक मार्ग
ज्ञानाचा.
गुरु नाही काया
गुरु नाही माया
गुरु एक तत्त्व
परब्रह्म.
माझा भाव आता
निराळा झाला
गुरु म्या देखिला
सर्वा ठायी.
देव प्रकटला त्याच ठिकाणी
✍️ डॉ.ज्ञानेश्वर थोरात
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं.दा.करंदीकर मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवीवर्य म्हणून मराठी मुलखाला सर्वोतोपरी ज्ञात आहे.त्यांनी मराठी काव्यात नवनवीन प्रयोग केले.' कणिका ' हा काव्यप्रकार मराठी साहित्यात त्यांनी सक्षमपणे रुढ केला .कणिका म्हणजे चार ओळींची कविता असते.अलिकडे तिला चारोळ्या असेही म्हटले जाते.
' उत्क्रांती ' ही त्यांची आशयघन कणिका पुढीलप्रमाणे आहे.
” माकड हसले त्याच क्षणाला ,
माकड गेले माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी ,
देव प्रकटला त्याच ठिकाणी.”
अर्थात येथे चार्लस डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अतिशय कलात्मक शैलीत प्रतिपादन केला आहे;हे वेगळ्या पद्धतीने सांगायला नको.उत्क्रांती म्हणजे जीवसृष्टीचा क्रमविकास आणि अविरत घडत राहणारी बदल-प्रक्रिया असते.आजचा माणूस माकडाचे उत्क्रांत रूप आहे .माकड शब्दाची व्युत्पत्ती ‘मर्कट ‘शब्दाचे ‘माकड’असे तद्भवरूप आहे . ‘मर’ म्हणजे ‘वृक्ष’ आणि ‘कट’ म्हणजे ‘उड्या मारणे’.अर्थात वृक्षांवर उड्या मारणारा प्राणी म्हणजे मर्कट अर्थात माकड असा आहे.
हास्य मग ते स्मितहास्य असो वा प्रकटहास्य असो,ते केवळ माणूसच करू शकतो किंबहुना हास्य हे माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ते विकट नसेल तर त्याचा स्वतःवर आणि इतरांवर सकारात्मक परिणाम होतात,असे आढळून आले आहे .ते इतर प्राण्यांत आढळून येत नाही परंतु उत्क्रांतीवादानुसार माकड ह्या प्राण्याने माणसाची हास्यक्रिया केली ; त्याचक्षणी त्याचे माकडपण गळून पडले आणि त्याचे माणसात रुपांतर झाले.हा पहिला बदल झाला.
लवकरच त्या माणसात दैवी गुणांची वृद्धी झाली आणि तो परदु:खाने अक्षरशः रडला; ही क्रिया सामान्य नसून दैवी होती. परदु:खाने रडणारा माणूस सामान्य कसा असेल? कवीला त्याच्या ह्या करुणाजन्य कृतीशील अभिव्यक्तीत देव प्रकटल्याचे प्रतित झाले.” जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले | तोचि साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ||” असे प्रतिपादन करून संत तुकोबा पुढे लिहितात,” तुका म्हणे सांगू किती |तोचि भगवंताची मूर्ती ||”
अर्थात माणूस आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि कर्तृत्वाने हेच परिवर्तन क्रांती करून चराचरावर सत्ता प्रस्थापित करू शकतो.ह्यासाठी केवळ वक्तृत्व उपयुक्त ठरणार नाही तर कर्तृत्वाची परिसीमा करण्यासाठी कवी दुष्यंत कुमारांचा निश्चय आणि निर्धार हवा.
“सिर्फ हंगामा खडा करना,
मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है की,
ये सूरत बदलनी चाहिए||” अशा कार्यसिद्धीने माणसाच्या वृत्तीत आणि कृतीत आमुलाग्र बदल घडून येतील ; अशी आशा आहे.

