विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

साहित्यसूर्य मावळला !

मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवीत होता …….

वाचकांचा भाव घडवणारा साहित्याचा देव हरवला !

भावपूर्ण श्रद्धांजली ! – वृंदा आशय

खरं म्हणजे उगवतीला मावळतीची गोष्ट करायची म्हणली की मन कसं कातर होतं. पण एस. एल. भैरप्पा यांना न आठवणे म्हणजे साहित्य आणि संस्कृतीशी तो कृतघ्नपणा ठरेल. उमाताई कुलकर्णी यांचे आभार न मानणं म्हणजे ती मराठी भाषेशी केलेली प्रतारणा ठरेल.
एस.एल. तुम्ही आम्हाला समृद्ध केलं, उमाताई तुम्ही माय भाषेतून एस. एल. यांना आमच्यापर्यंत पोहोचवलंत, आम्ही कृतज्ञ आहोत !

ज्ञानोत्सव समिती

डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या एका पुस्तकातून जसाच्या तसा घेतलेला परिचय

एस.एल. भैरप्पा यांचा जन्म २७ जुलै, १९३४ रोजी कर्नाटकमधील हासन जिल्हा येथे झाला. त्यांच्या बालपणावर प्रभाव पाडणाऱ्यांपैकी कन्नड साहित्यिक, गोरूर रामास्वामी अय्यंगार हे एक होते. तेरा वर्षाच्या लहान वयानच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उर्वरित शिक्षणासाठी मैसूर जाण्याआधी त्यांच्या शालेय शिक्षणान खंड पडला, असे त्यांच्या ‘भित्ति’ या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. भैरप्पांनी भावाच्या सांगण्यावरून शाळा सोडली आणि त्याच्याबरोबर एक वर्षभर भ्रमंती केली, या भ्रमंतीत काही काळ मुंबई येथे रेल्वे पोर्टर म्हणून काम केल्यावर, ते काही साधूंबरोबर आध्यात्मिक शांतीच्या शोधात बाहेर पडले. काही महिने फिरून ते पुढील शिक्षणासाठी मैसूरला परत आले. महाराजा सयाजी विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली, बद्री गुजरात येथील सरदार पटेल विद्यापीठ, दिल्लीतील एनसीइआरटी येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आणि मैसूरमधील ‘रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन’ इथून ते १९९१ साली निवृत्त झाले. गेली २५ वर्षे कन्नड भाषेतील आणि गेली ८ वर्षे मराठी भाषेतील सर्वाधिक खपणाऱ्या पुस्तकांचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे भारतातील बहुतेक भाषांमध्ये आणि इंग्रजीमध्ये अनुवाद झाले आहेत, त्यांच्या कन्नड भाषेतील ‘आवरण’ या कादंबरीच्या पाच महिन्यांतच दहा आवृत्या विकल्या गेल्या. भारतीय साहित्यसृष्टीत हा एक विक्रमच ठरला आहे. एस.एल. भैरप्पा यांना मिळालेले पुरस्कार

१९६६ : कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार,

१९७५ : साहित्य अकादमी पुरस्कार.

२००५ : पंपा पुरस्कार.

२००७ : एनटीआर नॅशनल लिटररी अवॉर्ड.

२००७ साली त्यांना गुलबर्गा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली.

