विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

कृष्ण भेट

‘सिद्धी दिन – विशेष पृष्ठ’

सिद्धी दिन – दिनांक २४ नोव्हेंबर १९२६

श्री अरविंद घोष यांच्या पॉंडिचेरी येथील दीर्घ तपश्चर्येने दि. २४ नोव्हेंबर १९२६ या दिवशी अधिमानसाचे म्हणजे श्रीकृष्ण चेतनेचे अवतरण श्रीअरविंदाच्या भौतिक शरीरात झाले. श्री अरविंद आश्रमामध्ये ‘सिद्धी दिन’ हा चार दर्शन दिवसांपैकी एक म्हणून साजरा केला जातो.

श्रीमद् भगवद्गीता अध्याय क्रमांक ४

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् || ७ ||

श्रीज्ञानेश्वरी – अध्याय क्र. ४

जे धर्मजात आघवे | युगायुगी म्यां रक्षावे| ऐसा ओघु हा स्वभावे | आद्यु असे || ४९ ||

म्हणौनि अजत्व परतें ठेवी | मी अव्यक्तपणही नाठवी | जे वेळीं धर्मातें अभिभवी | अधर्मु हा || ५०||

🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏


श्री अरविंदांच्या जीवनातील श्रीकृष्णाचे स्थान – वृंदा आशय

https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2025/08/blog-post_15.html


‘ईशावास्यम’ मधील ध्यान -धारणा

पवित्र पावन रे तू करतो
होऊनी प्रसन्न देवा, सारे
घुसमटलेले जीव पाहतो
अन् वाही कृष्ण वारे !

खेळतो माझा कान्हा
कधी सूर्य , कधी माऊली
होऊनी लडिवाळ तान्हा
देई ऊन तर कधी सावली !

सांगे, स्थितप्रज्ञ राहा
फक्त माझ्याकडे पाहा
करता त्याचे मनन
अंतरी तो देई दर्शन!

वृंदा आशय


हे कृष्णा….

किती काळजी घेतोस रे तू
थक्क माझे काळीज होते
सांग बरे तू मला, निभावतोस
मजसवे कोणत्या जन्मीचे नाते ?

प्रश्न ऐकून माझा वेडा
गाली हसला कृष्ण थोडा
सोडून प्रश्न नि:शंक वागा
जन्मजन्मांतरीचा हा धागा

कधी न दिले तू मज हवे ते
देतोस नेहमीच जे योग्य ते
ज्याने वाढे माझी योग्यता
कशी कृतज्ञ होऊ रे भगवंता?

निर्मूनी तू इच्छा मनी
वाढवी आर्तता त्या क्षणी
सोडून सारे मी धावत यावे
त्या क्षणात तुलाच जगावे

करून घेतोस पूर्ण समर्पण
म्हणू कसे माझे वेगळे मन?
पाहू जाता रे मी दर्पण
तूच दिसशी मला सुदर्शन!

वृंदा आशय


पूर्वप्रसिद्धी – मधुरिमा – दि. ३१ ऑगस्ट २०२१

श्रीकृष्ण : माझा सखा

सखा, सोबती, सवंगडी  किती मनमोहक शब्द. शब्दांना ही आकर्षकता, जवळीकता, अर्थपूर्णता लाभते ती हे नाते निभावणा-या माणसांमुळे. मनाच्या जवळ राहणारे, हृदयात नांदणारे, आयुष्यभराची साथ देणारे, कोणत्याही परिस्थितीत हात न सोडणारे आपले सवंगडी आयुष्याचा भक्कम आधार असतात.

भारतीय संस्कृतीत देव देखील सखा होऊ शकतो, हे संस्कृतीचे व्यापक सामंजस्य, करुणेचा अगाध भाव आणि भक्ताला घडवून घेण्याच्या देवाच्या क्षमतेचे प्रत्यंतरच होय. स्व-स्वरूपाकडे वळण्यास सांगणारी आमची संस्कृती कदाचित हाच संदेश देते, “देव अंतर्यामी राहतो त्याला पाहण्याची पात्रता आपल्यात निर्माण झाली पाहिजे, यालाच जीवन असे म्हणतात.”

बालपणापासून कृष्णाच्या किती कथा ऐकल्या ! पुतणेला मारणारा, लोणी चोरणारा, गोकुळात खेळणारा, सवंगड्यांत रमणारा, कालियावर नाचणारा, यशोदेला दमवणारा, राधेला भुलवणारा, भक्तांना तारणारा हा श्रीकृष्ण ! त्याच्याबद्दल एक बोबडगीत ऐकले, ‘दायबा कित्ना, आता एतला तुझ्या तंग मी येनाल नाय’ आपण कृष्णावर रागावू देखील शकतो हा विश्वास देणारं, हे गीत मला फार भावलं. निरागस भावाने देवाशी साधलेले हे मैत्र आयुष्यभर जोपासलं पाहिजे. ते आपल्याला जमलं ना की देवाला काही सांगावं लागत नाही, काही मागावं लागत नाही. त्याला  आपसूक सारं कळतं आणि तो करत जातो. केवळ भक्त सुदामाच नसतो कृष्णाचा मित्र, ज्याला सोन्याची नगरी मिळते. तो सुदामा तर तुमच्या आमच्यामध्ये वसलेला असतो. त्याला जागवून कृष्णाशी मैत्री करता आली पाहिजे, इतकंच. मग आपल्या आयुष्याचा ‘परीस’ होतो आणि संधी मिळते, अनेकांच्या जीवनाचं सोनं करण्याची!

