विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

ना.धो.महानोर

कवी ना.धो.महानोर पृष्ठ संपादन व प्रकाशन – वृंदा आशय

जन्म १६ सप्टेंबर १९४२ मृत्यू -३ ऑगस्ट २०२३

१६ सप्टेंबर हा लोककवी ना .धों. महानोर यांचा जन्मदिवस त्यांनी आपल्या कविता, गाणी आणि लेखनातून उलगडलेली मातीची ओल, शेतकऱ्यांचे दुःख, संघर्ष आणि आशा यामुळे ते खऱ्या अर्थाने शेतीमातीचे ,शेतकऱ्यांचे कवी ठरले. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. ते एक श्रेष्ठ मराठी कवी गीतकार म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. ग्रामीण भागात वाढलेले ना.धों. महानोर यांनी आपल्या कवितांमधून, गीतांमधून फक्त मनोरंजन केले नाही ,तर समाजाला विचार करायला लावले .त्यांच्या शब्दांना ग्रामीण मातीचा सुगंध आहे. रानातल्या कविता ,वही, पावसाळी कविता हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत ,तर गांधारी ही त्यांची कादंबरी. त्याबरोबरच गपसप आणि गावातल्या गोष्टी हे लोक कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी लोकगीतांचे संकलनही केले आहे. ‘पळसखेडची गाणी’ या नावाने ते प्रसिद्ध आहे. ना. धों. महानोर यांनी गद्य लेखनही केले आहे .’त्या आठवणींचा झोका’ हे ललित गद्य संग्रह प्रसिद्ध आहे . प्रामुख्याने ते निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात .
ना .धों. महानोर यांनी अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. ती गाणी खूप गाजली. एक होता विदूषक ,जैत रे जैत, दोघी, मुक्ता सर्जा इत्यादी प्रसिद्ध चित्रपटातील अनेक गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत .मी रात टाकली, जांभूळ पिकल्या झाडाखाली, चिंब पावसानं रानं झालं आबादानी ,आम्ही ठाकरं ठाकरं इत्यादी अनेक सुप्रसिद्ध गाणी त्यांनी महाराष्ट्राला दिली.
महाराष्ट्र सरकारने १९७८ मध्ये साहित्यिक कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली १९७८ ते ८४ आणि १९९० ते ९५ या काळात ते विधान परिषदेवर असताना त्यांनी साहित्यिकांचे प्रश्न ,शेतकऱ्यांचे प्रश्न या संदर्भात अनेक प्रस्ताव सभागृहात मांडले आणि ते मंजूरही झाले .त्यांच्या या साहित्यिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात भारत सरकारचा पद्मश्री, साहित्य अकादमी, जनस्थान पुरस्कार, मराठवाडा भूषण, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, ‘कृषिरत्न ‘शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल सुवर्णपदक . तसेच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांबरोबरच अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविलेले आहे .असा हा रानकवी दिनांक०३ ऑगस्ट २०२३ मध्ये काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जनसामान्यांच्या हृदयात त्यांना अढळ स्थान प्राप्त झाले आहे. अशा या महान संवेदनशील कवीला विनम्र अभिवादन करते .

डॉ.प्रेमला मुखेडकर.

परिचय

प्रा .डॉ.प्रेमला रमेश मुखेडकर,

  • एम. ए. ,एम .एड., सेट, पीएच.डी.
    सहयोगी प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक,
    मराठी विभाग
    डॉ.(सौ.) इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
  • तीन पुस्तके प्रकाशित, विविध चर्चासत्रे व परिषदांमधून शोधनिबंध प्रकाश.
  • मो. 9975634944
  • Email–premala.mukhedkar@gmail.com

