
विकास ध्यासमूर्ती : पद्मविभूषण (कै.) गोविंदभाई श्रॉफ
श्री. चंद्रकांत न्यायाधीश
(‘पाऊल खुणा’ या पुस्तकातून)
(२१ नोव्हेंबर हा पद्मविभूषण (कै.) गोविंदभाई श्रॉफ यांचा स्मृतिदिन.त्यांच्या चिंतनशील नेतृत्वाने निरंतर शाश्वत विकासाचे दिलेले प्रारूप नित्यच मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. तळागाळातून विश्वव्यापक (Local to Global) विकासाची प्रतिमा या प्रारूपात अनायास पाहायला मिळते. यातूनच त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळत राहील.)
पद्मविभूषण कै. गोविंदभाई श्रॉफ ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामा’चे एक अग्रणी सेनानी, मराठवाड्याच्या विकासासाठी अव्याहत निरंतर तळमळीचे व्यक्तिमत्त्व, शिक्षणातून समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारे चिंतनशील शिक्षण महर्षी, चिकित्सक अभ्यासू वृत्तीचे आणि दूरदृष्टी असणारे राजकारणपटू आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकशाही जीवन पद्धतीचे आग्रही समाजकारणी अशा अनेकविध विधायक आणि रचनात्मक पैलूंचे दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते.
जीवनाच्या अंतिम दशकात शासनाच्या आवाहनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविल्या गेलेल्या साक्षरता अभियानाच्या कार्यात औरंगाबाद जिल्ह्याचे मानद अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशातील आशय लक्षात घेऊन संपूर्ण साक्षरता अभियानात त्यांनी सर्वार्थाने समर्पित भावनेने झोकून दिले होते. त्याकाळात त्यांच्या कार्यात सर्वोच्च प्राधान्य केवळ साक्षरता अभियान कार्यास होते.
साक्षरता म्हणजे केवळ सही करणे किंवा लिहिता-वाचता येणे एवढ्या मर्यादित अर्थाने नव्हे तर मानवी समाजाच्या विकासाचा महत्त्वपूर्ण पाया म्हणून त्यांनी साक्षरतेचे महत्त्व समाजास पटवून देण्याचा प्रयत्न केला.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिगत विकासातून व्यक्तिमत्त्व घडवायचे आणि समाज परिवर्तनाच्या दिशा निश्चित करायच्या यासाठी लोकसहभागाचा मार्ग मा.भाईंनी प्रशस्त केला. लोकसहभागासाठी स्थानिक पातळीवर लोकसंघटनांची स्थापना केली. ग्रामीण भागात ग्राम पातळीवर तसेच शहरातून मोहल्ला किंवा वॉर्ड पातळीवर युवक-महिला मंडळांची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून विधायक आणि रचनात्मक विकास कार्यास चालना दिली. तळागाळातील समाजाच्या विकासासाठी सर्वंकष आणि सर्वव्यापक अशा जनजागृतीचा मार्ग या अभियानातून प्रशस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यासाठी लोकसंघटन महत्त्वाचे आणि आवश्यक होते.
साक्षरोत्तर कार्यक्रम आणि निरंतर शिक्षण प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यास्तव मा. भाईंच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पातळीवर तसेच शहरातील मोहल्ला /वॉर्ड पातळीवर युवक/महिला एकता मंडळाची रीतसर नोंदणी करण्यात आली.
