
(पूज्य गोविंदभाई श्रॉफ यांना आदरांजली)
भाई, तुम्ही असताना कधी नव्हतो आम्ही
एवढे खिन्न आणि उदास,
विषण्णता आणि नैराश्य
फिरकलेही नव्हते कधी मनाच्या आसपास.
तुम्ही प्रकाशाचे यात्री होता
अंधारात चाचपडणाऱ्यालाही
दिशा दाखवून मार्गावर आणलंत तुम्ही,
ठेचा खात आवर्तात गरगरणाऱ्यालाही
आधार आणि बळ दिलंत तुम्ही.
परकीय आणि निझामी जोखडातून
मुक्त होण्यासाठी तुम्ही लढे उभारले,
विकासाचे तंत्र लोकांना शिकविण्यासाठी
अखंड आणि अविरत श्रमलात.
थकलेल्या गात्रातही तुमच्या
ऊर्जेचा आणि प्रेरणेचा प्रचंड स्त्रोत होता,
तुमच्यासमवेत चालताना
आपणही शक्तिमान असल्याचा प्रत्यय
जनसामान्यांस येत होता.
आता कोण करील आमचे सांत्वन
आणि सावरेल आम्हास पाय थरथरताना !
भाई, तुमचेच शब्द येतील आमच्या ओठी
अन्यायाविरुद्ध झगडताना.
{‘अनिवार’ या काव्यसंग्रहातून }
कवी – जीवन देसाई
(माजी प्राचार्य, सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय)
यावर आपले मत नोंदवा