विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

सृष्टी ज्ञान

सृष्टी – व्यष्टी अतूट नाते !

(उत्स्फूर्तता , उत्कटता आणि उत्फुल्लता ही सृष्टीची देण आहे.)

उत्कटता

क्षणाक्षणाला धावत होते
उत्कटतेने तुझ्याकडे
पाहुनी म्हणती जन मला
गं बाई हिला लागले वेडे

तू ही पुसावे कशास येते
राहा सुखी तू आहे जेथे
काय करावे काही कळेना
तुजवीण मज क्षण गमेना

शेवटी असे केले आता
अर्पियली तुज उत्कटता
अंतर सारे क्षणात संपले
हृदयी तू हे मज उमगले

आता मी नाही धावत
तूही आता नाही पावत
अखंड एकमेका आता
आपण राहतो फक्त भावत

वृंदा आशय


‘पक्षी सप्ताहा’ निमित्त ‘ज्ञानोत्सव’ तर्फे एक विशेष पान

(०५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२५ )


१. आद्य पक्षिशास्त्रज्ञ सलीम अली – (जन्म – १२ नोव्हेंबर १८९६ , मृत्यू – २० जून १९८७ )

. वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली – (जन्म – ०५ नोव्हेंबर १९३२ , मृत्यू – १८ जून २०२५ )

पक्षिशास्त्रज्ञ सलीम अली यांचा परिचय

(जन्म – १२ नोव्हेंबर १८९६, मृत्यू – २० जून १९८७)

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षितज्ज्ञ
  • भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध, तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक ग्रंथ याकरिता सलीम अली प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य पक्षिविज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो.
  • सलीम अली यांचा जन्म मुंबईमध्ये मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सलीम मोइनुद्दीन अब्दुल अली असे होते.
  • सेंट झेव्हियर महाविद्यालयातून प्राणिविज्ञान विषयाची बी.ए. ऑनर्स ही पदवी त्यांनी संपादन केली.
  • प्रगत अभ्यासासाठी जर्मनीला बर्लिन विद्यापीठात गेले. तेथे त्यांना प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ एर्व्हीन श्ट्रेझमान यांचे मार्गदर्शन मिळाले.
  • त्यांनी द बर्ड्स ऑफ कच्छ, इंडियन हिल बर्ड्स (१९४६), द बर्ड्स ऑफ त्रावणकोर-कोचीन, द बर्ड्स ऑफ सिक्किम, ए फिल्म गाईड टू द बर्ड्स ऑफ द ईस्टर्न हिमालयाज ही निरनिराळ्या प्रदेशातील पक्ष्यांसंबंधी पुस्तके लिहिली.
  • सलीम अली यांनी इंडियन बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफ ची स्थापना करण्यासाठी भारत सरकारकडे आग्रह धरला होता.
  •  ते भारतातील ‘नेचर क्लब ऑफ इंडिया’ चळवळीचे संस्थापक होते.
  • १९८४ साली ‘औरंगाबाद’ येथे झालेल्या पक्षिमित्र संमेलनात ते प्रमुख पाहुणे होते.
  • भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ (१९५८) व ‘पद्मविभूषण’ (१९७६) हे किताब दिले, तसेच त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली (१९८५),
  • तमिळनाडू राज्यात कोईमतूर येथे त्यांच्या नावाने ‘द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्टरी’ (SACON) ही संस्था सुरू करण्यात आली आहे.
  • गोवा राज्यात चोडण बेटावरील ‘डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य’ पक्षी निरीक्षकांना आकर्षित करीत राहिली आहे.
  • त्यांच्या प्रयत्नातून भारतात केवलादेव घाना, चित्रस, ‘पॉईंट कॅलीमर,  ‘हरिके लेक’ ही पक्षी अभयारण्ये निर्माण झाली.
  • १९७७ मध्ये त्यांनी सायलेंट व्हॅलीच्या रक्षणासाठी जागृत मोहिम हाती घेतली व तीत त्यांना यश मिळाले.
  • त्यांनी केंद्र शासनाकडे पर्यावरण खाते सुरू करावे यासाठी आग्रह धरला. त्यानुसार शासनाने पुढे पर्यावरण हे स्वतंत्र खाते सुरू केले.
  • बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या हॉर्नबील मासिकपत्रिकेत त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले.
  • त्यांनी सिडनी दिलन रिप्लो यांच्यासोबत ‘द हॅन्डबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अॅंड पाकिस्तान’ हा दहा खंडांचा ग्रंथ लिहिला.  
  • सलीम अली यांनी लिहिलेले ‘द फॉल ऑफ ए स्पॅरो’ (१९८५) हे आत्मचरित्र पक्षी निरीक्षकांना उपयुक्त आहे.
  • सलीम अली यांनी लिहिलेल्या ‘द बुक ऑफ इंडियन बर्ड्स’, या ग्रंथाच्या अकरा आवृत्त्या निघाल्या.
  • त्यांनी मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला.
  • “सलीम अली यांनी पेन्सिल, कागद, संयम आणि दुर्बिण एवढ्या साधनांच्या जोरावर पक्षिविज्ञानाची जोपासना केली”, असे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ जॉन बर्डन सांडर्सन हॉल्डेन यांनी म्हटले आहे.

