विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

मास्तर

मास्तर

आम्ही सगळेजण सहज गप्पा मारत बसलो होतो. एवढ्यात आमच्यातले एक प्राध्यापक म्हणाले मला, “मास्तर असण्याचा अभिमान आहे.” खूप छान पद्धतीने आणि खरोखर अभिमानपूर्वक हे वाक्य त्यांनी उच्चारलं होतं. स्वाभाविकच तो उच्चार माझ्या मनामध्ये एक खोल घर करून गेला आणि ‘मास्तर’ या संकल्पनेचा विचार मनामध्ये सुरू झाला.

मला वाटतं ‘मास्तर’ ही संकल्पना शिक्षणाक्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना औपचारिक पद्धतीने शिकवणाऱ्या व्यक्तीसाठी वापरली जाते. या संकल्पनेचे मूळ स्थान ‘गुरु’ या संकल्पनेत आहे. ‘गुरु’, ‘गुरुकुल’ ते आताची ‘कुलगुरू’ अशा प्रकारची शिक्षण क्षेत्रातली परंपरा जर आपण पाहिली तर अगदी स्वाभाविकपणाने खूप सारे बदल आपल्याला या परंपरेत दिसून येतात. काही बदल काळाच्या अनुषंगाने आहेत, काही बदल भौतिक सुबत्तेमुळे आलेले आहेत, काही बदल व्यक्तीने किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपला ‘स्वधर्म’ सोडल्यामुळे आहेत, असो.

‘मास्तर’ हा शब्द मला स्वतःला आजही आवडतो. वास्तविक पाहता आजकालच्या युगात कोणताही प्राध्यापक स्वतःला ‘शिक्षक’ म्हणून घेण्यात देखील कमीपणा मानतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण शाळेत शिकवतो तो शिक्षक आणि महाविद्यालयात शिकवतो, विद्यापीठात शिकवतो तो प्राध्यापक; ही आमची धारणा आहे. अडचण अशी आहे मूळ शिकवणं बाजूला पडतं आणि या शब्दांनी जी प्रतिष्ठा निर्माण केलेली आहे, कदाचित जे आर्थिक स्थैर्य दिलेलं आहे त्यातून ही प्रतिष्ठा निर्माण झाली असावी त्या प्रतिष्ठेच्या वलयाभोवती आम्ही फिरत राहतो.

गुरुजी, मास्तर हे शब्द मला आजही खूप जिव्हाळ्याचे वाटतात. त्यातल्या त्यात ‘गुरुजी’ हा प्रेमळपणाचा तर ‘मास्तर’ हा शब्द मला कडकपणाचा निदर्शक वाटतो. खरं म्हणजे त्या पाठीमागे फार काही तर्कशुद्ध उत्तर माझ्याकडे आहे, अशातला भाग नाही. पण असतात काही काही संकल्पना आपल्या मनाशी आपण बांधलेल्या, त्यापैकीच कदाचित ही एक असावी.

‘मास्तर’ या संकल्पनेचा, या शब्दाचा विचार करताना माझ्या डोळ्यांसमोर या एकाच शब्दातून अनेक शब्द तरळून जातात.

मास्तर, मा स्तर, मातर – मात्र , मातेर,

संस्कृत – मा (नको), स्तर

अशा काहीशा विविध अर्थांनी हे शब्द माझ्या मनामध्ये प्रकटतात.

आता अगदी पहिला जो मा – स्तर आहे, यामध्ये हिंदीचा प्रभाव मला जाणवतो. आपण आईला हिंदी भाषेत ‘माॅं’ असं म्हणतो. मास्तराने विद्यार्थ्यांना शिकवताना ‘माॅंं स्तरावर अर्थात आईच्या स्तरावर जाणं अपेक्षित असतं. आई मुलांना जशी घडवते तसंच मास्तराने, गुरुजींनी, शिक्षकाने घडवावं हे अपेक्षित आहे. गुरु – शिष्य परंपरेपासून शिक्षक – विद्यार्थी परंपरेपर्यंत सुदैवानं आपल्याला याचा प्रत्यय येत राहतो. आई जशी प्रेमळ असते तशी वेळप्रसंगी कडकही होते. ‘श्यामची आई’ हे त्यासाठी फार उत्तम उदाहरण आहे. खरंतर तो मराठी मनावरचा एक संस्कार आहे, साने गुरुजी यांनी केलेला. तसं मास्तराने वेळप्रसंगी ‘आत मा’ आणि ‘बाहेर बाप’ होण्याची देखील आवश्यकता असते. कदाचित म्हणूनही मास्तर मला कडक वाटत असावा.

