विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

वारसा भाईंचा : मला लाभलेला

सूर्या, तुझी ऊर्जा
व्यापते सारी सृष्टी
होऊदे उदार व्यापक
तशी आमची कार्यदृष्टी!

शिशुविहार शाळेपासून माझ्या औपचारिक शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. इयत्ता तिसरीमध्ये माझे वडील श्री विजयराव देशपांडे यांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत माझा प्रवेश निश्चित केला. त्यानंतर थेट कला शाखेची पदवी घेऊनच १९९९ साली मी या शिक्षण संस्थेच्या बाहेर पडले. त्यानंतर २००६ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून मराठी विभागात रुजू झाले. आजतागायत माझ्या आवडत्या क्षेत्रात, आवडत्या ठिकाणी शिकवण्याचा आनंद मी उपभोगत आहे. गुरुकृपेने करिअरची आवड आणि निवड एकच ठरवली. त्यामुळे पॅशन की करिअर असे द्वंद्व माझ्या बाबतीत कधीच निर्माण झाले नाही.

आजही मला स्पष्टपणे आठवते तिसरीच्या वर्गात पहिल्याच दिवशी, “ती हुशार आहे” असं म्हणून जोशीबाईंनी माझं केलेलं स्वागत. प्रवेश परीक्षेमध्ये ११ चा पाढा लिहायला सांगितल्यानंतर मी जोशीबाईंना विचारूनच ११ × ८ = किती? हे नोंदवलेलं होतं, हे मला आजही आठवतं. त्यामुळे माझ्या त्या वेळेच्या दृष्टीने, आपल्याला एक उत्तर नीट आलं नाही तरीसुद्धा बाईंनी मला हुशार म्हणणं, हे मला बाईंचंच मोठेपण वाटलं होतं. माझे वडील जसे नेहमी सकारात्मक बोलायचे तशाच मला या बाई भासल्या. कदाचित त्या प्रसंगाने ‘हुशार होणं’ ही आपली जबाबदारी आहे, अशी काहीशी जाणीव माझ्या मनात पेरली असावी. त्या क्षणांची मी कृतज्ञ आहे.

सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये कला शाखेत प्रवेश घेतल्यानंतर अकरावीपासूनच आशय अंकाच्या संपादनाच्या निमित्ताने प्रा. डॉ. साधना शाह मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत गेले. अंक नेहमीच साकार प्रेसमध्ये छापण्यासाठी जात होता. श्री. रामकृष्ण जोशी काकांची कडक शिस्त हळूहळू परिचित होत गेली. मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावरही त्या शिस्तीने मला चांगलाच बडगा दाखवला. मात्र त्याच शिस्तीमुळे मी संपादकाचा कोणताही औपचारिक वर्ग न करता अचूक संपादनासाठी तयार झाले. माझे शिक्षक नसतानाही त्यांनी शिकवलेलं हे संपादन, दिलेला हा संस्कार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

कै. रामकृष्ण जोशी व त्यांच्या पत्नी कै. अनुराधा जोशी

वाचन – लेखन – संपादन हे संस्कार पक्के झाले ते केवळ आणि केवळ ऋषितुल्य गोविंदभाई श्रॉफ यांच्या संस्थेत प्रवेश घेतल्यामुळे ही माझी प्रामाणिक धारणा आहे.

वाचनाने मला काय दिलं?

वाचनाने मला दिली ताकद स्वप्न पाहण्याची आणि साकार करण्याची.माझ्या स्वप्नांना पंख नसतात.त्यांना असतात पाय. जे जमिनीवर रोवले जातात ठामपणाने ! तर्कशुद्धपणे ते झेपावतात आकाशात. ते असतात आत्मप्रेरित आणि होतात स्वयंप्रकाशी !

जो स्वयंप्रकाशी तो विराजे आकाशी
सहस्त्रकररश्मी त्याला नित्यसाक्षी !

