विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

पुस्तक परिचय.

1. दोन आत्मकथने

- डॉ.लता मोहरीर


२०२४-२५ ह्या वर्षात दोन उत्तम आत्मकथने वाचायला मिळाली . नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालेले अमोल पालेकरांचे “ ऐवज-एक स्मृतिबंध” व मार्चमध्ये आलेले चित्रा पालेकरांचे “तर-अशी सारी गंमत”. दोन्ही दीर्घ . तीनशे साडेतीनशे पानांची. संग्राह्य . आपला जवळजवळ आठ दशकांचा कलाप्रवास उलगडतांना अमोल पालेकरांनी “ऐवज -" च्या सुरूवातीला ज्या कलाकृती आपण निर्मिलेल्या आहेत वा जे मुद्दे मांडलेले आहेत त्यांच्या अनुषंगाने “क्यू. आर. कोड” सूचीसहित दिलेले आहेत (२४)ते ह्या आत्मकथनाचे खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे . मराठीत असा प्रयत्न बहुधा प्रथमच झालेला आहे. पालेकर निर्मित , दिग्दर्शित, अभिनीत असे १५-१६ चित्रपट , नाट्यकृती , मुलाखती , माहितीपट ह्या सर्वातूनआपण एका बुद्धिमान , संवेदनक्षम , सुसंस्कृत अशा मनस्वी कलावंताची वैचारिक वाटचाल अनुभवत जातो.हिन्दी चित्रपटांमधील उत्तम भूमिकांमुळे प्रसिध्दी मिळत गेली तरी बॅालीवूडच्या तथाकथित सेलिब्रिटी जगापासून ते दूर राहिलेले दिसतात ते त्यांच्यातील कलासक्त वृत्तीमुळे . वाङ्मय , चित्रकला , नाट्यकला , संगीतकला इ. च्या अभ्यासपूर्ण ज्ञानामुळे. एका अस्वस्थ कलावंताचा हा स्मृतीबंध वाचनीय तर आहेच पण अंतर्मुख करणारा आहे. कारण गतायुष्यातील घटनाप्रसंगांचे , व्यक्तींचे केवळ नामनिर्देश करून एक ऐतिहासिक कालखंड अमोल पालेकरांनी उभा केलेला नाही तर त्या त्या प्रसंगी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रतिक्रिया , मनात उमटलेली स्पंदने एक कलावंत व एक माणूस म्हणून त्यांचे चित्र आपल्यापुढे उभे करतात.”विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना” ही या पुस्तकाची अर्पणपत्रिका लेखक आपल्याला रूढ, पारंपरिक वाटेने घेऊन जाणार नाही हे सुचविणारी आहे.

चित्रा पालेकरांच्या आत्मकथनाचे “तर—-अशी सारी गंमत” हे शीर्षकच ज्या मनमोकळेपणाने , सकारात्मकतेने, एका बालसुलभ स्वच्छंदीपणाने व कुतूहलाने ते लिहिलेले आहे याची सूचना देणारे आहे. प्रभा गणोरकरांनी त्याचे संपादन केलेले आहे.त्यांनी म्हटल्याप्रमाणे एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबात वाढलेल्या लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्यांनी अनुभवलेल्या सुखदुःखासह आपल्यापुढे येतो. नाट्यचित्रसृष्टीबद्दलची त्यांची उपजत आवड ह्या क्षेत्रात त्यांना आपली मूळे रूजवायला प्रेरित करते. सत्तरच्या दशकातील मुंबईतील प्रायोगिक नाटयचळवळ व त्यातील त्यांचा सहभाग- लेखन,अभिनय, निर्मिती सर्व बाबतीतला- एक ऐतिहासिक कालखंड उभा करणारा आहे. तो उभा करतांना ज्या व्यक्तींच्या , कलावंताच्या सहवासात त्या आल्या त्यांच्या संदर्भातील अनुभवातून निर्मिलेली अनेक व्यक्तिचित्रे हा या आत्मकथनाचा महत्त्वाचा भाग आहे . किशोरवयात नकळत त्यांच्या मनात धाडसी प्रायोगिकतेची बीजं रूजविणा-या - कोकणी हॅम्लेटमध्ये ॲाफिलियेची भूमिका करायला लावणा-या- आर.डी.कामत ह्या लेखक दिग्दर्शकांपासून ते थेट “मातीमाय” ह्या त्यांच्या चित्रपटापर्यंत भेटलेल्या अनेक दिग्गजांची व्यक्तिचित्रे आपल्या समोर येतात व व आपणही त्यांच्या बरोबर तो काळ अनुभवत ही वाटचाल करीत जातो. इथे सत्यदेव दुबे , बादल सरकार, अमरीश पुरी ,दामू केंकरे, अरविंद -सुलभा देशपांडे, कुमुद मेहता , नंदिता दास , दीपा मेहता इ. गेल्या ४०-४५ वर्षांतील नाट्यचित्र चळवळीचा हा आलेख चित्रा पालेकरांची विलक्षण अनुभवसंपन्नता अधोरेखित करणारा आहे. हे संपूर्ण आत्मकथन वाचल्यावर जाणवतं की एका खेळकर वृत्तीतून ते लिहिलं गेलेलं असलं तरी आपली बुद्धिमत्ता, कर्तृत्व, नव्या गोष्टी शिकण्याची उमेद ह्यांच्या तुलनेत म्हणावी तशी आपल्या कामाची दखल घेतली गेली नाही ही खंत त्यांच्या मनात आहे.

ऐवज. —एक स्मृतिबंध” आणि “तर- -अशी सारी गंमत” ह्या आत्मकथनातून दोन बुध्दिमान, कलासक्त व्यक्तींचा जो जीवनप्रवास आपल्यासमोर उलगडलेला आहे तो महत्त्वाचा व वाचनीय आहे. त्यावर सविस्तर लिहायला पाहिजे.

डॉ. लता मोहरीर