अभियानाच्या निधीमधून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात मंडळाच्या घटनेसह ही नोंदणी करण्यात आलेली आहे. या मंडळाच्या घटनेमध्ये ‘मंडळाचे ध्येय आणि उद्देश’ सर्व मंडळासाठी समान आहे. प्रत्येक मंडळाचे स्वतःचे असे विशेष नाव असले तरी त्यासोबत ‘एकता विकास’ युवक महिला मंडळ असेच संबोधले जावे असे निश्चित केले होते. एकतेशिवाय विकास शक्य नाही हा संकेत यात अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे या मंडळांमध्ये युवक आणि महिलांचे निर्धारित प्रमाण असणे बंधनकारक होते. स्थानिक पातळीपासून विश्वात्मक विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होणे सहज आणि सुलभ व्हावे म्हणून या मंडळांचे कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. ‘साधारणपणे पाचशे नवसाक्षर असलेला गाव/वस्ती/मोहल्ला किंवा त्याचा भाग परिसरातील शेजारच्या क्षेत्रातील अशा स्वयंसेवी मंडळ/संघटना यांच्याशी सौहार्द आणि सहकार्याच्या संबंधातून परस्परांच्या क्षेत्रात विधायक आणि रचनात्मक कार्य-सहयोग घडून येत असल्यास अशा सामूहिक उपक्रमासाठी कार्यक्षेत्राच्या मर्यादेची आडकाठी असणार नाही.’ Local to Global विकास प्रक्रियेसाठी चिंतनशील अशी सौहार्दता आणि सहकार्याच्या संकल्पनेतील कार्यक्षेत्राची व्यापकता. ‘मंडळाचे ध्येय आणि उद्देश’ यामध्ये निरंतर अशी विकासाची कार्यप्रणाली पुढीलप्रमाणे नमूद केली आहे.
मंडळाचे ध्येय आणि उद्देश
१. साक्षरोत्तर कार्यक्रमांतर्गत
अ) मंडळाच्या कार्यक्षेत्र परिसरातील ६ ते १४ वयोगटातील सर्व मुला-मुलींची शाळेमध्ये नोंदणी झालेली आहे हे पाहणे. यास्तव सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि शाळेतील या वयोगटातील मुला-मुलींची गळती मुळीच होणार नाही यासाठी कटाक्षाने प्रयत्न करणे.
ब) साक्षरता अभियानात नोंदणी न झालेल्या निरक्षरांचा शोध घेऊन त्यांची साक्षरता केंद्रात नोंदणी करून ही केंद्रे स्वयंसेवी वृत्तीने चालविणे.
क) साक्षरता अभियानातील नवसाक्षरांची वाचनात गोडी निर्माण करून त्यांची साक्षरता वाढविणे आणि कायम टिकविणे. साक्षरोत्तर कार्यक्रमात प्रस्तावित वाचन-लेखन आणि गणितातील अपेक्षित पातळी नवसाक्षरांनी आत्मसात केली आहे हे पाहणे व त्यासाठी प्रयत्न करणे.
ड) साक्षरोत्तर कार्यक्रमात साक्षरतेची उर्वरित कामे पूर्ण करणे.
२) महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज्य, महिला धोरण आणि सर्वांसाठी शिक्षण या योजना लोकांपर्यंत यथायोग्य पोचविणे आणि त्याचा लाभ जनतेस पूर्णतः मिळावा यास्तव कटाक्षाने प्रयत्न करणे. यास्तव सतत जाणीव जागृतीचे कार्य करणे.
३) महिला स्वावलंबी होण्यासाठी अनेकविध, लघु-कुटीर गृहउद्योग प्रशिक्षण, उत्पादन आणि वाणिज्यविषयक कार्यक्रम राबविणे.
४) मंडळाच्या कार्यक्षेत्रातील गावात, परिसरात कोणत्याही प्रकारचे अंतर्गत किंवा बाह्य परिस्थितीमुळे ‘एकोप्यास’ आणि सहभागितेस धक्का पोचणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. यातूनच व्यापक एकात्मता साधून एकात्मिक विकास प्रक्रिया नित्य निरंतर गतिमान करण्यावर भर दिला जाईल.
५) नागरिक या नात्याने मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्वांना नागरिक म्हणून त्यांचे हक आणि कर्तव्य समजावून देणे आणि प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी दक्षतेने पार पाडावी यासाठी प्रेरित करून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे.
६) लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने नियमानुसार मतदार म्हणून नाव नोंदवून प्रत्येकास निर्भयपणे मतदान करण्यास प्रवृत्त करणे.
७) मंडळाच्या कार्यक्षेत्रातील परिसर, गाव याची समग्र माहिती प्रत्येकास देऊन त्यांच्या विकासासाठी सामूहिक कार्याचे महत्त्व पटवून देणे. कार्यक्षेत्रातील गाव, वस्ती, मोहल्ल्यातील कुटुंब सर्वेक्षण करून लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम प्राथमिकतेने हाती घेणे. विकास प्रक्रियेतील लोकसंख्या नियोजन हा केंद्रबिंदू मानून योजना बनविणे.