अरण्यऋषींच्या लेखनप्रेरणा त्यांच्याच शब्दात !

प्रस्तावना

१९६० साली मी पुणे जिल्हयातील वडगाव मावळ येथे वनाधिकारी होतो. वडगावपासून जवळच असलेल्या तळेगावी आप्पा दांडेकर राहत असत. एक दिवस त्यांच्या घरी जाऊन त्यांची ओळख करून घेतली. या ओळखीचं रूपांतर पुढं स्नेहात झालं.

मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ आणि नाणे मावळ या भागातील जंगलं आणि गडकिल्ले त्यांच्यासोबत पाहिले. मावळ तालुका त्यांच्या लेखनाची कर्मभूमी आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतील पात्रं याच भागात राहत होती. भटकंतीत त्यांनी मला ‘माचीवरला बुधा’ दाखविला. पवनाकाठच्या धोंडीची भेट घडवून आणली.

त्यांच्यासारख्या ज्ञानी माणसाची सोबत मला जंगलात मिळावी, हे माझं परमभाग्य वनाधिकाऱ्याशी संबंध येण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग नसावा.

मी वडगावला असेतोपर्यंत ते दिवाळी अंकाच्या लेखनासाठी एखादा महिना माझ्या निवासाशेजारच्या वनकुटीत राहायला येत. त्या वेळी आम्ही अधिकच जवळ आलो. त्यांनी मला अगदी जवळून पाहिलं. एखादा लेखक लेखन कसं करतो, हे पाहण्याची संधीही मला याच काळात मिळाली. त्यांचं लेखन एकटाकी असे. हिरव्या शाईत ते अतिशय सुंदर अक्षरांत लिहीत. त्यात एका शब्दाचीदेखील खाडाखोड नसे.

अशाच दिवसांत एक दिवस दिवेलागणीच्या वेळी त्यांच्याबरोबर बोलत बसलो होतो. त्या दिवशी ते संत तुकारामाबद्दल बोलत होते. बोलता बोलता ते मध्येच मला उद्देशून म्हणाले,

“चितमपल्लीसाहेब, तुकारामांनी एका ठिकाणी धन कसं मिळवावं, हे सांगितलं आहे.”

मी विचारलं, “कसं?”

“जोडोनिया धन उत्तम वेव्हारे |”

अन् त्याचा उपयोग कसा करावयाचा?

” उदास विचारे वेच करी ||”

चौकीदारानं शमादानीवर पितळेचा स्वच्छ घासलेला लखलखीत लॅम्प आणून ठेवला. खोलीत उजेड पडला. तसा माझ्या मनातील अंधारही नाहीसा झाला. आप्पांनी मला जणू गुरुमंत्रच दिला होता. एखाद्या सर्पानं कात टाकावी तसा माझा धनाविषयीचा लोभ गळून पडला.

लेखनाचा श्रीगणेशा त्यांच्याच प्रेरणेने केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली थोडं – फार लेखन करण्याचा प्रयल करू लागलो. त्यांच्याचमुळं शब्दांचं धन गोळा करण्याचा छंद लागला. त्यांनी त्या धनाची वाटुली दाखविली. गेली अडीच तपं त्याच वाटुलीवरून चालतोय. त्या वाटेनं जाताना अनपेक्षितपणे वाटेवरच्या सावलीसारख्या पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली, प्रा. नरहर कुरुंदकर, चित्रकार आलमेलकर, तात्यासाहेब माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी अशा अनेक थोर व्यक्ती भेटल्या.

ॲरिस्टॉटल हा पहिला पदार्थसृष्टिज्ञानी. सृष्टीवरील निरीक्षणाचे त्याने सव्वीस खंड लिहिले आहेत. त्याच्या ग्रंथांचा शोध करीत दिल्लीपर्यंत गेलो. तिथल्या ग्रंथालयात मी रोज ॲरिस्टॉटलवरची टिपणं काढायचो. तेव्हा त्यात पक्षिशास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल सापडला. त्याच्या लेखनानं मी झपाटून गेलो. चैतन्याच्या शोधात असलेली जॉय ॲडमसन तिच्या विपुल ग्रंथसंपदेतून सापडली. माझे मित्र सुमंतभाई शहा कोणी मोठा माणूस नाही. मुंबईतील वास्तव्यात त्यांनी आणि भाभीजींनी माझ्याकरता जे केलं, ते आणखी कोणी केल असतं, असं वाटत नाही. रजनीगंधाच्या रूपानं त्या वृद्ध पतिपत्नीनं दिलेला आशीर्वाद अजूनही माझ्या मस्तकी आहे.

चोर मोठी माणसं जशी भाग्यानं भेटतात, तसे ग्रंथही योगायोगानंच आयुष्यात येतात, ग्रंथांनी तर माझं आयुष्य समृद्ध केलंच, परंतु काही वेळा त्या ग्रंथांचे लेखक आपल्या पात्रांबरोबर मला भेटायला येतात. बनगरवाडी, सी शॉनगॉनचं पिलोबुक, हंसदेवाचं मृगपक्षिशास्त्र, जे कृष्णमूर्तींच्या रोजनिशी या ग्रंथांविषयी असंच म्हणावं लागेल. कित्येकदा तर या ग्रंथांप्रमाणं झाडंंदेखील भेटायला येतात.

