विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

सातवी माळ

|| श्री कुलस्वामिनी मर्दडी माता की जय ||

सन्मान स्त्रीत्वाचा – पुरुषांच्या दायित्वाचा

नामस्मरण

घ्यावे तुझ्या नामजपा
अवचित होते कृपा |
तुझे नाम रे सुलभ
दूर करते मळभ ||१||

जेव्हा जेव्हा मन माझे
खोल गर्तेत जाते |
भोवतीच्या अंधाराने
पुरते गांगरते…||२||

तेव्हा तेव्हा तू येतो
होऊन माझा दिवा |
असा कसा गवसतो
तुला नित मार्ग नवा ||३||

तुझ्या अस्तित्वाची ज्योत
माझ्या जीवनाचा पोत |
असेच राहू दे रे देवा
नाते प्रेमाचे ओतप्रोत ||४||

वृंदा आशय


नवरात्रिस्तवनाञ्जलिः।

आश्विन शु.७।। शके १९४७

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

सप्तमी :

रौद्री काली मृडानीति कालरात्रिरिति स्तुता।
सहस्रारस्थिता देवी या महासिद्धिकुञ्जिका।।
: सहस्रार चक्रात विराजमान असलेली, रौद्र रूपधारिणी, महाकाली, मृडानी (पार्वती) अशा विविध नावांनी जिचे स्तवन केले जाते, अशी भगवती कुंजिका देवी महासिद्धींची स्वामिनी आहे.
Dwelling in the Sahasrara Chakra, the fierce Goddess is praised as Kali, Mridani, and Kalaratri. She is the divine Kunjika, the mistress of supreme siddhis.

घनान्धकारवर्णा सा विद्युन्मालाधरा वरा।
तैलाभ्यङ्गा च लम्बोष्ठी खरवाहनसंस्थिता।।
: घनगर्द अंधःकारासमान कांती असलेली, विजेच्या शलाकांची माळ धारण केलेली, अंगाला तेल लावलेली, दीर्घ ओठ असलेली ही देवी गर्दभावर आरूढ झालेली आहे. अमंगल चिन्हे धारण करूनही ती परम मंगल व पावन आहे.
Her complexion is like dense darkness, She wears a garland of lightning, anointed with oil, with long lips. Though bearing fierce marks, She is supremely auspicious and rides the donkey.

रक्तपात्रधरा घोरा रक्ताक्षा रक्तवाससा।
कृष्णा रुधिरपा दुर्गा भयदाऽप्यभयप्रदा।।
: हातात रक्ताने भरलेलं पात्र, रक्ताळलेले डोळे, रक्तरंजित वस्त्र, रक्त प्राशन करणारी अशी भगवती दुर्गा काली भयप्रद रूपात आविर्भूत होत असली तरी सत्शील भक्तांना ती अभय देणारी आहे.
Holding a vessel of blood, with red eyes, clad in blood-stained garments, and drinking blood, the fierce Durga Kali terrifies yet bestows fearlessness upon Her true devotees.

सत्यप्यघोररूपा सा पुण्यरूपा शुभंकरा।
ग्रहबाधाप्रशमनी सर्वदुष्टभयङ्करी।।
: तिचं हे रूप अघोर व भयप्रद असलं तरी ती मूळात पुण्यस्वरूपिणी शुभंकर आहे. ग्रहपीडा, व्याधी यांचं निरसन करणारी ती केवळ दुष्टवृत्तीच्या लोकांसाठीच भयंकर रूप धारण करते.
Though seemingly terrifying, She is truly auspicious and holy. She removes afflictions caused by planets and diseases, becoming dreadful only to the wicked.

जलाग्निरिपुरुग्भीतिहारिणी भवतारिणी।
सद्भक्तास्तत्प्रसादेन भवन्ति स्थिरचेतसः।।
: जल, अग्नी, शत्रू आणि रोग अशा विविध भयांचे हरण करणारी, भवसागरातून तारून नेणारी अशी ही भगवती आहे. तिचे सद्भक्त तिच्या कृपेने स्थिरचित्त होऊन इहपरलोकात उत्तम गती प्राप्त करतात.
She dispels the fears of water, fire, enemies, and diseases. As the savior across the ocean of existence, Her devotees attain steadiness of mind and noble progress here and beyond.