भाईजी,

त्या सूर्याला एक प्रार्थना –

सूर्या, तुझी ऊर्जा
व्यापते सारी सृष्टी
होऊदे उदार व्यापक
तशी आमची कार्यदृष्टी!

वृंदा आशय


( भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अनेक स्वातंत्र्यसैनिकांची मुलाखत घेण्याची संधी दिल्याबद्दल मी आजही डॉ. साधना शाह मॅडमची त्या वेळेइतकीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त कृतज्ञ आहे. – वृंदा आशय )

भाईजींसोबत गप्पा मारण्याचा आनंद माझ्यासाठी तरी काही निराळाच असतो. त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं पहिल्यांदाच त्यांच्याशी जवळून गप्पा मारण्याचा योग आला. पण मनात एक प्रकारची धाकधुक देखील होती. एवढ्या मोठ्या भाईजींशी आपण कसा संवाद साधायचा ?

या प्रश्नाचं उत्तर मला सापडायच्या आतच ८७वर्षांचे भाई ताडताड चालत आले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली, अगदी सहजतेनं आणि तन्मयतेनं. आणि पाहता पाहता आम्ही त्यांच्या विद्यार्थीदशेत पोहचलो.

भाईजर्जीच्या आजूबाजूला नेहमीच चळवळीचं वातावरण होतं. गांधी-नेहरूंचे प्रयत्न, सावरकरांसारख्या युवा नेत्यानं तरुणांना दिलेली चेतावणी, महिलांचा सक्रीय सहभाग, मार्क्स कम्युनिस्ट या विचारांचा प्रभाव – या साऱ्या गोष्टी वाचून पाहून तसं तसं मन संस्कारीत होत गेलं. परंतु कोणाचंही अनुकरण त्यांनी केलं नाही. आपल्या बुद्धीला जे पटेल तेच ते करत, स्वतःचे निर्णय स्वतः घेत आणि हे सगळं करताना कुटुंबातल्या लोकांनीही त्यांना सांभाळून घेतलं.

विद्यार्थीदशेत गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमातून जागृतीची कामं केली. शाळेत गणेशोत्सवासाठी परवानगी न मिळाल्याने शाळा सोडली. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहाच्यावेळी कॉलेज सोडले. पुढे ते कलकत्त्याला गेले. तेव्हा बंगालच्या वातावरणात त्यांना खूप काही शिकायला मिळालं. पुढे औरंगाबादला येऊन M.SC., LL.B. पूर्ण केलं. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये मार्क्सवादी विचारांचा अभ्यास करून मित्रांबरोबर विविध विषयावर चर्चा करत. घरोघर जाऊन खादी विकत.

स्वातंत्र्याच्या संकल्पनेबद्दल बोलताना भाईजी म्हणाले, आम्हाला स्वातंत्र्य आणायचं होतं म्हणजे निजाम राजा काढून तिथं हिदूला बसवायचं होतं असं नाही तर लोकांना जबाबदार पद्धतीचं राज्य मिळावं अशी एक सर्वसाधारण इच्छा होती. सर्व लोक समतेनं, बंधुभावानं राहतील, गरीबांचं कल्याण होईल असा विचार होता. पण पुढे या लोकशाहीतून नेमक काय होईल, किंवा कोणत्या पद्धतीनं ती जायला हवी याबद्दल आम्ही फार विचार केलेला नव्हता, आणि आम्ही नेमके इथेच चुकलो. अजून खूप कार्य करायला हवं हे कळलं तेव्हा थोडा उशीरच झाला होता.

सबंध मराठवाड्याचं नेतृत्व करणाऱ्या या नेत्यानं इतक्या प्रांजळपणानं आम्हाला काय घडलं ते सांगितलं आणि आम्ही नतमस्तक झालो. कारण झालेल्या चुकांचं समर्थन कसं करावं हेच इतर लोक करीत असल्यांचं आम्ही आजवर पाहात होतो.