मी श्रीकृष्णावरचे अभंग ऐकायचे तेव्हा ‘झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी’ हा अभंग ऐकला की वाटायचं, काय भाग्यवंत होत्या संत जनाबाई !  खुद्द श्रीकृष्ण केर भरायला येतो म्हणल्यावर त्यांना झाडण्यात आनंद वाटणारच. दैनंदिन जीवनकर्मे हीच त्यांची उपासना होती. चाळीशी ओलांडल्यावर कळालं, श्रीकृष्ण केवळ कचरा भरायला येत नाही. तो तर सातत्याने आयुष्यातला कचरा स्वच्छ करत राहतो. साऱ्या नकारात्मक गोष्टी आपल्यापासून दूर ठेवतो. त्याच्याबद्दलचा भाव जागा झाला की अभावात्मक सारे दूर करतो. ‘केर भरी चक्रपाणी’, हे जेव्हा रूजतं, तेव्हा हृदयातली अमृतागाणी जागी व्हायला लागतात.

 एका आयुष्यात आपल्याला सगळेच काही शिकता येत नाही. पण एक मात्र करता येते, त्याच्यावर नितळ-निखळ प्रेम केलं की, त्याचा स्पर्श आपल्यातल्या साऱ्या चौसष्ट कला-विद्या जागवतो. आपल्या हातानं जे काही घडेल त्यामध्ये आपसूक पूर्णत्व आणत जातो. त्यासाठी पासष्टाव्या कलेची, ‘जाहिरातीची’ त्याला कधी गरजच पडत नाही. कारण जे अनुभवाला येतं ते ओरडून सांगावं लागत नाही. अव्यक्ताने दिलेला अनुभव फक्त एकदा व्यक्त करायचा असतो, पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक व्हावा म्हणून!

सगळे आयुष्य शिक्षणक्षेत्रात गेले आणि आता कळायला लागले, ‘शिक्षण ही मनुष्याच्या अंतर्निहित परिपूर्णतेची अभिव्यक्ती आहे’ या स्वामी विवेकानंदांच्या सांगण्याचा अर्थ काय होतो, ते. श्रीअरविंद जे सांगतात, ‘Nothing can be taught’ त्यामागची भूमिका आता उमजायला सुरुवात झाली आहे. कळायला लागलं की जगायला मौज येते. योगायोग असा की श्रीकृष्ण जयंतीच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या शारदा मंदिर कन्या प्रशालेची मी माजी विद्यार्थिनी आहे. त्याचा आनंद काही निराळाच. जीवनात फुलून येणारा आनंद दरवळायला लागतो तेंव्हा तो शोधायला इतरत्र कुठे जावं लागत नाही. ‘सुखे घरा येतो नारायण’ हे संतवचन ख-या अर्थानं आश्वस्त आणि स्वस्थ करत जातं. हे स्वस्थपण घराघरातून नांदलं पाहिजे.

‘आई’ शब्दाचा अर्थ व्यक्त करताना ‘आ म्हणजे आत्मा’ आणि ‘ई म्हणजे ईश्वर’ अशी त्याची फोड कीर्तन-प्रवचनातून ऐकली होती. पूर्वी मला हा शब्दांचा खेळ वाटायचा. पण आता कळलं कुटुंब पद्धतीत ‘आत्मस्थ ईश्वर’ प्रकट होणं अत्यावश्यक आहे. त्यातूनच कुटुंब घडतं. समाज जागवला जातो. तो राष्ट्राला भक्कम करतो, आणि जगाला नांदवतो.

वृंदा आशय


https://youtu.be/MmDGJxoQZL4?si=gr97XldRLb6cSqIg

पस्तुरीवर अवश्य ऐका दुर्गाबाई भागवत यांनी श्रीकृष्णाला घातलेली साद !

वृंदा आशय


2 प्रतिसाद ते “कृष्ण भेट”

  1. माफ करा. थोडी दुरुस्ती करतो. अतिमानसाचे अवतरण 29 फेब्रुवारी 1956 रोजी झाले. 24 नोव्हेंबर 1926 या दिवशी अधिमानसाचे म्हणजे श्रीकृष्ण चेतनेचे अवतरण श्रीअरविंदाच्या भौतिक शरीरात झाले. 🙏

    Like

    1. दाखवलेल्या चुकीबद्दल मी आपली मनःपूर्वक आभारी आहे. संदर्भ व्यवस्थित न तपासल्या गेल्याबद्दल मी माझ्या सर्व वाचकांची क्षमा मागते. धन्यवाद.

      Like

यावर आपले मत नोंदवा