साधकाः यत्प्रसादाद्वै धनज्ञानसमन्विताः।
शक्तिमन्तः भवन्तीति व्यासोक्तिः सत्यमण्डिता।।
: निर्मल मनाचे साधक जिच्या प्रसादाने धनधान्य व ज्ञानाने संपन्न होतात, शक्तिमान होतात. वेदव्यासांनी सांगितलेले हे वचन सत्य आहे.
By Her grace, seekers with pure hearts gain wealth, knowledge, and strength. This statement of Sage Vyasa is indeed the truth.

भूतप्रेतपिशाचाद्या अपसर्पन्ति दूरतः।
मङ्गला पावनी ख्याता सिद्धानां परमा गतिः।।
: भूत, प्रेत, पिशाच आणि दुष्ट शक्ती तिच्या स्मरणाने दूर जातात. अशी मंगलरूपा, पुण्यमयी देवी सिद्ध सत्पुरुषांचे ध्येय आणि गती प्राप्त करून देणारी आहे.
Ghosts, spirits, and evil beings flee far away at Her remembrance. Known as auspicious and pure, She grants the supreme goal to saints and perfected souls.

मुनयः साधकाः सिद्धाः देवाः दैत्याश्च पन्नगाः।
यस्याः शरणमृच्छन्ति कालरात्र्यै नमो नमः।।
: सर्व ऋषी, मुनी, सिद्ध, साधक, देवता, दैत्य, सर्पादि जीव जिला शरण जातात, त्या भगवती कालरात्रीला पुनःपुन्हा साष्टांग नमस्कार असो.
Sages, seekers, perfected ones, gods, demons, and serpents all seek refuge in Her. Salutations again and again to Goddess Kalaratri.


देवळातील अंधारः७
शारदीय नवरात्र चिंतनः
आश्विन शु ७, रविवार दि २८ सप्टेंबर २०२५
© प्रतिभा मिस्त्री

सरस्वती पूजनः एक भव्य संस्कृती चिन्ह

येथे हे पूजन चिन्ह म्हणजे सरस्वती मूर्ती अथवा तिचे जे वर्णन रुढार्थाने देवीच्या प्रसिद्ध सरस्वती वंदनेत आहेः याकुन्देतुषारहारधवला…. ते नाही. ते सर्वपरिचित आहे.त्यामुळे मी तेच पुन्हा सांगणे टाळते आहे. पण त्या प्रतिमेच्या इतिहासापूर्वीही आपण जी विद्या साधना केली आहे त्याबद्दल मी येथे लिहिणार आहेः वेदपूर्व, वेदकालीन व वेदोत्तर अशा सर्व काळांमधे ही विद्यासाधना भारतीय स्त्रियांनी केली आहे. देवी सरस्वती ही विद्या व कला यांचे प्रतीक आहे. कारण विद्या व कला हा कोणत्याही संस्कृतीचा गाभा असतो. संस्कृतीच्या चैतन्य शक्तीचा हा साठा संस्कृतीच्या या गाभ्यात असतो.”कोणत्याही राष्ट्रीय संस्कृतीचे अधिष्ठान असलेली शक्ती व विश्वसंस्कृतीचे अधिष्ठान असलेली शक्ती ही एकच असते. वस्तुतः विश्वसंस्कृतीचे बीजच राष्ट्रीय संस्कृतीच्या रूपाने प्रकट होत असते”, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या पुस्तकात म्हणतात.

पुढे ते म्हणतात, “समाजाकडून व्यक्तीला मिळणारे वळण व शिक्षण, त्याचप्रमाणे विविध आचारविचारांचे नियमन आणि आर्थिक जीवन याच्यायोगे संस्कृतीला आकार येतो. संस्कृती मुख्यतः भाषिक असते, वांशिक नसते. प्राचीन ग्रंथ ऋग्वेद याची रचना संस्कृत भाषेवर संस्कार झाल्यानंतरच्या काळातील आहे. तीपूर्वी येथे उच्च अशी द्रावीड संस्कृती होती. आर्यांची संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान हे द्रावीड संस्कृती पेक्षा उच्च होते, ही कल्पना आता सिंधू संस्कृतीच्या अवशेषांवरून व अभ्यास निष्कर्षांवरून मागे पडली आहे”. शास्त्रीजींच्या मते प्राचीन भारतीय समाजातील स्त्रिया व खालचे वर्ग सुध्दा मानसिक संस्कृतीचे प्रवर्तक आहेत. शूद्र हा विभाग ऋग्वेदाच्या उत्तर भागात येतो, त्यांच्यापर्यंत वैदिक संस्कृती पोचलेली होती, असे निषादस्थपतींच्या (गवंड्यांच्या) व रथकारांच्या यज्ञसंस्थेवरून सिध्द होते, असे तर्कतीर्थ मानतात.