(प्रस्तावनेतला लेखनप्रेरणेसंबंधिचा काही भाग इथे दिलेला आहे.)

शब्दांचं धन

मारूती चितमपल्ली


         अरण्यऋषी – मला भावलेले !

मला वाचक म्हणून कोणता साहित्यिक आवडतो असा प्रश्न जर कोणी विचारला तर चटकन नावं येतात ती कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, बा. भ. बोरकर अशा कवींची. ज्यांनी समाजाचं वर्णन फारच अप्रतिम पद्धतीने केलेले आहे. मात्र सिमेंटच्या जंगलात वाढणाऱ्या मानवी मनाला खरा आकार मिळतो तो मुक्त निसर्गाच्या सहवासात ! मोकळ्या आकाशाखाली वाढणाऱ्या हिरव्याकंच झाडीत, उंच पर्वतरांगांमध्ये, खळाळत्या नदीत, दऱ्या-खोऱ्यांच्या सहवासात माणूस नव्यानं घडतच राहतो. खऱ्या अर्थानं जीवंत राहतो. 

त्यामुळे जाणीवपूर्वक वाढवलेल्या बागेपेक्षा, आपसूकपणाने वाढत गेलेली झाडी अर्थातच जंगले मला फार अधिक भावतात. बाग आणि जंगलांची तुलना करताना मला आठवण येते ती बिरबलाच्या एका गोष्टीची. एकदा काय झालं, राणीसाहेबांना बरं नव्हतं आणि वैद्याची आवश्यकता भासली तेव्हा अकबरानं तिला सांगितलं की, “बाई गं, बघ, काम करणाऱ्या अनेक बाया या कशा सहजतेने जगू शकतात; आणि तुला थोडं काही झालं की सतत वैद्याची, औषधांची गरज पडते.” तेव्हा राजाविषयीची तक्रार राणीनं बिरबलाच्या कानावरती घातली आणि मग बिरबलानं गंमतच केली. राजाच्या आवडत्या बागेला काही दिवस पाणी न घालण्याचा सल्ला त्याने माळ्याला दिला. राजेसाहेब जेव्हा फेरफटका मारत बागेमध्ये आले त्या वेळेला सुकलेली बाग पाहून स्वाभाविकच माळ्यावर रागावले. माळी दादांनी बिरबलाकडे बोट दाखवले, तेव्हा बिरबल म्हणाला, “महाराज, मला वाटलं जंगलात झाडं आपोआप वाढतात तशी बागेतही वाढतीलच. म्हणून मी माळ्याला सांगितलं, “सध्या पाणी घालू नको.” राजाला आपली चूक उमगली आणि राणीच्या उपचाराबाबतचं त्यांचं मत बदललं. अंगणातली बाग आणि आपल्या भागातलं जंगल दोन्हीही तितकंच महत्त्वाचं असतं मात्र ते दोन्ही जपलं जातं, वाढवलं जातं ते मात्र वेगवेगळ्या पद्धतीने.

अशा या जंगलांमध्ये रमणारा एक विलक्षण माणूस म्हणजे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली! पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली यांना आपण ओळखतो ते पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक म्हणून. त्यांचे जीवन समजून घेताना लक्षात येते, मुळामध्ये त्यांचं बालपण गेलं आईच्या सहवासात, गोष्टीवेल्हाळ जगात आणि पारंपरिक शहाणपणाच्या अनुभवी वातावरणात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या वाढणारा हा माणूस निसर्गाकडे आपसूकच खेचला गेला.

पुढे करिअरचा भाग म्हणून वन अधिकारी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संबंधित परीक्षा दिल्या. त्यांच्या मनाला वनांबाबतची जी एक उपजत सात्त्विक ओढ होती, त्या ओढीने त्यांना जंगलात राहूनही शाकाहारी ठेवले, मद्यप्राशनापासून दूर ठेवले. म्हणजे एक सर्वसाधारणपणे वन अधिकारी म्हणल्यानंतर जे जे दुर्गुण आपल्या मनामध्ये येतात, त्या सगळ्या दुर्गुणांपासून दूर असणारा आणि जंगलांच्या मात्र फार जवळ असणारा असा हा वन अधिकारी म्हणजे मारुती चितमपल्ली होय. मारुती चितमपल्ली यांनी 36 वर्षे वनविभागात काम केले, त्यादरम्यान त्यांनी संशोधन आणि कागदपत्रांसाठी संपूर्ण भारतभर 5 लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केला. 13 भाषांमध्ये ते अस्खलितपणे बोलत. या भाषांचा उपयोग आदिवासी समुदायांशी संवाद साधण्यासाठी आणि मौल्यवान पर्यावरणीय माहिती गोळा करण्यासाठी केला.

मारुती चितमपल्ली यांच्या नावाचा विचार करताना मला जाणवते की मारुती नावाचा पौराणिक अर्थ मुळात ‘पवनपुत्र’ असा होतो. त्या पवनपुत्रामध्ये जी एक विलक्षण अशा प्रकारची झेप घेण्याची ताकद आहे, जी सात्विकता, पावित्र्य, भक्ती हे सगळे गुण आहेत तेच गुण आपल्याला मारुती चितमपल्लींमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यांच्या मनातली भक्ती होती सृष्टीबाबतची, वनांप्रतीची, ज्ञानाप्रतीची! जंगल हे त्यांच्यासाठी एक खुलं पुस्तक होतं. परमेश्वराने निर्मिलेले एक सुंदर काव्य होते.