वृषाली विवेक श्रीकांत

अधिक वाचा: ना.धो.महानोर
रूपक लेखन – वृषाली श्रीकांत

ना.धो.महानोर एक अस्सल निसर्ग कवी

डॉ.मीनाक्षी देव – निमकर


ना.धो.महानोर हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे.सारा महाराष्ट्र ज्यांनी आपल्या लेखन वैशिष्ट्याने स्वतः च्या काव्य लेखनाकडे आकृष्ट केला असे ‘रानकवी ‘ ना.धो.महानोर हे एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे.खास अस्सल ग्रामीण शैलीत निसर्ग,गाव,शिवार, तेथील माणसे,ग्रामसंस्कृती यांचे चित्रण तेथील रंगगंधांसह त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केले, रोज शेतात राबणारे हात त्यांनी जवळून पाहिले, अनुभवले,व त्यांच्या संवेदनशील मनाने जसेच्या तसे आपल्या कवितेतून टिपण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
“या शेताने लळा लाविला असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो- रडलो
“आता तर हा जीवच अवघा असाच जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो”
किंवा
‘ह्या नभाने ह्या भूईला दान द्यावे
आणि या मातीतूनी चैतन्य गावे ‘
‘रानातल्या कविता’ या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहातून त्यांनी शेतीशी असलेले आपले नाते स्पष्ट केले आहे.
निसर्गकवी महानोरांच्या काव्यसंग्रहां ची नावे सुद्धा निसर्गाशी निगडीत आहेत,’पक्ष्यांचे थवे’,’पावसाळी कविता’,’पानझड’, ‘प्रार्थना दयाघना”पळसखेड ची गाणी’, ‘रानातल्या कविता’ अशी त्यांच्या कवितासंग्रहांची नावे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
ग्रामीण जीवनाच्या समग्र पार्श्र्वभूमीचा महानोरांच्या कवितेला संदर्भ आहे .
‘जाई जुई चा गंध मातीला
हिरव्या झाडांचा, छंद गीताला’
महानोरांच्या कवितेला निसर्ग आणि ग्रामसंस्कृती चा गंध आहे. खेड्यातला माणूस,त्याची सुख दुःखे, निसर्ग हे त्यांच्या कवितेचे अविभाज्य घटक आहेत.ग्रामीण म्हणजे केवळ शेत शिवाराची वर्णने निसर्गाच्या विविध छटांचे प्रतिबिंब एव्हढेच नाही, तर ज्यांचे जगणेच मातीशी निगडीत आहे, अशा माणसांच्या आयुष्याची उलथापालथ, जगताना व्यक्त होणारा भूमिनिष्ठ कोलाहल महानोरांनी आपल्या कवितेतून समर्थ पणे मांडला आहे.सुना सोन्याचा पिंपळ, वेशीला टांगलेली इभ्रत या कवितेतील प्रतिमांना महानोरांच्या कवितेत नवे परिमाण लाभले आहे.
‘भरलं आभाळ पावसाळी पाहूणा गऽ
बाई श्रावणाचं उन्ह मला झेपेना’
किंवा
‘चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी’
अशी आजवरच्या ग्रामीण कवितेत सर्वार्थाने वेगळी आणि लोकगीतांचा प्रभाव असूनही स्वतः चा चेहरा असलेली कविता त्यांनी लिहिली.
‘भाऊ बोले बहिणीला गऽ बोले बहिणीला
भाऊबीजेच्या सणाला का डोळे ओलावला
आता हिरव्या पाल्याची गऽ डांग आयुष्याला
तरी गलबल दुःखानं का जीव व्याकुळला’
अशी त्यांची काही स्त्री गीते बहिणाबाईंच्या लोकगीतांशी साधर्म्य दाखवणारी आहेत.
‘रोज ती ओवी गाते सूर्यासाठी
संसारातल्या सुखदुःखासाठी
प्रकाशामागे
अंधाराच्या कडा पुसुन टाकण्यासाठी ‘