वेदकाळात स्त्रियांना उपनयनाचा व त्यानंतर गुरुगृही राहून अध्ययनाचा अधिकार होता. त्यांच्यात ब्रह्मवादिनी व सद्योद्वाहा असे आविष्कार होते. ब्रह्मवादिनी ह्या उपाध्याया व आचार्या होत्या. ब्रह्मचर्य पाळून त्या अध्ययन व अध्यापन करत. अशी स्वतंत्र व सुबुद्ध ब्रह्मवादिनी आचार्या राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानली जाई व त्यांचे त्या काळात सन्मान्यता पावलेले आश्रम होते. दुसऱ्या प्रकारच्या स्त्रिया सद्योद्वाहा या १६ वर्षे गुरुगृही अध्ययन करून आपल्या मनाने पसंत वराशी विवाह करून गृहस्थाश्रमात पडत. हा काळ साधारण पणे इ स ३००-४०० पर्यंत होता. पुढे स्मृतिकाळात(इ स ४००- १०००) सुरुवात बरी होती, तरी अखेरीस स्त्रीचे स्थान घसरत गेले. उदा. मंडनमिश्रांची पत्नी ‘भारती’ ही शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यातील वैदिक तत्त्वचर्चेमधे न्यायाधीश होती. याच काळात अनेक कर्तबगार राजस्त्रियाही होत्या. त्यांनी पतीनिधनानंतरही उत्तम प्रशासन केले आहे, त्या सुविद्यही होत्या असे पुरावे आढळतात. ऋग्वेदातील स्त्रियांमधे सूक्तकार ब्रह्मवादिनी आहेत. ऋग्वेदात सव्वीस सूक्तांच्या प्रणेत्या स्त्रिया आहेत. त्यातील अठरा स्त्रियांची नावे प्रसिद्ध आहेतः (अजूनही काही नावे ही संवाद सूत्रे व नाट्यसंवादात आहेत.) अपाला, घोषा, सूर्या, शची, गोधा,अदिती, विश्वधारा, आत्रेपी, वाक्, श्रध्दा, वैवस्वती, यमी, इत्यादी.

यमी आपल्या प्रिय बंधूला त्याच्या मृत्यूनंतर सागत आहे, ” ..सत्याला ज्यांनी सोडले नाही, सत्याची ज्यांनी वाढ केली, त्या तपस्वी पितरांमधे तू जा. जे कवी व ज्ञानी सहस्र मार्ग शोधतात आणि सूर्याचे रक्षण करतात त्यांच्यात आणि तपात निर्माण झालेल्या तपस्वीऋषींत जा” (१०/१५४). येथे शास्त्रीजी म्हणतातः तपस्वी, शूर, सत्यनिष्ठ व ज्ञानी यांची मृत्यूनंतर प्राप्त होणारी उच्च स्थिती या सूक्तात कल्पिली आहे. भारतीय धार्मिक वाङ्मयात मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या स्थितीचे सर्वांत प्राचीन वर्णन हेच आहे व ते वर्णन करणारी एक स्त्री आहे. बंधुवियोगाने शोकाकुल झालेल्या स्त्रीने मृत्यूनंतर प्राप्त होणारी शुभ गती आपल्या प्रतिभेने धीरपणे प्रथम शोधून काढली असेच म्हटले पाहिजे, ही शास्त्रीजींची प्रतिक्रिया आहे.

प्राचीन भारतीयांच्या दैनंदिन व खाजगी जीवनात स्त्रियांचा दर्जा ध्यानात भरावा इतका सुधारलेला होता.स्त्रियांचा बौध्दिक विकास ही त्या काळाच्या सर्वांगीण सुधारणेची निशाणी आहे.या सर्व मजकुराचा आधार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा “वैदिक संस्कृतीचा इतिहास” हा ग्रंथ आहे.शास्त्रीजी पुढे म्हणतात, “ज्ञान हे उच्चतम अंतिम मूल्य आहे. ज्ञानाचा संबंध सर्व मानवी व्यवहारांशी अत्यंत निगडित असतो. जीवनविषयक प्रयत्नांचे जितके प्रकार तितक्या विद्या व कला असतात. म्हणून ज्ञानास सर्वांगीण स्वरूप प्राप्त होण्यास समाजातील सर्व प्रकारच्या घटकांची भागीदारी असावी लागते. सर्व प्रयत्नांचे साफल्य ज्ञानावर अवलंबून असते. ज्ञान हे मुख्य साधन व अंतिम साध्य आहे”.