त्यांच्या लेखनातून येणारी निसर्ग निरीक्षणे व वर्णने आपण पाहतो तेव्हा याचा सहज प्रत्यय येतो. मोराला पिसारा असतो. पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो. त्याला ‘मुकना मोर’ म्हणतात. मोरनाचीमध्ये या मुकन्या मोराला प्रवेश नसतो. हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी ‘मुकना हत्ती’ असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते. हत्तींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही. आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात. सर्वसामान्यांकरिता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे; परंतु या ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातील प्राण्यांबाबत वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती ते साहित्यातून फार सहजपणे आणि पारदर्शकतेने मांडतात. चांदणं पाझरावं तसं हे निसर्गसत्य कलात्मक सौंदर्याने आपल्याला दर्शन देत राहते.

मारुती चितमपल्ली यांच्या मुलाखतींच्या आणि कथा व अन्य  ललितगद्याच्या माध्यमातून यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. ‘राष्ट्रसेवक’ या  यूट्यूब वाहिनीवर ‘अरण्यऋषी: मारुती चितमपल्ली’ या मुलाखतीचे पाच भाग उपलब्ध आहेत. निसर्गाच्या सहवासात, मधाळ आवाजात,  प्रश्नांना सहज आणि मार्मिक उत्तर देणारे मारुती चितमपल्ली, पक्ष्यांच्या चिवचिवाटाचा असणारा पार्श्वध्वनी, तितक्याच तन्मयतेने प्रश्न विचारणारे मुलाखतकार एका सुरेल, समृद्ध आणि अनेक विचारबीजे पेरणाऱ्या प्रकट मुलाखतीचा अविस्मरणीय आणि सर्जक अनुभव देतात. वाचक, श्रोता आणि प्रेक्षक या नात्याने आपण तृप्त होतो. गो.नि.दांडेकर, नरहर कुरुंदकर यासारख्या मोठ्या माणसांशी लेखकाचे असलेले भावबंध, अनेक शिकाऱ्यांशी त्यांचे जडलेले नाते आपल्याला थक्क करते. मेघदूतातील निसर्गातील वर्णने, त्यामागचे मारुती चितमपल्ली यांनी सांगितलेले निसर्गसत्य, लोकमानस व लोकश्रद्धा यांच्याशी निसर्गवास्तवाचा असलेला संबंध आणि त्यातून संत ज्ञानदेवांच्या, संत तुकारामांच्या अभंगातील निसर्गवर्णनांचा उलगडत जाणारा अर्थ खरोखर आपल्याला अगदी सहज बोट धरून एका अद्भुत सृष्टीत घेऊन जातो.     

चकोर चांदणं पितो म्हणजे चकोर चांदण्याच्या प्रकाशात वाळवी खातो हे नैसर्गिक सत्य आहे. हंसाचा नीरक्षीरविवेक म्हणजे हंस चोचीने कमळाचा देठ चिरून त्यात पाण्यासारखे प्रवाही असणारे दूध पितो,  तर चातक पावसाचे पाणी पितो म्हणजे पावसाचे पाणी पीत असताना तो झाडाच्या देठावरून जे पाणी खाली येते तिथे चोच लावतो, तो स्थलांतरित होताना केवळ पावसाच्याच प्रदेशात स्थलांतरित होतो, जिथे पाऊस नाही तिथे चातक जातच नाही आणि म्हणून तो फक्त पावसाचे पाणी पितो हे सत्य आपल्याला कळते. निसर्गाच्या बाबतीमध्ये  वास्तव आणि कल्पनांच्या मधले सत्य उजागर करण्याचं काम हे मारुती चित्तमपल्ली यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं.

 त्यांच्यातल्या या वनप्रेमी माणसाने घडवला त्यांच्यातला साहित्यिक! ते केवळ निसर्गप्रेमीच नव्हते तर ते होते एक व्यासंगी निसर्गवाचक, सूक्ष्म निरीक्षक, सजग नोंदलेखक, संयमी अभ्यासक आणि संवेदनशील लेखक. त्यामुळे त्यांनी जंगलांवर ज्या आत्मीयतेने ललित साहित्य लिहिले तितक्याच समर्थपणे कोश साहित्य निर्माण केले. वास्तविक पाहता व्यक्तिनिष्ठता हा ललित साहित्याचा गुणधर्म तर वस्तुनिष्ठता हा कोश वाड्मयाचा. तादात्म्य आणि ताटस्थ्य याचा सुंदर मेळ घालत त्यांनी जंगलसृष्टीला मराठी भाषिक रूपे दिली. मराठी  भाषा-साहित्य आणि संस्कृतीला समृद्ध केले. त्यांच्या २१ ग्रंथांमधून- ललितगद्य, कथा, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्र, कोशवाड्मय, अनुवाद या विविध साहित्य प्रकारांमधून जंगलाला मराठी साहित्यसृष्टीत प्रस्थापित केलेले आहे. ‘पक्षी जाय दिगंतरा’, ‘जंगलाचं देणं’, रानवाटा, निळावंती, ‘चकवाचांदण : एक वनोपनिषद’ यासारखे समृद्ध ललित साहित्य तर पक्षीकोश, वृक्षकोश, मत्स्यकोश यासारखे मुलभूत संदर्भ साहित्य मराठी समाजजीवनाच्या कक्षा वाढवणारे आहे. माणसाला निसर्गाच्या जवळ नेणारे, सभोवतालच्या सृष्टीची संवेदनशील व अर्थपूर्ण दखल घेण्यास प्रवृत्त करणारे हे हरित साहित्य आहे, असे म्हणावयास हरकत नसावी. या हरित साहित्याच्या प्रकाशसंश्लेषणाने समाज धष्टपुष्ट होतो.

