विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन !

संपादकीय

मुकी बिचारी कोणी हाका

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा संदर्भ ज्या ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला ‘मुकी बिचारी कोणी हाका‘ हे पालूपद तत्कालीन जनतेचे वैशिष्ट्य वर्णन करताना लावले जाते. आणि मग आपसूकपणे आपण निजाम, त्याची अन्यायी राजवट, रझाकारी या सगळ्या गोष्टींबद्दल तावातावाने बोलायला लागतो.
इतिहास आहे. इतिहासाबद्दल बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे, संशोधन केले पाहिजे. काय घडले होते याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. मात्र हे विश्लेषण कशासाठी याचा जेव्हा मी विचार करते त्या वेळेला लक्षात येते,
बऱ्याच वेळेला आपापले ‘विशिष्ट स्वार्थ साधण्यासाठी’, ‘गढे मढे उकरण्यासाठी’ या संशोधनाचा वापर राजकीय आणि सामाजिक पातळीवर केला जातो.

वास्तविक पाहता इतिहास ही एक प्रेरणा आहे जिथून आपण शिकायचे असते आणि कोणतीही गोष्ट शिकायची असे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्याचा अर्थ होत असतो, “योग्य ते करायचे आणि अयोग्य ते टाळायचे .जे बरोबर आहे ते करावे आणि जे चुकीचे आहे ते टाळावे.” इतिहासाकडून आपण शिकवण घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला भविष्यामधला मार्ग हा स्पष्टपणे दिसतो आणि चालता येतो.

काय आम्ही खरेच आमच्या इतिहासाकडून शिकतो का ?ज्या वेळेला आम्ही श्रद्धा ,अंधश्रद्धा, अज्ञान हतबलता, नैराश्य या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला लागतो तेव्हा तत्कालीन जनतेबद्दलची, तत्कालीन लोकांबद्दलची एक विलक्षण सहानुभूती आमच्या मनामध्ये दाटून येते आणि तेव्हाची जनता किती गरीब बिचारी होती, अशा प्रकारच्या एका निष्कर्षावरती आम्ही येऊन थांबतो.
असे निष्कर्ष ज्या वेळेला आपण काढतो, मला वाटतं थोडासा आत्मपरीक्षणाचा आरसा माणसाने त्यावेळेला समोर धरला पाहिजे. कदाचित त्या जनतेशी कुठेतरी आपले एकआदीम नाते जडलेले आहे ; आदिमतेचे ते सूत्र ‘मुकी बिचारी कोणी हाका’चं गोत्र आपण एका सूत्रात बांधून इथपर्यंत आणलेले आहे , याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही . फक्त बदलत असते परिस्थिती, माणसं आणि प्यादे ! कधी पारतंत्र्य असतं, तर कधी स्वातंत्र्यातही हे घडत असतं. कधी हुकूमशहा हे करत असतात तर कधी लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीचे पुरस्कर्ते या सगळ्या गोष्टी घडवून आणताना दिसतात. जनतेच्या मनामध्ये मात्र ‘आपण फक्त प्यादे’ असा भोळा भाव वसत असतो.

आम्ही, म्हणायला भरपूर प्रगती केलेली आहे. विकास केलेला आहे . काळाच्या पुढे जाण्याची क्षमता बाळगणारे आम्ही समुद्राच्या तळाशी जाणारे , आकाशाचा वेध घेणारे, अवकाशाच्या कक्षा भेदून त्याच्या पल्याड जाणारे, चंद्राला कवेत घेणारे आम्ही. विज्ञानाच्या प्रगतीने, तंत्रज्ञानाच्या साथीने, करोडो मैलांवरती सहजतेने लक्ष ठेवत, अचूक वेध घेणारे, मार्मिक भेद करणारे आम्ही , आमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेतरी कमी पडतो आहोत का याचे आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे.

ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये वावरतो आहोत , ज्या ठिकाणी आपण आपली नोकरी करतो आहोत, आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणाने करून सुद्धा, आपले स्वतःचे म्हणणे बासनात बांधून गुंडाळून ठेवण्याची वेळ आपल्यावरती येते आहे; न जाणो कोणत्या प्रकारचज संकट माझ्यावरती येईल म्हणून स्वतःलाच एका पिंजऱ्यामध्ये बंद करून घेतो आहोत, अशावेळी मला वाटतं ‘मुकी बिचारी कोणी हाका,
‌‌ही परिस्थिती त्या काळातल्या लोकांची होती गरीब बिचारे अज्ञानी दरिद्री पिचलेले खंगलेले होते असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला राहतो का हा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला पाहिजे कारण आपल्या वर्तनातून आपण स्वतःची ती परिस्थिती करवून घेतलेली आहे. कोणाशी तरी एकनिष्ठ राहत असताना आपली एकनिष्ठा दाखवण्यासाठी, मिळालेलं पद आनंदाने सांभाळण्यासाठी आम्हाला जर सत्याशी फारकत घ्यावी लागत असेल, आम्हाला जर आमचं तोंड बंद ठेवावं लागत असेल आम्हाला आमचं मत गुंडाळून बाजूला ठेवावं लागत असेल तर कोणती हिंमत आम्ही दैनंदिन जीवनात दाखवू शकतो आणि स्वातंत्र्य मिळाल्याची कोणती किंमत आज आम्ही मोजतो आहोत हे सुज्ञांच्या लक्षात येण्यास वेळ लागणार नाही आणि हे जर असं घडत असेल, मला माझ्या समस्या सोडवता येत नसतील, मला स्वतंत् पणानं ताठ मानेने उभं राहता येत नसेल तर मला इतिहासाचा गौरव करण्याचा अधिकार नाही, मला भविष्यामध्ये मुक्ततेची स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही . तेमी माझ्याशी प्रतारणा करतो आहे. जो स्वतःशी प्रतारणा करतो तो कुणाशीही एकनिष्ठ राहू शकत नाही हे इतिहासानं वारंवार सिद्ध केलेले सत्य आहे आजच्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने एवढंच!