सरस्वती पूजन हे या ज्ञानपूजेचे प्रतीक रूप आहे. विद्यार्जनास सुरुवात करताना आपण तिची प्रार्थना
करून म्हणतोः
विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु में सदा॥

या विद्येचा प्रसार आज खूप झाला आहे पण तिचे खरे मूल्य, खरा अर्थ आपणास समजला आहे काय? आपले आजचे स्त्री जीवन ज्या या प्राचीन विद्यावेत्ती आचार्या आहेत त्यांच्या पासून किती दूर गेले आहे! कबूल आहे की, मध्ययुगीन आणि नंतर मुस्लिम कालखंडांमधे आपण स्त्रिया अंधाराच्या गर्तेत लोटल्या गेलो.……पण याच घनदाट रूढींंरूपी अंधाराना आपण आजही कवटाळून बसायचे कारण नाही. त्यांना आपले स्त्रीत्व मानायचे कारणच नाही. ते सर्व अज्ञान आहे. ज्ञानाची वाट स्वयंभू व स्वयंप्रकाशी असते, ती आपली मानव्याची ओळख आहे. ती सरस्वती देवता या ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून ही ज्ञानदेवता पत्नी, पुत्री व माता या कोणत्याही संकेतांमधे बध्द नाही केली गेली, अगदी वेद पूर्व काळातही. माता सरस्वतीचे पूजन करताना आपणा सर्वांना आपले अंतरंगातील अंधार दूर करणारे हे आत्मप्रकाश लाभोत, ही मनःपूर्वक प्रार्थना. म्हणून ही रांगोळी सरस्वती प्रतीके वापरून.काढली आहे. ग्रंथ, लेखणी व वीणा यांच्या प्रतीकांनी श्रीचिन्ह सरस्वती प्रतीकावर रेखाटले आहे.मला ही सर्व प्रतीके प्रिय आहेत, वंदनीय आहेत.

————————————————————————

Navratri Rituals

Jagruti Dharmadhikari

🌑 Navratri Day 7 – Kalaratri: Resilience in Crisis 🌑

Maa Kalaratri teaches us that even in the darkest night, wisdom lights the way.

For school leaders, this is a reminder that true leadership is tested in times of crisis. Whether it’s financial stress, regulatory hurdles, or student challenges, resilience is not about avoiding storms—it’s about guiding the community through them with balance, wisdom, and courage.

💡 A resilient leader doesn’t just react; they respond with vision. They turn obstacles into opportunities, and fear into collective strength.

✨ On this day, let us honor the spirit of Kalaratri by embracing challenges with calm resolve, ensuring our schools remain sanctuaries of trust, learning, and hope—even in the toughest of times.

——————————————————————————–

ॲड. गीता देशपांडे

शालेय जीवनापासून सरस्वती भुवन शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी.

स.भु. कला व वाणिज्य महाविद्‌यालयात असताना, वक्तृत्व-
वाद‌विवाद, काव्यवाचन, कथाकथन, निबंध अशा विविध स्पर्धांमधून भरघोस पारितोषिके प्राप्त.

माणिकचंद पहाडे महाविद्‌यालयातून १९८८ साली LLB पूर्ण. त्यानंतर लगेचच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसायास सुरुवात केली.

२०१० पासून उच्च न्यायालयाच्या Mediation पॅनलवर, समुपदेशन करतात.

विविध महाविद्यालय व संस्थांच्या कायद्यांशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून कार्यरत.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून 30 वर्षे नैमित्तिक वृत्तनिवेदिका म्हणून बातम्या देण्याचे काम केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून कथा, कविता अभिवाचनात सहभाग घेतला.


नवरात्रीचा आजचा ७ वा दिवस.
नवरात्रीच्या सातव्या दिवसाची देवी, माँ कालरात्री आहे. ही देवी दुर्गाच्या नऊ रूपांपैकी सातवे उग्र स्वरूप मानले जाते. जी अंधार आणि अज्ञान नष्ट करते आणि वाईट शक्तींचा नाश करते. या देवीला झेंडूच्या फुलांची माळ वाहतात. आज गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.

