विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

भावपूर्ण श्रद्धांजली जितेंद्र जैन

भावपूर्ण श्रद्धांजली जितेंद्र जैन यांना!

                          आम्हा साधकांसी, ग्रंथ उपकारी |

                          जगासी हितकारी, ज्ञानरूपी॥

                          आम्ही जे बोलू, ते ग्रंथ होती

                          जगाचे हिती, येरझारे ||

या संतोक्तीला शतकानुशतके उलटून गेली. मात्र ही ज्ञानसाधना आपआपल्या परीने अनेकानेक निभावत राहिल्याने या शब्दांना ‘मंत्र शक्ती’ प्राप्त झाली. छत्रपती संभाजीनगर येथील श्री जितेंद्रजी जैन हे ती मंत्र शक्ती प्राप्त करून देणारे मूक साधक होते. ती साधना त्यांनी, परमेश्वराने प्रदान केलेल्या आयुष्य कालावधीत अखंडपणाने केली होती. ‘केली होती’  म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आपणावर आली आहे. श्री जितेंद्रजी यांचे असे आकस्मिक परलोक यात्रेसाठी निघून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले आहे.

मनुष्याचे जीवन क्षणभंगुर आहे हे ही खरेच…पण त्याची अशी प्रचिती कधीही कुणालाही येऊ नये. सर्व वैचारिक धारांची उत्तम जाण असलेले श्री जितेंद्रजी जैन .. अनेकांचे श्री जैन काका यांचे असे अचानक निघून जाणे न पटणारे आहे. आपली योग्यता कितीही जास्त असली तरी संघ विचारांची गरज म्हणून जी जबाबदारी आपल्या कडे येईल ती संपूर्णपणे  पूर्ण करण्याचे काम संघ स्वयंसेवक करीत असतो. छत्रपती संभाजीनगरची गरज म्हणून संघ विचारांच्या पुस्तकालयाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. ती त्यांनी सहर्ष स्वीकारली. लोकसत्तात पत्रकार म्हणून काम करताना सर्व प्रकारच्या साहित्याची चांगली जाण असलेले श्री जितेंद्रजी यांनी या साहित्य व्यवहाराची धुरा जबरदस्त सांभाळली. त्याचसोबत अन्य चांगली  पुस्तके त्यांनी सामान्य कार्यकर्त्या पासून ते व्यासंगी वाचकांना उपलब्ध करून दिली. प्रल्हाद भवन असो किंवा कुठला कार्यक्रम, बैठका,सभा स्थानी हे अनमोल पुस्तकांचे भांडार घेऊन ते त्या ग्रंथाच्या  पाठीशी (पुस्तकांच्या टेबलापलीकडे) हसतमुखाने उभे असलेले आपण सारेच पहात आलो आहोत.नवनवीन प्रकाशनं संघ स्वयसेवकां पर्यंत तितक्याच तत्परतेने पोहचली पाहिजेत अशी त्यांची धडपड असे. हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतील अशी जुनी नवी पुस्तके  त्यांच्या पुस्तकातलयात उपलब्ध असतील याची सर्वांनाच खात्री असे.

कुठे काही बोलायचे म्हणून काही संदर्भ देणारे पुस्तक असेल इथपासून ते  पुस्तकं भेट देणे असेल,विविध अभियानाप्रसंगी प्रसारासाठी आवश्यक असलेली पुस्तकं असतील हे सारे उपलब्ध करून देणारे कार्यकर्ते म्हणजे श्री जितेंद्रजी. कुठे बैठक आहे, कुठे सभा, कुठे कार्यक्रम कोणता आहे, कोण कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, त्यांना कोणती पुस्तके, ग्रंथ आवडू, रुचू शकतात त्या नुसार त्या स्थानी तशा पुस्तकांची विक्री व्यवस्था योग्य ठिकाणी,आकर्षक स्वरूपात करणे हे कौशल्य त्यांनी आपसूक प्राप्त केले होते. वाचनाची आवड कार्यकर्त्यां मध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेकानेक उपक्रम केले. त्यातीलच ‘ग्रंथ संवाद’ हा एक उपक्रम. नवनवीन पुस्तकांचा मर्यादित शब्दात प्रभावी परिचय करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मूळचे मुंबईचे श्री जितेंद्रजी छत्रपती संभाजीनगरला आले.

संघ स्वयंसेवक अनेक कारणांनी स्थलांतरित होत असतात. नवीन गावी गेले की दैनंदिन शाखा कुठे लागते हे माहीत करून घेणे,त्या शाखेत जायला सुरुवात करणे आणि मग आपल्याला शक्य असेल ते काम शोधून, स्थानिक अधिकाऱ्यांना विनंती करून आपल्या कडे ते काम घेणे हे संघ कार्यकर्ता करीत असतो.श्री जितेंद्रजीनीही अशीच शाखा शोधली. ‘नेताजी प्रभात शाखा’  जायला सुरुवात केली. काम शोधले. ते सुरू ही केले. आणि मग ‘प्रल्हाद भवन मधील पुस्तकालय आणि श्री जितेंद्रजी जैन हे अतूट समीकरण होऊन गेले.प्रल्हाद भवनात गेले की पुस्तकालयात जाणे आणि त्यांच्याशी पाच पंचवीस वाक्यं बोलणे नक्की होत असे. पुस्तकांच्या सोबत अलिकडे त्यांनी गो आधारीत उत्पादने, स्वदेशी वस्तू, चांगले सुती कपडे विक्री ही सुरू केली होती. एका निष्ठावान, कर्मठ कार्यकर्त्याचे असे अचानक जाणे हे दुःखदायक तर आहेच. पण ‘ईश्वरेच्छा बलिर्यसी!’

डॉ. दिवाकर कुलकर्णी

{ डॉक्टर दिवाकर कुलकर्णी यांच्या  ‘शब्दचित्र भिंती’वरून (‘फेसबुक’ वरून) साभार!}

यावर आपले मत नोंदवा