हे सगळं पाहिलं की मन थक्क होतं. अरण्यऋषी म्हणजे काय या ऋषीची तपस्या काय आहे, या ऋषीची ताकद काय आहे, या ऋषीची सात्त्विकता काय आहे या सगळ्याच गोष्टींचा उलगडा एका फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला आपसूकपणे घडत जातो. मला वाटतं भारतामध्ये जे एक प्रकारचं पारंपरिक असं शहाणपण आहे, सृष्टीबद्दलची एक विलक्षण कृतज्ञता भारतीय मनामध्ये आहे त्या सृष्टीची समष्टीशी ओळख करून देणारी ही व्यक्ती म्हणजे मारुती चितमपल्ली होय!

(पूर्वप्रकाशन – जलोपासना – वरील छायाचित्रात दिसत असलेला अंक )

प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी

मराठी विभाग

सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय


निष्पर्ण

आपण व्हावं निष्पर्ण
मग तोच होतो पालवी
फुलवीत टवटवी नित्य नवी
शिशिराला ना प्रवेश जेथे
ना कोणते ऋतूचक्र होते
केवळ एकच स्थिती
समर्पिताची – तादात्म्याची
तादात्म्याची – समर्पिताची !

वृंदा आशय

झाड

मी जिथे जाईल तिथे
सतत असतं झाड
करत राहते ते माझे
वेड्यासारखं लाड

त्याच्या सहवासात
मी स्वच्छंदी ….
क्षणार्धात होतं मन
अतीव आनंदी !

खरंच सांगू
झाड काय करतं
मला ते प्रेमाने
घट्ट मिठीत घेतं !

मला पाहताच त्याची
डोलतात पानं – फुलं
खोलवरून त्याची
धावत येतात मूळं

धाऊन येतात मूळं नि
गदगदा हलवतात मला
ते असतं निमंत्रण
माझ्या मूलपणाला !

वृंदा आशय


सहअस्तित्वाची  जाणीव….

प्रा. डॉ. क्षमा खोब्रागडे

ही सर्व जीवसृष्टी वैविध्याने भरलेली आहे. यातील कित्येक जीव तर असे आहेत की ते माणसाच्या डोळ्यांना दिसतही नाही, त्यांना आपण ‘सूक्ष्मजीव’ म्हणतो आणि काही अगदीच अजस्त्र! या सगळ्यांचेच पृथ्वीवरील पर्यावरणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

पक्षी जगताविषयी बोलायचे झाल्यास ‘पक्षी’ हा प्राणी जीवसृष्टीतील उत्क्रांतीच्या एका महत्त्वपूर्ण स्थित्यंतराचे प्रतीक म्हणून उत्तम उदाहरण देता येईल. कारण जीवसृष्टीची उत्क्रांती हीदेखील अतिशय उद्बोधक अशी आहे. सर्वप्रथम अतिसूक्ष्म अशा एकपेशीय जीवापासून (Prokaryotic organism) जीवसृष्टीचा प्रारंभ झाला आणि प्राणी जगतातली ही सुरुवात टप्प्याटप्प्याने येऊन ठेपली ती मानव ह्या सर्वात उत्क्रांत असलेल्या प्राण्यापर्यंत! सर्वात आधी पाण्यातील जीव तयार झाले त्यानंतर जमिनीवर राहणा-या प्राण्यांची उत्पत्ती झाली आणि दोघांच्या मध्यावर म्हणजे जे पाण्यातून जमिनीवर आले आणि आकाशातही उडायला लागले असे हे पक्षी. त्यामुळे यांची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. हा जसा उडू शकतो तसा तो जमिनीवर देखील राहू शकतो. पक्षांना एक विशिष्ट प्रकारचा अधिवास लागत असतो.  अधिवास म्हणजे काय तर त्याचे राहण्याचे ठिकाण. हे राहण्याचे ठिकाण एकतर भरपूर दाटी असलेली झाडे, जंगले, वने, उद्यान यासोबतच नदी, तलावाकाठची पानथळीची जागा आहे. पानथळीच्या जागेचे वैशिष्ट्य असे आहे की इथे मुबलक प्रमाणामध्ये अळ्या, किडे, किटक हे पक्षांना आवडणारे अन्न असते. आता मागील शंभर सव्वाशे वर्षात आपल्या जीवनशैलीत अतिशय झपाट्याने बदल झाले. शहरीकरण अतिवेगाने होत आहे. शहरांमध्ये लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे तिथे पक्षांना पुनरुत्पादन आणि जगण्यासाठी म्हणून संरक्षित, आल्हाददायक परिस्थिती राहिली नाही.

टोलेजंग इमारती, मोठमोठाली  कार्यालये, आणि नानाविध उद्योगधंदे यासाठी म्हणून नैसर्गिक स्थितीतील विस्तीर्ण अशी जंगलेच्या जंगले भुईसपाट झाली. आणि यासोबतच पक्ष्याची घरेही, त्यांनी वस्ती करून राहण्याच्या जागाही भुईसपाट झाल्या.

 यासोबतच प्रचंड लोकसंख्येच्या मानवी वसाहती मधून निर्माण झालेले मैला, सांडपाणी यासोबतच औद्योगिक क्षेत्रातील रसायनमिश्रित सांडपाणी हेदेखील जलस्त्रोतांमध्ये जसे की नदी-तलाव- झरे यामध्ये मिसळल्या गेले. त्यामुळे जलक्षेत्राच्या अवतीभवती असलेल्या  पाणथळीच्या जागादेखील या  सांडपाण्याने प्रदूषित झाल्या. आणि पक्ष्यांची संख्या रोडावली. मानवाचा मूळ पिंड निसर्गात रममाण होण्याचा आहे. पंचतारांकित सुविधा असल्या तरीही निसर्गाच्या सान्निध्यात तो मनस्वी आनंदी होतो. म्हणूनच कृत्रिमरित्या अशा प्राकृतिक संरचनेच्या ठिकाणांना पर्यटक गर्दी करतात. पण दैनंदिन जीवन जगताना आपण काही दोन चार गोष्टी जर केल्या तर आपल्या घराभोवतीही चिमणी, पोपट असे पक्षी तर निश्चित येऊ शकतात. जागा कितीही कमी असेल तरीही थोडीफार छोटी झाडे, कुंडीत किंवा जमिनीवर लावू शकतो. पाण्यासाठी मातीचे भांडे आणि भरड धान्याचे दाणे सावलीत ठेवू शकतो. यासोबतच पेस्टकंट्रोल वापरण्याचा अतिरेक टाळणेही गरजेचे आहे. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे, म्हणजे तो एकदुसऱ्याचे भक्षण करतोच असे नाही परंतु या जैवसाखळीतील सर्वच जीवांचे अस्तित्व …. केवळ असणे,  ही सहजीवनाची श्रुंखला, परस्परावलंबित्व एकेकाचे जगणे समृद्ध करत असते. मानवाला आपले अस्तित्व समृद्ध करण्यासाठी हा निसर्गनियम अनुसरावा लागेल. 

पक्षीसप्ताहानिमित्त हा सहअस्तित्वाचा विचार करण्यास काय हरकत आहे? बघा आपल्याही खिडकीत दोन चार पक्षी नक्कीच डोकावतील !

प्रा. डॉ. क्षमा खोब्रागडे.

उपप्राचार्य, पर्यावरण शास्त्र विभागप्रमुख,

स. भु. विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद.

(९८२२२९४६३९)

kshama.earth@gmail.com


वैभव ग्रीष्म ऋतुचे

वैभव ग्रीष्म ऋतुचे आगळे वेगळे
रूप चैत्रपालवीचे कोवळे
सृष्टीचा हा अनोखा देखावा
हळूच मनात जपावा

फुटतो आंब्याला मोहोर दाट
कंठ कोकिळेचा पाहतो वाट
गोडी बाळ कैऱ्यांची अविट
आम्र फळांच्या आगमनाचा थाट

आला गुलमोहोर बहरात
ग्रीष्माचे करावयास स्वागत
लाल हिरव्या रंगाच्या शृंगारात
सडा लाल पाकळ्यांचा घालत

बहरला मनसोक्त बहावा
पांग डोळ्यांचा फेडून घ्यावा
नाजूक पिवळे घोस फुलांचे
मन मोहकरूप बहाव्याचे

फुलतो ग्रीष्म डोंगररानात
फुले लाल पळस बनात
शोभतात निष्पर्ण साग बनात
ग्रिष्म भरतो रंग निसर्गात

आला गुलमोहर बहरात
ग्रीष्म भरतो रंग निसर्गात
काढावी उसंत घडीभर
बघावे रूप ग्रीष्माचे मनोहर

  • डॉ. अलका काथार
    (जिव्हाळा – या काव्यसंग्रहातून)

https://shubhada6789.blogspot.com/2022/03/blog-post.html?m=1 या लिंकवर वाचा डॉ. शुभदा लोहिया यांचा लेख – ‘जगण्याचे भान देणारे चिमणपाखरू’ : सृष्टी ज्ञान

डॉ, शुभदा राठी यांच्या नव्या पुस्तकाबद्दल –

एक आनंदाची बातमी….

🌷🎊✨

डॉ शुभदा राठी – लोहिया यांच्या

 ” रुग्णांच्या चष्म्यातून”

(साधना प्रकाशन) या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद

 “Unveiling Healing”*

 (विश्वकर्मा पब्लिकेशन्स)

यांनी प्रकाशित केला आहे.