१९९९ साली कनकपूर येथे झालेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

—————————————————————————-

डॉ. सतीश बडवे यांनी वाहिलेली श्रद्धांजली

प्रख्यात कन्नड साहित्यिक पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. कादंबरीकार म्हणून ते कन्नड भाषेव्यतिरिक्त अन्य भाषिकांनाही परिचित होते. याचे कारण विविध भारतीय भाषांमध्ये त्यांच्या साहित्यकृतींचे अनुवाद झाले. मराठीपुरते बोलायचे तर उमा कुलकर्णी यांनी भैरप्पा यांचे साहित्य मराठीत भाषांतरित केले. महाभारत आणि रामायण यांसारख्या आर्ष महाकाव्यांचे संदर्भ घेत त्यांच्या कादंबऱ्यांची कथानके आकार घेतात. ऐतिहासिक संदर्भ धुंडाळून त्यांनी सत्य प्रतिपादन करण्याची भूमिका आपल्या कादंबरीत मांडली. पर्व, आवरण सारख्या कादंबऱ्या याची साक्ष ठरतात. आशय आणि विषय या दोन्ही अंगांनी क्वचित त्यांच्या लेखनासंबंधी वादही झाले. खरे तर लेखक उजवा आणि डावा अशी विभागणी करता येईल का? लेखक हा लेखकच असतो. त्याचे लेखकपण महत्त्वाचे. भूमिकांमध्ये मतभेद संभवू शकतात. भैरप्पा यांना अशा वाद विषयाशी सामना करावा लागला. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. वंशवृक्ष,जा ओलांडूनी, धर्मश्री, काठ, सार्थ या त्यांच्या कादंबऱ्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या. ‘ सत्य आणि सौंदर्य ‘, ‘ मी का लिहितो ‘ हे त्यांचे वैचारिक लेखन इंग्रजीत आहे. ‘मंद्र’ कादंबरीसाठी त्यांना सरस्वती सन्मान प्राप्त झाला होता. पद्मश्री, पद्मभूषण हे सन्मानही त्यांना लाभले. म्हैसूर विद्यापीठाने मानद डीलीट पदवी त्यांना बहाल केली होती. मात्र ज्ञानपीठाचा सन्मान त्यांना मिळाला नाही याची रुखरुख आहे. ‘मी भैरप्पा ‘ हे त्यांचे भाषांतरित पुस्तक डॉ. बा.आं.म. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लावण्यात आले होते. त्यांच्या जीवनातील चढ उतार चित्रित करणारे आणि कन्नड संस्कृतीचा परिचय घडविणारे हे लेखन आहे. भैरप्पा हे भारतीय पातळीवर ओळखले जाणारे महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांच्या निधनाने कुणाही मराठी रसिकाचे मन हळहळल्याशिवाय राहणार नाही.

————————————————————————————-

डॉ. विद्यासागर पाटंगणकर यांनी वाहिलेली श्रद्धांजली.

—————————————————————————————-

श्री निलेश चव्हाण यांनी वाहिलेली श्रद्धांजली .

——————————————————————————————–

छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथालयात एस. एल. भैरप्पा यांची उपलब्ध असलेली काही पुस्तके

एस.एल. भैरप्पा यांची पुस्तके या चमुमुळे चटकन उपलब्ध झाली.
आपली कर्मनिष्ठा अशीच राहो.

थेट पुस्तकांच्या मलपृष्ठावरून –

. माझं नाव भैरप्पा

एस. एल. भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्त्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्रः

जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच अगदी हितशत्रूचीसुद्धा – आवर्जून दखल वैगर त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य -चढउतार, यशापयश, सुखदुःख… सार काही वाचकांसमोर मांडून ठेवण्पारं

आत्मचरित्रांच्या दालनाची समृद्धी वाढवणार एक पारदर्शी पुस्तक.


२. सार्थ

‘सार्थ’ म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा. ज्या काळात या अथनि ‘सार्थ’ हा शब्द भारतात प्रचलित होता त्या सातव्या आठव्या शतकात ही कादंबरी आपल्याला नेते. ‘तारावती’ या नगरातला नागभट्ट हा मंडनमिश्रांच्या गुरुकुलात वेदाध्ययन केलेला, समवयस्क अमरूक नावाच्या राजाच्या विश्वासातला, नुकतीच पंचविशी ओलांडलेला. राजा अमरूक नागभट्टावर काही कामगिरी सोपवून त्याला एका ‘सार्था’ बरोबर देशांतराला पाठवतो अन् तिथूनच विविधरंगी अनुभवचक्रात नागभट्ट गोवला जातो.

मध्ययुगातील अनेक सत्य अन् कल्पित घटनांद्वारे या कादंबरीचा पट -घट्ट होत जातो. कुमारिलभट्ट, मंडनमिश्र, त्यांची पत्नी भारतीदेवी, शंकराचार्य इ. व्यक्तींच्या किंवा नालंदा विद्यापीठ, पूर्वेचे सूर्यमंदिर इ. स्थलांच्या कथा येथे गुंफून घेतलेल्या आहेत. या निरनिराळ्या ऐतिहासिक कथा या कादंबरीचा प्रवाह सखोल करीत राहतात व कथानकाचा भावकल्लोळ तीव्रच करतात. यातूनच कादंबरीचा वाचक मध्ययुगीन जीवनशैलीच्या अ‌द्भुत, विस्तीर्ण अनुभवसागरात थेट खेचला जातो. भारतीय कीर्तीचे सिद्धहस्त कन्नड लेखक डॉ. भैरप्पा यांच्या इतर कादंब-या प्रमाणेच ‘सार्थ’ ही कादंबरीही वाचकांना एका अजस्त्र ‘महाकाय अनुभवाला सामोरे जाण्यास भाग पाडते.