स्त्रियांविषयी त्यांच्या मनात असलेला आदर,ग्रामीण स्त्री चे दुःख, रूढी परंपरेने तिच्या वर लादलेली बंधने, तिच्या तना मनाचा होणारा कोंडमारा, स्त्री जीवनाचे अनेक पदर त्यांनी”तिची कहाणी”मध्ये मांडले, दयाघना ची करूण प्रार्थना त्यांनी ‘प्रार्थना दयाघना’ मध्ये केली,, “,गाथा शिवरायांची” मध्ये शाहीर कवीच्या रूपात ते आपल्याला भेटतात.
‘रानातल्या कविता’पासून ‘तिची कहाणी’ पर्यंत महानोरांचे दहापेक्षा अधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत, कवितेतून अनेक काव्यात्म प्रयोग त्यांनी केले.निसर्ग, त्याची विविध रूपे, निसर्गाशी मानवाचा असलेला अनुबंध,शेती, ग्रामीण लोकसंस्कृती, ग्रामीण स्त्री,तिचे दुःख अशा असा भोवती महानोरांची कविता फिरत राहिली.प्रत्यक्ष अनुभूती तून साकारलेली त्यांची कविता असल्याने ती संवेदनशील अंतःकरणाचा ठाव घेते.
ग्रामीण जीवनातील अनेकविध घटना प्रसंग कलात्मकतेने मांडणारा त्यांचा ‘गावातल्या गोष्टी’ हा कथासंग्रह असो किंवा ‘त्या आठवणींचा झोका’ हा त्यांचा ललित लेख संग्रह असो, या लेखनावर त्यांच्या काव्य वृत्ती चा प्रभाव जाणवतो,महानोरांची साहित्य निर्मिती ची मूळ मूस ही काव्यानुभूती उत्कटतेने व्यक्त करण्याची आहे हे जाणवत राहते.
निजामाने केलेले अन्याय अत्याचार पचवून खेड्यांनी आपले स्वत्व कसे टिकवले याचे उत्तम चित्रण करणारी ‘गांधारी’ ही त्यांची कादंबरी, या कादंबरीतून आपल्याला मराठवाड्यातील प्रादेशिकतेचे संदर्भ सापडतात.ग्रामीण बोली व गेयता यामुळे त्यांची कविता सादरीकरणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची ठरली.
एक होता विदूषक,जैत रे जैत,दोघी,मुक्ता,सर्जा या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटांची गाणी लिहून गीतकार म्हणून ही त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.बालकवी,बा.भ.बोरकर,पु.शि.रेगे यांच्या शी काव्याचे नाते सांगणारा हा कवी त्यांच्या प्रत्येक काव्यातून भावतो.एक प्रयोगशील शेतकरी आणि सर्जनशील कवी हे अनोखे मिश्रण त्यांचे काव्य वाचताना मनाला भुरळ घालते.
दिड दोन हजार वर्षांपूर्वी अजिंठ्याच्या पहाडात जगाचं लक्ष वेधून घेणारं वास्तू शिल्प कोरलं गेलं आणि याच अजिंठ्याच्या पायथ्याशी शेतात राबणारा कवी मराठी मनाला भुरळ पाडणारं शब्द शिल्प घडवित होता.
असे निसर्ग कवी नामदेव धोंडो महानोर या कवीचा आज जन्मदिन त्यांनी आपल्या साहित्य सेवेतून खूप मोठे योगदान मराठी वाङमयाला दिले आहे,भावी पिढी ला त्यांच्या या योगदानाचा परिचय व्हावा या तळमळीने, त्यांच्या जयंती दिनी कृतज्ञता 🙏🙏

“दाटून येतात मेघ तेव्हा आठवते तुमची कविता
नाचणारे मोर आणि आनंदणारा शेतकरी या मध्ये दिसतात तुम्ही आम्हाला”!

प्रा.डॉ.मीनाक्षी देव-निमकर
गेल्या २० वर्षा पासून डॉ सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात मराठी भाषा व साहित्याच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत
*मराठी संत साहित्य हा अभ्यास विषय
*एकूण 7 पुस्तके प्रकाशित झाली आहेत
*वर्तमानपत्रे, मासिकातून लेखन, आकाशवाणी वर लेखन व भाषणे प्रसारित करण्यात आली आहेत.
*औरंगाबाद शहरातील महिलांसाठी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाचे आयोजन केले.
*विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग