विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

गीता जयंती विशेष

पृष्ठसंपादन व पृष्ठरचना – वृंदा आशय

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।


प्रवास देवकाव्याचा ! भाग १

(देवकाव्याच्या या काव्यप्रवासावर AI ने दिलेली खालील प्रतिक्रिया पाहून मलाही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संवेदनशीलतेचे कौतुक वाटले. AI चे मनापासून आभार मानते. – वृंदा आशय )व्यप्रवास देव-काव्यचा!

जीवनातल्या प्रत्येक अनुभवातून सुंदरता आणि प्रेरणा मिळवणारा हा प्रवास आहे. यामध्ये सृजनशीलतेचा कळस साधताना, आपल्याला नवे विचार आणि दृष्टिकोन मिळतात. प्रतिकूलता असली तरी काव्याच्या रूपाने स्पष्टता आणि आनंदाची अनुभूती होते, जी जीवनाला एक नवे वळण देते. काव्यप्रवास म्हणजे एक अद्भुत अनुभव, जो आपल्याला आत्मिक समृद्धीच्या दिशेने मार्गदर्शित करतो. – AI


कृपा

सरस्वतीची वीणा हाती

जोडून देते सारी नाती ।।

तिला प्रार्थिता, तिला आवाहिता

अक्षरशः ती देई हुंकार ।।

शब्दाशब्दातून मग प्रकटे

तिचाच हा झंकार ।।

दिव्य ती गीत गाते

अवघे जीवन संगीत होते ।।

वृंदा आशय


कृष्णरेषा

माझ्या नशिबासवे बोलती
साऱ्या कृष्णरेषा …..
तोच काढतो, तोच खोडतो
तोच लिहितो गमभन
क्षणार्धात होऊन जाते
माझेच बाई कृष्णमन !

वृंदा आशय


तो आलाय…

आलाय संरक्षणार्थ
दूर सारण्या स्वार्थ
साधण्या परमार्थ
तो जाणतो आर्त !

तो येताच…

पसरतो प्रकाश
खुलते आकाश
आंतरिक विकास !

तो भेटताच…
बहरते पावित्र्य
नांदते मांगल्य
लाभते कैवल्य !

वृंदा आशय


देव पूजिले, गुरु पूजिले, पूजिले सारे संत

कृपामयी तो असा जाहला मजवरी भगवंत

काही सांगे, काही मागे जे त्याला लागे

विविध रूपे नटूनी रे तो माझ्यासवे वागे

तोचि कर्ता आणि करविता

तोचि धर्ता आणि धरविता

हवे त्याला ते घेतो करुनी

मनी माझ्या ते बीज पेरुनी

हे भगवंता रे तू ताता

तृप्त केले मज तू आता

साधन म्हणूनी मज स्वीकारूनी!

वृंदा आशय


ती येते…

ती येते पाण्यात

डोलते वा-यात

पण…

फुलते ऊन्हात!

मग…

आपण का घाबरावं?

ऊन सहावं…

नि:संग फुलावं!

वृंदा आशय


मज खुणावतो
माझा कान्हा
शब्दांना मग
फुटतो पान्हा !

कधी हसावे
कधी रडावे
धडक कधी
गळ्यात पडावे!

उगा राहून
होतो साक्षी
सहज कर्मे
सतत रक्षी

रागावता मी
करतो मुग्ध
सतत भांडूनी
तिथेचि लुब्ध!

वृंदा आशय


कधी वाटते..

कधी वाटते
मी प्रगल्भ झाले
स्थितप्रज्ञतेकडे
वळती पावले !

कोणी वंदा कोणी निंदा
काहीही वाटत नाही
माझ्या वाटेवरती
मी चालतची राही !

कधी वाटते
मन खंबीर झाले
डोळ्यातले रडे
कोठल्या कोठे पळाले !

मग येते लक्षात
कृष्ण माझ्या पक्षात
घालूनी बांध तो उभा
तोच इतरांसवेचा दुवा !

तो तसूभर होता दूर
पालटतो माझा नूर
घेऊन वाहतो मला
आसवांचा महापूर!

वृंदा आशय


आजही कधी कधी
दुखावते पार्वती…
भांबावतो शंकर
जाईल का ती सती?

अवमानिली जाता माता
कृद्ध होतो बुद्धिदाता
म्हणे …..
कृष्ण रुपात प्रकटेल आता !

न चक्र घेता हाता
तो होईल शास्ता
वापरून कृष्णनीती
करेल दूर सारी अनीती !

आतातरी…
सुखावेल का पार्वती?

वृंदा आशय


प्रकृति-पौरूषेय

आशीष गुरुजनांचे फळले
शल्य माझे कृष्णास कळले

तो म्हणे, तू राहा गं निर्धास्त
होणारच दुष्प्रवृत्तीचा अस्त

हा खेळ पुरूष- प्रकृतीचा
संदेश माझ्या संस्कृतीचा !

तो इच्छितो ते ती करते
तो बीज टाकतो ती धरते

होऊनी धरा फळते-फुलते
ते चैतन्य येथ विलसते!

वृंदा आशय


जनमन

चढला फुलला वेल सायलीचा
लाभे त्याला आशीष माऊलीचा

लगडले माझ्या घराला रामचांदणे
की म्हणावे त्याला कृष्णनांदणे?

चांदणनांदण्यात सवे येतेच वनिता
कधी राधा-कृष्ण कधी राम-सीता

भारतीयांचे हे आराध्य दैवत
पाझरते जेथे सारे हृदगत

हे सार आपुल्या संस्कृतीचे
प्रतिबिंब उमटते जनमनाचे!

वृंदा आशय



संदेश वागेश्वरीचा !

वाणी असो अशी लाघवी
वठल्या झाडा फुटो पालवी

सामर्थ्य वाणीचे तू जाण
तो आहे गं रामबाण !

वाणीने स्थापावे ऋत
व्हावे अमृताचे दूत

वाणीने वदावे सत्य
त्यजावे सारे मर्त्य

मधुर असावी वाणी
गावी चैतन्याची गाणी

वाणी असो व्रतस्थ
होवो साऱ्यांची हृदयस्थ !

वृंदा आशय


यावर आपले मत नोंदवा