दोन्ही पुस्तके अनुराग पुस्तकालय उपलब्ध आहेत.

इंग्रजी पुस्तकाचे स्वागत…

डॉ शुभदा राठी – लोहिया यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…!

🌷🎊📚🖋️✨🌼

रुग्णांच्या चष्म्यातून , साधना प्रकाशन, लेखिका – डॉ. शुभदा राठी – लोहिया 

मो.नं. : ९४२२७४४८४४

वाचकाची प्रतिक्रिया

श्री. नामदेव गुंडाळे

‘रुग्णांच्या चष्म्यातून’ हे पुस्तक काय आहे? तर ते आहे, एका साक्षेपी डॉक्टरचे समृद्ध होत जाणारे अनुभव विश्व!  पंचवीस वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर, रुग्ण आणि त्यांच्यातील नाते संबंधाची भाव-चिकित्सा! ही भाव चिकित्सा एका डॉक्टर ने केली आहे ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ !

या पुस्तकात रुग्णांच्या उपचारात संवादाचे महत्त्व, स्पर्शाची जादू, सकारात्मक दृष्टीची महती कशी असते हे सगळं जसं आहे, तसंच सामान्य माणसाच्या शहाणपणातून शिकणाऱ्या डॉक्टरांचे ‘विद्यार्थीपण’ सुद्धा आहे.

या पुस्तकात एखाद्या असाध्य आजाराच्या असण्याने खचून जाऊ पाहणाऱ्या आयुष्याला त्या आजाराची वस्तुनिष्ठ माहिती देऊन त्याच्याशी खंबीर पणे लढण्याची हिंमत मिळवून देणारे समुपदेशन आहे.

एखाद्याची श्रद्धा जीवनाच्या संघर्षात त्याला आत्मबल देणारी कशी ठरू शकते… मन हरले तरच आपली हार असते म्हणून मनाला हरु न देता संघर्षपूर्ण जीवन सकारात्मक विचारांनी कसे जगता येईल याची दिशा दर्शवणारे अनुभव या पुस्तकातून लेखिकेने दिले आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांशी रुग्णाचे संबंध हे आजारपणाशी लढताना कसे महत्त्वाचे ठरतात हे जसं या पुस्तकात येतं तसंच रुग्णांच्या डॉक्टरांवरील विश्वासाचाही सकारात्मक उपचारात सिंहाचा वाटा असतो हेही यात प्रकर्षानं येतं.

रुग्ण, त्याचा आजार, त्याची जीवनदृष्टी, विविध नाते संबंध, पती पत्नीच्या सहजीवनापासून ते मृत्युच्या अपरिहार्यतेपर्यन्तचा हा प्रवास वाचताना वाचकालाही समृद्ध करत जातो.

डॉक्टर – रुग्ण व्यवहाराचे निमित्त घेऊन विविध आजार, त्यातून वाट्याला येणारे दुःख, त्याच्याशी लढणारी मानसिक कणखरता, सकारात्मक दृष्टी, मृत्युचे अटळपण अशा जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करत लेखिका आपल्या समोर मांडत जाते एक समृद्ध जीवन जगण्याचे प्रिस्क्रीप्शन! त्यात वाचक स्वतःला शोधत जातो. तो शोधत जातो त्याचे आजार, त्याचे मन, त्या मनाच्या व्यवहाराचे धागे दोरे! तो अनुभवत जातो त्याच्या संघर्षपूर्ण जीवनाशी लढण्यासाठी खंबीर होत जाणारे मन!

लेखिकेसाठी हा जसा समृद्ध करणारा प्रवास आहे तसाच वाचकांसाठी सुद्धा तो अनेक अर्थांनी समृद्ध करणारा अनुभव ठरतो.

– नामदेव गुंडाळे 


हृदय झाले गंगाजळ, दारी फुलले कृष्णकमळ !

अंगणामध्ये कमळ फुलणे हे मुळातच माझ्यासाठी इतके आनंददायी असते की तो निखळ आनंद मांगल्य पसरवतच येतो. त्यात कृष्णकमळ आणि ब्रह्मकमळ आपल्याकडे विशेष शुभसूचक मानले जातात. गेल्या आठवड्यात आमच्या अंगणात कृष्णकमळाची सहा-सात फुले उमलून गेली. मी जेवढी फुले पहिली त्यात माझ्या आठवणीनुसार पहिले फूल पश्चिमेला उमलले, त्यानंतर दोन कृष्णकमळे दक्षिणेला उमलली, त्यानंतर एक ईशान्येला व एक आग्नेय दिशेला उमलले तर आज एकच फूल आणि तेही इतर फुलांपेक्षा आकाराने थोडे मोठे आणि त्याचा अग्रभाग पाहता ठामपणाने व्यापकता व्यक्त करत पूर्व दिशेला, सूर्याच्या थेट समोर उमललेले आहे. कृष्णकमळाच्या निमित्ताने मी नकळत दिशांचा विचार करू लागले तेंव्हा शाळेत मला माफक गुण देणाऱ्या भूगोल विषयाने मनातल्या मनात देवाचे नक्कीच आभार मानले असतील.