वृंदा आशय

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष, ग्रंथमित्र नागोराव विठ्ठलराव उर्फ ना. वि. देशपांडे यांचं 24 मार्च 2020 रोजी निधन झालं.

मूळ परतूर (जि. जालना) येथील रहिवासी असलेल्या ना. वि. देशपांडे यांचा जन्म 24 एप्रिल 1931 रोजी सीता नवमीला झाला. लहानपणी हैदराबाद मुक्तीसंग्रामात त्यांनी रझाकारांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहभाग नोंदवला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सत्याग्रह केले.

हैदराबाद येथील स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियलचे सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्राचे संस्थापक सचिव आणि मराठवाडा जनता विकास परिषदेचेही ते संस्थापक सचिव होते. ग्रंथपाल सोसायटी आणि आणि खादी ग्रामोद्योग समितीत ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्राचे कोषाध्यक्ष आणि जांब समर्थ येथील समर्थ रामदास स्वामी जन्मस्थान मंदिराचे विश्वस्त सुरेश देशपांडे, सुधीर देशपांडे आणि सुहास देशपांडे यांचे ते वडील होत.

संकेत कुलकर्णी

(लिंकवर क्लिक करून त्यांची सविस्तर मुलाखत ऐकू शकता. – https://m.facebook.com/story.php?story_fbid=265522894085023&id=55436896972 ‘)

श्रिया व मधुरा या पानावर वाचा नातीने करून दिलेली आजोबांची अर्थात ना. वि. देशपांडे यांची ओळख https://dnyanotsav.in/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be/

पावन मारुती मंदिर, टिळक नगर, छत्रपती संभाजी नगर येथील संघाच्या विक्रमादित्य प्रभात शाखेतर्फे 17 सप्टेंबर 2024 रोजी हैद्राबाद मुक्तिसंग्राम या विषयावर श्री. विजय विठ्ठलराव देशपांडे यांचा कार्यकर्त्यांशी झालेला संवाद. इथे ऐका …..

https://youtu.be/OJByos_q-74?si=5zK3paOj3zBZ1x1A

……आणि सप्तर्षी शैली या यू ट्यूब चॅनलवर पाहा

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त निर्मित हे पान

कै. महामहोपाध्याय ब्रह्मानंद देशपांडे सर यांना समर्पित

गुरुवर्यांचा आजही कानात घुमत राहणारा प्रश्न-

परमेश्वर दररोज तुम्हाला 24 हिरे देतो त्या हिऱ्यांचे तुम्ही काय करता?”

वृंदा आशय

१७ सप्टेंबर – ज्ञानोत्सव – दै. दिव्य मराठी वृत्तपत्रात ०८ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला – न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचा माझा सख्खा मित्र …. हा कै. दिनकर बोरीकर यांच्यावर लिहिलेला लेख डॉ. सुधीर रसाळ सरांच्या अनुमतीने प्रकाशित केलेला आहे. अवश्य वाचा खालील लिंकवर

https://tinyurl.com/2y5umyuz

स.भु. च्या ‘कथा हैदराबाद मुक्तिसंग्रामाची’ QR कोड चे प्रकाशन

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी माननीय न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्याचबरोबर ‘कथा हैदराबाद मुक्तिसंग्रामाची’ या QR कोड चे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित विविध विषयांवर सामान्य नागरिकांना, अभ्यासकांना, वाचकांना, रसिकांना हैदराबाद मुक्तिसंग्रामाची माहिती पाच पाच मिनिटांच्या ध्वनिफिती मधून (ऑडिओ मधून ).मिळणार आहे. याप्रसंगी बोलताना मा.न्यायाधीश रवींद्र बोर्ड यांनी,”मिळालेले स्वातंत्र्य आताच्या काळात जपण्याची आणि जोपासण्याची जबाबदारी ही युवा पिढीची आहे, आपण जबाबदारीने पण मुक्तपणाने बोलले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे असे आवाहन करत युवा पिढीला मार्गदर्शन केले. या वेळेला संस्थेच्या संगीत विभागातर्फे राष्ट्रगीत,राज्य गीत,ध्वजगीत, मराठवाडा गीत ही गीते उत्कृष्ट पद्धतीने सादर करण्यात आली.
एनसीसी पथकाने मान्यवरांना मानवंदना देऊन स्वागत केले. माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश वकील, माननीय सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे आणि अन्य सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नागेश अंकुश यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती प्रज्ञा देशपांडे यांनी केले. संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, उपप्राचार्य, प्राचार्य सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.

https://www.facebook.com/share/v/1CYihnTuVz/