आजचा रंग आहे केशरी. 
      केशरी रंग उबदारपणा, चैतन्य, उत्साह, सकारात्मकता आणि सर्जनशीलता दर्शवतो. केशरी रंग उत्साह, धैर्य आणि प्रेरणेचे प्रतिक आहे.
 इतिहासामध्ये केसरी रंगाननं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा केसरी रंग शौर्याचं, आणि वीरतेचं प्रतिक आहे. पण  वीरता ही फक्त पुरुषांशी संबंधित नाही तर, अनेक विरांगंनाशीही संबंधित आहे.
   श्रीरामांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांनी भगवा झेंडा अभिमानाने मिरवला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याला स्मरून,  समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांना सहभागी करून घेऊन  स्वराज्य निर्माण केलं.  नाना साहेब पेशव्यांनी  शौर्य दाखवून  भगवा झेंडा अटकेपार नेऊन  फडकावला.
आपल्या तिरंग्या मध्ये सुद्धा हा केशरी रंग असून, आपल्या लढ्याचं प्रतिक दर्शवतो. हा लढा फक्त ब्रिटीश सैन्यापुरता मर्यादित नाही. तर हा गुलामी आणि वाईट प्रवृत्ती विरोधात दिलेला लढा आहे.  या आपल्या शहीद जवानांचं शौर्य या केशरी रंगातून प्रकट होतं.
 केशरी रंग सूर्याचा रंग आहे. अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा हा रंग.   
   लाल आणि पिवळ्या रंगाच्या संयोगानं बनणारा हा रंग  शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे. अतिशय पवित्र समजला जातो हा रंग.
हा जसा पराक्रमाचा रंग आहे, तसाच तो त्यागाचाही रंग आहे. 
   स्वामी विवेकानंदांच्या पेहराव्याचा हा रंग! नि:संगाचा चा त्याग करून अध्यत्माच्या ओढीने जेव्हा साधू घर दार सोडून जातात, तेव्हा ते भगवं वस्त्र परिधान करतात.
 शौर्य, धैर्य, वीरता, त्याग, तिरंगा किंवा भगवा झेंडा बघून स्फुरण चढतं, हे सगळं ठीक आहे. पण सामान्यांच्या आयुष्यात काय जागा आहे बरं केशरी रंगाची?
 संत्र्यानंतर अगदी लहानपाणी सगळ्यात आधी आपली  केशरी रंगाशी ओळख होते ती,  संत्र्यांच्या गोळ्यांमुळे.  पूर्वीच्या काळी शाळेच्या बाहेर बरण्यांमधल्या संत्र्यांच्या गोळ्या  सगळ्या लहान मुलांना खुणवायच्या. त्या गोळ्यांचा रंगच इतका चटकदार असे, की लहान मुलं अगदी आकर्षितच व्हायचे त्याच्याकडे.
  त्यानंतर आपली ओळख झाली केशरी रंगाशी ती पदार्थांची चव वाढवणाऱ्या, रंग  खुलवणाऱ्या, सुगंध वाढवणाऱ्या केशरामुळे. प्रत्येक सणावाराला केलेल्या पदार्थांमध्ये केशर युक्त श्रीखंड, जिलबी, इम्रती, केशरी भात या पदार्थांनी फारच बाजी मारली आहे. 
 अश्विनी पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरीला केशरयुक्त दुधाचे प्यालेच्या प्याले रचवले जातात. पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब पडावं, म्हणून कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवून, त्यात केशर, विलायची,  चारोळी घालून ते दूध गच्चीमध्ये ठेवलं जातं. असं कोजागिरी पौर्णिमेचं दूध न आवडणारी व्यक्ती विरळाच असेल.
 कशापासून बनवतात बरं हा केशर?
    केशर शेती ही 'क्रोकस सॅटिव्हस' या फुलाच्या कोरड्या कलंकांपासून केली जाते.जो जगातील सर्वात महागडा मसाला आहे. काश्मीरमध्ये मुख्यत्वे केली जाणारी ही शेती, आता महाराष्ट्रातही सुरू झाली आहे. आणि त्यासाठी कमी जागेत, नियंत्रित वातावरणात किंवा घरातील रॅकवरही लागवड करता येते. या शेतीत सुरुवातीला योग्य कंद (कॉर्म्स) लावणं, योग्य तापमान राखणं, आणि वेळेवर कापणी करणं महत्त्वाचं असतं . केशराला 'लाल सोनं ' म्हणूनही ओळखलं जातं. कारण, ते खूप महाग असतं.  