– वृंदा आशय


|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||

मुक्त चिंतन

‘गहन’ आणि ‘ग्रहण’

‘गहन’ आणि ‘ग्रहण’ या दोन शब्दांचा विचार करताना या दोन्ही शब्दांमध्ये मला जाणवणारे साम्य म्हणजे हे दोन्ही शब्द निसर्गाशी निगडित आहेत. खरं म्हणजे त्यांच्या अनेक वेगवेगळ्या अर्थछटा आहेत पण आज आपण हे सृष्टीचं विशेष पृष्ठ प्रकाशित करत आहोत म्हणून मी या दोन शब्दांचा सृष्टीशी संबंधित जो अर्थ आहे तो लक्षात घेऊन त्यावरच भाष्य करणार आहे.

गहन याचा अर्थ दाट, निबिड असा होतो. स्वाभाविकरित्या जेव्हा आपण ‘गहन’ हा शब्द निसर्गाच्या संदर्भात वापरतो त्याबरोबर आपल्याला अरण्य आठवायला लागतं ‘गहन अरण्यामध्ये’ ‘दाट अंधारामध्ये’ अशा प्रकारच्या शब्दांच्या जोड्या या आपसूकपणे आपल्याला आठवतात.ज्या वेळेला आपल्या दैनंदिन जीवनाच्या बाबतीमध्ये आपण हा ‘गहन’ शब्द वापरतो त्या वेळेला ‘गहन समस्या’, ‘गहन प्रश्न’, ‘गहन विचारात’ तो पडलेला आहे सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने आपण हा शब्दप्रयोग करतो. याचा अर्थ कोणत्यातरी गुंतागुंतीच्या विचारांमध्ये, गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये तो अडकलेला आहे, हे आपल्याला सांगायचे असते.

जसं आपण अनोळखी अशा जंगलामध्ये गेलो तर स्वाभाविकपणानं त्या ठिकाणी आपल्यासाठी भुलभुलैय्या निर्माण होतो अगदी त्याच पद्धतीने अनोळखी अशा समस्या जर आपल्यासमोर आल्या तर आयुष्यातही भुलभुलैय्या निर्माण व्हायला लागतो.

आता ‘ग्रहण’ हा जो शब्द आहे या शब्दाला निसर्गाच्या अनुषंगाने एक नकारात्मक अर्थ आपल्याला प्राप्त झालेला दिसतो. आपल्याला परिचित असलेले सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे जेव्हा होतात तेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्यामध्ये त्यांच्यापैकी कुणीतरी येणं आणि त्याच्यामुळे एकाला दुसऱ्याचे ग्रहण लागणं हा निसर्गतः असलेला अर्थ आहे. ज्या वेळेला ‘ग्रहण’ हा शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये आणि विशेषत्वानी हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वापरला जातो, तेव्हा ‘ग्रहण करणे’ याचा अर्थ आकलन करणे, ज्ञानग्रहण केले म्हणजे ज्ञान आत्मसात केले, अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला अपेक्षित असतो. आता हे गहन – ग्रहण – ग्रहण हे जे काही शब्द आहेत त्यांच्या अर्थाचा विचार करताना काही शब्दकोशांमध्ये तर आपल्याला ‘गहन’ याचाच अर्थ ‘ग्रहण’ हा देखील दिलेला दिसतो. तो कितपत योग्य आहे याबाबत मी स्वतः भाषेच्या आजच्या वापरानुसार तरी निश्चितच साशंक आहे. असो.

माझ्या मते आपण ‘गहन’ विचारांमध्ये गढलेलो असताना किंवा ‘गहन’ समस्येमध्ये अडकलेलो असताना त्या समस्येचे ‘ग्रहण’ जर चांगल्या पद्धतीने केले तर आपल्या आयुष्याला लागलेले ‘ग्रहण’ सुटू शकते. आणि त्याच्यामुळे ‘टेक्स्ट विथ कॉन्टेक्स्ट’ हा जो काही ‘शब्द’ आणि ‘अर्थ’ यांचा संबंध असतो; हा संबंध अचूक लावता आला तर मला वाटतं ‘गहन’ आणि ‘ग्रहण’ आपल्या भोवती जे काही एक वेटोळे निर्माण करतात, जो काही आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात, जो काही भुलभुलैय्या आपल्या भोवती निर्माण करतात ; त्यातून एक निश्चित अशी दिशा आपल्याला मिळू शकते आणि हे आपल्याला शिकवण्यासाठी निसर्गासारखा सुयोग्य असा दुसरा गुरु नाही, असं मला वाटतं.

वृंदा आशय

🙏श्रीकृष्णार्पणमस्तु! 🙏


जे पिंडी ते ब्रह्मांडी

तो अंत:रंगी राहतो
हे सारे जग पाहतो
काय कोठे घडते ते
तोच मला सांगतो !

तो त्रिकालदर्शी
पाहूनी मनी हर्षी
अंत:रंगी प्रकाशी
सहस्त्ररश्मी साक्षी

तो उच्चरवे सांगतो
जे पिंडी ते ब्रह्मांडी
अंतरीचे तेज:कण
सुज्ञ कधीही न सांडी

वृंदा आशय


एक विशेष सूचना वक्तृत्व स्पर्धेची

वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्या साठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉइन करावा.
👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/JOn78FjsT1H1td1zjRmfYA?mode=wwt