‘मां’ हा शब्द हिंदी भाषेमध्ये ‘आई’ हा अर्थ व्यक्त करतो. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भाषेत किंवा जुन्या काळी आईला ‘मां’ म्हणून संबोधलं देखील जात होतं. संस्कृत भाषेमध्ये ‘मा’ या एका वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा अर्थ ‘नको’ असा होतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अशा प्रकारच्या उदाहरणातून तो सर्वपरिचित आहेच.

विद्यार्थ्यांना घडवत असताना बऱ्याच वेळेला शिक्षकाला नकारात्मक भूमिका पार पाडावी लागते. या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांची आठवण होते. कारण शिक्षण हे ‘नकारात्मक’ कार्य करते, असा एका ठिकाणी त्यांनी विचार व्यक्त केलेला आहे. इथला ‘नकारात्मक’ हा शब्द आपण आज ज्या पद्धतीने किंवा अर्थाने वापरतो तसा अभिप्रेत नाही. तर एक उदाहरण देऊन ते हे स्पष्ट करतात, बागेमध्ये एखादे रोप वाढवताना आपण त्याच्या आजूबाजूचं तण काढून टाकतो, ते रोप सुरक्षित राहील अशा पद्धतीची व्यवस्था, खत, पाणी, जागा याच्या आधारे करतो.

आपण नको असलेलं दूर करतो, काढून टाकतो आणि मग हवं असलेलं जे काही आहे ते शोधत या झाडाची मुळे खोलवर, दूरवर जातात. त्यांना जमिनीतून, हवेतून जे काही वाढीसाठी आवश्यक आहे ते सगळं घेत राहतात; म्हणजेच झाड आपलं आपलं वाढतं. त्याच्यामध्ये क्षमता असेल तरच वाढतं. त्याचं बीजच जर निकस असेल तर वरून तुम्ही कितीही आणि काहीही दिलं तरी ते वाढत नाही. आणि कस त्याच्यामध्ये असेल तर परिस्थिती प्रतिकूल असेल तरी देखील ते वाढतंच, ही वस्तुस्थिती आहे.

मला वाटतं विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मास्तराची भूमिका हीच आहे प्रत्येक स्तरावर ‘काय नको’ हे त्याने आवर्जून सांगितलं पाहिजे. हे नकोच असं सांगितलं की जे घेतलेलं चालेल त्यातलं निवडायला विद्यार्थी मोकळा होतो. फक्त ‘काय नको’ हे सांगताना ‘वस्तुनिष्ठ’ विचार करण्याची सवय लावली पाहिजे. ही सवय जर ‘व्यक्तिनिष्ठ’ पद्धतीने विचार करायची असेल तर आवडी – निवडीशी संबंधित होते; आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार केला तर ती संबंधित बाबींच्या ‘हित-अहित’, त्यासाठी ‘योग्य-अयोग्य’ याच्याशी संबंधित होते.

अजून एक ‘मातर’ हा जो शब्द आहे या संस्कृत शब्दाचा विचार केला तर हे ‘मातृ’ म्हणजेच ‘आई’ या शब्दाचे एक रूप आहे. तर मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या ‘मातर’ या शब्दाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये हा शब्द बोली भाषेत ‘मात्र’ या प्रमाण शब्दाच्या अर्थाने वापरताना दिसून येतो.

‘मातर’च्या मागोमाग माझी विचारांची गाडी ‘मातेरं’पर्यंत पोहोचली. एखादी गोष्ट आपण नासवली तर त्याने त्याचं ‘मातेरं’ केलं; अशा अर्थाने हा शब्द ग्रामीण भागात वापरताना दिसून येतो. शिक्षणाच्या अनुषंगाने एवढंच म्हणावंस वाटतं, ” मास्तराला ‘माॅं’ स्तरावर नाही जाता आलं तरी चालेल, मात्र त्यानं शिक्षणाचं आणि विद्यार्थ्यांचं ‘मातेरं’ करू नये, एवढीच कळकळीची विनंती.

वृंदा आशय


यावर आपले मत नोंदवा