- भवानी मंदिर – श्रीअरविंद
आमची सवाँची जन्मदात्री होय अशी प्रस्तावना करून श्रीअरविंद या अत्यंत स्फूर्तिप्रद व प्रतिभाशाली पुस्तिकेत लिहितात, “प्रस्तुत युगात ही माता शक्तीमाता म्हणून आविष्कृत झाली आहे. सर्व जग शक्तीरूपी मातेने व्याप्त होऊन वृद्धी पावत आहे. भारतात मात्र आपण शक्तीच्या अभावामुळे सर्व गोष्टीत अयशस्वी होत आहोत. शक्तीच्या अभावामुळे आमचे ज्ञान ही एक मृत वस्तु झाली आहे. शक्तीच्या अभावी आमची भक्ती जगू शकणार नाही इच्छाशक्तीत बद्ध व अपंग झालेल्या भारताला पुन्हा जन्म घ्यावयाचा आहे. भारताचा पुनर्जन्म झालाच पाहिजे. कारण तशी जगाच्या भविष्यकाळाची मागणी आहे. एखाद्या मानव वंशाच्या वाट्याला येणारे अत्यंत मोठे व अत्यंत आश्चर्यकारक असे हे कार्य भारताच्या वाट्याला आले आहे आणि या महान कार्याचा शुभारंभ करण्यासाठी म्हणून भगवान रामकृष्णांचे येणे झाले आणि विवेकानंदांनी उपदेश केला. एके काळी चिन्हे दिसत होती त्याप्रमाणे जर या कार्याची प्रगती घडून आली नसेल तर त्याचे कारण म्हणजे आपण पुन्हा आपल्या आत्म्यावर तमाच्या भयानक मेघाला भीती, संशय, चांचल्य, आलस्य यांना आरूढ होऊ दिले आहे.
आपल्यापैकी कित्येकांनी रामकृष्णापासून प्रवाहित झालेल्या भक्तीचे ग्रहण केले आहे आणि विवेकानंदांनी दिलेल्या ज्ञानाचे ग्रहण केले आहे. परंतु शक्तीच्या आणि कर्माच्या अभावी आपण आपल्या शक्तीला एक जीती जागती वस्तु बनवू शकलो नाही. आपण अजूनही हे लक्षात घ्यायला पाहिजे की रामकृष्णांनी जिची उपासना केली आणि जिच्याशी ते एकरूप झाले ती काली होती, तीच भवानी, तीच आदिमाता भारताचे भविष्य आता कोणा व्यक्तीच्या दोषांसाठी आणि उणीवांसाठी वाट पहात बसणार नाही. मातेची अशी आज्ञा आहे की माणसाने उठावे, तिची उपासना करावी आणि ती विश्वव्यापक करावी. तीन मूलभूत नियमांना धरून असणाऱ्या तीन गोष्टी आम्हाला पाहिजेत १) भक्तिमातेचे मंदिर-शक्तीमातेचे पूजन केल्याशिवाय आपणाला शक्तीचा लाभ होणार नाही २) कर्म ब्रह्मचाऱ्याचे नवे दल कर्मामध्ये रूपांतरित केल्याशिवाय आपणाला शक्तीचा लाभ होणार नाही. ३) ज्ञान, भक्ती व कर्म जोपावेतो ज्ञानावर अधिष्ठित नाहीत तोपर्यंत त्यांना पूर्णत्व व चिरंजीवित्व लाभणार नाही.
तसे पाहिले तर असे भवानी मंदिर प्रत्यक्षात कुठेही व कधीही उभारले गेले नाही. तसेच या ज्वालाग्राही पुस्तिकेवर ब्रिटिश सत्तेने बंदी घातल्यामुळे तिचा प्रसारही फारसा झाला नाही. पण भारतीय राष्ट्रवादात प्राणाची जी फुंकर त्यातील विचारांनी घातली आणि शक्ती उपासनेचा जो महामंत्र दृढमूल केला त्याचे महत्त्व राष्ट्रीय उत्थानात अनन्यसाधारण आहे.
। श्रीअरविंद : क्रांतिकारक व योगी ।
https://incarnateword.in/cwm/20/the-past
https://jagar-swatantryacha.blogspot.com/2022/03/blog-post.html
बलसागर भारत होवो – वृंदा आशय