- 5 सप्टेंबर – शिक्षक दिन
- 7 सप्टेंबर – बी. रघुनाथ स्मृतिदिन
- 11 सप्टेंबर – आचार्य विनोबा भावे जयंती



बी. रघुनाथ : (१५ ऑगस्ट १९१३-७ सप्टेंबर १९५३)
७३ व्या पुण्यतिथी दिवशी ‘ज्ञानोत्सव’ तर्फे विनम्र अभिवादन !
मराठीतील सुप्रसिद्ध ललित लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार व लघुनिबंधकार.
पूर्ण नाव – भगवान रघुनाथ कुलकर्णी
मूळ गाव – सातोना, जिल्हा परभणी .
काव्य
ते न तिने कधी ओळखीले
दिले उशाला काळीज ठेवून
स्पंदनात परि ते दुखले
ते न तिने कधी ओळखीले
हिरमुसलेली विहिरीकाठी
विहिरीत पडल्या पोहऱ्यासाठी
भेट प्रथम ही; घटातून मग
तिने हिसळवीत चालविले
ते न तिने कधी ओळखीले
पथात शोधीत तिची पाऊले
फिरत राहिले देव देवळे
माग घेत कधी, कधी मार्गावरी
पथदिव्यापरी मन जळले
ते न तिने कधी ओळखीले
आम्लफळास्तव आसुसलेली
तिची अडाणी वृत्ती न रुचली
मधुर फळांचे भाव धर्म रस
तिज दाखवले चाखविले
ते न तिने कधी ओळखीले
कधी यात्रेच्या गर्दीमधुनी
तिची टाकत वाट चुकवूनी
बावरल्या हरणीस मनोगत
स्पर्शजलातून कळवियले
ते न तिने कधी ओळखीले
सामसुमल्या अपरात्रीतून
टिचकविले हळू दार बाहेरून
होते जेव्हा परस्परांच्या
पिसात पंछी शहारलेले
ते न तिने कधी ओळखले
आवड पाहून तिची फुलांची
फुलात यौवन सजवायाची
आज तिच्या वाटेवर…
अंतर काट्यावरती अंथरले
ते न तिने कधी ओळखीले!
कवी बी. रघुनाथ

टीप – या काव्याचे ज्येष्ठ कवी व अभ्यासक श्री. इंद्रजित भालेराव यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेले रसग्रहण,
काव्यविवेचन यू ट्यूब वर उपलब्ध आहे.
या वर्षीचा बी. रघुनाथ पुरस्कार श्री. प्रसाद कुमठेकर यांच्या ‘इत्तर गोष्टी’ या कथासंग्रहाला प्राप्त.
पुरस्कार वितरण आज दिनांक – ०७ सप्टेंबर २०२५ रोजी
वेळ – सायंकाळी – ६.३० वाजता
स्थळ – ग्रंथमित्र भा. बा. आर्वीकर सभागृह , जीवन विकास ग्रंथालय, छत्रपती संभाजीनगर
माहिती संकलन – वृंदा आशय
11 सप्टेंबर – आचार्य विनोबा भावे जयंती

विश्वर्षी विनोबा
● किशोरावस्थेत ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा.
● आईला गीतेतील तत्त्वज्ञान समजावे म्हणून सोप्या भाषेत गीताई लेखन आतापर्यंत एक कोटी प्रती विक्री
● बंगालची क्रांती, हिमालयाच्या शांतीच्या शोधात, महात्मा गांधी ची पहिली भेट साबरमती आश्रमात.
● भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील पहिले व्यक्तिगत सत्याग्रही.
● १४भारतीय ,४ परकीय भाषा अवगत.
● देशातील महनीय संताचे जीवन कार्य, वाङ्मयाचा अभ्यास पदयात्रे दरम्यान त्याचे प्रतिपादन
● धुळे कारागृहात बंदिस्त असताना गीतेवर प्रवचने, त्याचे लेखन साने गुरुजी करत असत.
- जीवनाच्या सर्व विषयाचे मूलगामी चिंतन.
● पृथ्वीच्या दीड प्रदक्षिणा पूर्ण होऊ शकतील इतकी भूदान पदयात्रा, पहाटेच्या अंधारात साडे तेरा वर्षांचा दुनियेतील एकमात्र भूदान यज्ञ. ४७ लक्ष एकर भूमी दानात
मिळवली.
● भूदानाचा दुसरा टप्पा ग्रामदान.
● आचार्य कुलाची स्थापना, शिक्षणाचा मूलगामी विचार यातून शिक्षण परिवर्तन.
● महात्मा गांधीचे आध्यात्मिक वारस.
● जीवन कार्य संपले- प्रायोपवेशन- महानिर्वाण.
अशा अलौकिक विश्वर्षीला आजच्या जयंती दिनी वंदन.
त्यांच्या जीवन प्रकाशात आम्ही स्वतःचे, समाजाचे, राष्ट्राचे जीवन उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक नाही का?
आपला विनम्र
ज्ञानप्रकाश मोदाणी,
आचार्य विनोबा तत्त्व विचार केंद्र,
महात्मा गांधी सर्वोदय भवन,
छ.संभाजीनगर.
९४०४०१८२८२