माझा सख्खा मित्र…
(8 वर्षांपूर्वी दै. दिव्य मराठीत प्रकाशित झालेला लेख)
माझा सख्खा मित्र…

दिनकर मित्र तर हाेताच.. पण त्याचं व माझं आणखी एक नातं हाेतं.. आम्हा दाेघांचेही वडील स्वामी रामानंद तीर्थांचे निकटचे सहकारी आणि दाेघांनाही स्वातंत्र्यानंतरसुद्धा सत्तेचा स्पर्श झालेला नव्हता. दिनकरचे वडील श्रीनिवासराव बाेरीकर मराठवाडा क्रांती काँग्रेसचे चिटणीस हाेते आणि संघटनेच्या अधिवेशनात धाेरणविषयक ठराव बहुतेक बाेरीकरच लिहीत. वकिली फारशी केलीच नाही. आपल्या गरजा मर्यादित करून जवळजवळ दारिद्र्यातच दिवस काढण्याचे व्रत श्रीनिवासरावांनी (दिनकरच्या वडिलांनी) आयुष्यभर चालवले. त्यांच्याच संस्कारामुळे दिनकर अगदी किशाेरवयातच स्वातंत्र्याच्या चळवळीत दाखल झाला. तसं सगळं कुटुंबच चळवळीला वाहिलेलं हाेतं. मनमाडला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात दिनकरच्या आई स्वयंपाकही करायच्या.
स्वातंत्र्य आल्यानंतर दिनकरची भूमिका सांगतील ते काम करणाऱ्याची हाेती. अगाेदर त्याला खादी ग्रामाेद्याेगाचे काम सांगण्यात आले. त्यासाठी हिशेब तपासणीसाचेही काम त्याने केले. नंतरच्या काळात हळूहळू ताे अर्थशास्त्रात एम.ए. झाला. औरंगाबादला सरस्वती भुवन महाविद्यालयात ताे प्राध्यापकही झाला. मात्र, इतर जबाबदाऱ्या घ्यायला ताे फारसा उत्सुक नसे. स.भु.चे चिटणीस हाेण्यासही अगाेदर त्याने नकार दिला हाेता. ‘मराठवाडा’चे संपादकत्व त्याने स्वीकारावे, अशी अनंतरावांचीही इच्छा हाेती; मात्र त्याने ते कबूल केले नाही. प्राध्यापकी सांभाळता सांभाळता काही उपक्रम त्याने राबवले. वेगवेगळ्या राजकीय तत्त्वज्ञानांची ओळख व्हावी म्हणून वेगवेगळ्या पक्षांचे नेते त्याने औरंगाबादला बाेलावले. ताे, राज्यशास्त्राचे जाेशी व इतर मित्रांनी व्हॅनगार्ड्स
या नावाखाली व्याख्यानमालाही चालवली.
पुढे मराठवाडा खादी ग्रामाेद्याेग समितीचे कामही विश्वस्त म्हणून त्याने सांभाळले. याच काळात पी. व्ही. नरसिंह राव व त्याचा संबंध
आला. त्यांचा विश्वास त्याने संपादन केला हाेता. गाेविंदभाईंच्या सार्वजनिक जीवनाचा तर ताे अविभाज्य भागच बनला हाेता. स्वामी रामानंद तीर्थांचे काम पुढे चालवण्यासाठी जी स्मारक समिती बनली त्यात गाेविंदभाई आणि पीव्ही दाेघांनीही आग्रह करून त्याचा समावेश केला हाेता.
गेले काही दिवस सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत काम करताना इतर कार्यकर्ते व दिनकर यांच्या विचार पद्धतीतला फरक नेहमी लक्षात येत असे. स्वातंत्र्य चळवळीत जाेपासलेल्या मूल्यांच्या आधारेच संस्था चालावी, असा त्याचा आग्रह असे. शाळेची किंवा वसतिगृहाची फी वाढवू नये, त्यात संस्थेला ताेटा झाला तरी हरकत नाही, असा गाेविंदभाईंप्रमाणेच त्याचाही आग्रह असे. विनाअनुदानित शाळा ही खरे म्हणजे त्याच्या मनाेभूमिकेला न पटणारीच गाेष्ट हाेती. अलीकडे त्याने संस्थेचे काैटुंबिक मुखपत्र म्हणून एक मासिक चालवले. त्यात जुन्या संबंधित कार्यकर्त्यांचे स्मरण करताना दिनकरच्या मनात भूतकाळाशी संस्थेचे असलेले नाते दृढ करण्याचाच विचार हाेता.
खरं म्हणजे दिनकर आमच्या पिढीतला स्वातंत्र्य चळवळीच्या सर्वाधिक निकट असलेला. त्याने चळवळीच्या आणि विशेषत: आपल्या आठवणी लिहाव्यात, असा आग्रह मी खासगी नि जाहीर दाेन्ही पद्धतींनी त्याला अनेक वेळा केला; पण ते त्याला करावेसेच वाटले नाही. कदाचित वडिलांची आठवण काढता काढता त्यांनी भाेगलेले कष्ट दिनकरच्या मनाला इतके व्यापून टाकत असावेत की त्या दु:खाच्या आठवणी नकाेत, असे त्याला वाटत असावे.
त्याने अनेक छाेटी-छाेटी पुस्तके लिहिली, काहींचे अनुवादही केले. त्याचे ओशाेंवरचे प्रेम आम्हाला कुणालाच मान्य नव्हते. एकच महत्त्वाचे पुस्तक ताे लिहू शकला ते म्हणजे पी. व्ही. नरसिंह रावांचे एकेकाळचे चिटणीस प्रसाद यांनी लिहिलेल्या इंग्रजी आठवणींचे भाषांतर. सीतापतींनी लिहिलेल्या ‘हाफ लाॅयन’ या नरसिंह रावांच्या चरित्राचे भाषांतर करण्याचाही त्याचा विचार हाेता; पण ते राहून गेले.
भूतकाळ काहींना विसरता येत नाही. वर्तमानात जगताना ते जुन्या काळच्या आठवणी, जुनी मूल्ये हीच उराशी जपून जगण्याचा प्रयत्न करत असतात. काळ किती पुढे गेेला आणि सार्वजनिक हितापेक्षा आपले स्वत:चे हित पाहणारी मंडळी किती यशस्वी झाली हे खेदजनक वास्तव स्वीकारण्याची त्याची तयारी हाेत नव्हती. दिनकरच्या जाण्याने माझा एक सख्खा मित्र मी गमावला… असं मी एका दुसऱ्या मित्राला बाेललाे. त्याने मला हे सख्खेपण म्हणजे काय, असे विचारले. सारख्याच मूल्य व्यवस्थेचा आग्रह धरीत दाेन पिढ्या बराेबर जगल्या म्हणजे येणारे ते सख्खेपण हाेते.
सख्खेपण म्हणजे काय?
दिनकरच्या जाण्याने माझा एक सख्खा मित्र मी गमावला… असं मी एका दुसया मित्राला बाेललाे. त्याने मला हे सख्खेपण म्हणजे काय, असे विचारले. सारख्याच मूल्य व्यवस्थेचा अग्रह धरीत दाेन पिढ्या बराेबर जगल्या म्हणजे येणारे ते सख्खेपण हाेते.
– नरेंद्र चपळगावकर, निवृत्त न्यायमूर्ती

यावर आपले मत नोंदवा