३. जा ओलांडूनी

एखाद्या जातीला चातुर्वर्ण्यत बसवणं राजाच्या अधिकारात होतं. त्यासाठी आवश्यक असलेला शास्त्राचा आधार ब्राह्मण देणार! धन, सोनं, गायी देऊन ब्राह्मणाला तृप्त करून कुणीही शास्त्राला आपल्या मर्जीप्रमाणे आकार देऊ शकत होता …. बाहुबलानं जो राज्यकारभार पाहात होता तोच क्षत्रिय झाला ! … जे मंत्र शिकले ते राजाच्या अनुग्रहानं ब्राह्मण-मुद्रा स्वीकारून ब्राह्मण झाले. जर सगळेच मूळ ब्राह्मण असते तर त्यामध्ये जेवढे वेगवेगळे पंथ-उपपंथ का आले असतें ? प्रत्येक समूहानं कसल्यातरी ब्राह्मण्याचाच मुकुट मिरवला. चोरून वेदविद्या शिकून घेणाऱ्या मारम्माच्या नवऱ्यानंही हाच प्रयत्न केला होता. ब्राह्मण होण्याचा प्रयत्न !

हा सगळा इतिहास काय सांगतोय ? ब्राह्मण व्हायची इच्छा ! कुठल्या मार्गानं का होईना ब्राह्मण म्हणवून घेण्याचा प्रयत्न ! ज्यांनी हे ब्राह्मण्य धिःक्कारलं त्यांनीही स्वतःचा एक समूह तयार करून स्वतःला श्रेष्ठ मानून तेच ब्राह्मण्य वेगळ्या रूपानं आपलंसं केलं… किती अदम्य आकर्षण ! किती प्रचंड शक्ती ही! ही ब्रह्तत्वाची शक्ती कसली म्हणायची ?

सनातन प्रश्नांचा डॉ भैरप्पांनी घेतलेला हा वेध. साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या ‘दादु’चा मराठी अनुवाद.


४. परिशोध

मरणाचा अर्थ समजेपर्यंत जीवन समजत नाही. केवळ जन्मणं त्यासाठी पुरेसं नाही. मरून जन्माला आलं पाहिजे. त्यानंतरच जीवनाचा खरा अर्थ समजतो. तीन वेळा मरायचा प्रयल केला, तरी विशिष्ट प्रकारचाच अनुभव आला. शुद्ध गेल्यासारखं – डोक्यात पाणी भरल्यासारखं – श्वास कोंडून जीव गुदमरत असतानाही पाण्याबाहेर यायला जमू नये, तसं. चढायला धडपडत असताना कुणी तरी पुन्हा गर्तेत लोटून द्यावं, तसं. भोवताली काळपट हिरवेपणा भरून राहावा … खोल बुडत जावं …

खरंय् हे. मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. मला असा अनुभव कधीच आला नाही. आत्महत्या करावी. इतकं उत्कट दुःखही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे काय ? ठाऊक आहे, असं म्हणता येईल काय? माझं चिंतन कशा प्रकारे चालतं? साहित्य वाचणं ते ‘क्लासिक’ आहे, याची काळजी घेत ! पुस्तकं विकत घेणं, संध्याकाळच्या थंड सुखद हवेत फिरून येणं … उत्तम कॉफीचे घुटके घेत साहित्यातील पात्रांवर आणि प्रसंगांवर चिंतन करणं, प्रत्यक्ष आयुष्यात शक्यतो कुणालाही न दुखवता जगत राहणं!

जीवन म्हणजे एवढंच ? अंहं

एक जीवघेणा संघर्ष … चिरंतन परिशोध …


ज्ञान आमच्यापर्यंत वेगाने पोहोचवणाऱ्या तंत्रज्ञानाचे आम्ही आभारी आहोत. या पृष्ठासाठी संपूर्ण तंत्रसाहाय्य श्री. आशय जोशी यांचे लाभले . मी व्यक्तिश: त्यांची आभारी आहे. – वृंदा आशय

यावर आपले मत नोंदवा