स्वातंत्र्य मिळालं, घटना आली आणि त्याचबरोबर जाती-धर्माचे रंग घेऊन अनेक प्रश्नही पुढे आले. समाजाची मानसिकता किंचितही बदललेली नव्हती त्यामुळे लोकशाहीची वाकडी तिकडी वाढ झाली. ती भ्रष्ट झाली. कारण संकुचिततेतून बाहेर येण्यासाठी कोणी तयार नव्हते. या लोकशाहीचं शुद्धीकरण आता झालं पाहिजे.

स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षांचा विचार करायचा म्हटलं तर आपली मानसिकता थोडी बदलली आहे पण ती फारच अपुरी आहे. खऱ्या अर्थानं आजही आम्ही लोकशाहीचे नागरिक झालेलो नाहीत. ‘राजा-प्रजा’ नात्यातली प्रजाच आपण राहिलोत तेव्हा आपले हक, कर्तव्य याबद्दल आपण जागरूक झालं पाहिजे. आपल्या देशाची आर्थिक प्रगती बऱ्यापैकी झाली. पण इतर देशांची गती आपण पकडू शकलो नाहीत. आपणच निवडून दिलेले लोक आर्थिक घोटाळे आज करत आहेत. त्याची जबाबदारी बऱ्याच अंशी आपल्यावर येते. आजही ३०% लोक दारिद्रय रेषेखाली आहेत. ५०% लोक निरक्षर आहेत. त्यांची जबाबदारी केवळ शासनावर नाही. खरं तर ती आपल्यावर आहे.

आज तरुणांनी निरीक्षण करून आपल्या जबाबदाऱ्या ओळखाव्यात, पार पाडाव्यात, आपली मानसिकता बदलावी, आपल्या जीवनाचा काही काळ समृद्धीचा काही हिस्सा समाजाला व देशाला द्यावा. पण त्यात उपकाराची भावना असू नये. जे काम आपण करतो त्याचे आपल्याबरोबरच इतरांवर, देशावर परिणाम होतात हे लक्षात घ्या आणि प्रत्येक काम भक्तीभावानं करा. तुमचं काम तुम्ही सचोटीनं प्रामाणिकपणानं करणं ही एक देशसेवाच आहे हे समजून घ्या. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करणे म्हणजे देशसेवाच.

भाईजी म्हणाले गांधीजींनी ‘Young India’ मधून सांगितलेलं आहे. “एखादं काम तुमच्या समाजाच्या हिताचे आहे ते काम बिनशर्त सुरुवात करा व त्या कामासाठी चार मित्र तर मिळवण्याचा प्रयत्न करा.”

तरुणांनी लोकशाही, मानवता, भ्रातृभाव यांना मजबूत करणारी संघशक्ती उभारावी. एकमेकां समजून घ्यावं. कारण तुम्ही इतरांचा किती विचार करता यावरच लोकशाही स्वातंत्र्य अवलंबून असते आणि त्याशिवाय देश एकसंघ होऊ शकणार नाही.

भाईजी शेवटी एवढेच म्हणाले, “तरुणांनी लक्षात घ्यावं की पूर्वीच्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा आजचा लढा जास्त संघर्षमय आहे, कारण तो परकीयांबरोचर होता आणि आजचा लढा जुन्या व नव्या मानसिकतेचा आहे.”

भाईजी बोलायचे थांबले पण तत्पूर्वी नव्या मानसिकतेचं एक चिमुकलं बीज मनात पेरूनच

कु. कल्पना खंडागळे आणि कु. वृंदा देशपांडे

(विद्यार्थिनी, बी. ए. द्वितीय वर्ष, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय )


गुरुपोर्णिमेचे चांदणे – पूर्वप्रसिद्धी – २३ जुलै २०२१ https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2021/07/blog-post.html : वारसा भाईंचा : मला लाभलेला

अधिक वाचा: वारसा भाईंचा : मला लाभलेला अधिक वाचा: वारसा भाईंचा : मला लाभलेला

यावर आपले मत नोंदवा