८) शासकीय विविध विकास आणि इतर योजनांची माहिती व लाभ कार्यक्षेत्रातील लोकांना मिळवून देणे.
९) व्यक्ती, कुटुंब, गाव/परिसर यापासून तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि जगाच्या पातळीपर्यंत विकासात्मक घडामोडींचे सम्यक ज्ञान सर्वांना व्हावे यासाठी विविध कार्यक्रम राबवून त्यात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणे. या सहभागातून स्वातंत्र्य, ऐक्य, बंधुभाव, समानता आणि सहकार्याची भावना वाढवून लोकशाही मूल्यांबरोबरच मानवी मूल्यांची जोपासना करण्याचे प्रयत्न करणे.
१०) महिला आणि बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी औपचारिक आणि अनौपचारिक स्वरूपाचे उपयुक्त आणि पूरक ठरणारे शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि इतर विधायक कार्यक्रम तात्कालिक आणि / किंवा कायमस्वरूपी हाती घेऊन शासन आणि लोकांच्या सहकार्याने राबविणे.
११) मंडळाच्या क्षेत्रातील तसेच एकूण शक्यतो समाजासाठी सांस्कृतिक क्रीडाविषयक कार्यक्रम, स्पर्धा इ. आयोजित करणे.
१२) मंडळाच्या क्षेत्रातील गाव आणि एकूण परिसराचा विकास आराखडा तयार करून शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, व्यसनमुक्ती, स्त्री सुरक्षा इ. समाज विधायक आणि रचनात्मक कार्यक्रमाचे निरंतर नियोजन / संयोजन करून परिसर सर्वांगीण विकास प्रक्रियेस सतत गतिमान ठेवणे.
१३) वरील सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना पोषक आणि पूरक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
१४) मंडळाच्या कार्यक्षेत्रातील गाव तसेच तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान व्यक्तीच्या विशेष स्मरण दिनाचे औचित्यपूर्ण कार्य-प्रेरक कार्यक्रम आयोजनात केवळ प्रतिकात्मकतेऐवजी त्यांच्या जीवन कार्याचा शक्यतो अंगीकार आणि आचरणात स्वीकार करण्यात यावा.
१५) प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजनात-नियोजनात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि ते टिकविण्याचा प्रत्येक क्षणी प्रयत्न करण्यात येईल.
१६) मंडळाच्या कार्यातील पुढाकाराने गावातील / परिसरातील / वस्तीमधील प्राथमिक शाळा / शाळा एक सांस्कृतिक केंद्र बनेल.
१७) विज्ञाननिष्ठा, अध्ययनशील उद्योगप्रधान लोकशाहीनिष्ठा जोपासणारी एकात्मिक समाजनिर्मिती.
१८) मंडळाच्या ध्येय आणि उद्देशपूर्तीसाठी अंगणवाडी, बालवाडी, सर्वांसाठी वाचनालय, शाळा, प्रशिक्षण संस्था, आरोग्य केंद्र, व्यायाम शाळा इ. आणि इतर शैक्षणिक संस्थांची निर्मिती तसेच प्रशिक्षण केंद्राची स्थापना आणि संचालन कार्य हे मंडळ आवश्यकतेनुसार करील आणि त्यासाठी शासकीय सहाय्य, अनुदान इ. तसेच इतर सेवाभावी संस्था, संघटनांकडून आर्थिक आणि इतर सहकार्य मिळवील.
या मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता आणि कार्यकौशल्य साध्य करून ही मंडळे सांस्कृतिक केंद्रे बनावीत असे भाईंचे स्वप्न होते. निरंतर शिक्षणाचा टप्पा कार्यान्वित होतांना मा. भाईंचे नेतृत्व लाभले नाही हे मोठे दुर्दैव! शिक्षण संस्था सांस्कृतिक केंद्र बनवीत हे मा. भाईचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…
(या लेखाचे लेखक – श्री. चंद्रकांत न्यायाधीश, माजी प्राध्यापक व विभागप्रमुख हिंदी विभाग, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय)
यावर आपले मत नोंदवा