हे स्त्रीकेसर हाताने काळजीपूर्वक फुलांमधून वेगळे काढले जातात. वाळवले जातात. या वाळलेल्या स्त्रीकेसरांनाच आपण ‘केशर’ म्हणतो. या प्रक्रियेत फुलाचा सुगंध, रंग आणि चव देणारे स्त्रीकेसर वापरले जातात, ज्यामुळे ते एक मौल्यवान मसाला आणि रंग म्हणून वापरले जाते. केशराच्या झाडाला गवतासारखी पाने असतात. फुले एकेकटी आणि पानांसारखी भासणारी असतात. केशराच्या फुलांचा रंग जांभळा असतो. भारतात केशराचे शाही केशर, मोग्रा केशर आणि लांचा केशर असे तीन प्रकार आहेत. शाही केशर उच्च प्रतिचे असते, तर लांचा केशर हे हलक्या प्रतिचे असते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यासही केशर उपयुक्त आहे.
मन मोहवून घेणारा केशरी रंग आपल्याला कुठे दिसतो? तर प्राजक्ताच्या देठामध्ये. किती ते नाजुक फुल, आणि किती तो सुंदर देठ. हलव्यातले केशरी दाणे सुद्धा पांढऱ्या आणि हिरव्या रंगसंगतीत उठून दिसतात.
आणखीन केशरी रंगाशी आपली ओळख होते, ती होळीत खेळल्या जाणाऱ्या रंगांमध्ये. पूर्वी हा फक्त नैसर्गिक रंग खेळला जायचा. आणि हा केशरी रंग मिळवला जायचा पळस, पांगारा, आणि पिचकारी या फुलांमधून शिशिर ऋतूत पानगळ होते. आणि सगळीकडे झाडांची पानं वाळून खाली पडतात. झाडं निष्पर्ण होतात. आपण कुठे प्रवासाला निघालो असलो की, सगळीकडे ती निष्पर्णता पाहून मन उदास होतं. पण अशा निष्पर्ण झाडांना पळस, पांगारा, पिचकारी यांची फुले मात्र भरभरून येतात. सगळीकडे जणु अग्नी फुलं लागली की काय, असं वाटायला लागतं.

पळसाचं झाड हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून ते जंगलाची ज्वाला, किंवा ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ म्हणून ओळखलं जातं. याची पानं, फुलं, साल आणि बिया यांचा आयुर्वेदात उपयोग होतो.तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही याचं महत्त्व आहे. पत्रावळींसाठी याच्या पानांचा वापर होतो. पत्रावळ हा शब्द आता इतिहास जमा झाल्यासारखा आहे. पत्रावळ, पर्यावरणयुक्त आणि निसर्गात एकरूप होणारी गोष्ट. पळसाच्या बिया, पाने, फुले आणि सालीमध्ये जंतनाशक, अँटी-इन्फ्लेमेटरी (दाहक-विरोधी), वेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आढळतात. पोटातील जंत काढण्यासाठी पळसाचा वापर होतो.पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो.पळसाला पवित्र वृक्ष मानलं जातं. तीन तीन पानांची मिळून एकेक फांदी होते.
हिंदू धर्मात पानांच्या तीन दलांना त्रिमूर्तीचं रूप मानलं जातं. (विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेव).
पळसाची फुले सरस्वती आणि कालीमातेच्या पूजेसाठी वापरली जातात. या झाडाचा वापर वनसंवर्धनातही होतो. कारण, यामुळे जमिनीची धूप थांबते आणि इतर झाडे वाढण्यास मदत होते.
फुले बहरल्यावर हे झाड निष्पर्ण होतं, ज्यामुळे लालबुंद फुलांचे घुमारे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

   आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही या केशरी रंगानेच होते.  सूर्योदय, आणि सूर्यास्त दोन्ही वेळेस आकाश केशरी रंगाने माखलेलं असतं. सूर्याची आभा दोन्ही वेळेस इतकी मोहक दिसते की, कवी, चित्रकार त्या रंगात हरवून जातात.
  म्हूणनच शांताबाई एका कवितेत म्हणतात,
'मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले,

जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले,
जखम जिवाची हलके हलके भरून यावी,
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले.
घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणिक मजला घेरित आले.’

ॲड. गीता देशपांडे

——————————————————————————

यावर आपले मत नोंदवा