

दत्त – दर्शन
प्रा. डॉ. सीमा ढगे
हिंदू मंदिरे केवळ एक मूर्ती नसते..तिथली दगडातून चैतन्य घडवणारी सृजनशीलता भक्तीचे अनोखे रूप दर्शवते. फुलांची आरास, दिव्य मंत्र, धुपाच्या सुंगधात न्हाऊन निघणारे देवालय आणि त्यासोबत तेवणारे दीप मनातही एक विवेकदीप जागृत करत होते. दर्शन तर असतेच पण कला, ज्ञान आणि समरसता हे देखील ही ऊर्जास्थाने शिकवत असतात.
माझ्या अंतरी तू,
मग सहजच मिटते अंतर,
सावरणारे हात तुझे अन्
कृपेची सावली निरंतर!
अशा विचारात सुरू झाली आमची कुरवपूर, मंत्रालय आणि श्रीशैल्यंची यात्रा. पहिले दर्शन घेतले कुरवपुर इथले !

श्री क्षेत्र कुरवपूर हे कर्नाटकातील आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागात ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला त्या रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या बेटावर असलेले पाण्याने वेढलेले तीर्थक्षेत्र आहे. लोकवस्तीपासून थोड्या अंतरावर नदीच्या दुसऱ्या तीरावर असणारे स्वयंभू पीठ दत्तमंदिर ! भगवान दत्ताञेयांचा कलियुगातील प्रथम मनुष्य अवतार.श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांनी मनुष्यरुपात पिठापुरम येथे अवतार घेतला.पुढे सोळा वर्षापर्यंत पिठापुरम इथं वास्तव्य केलं, नंतर ते कुरवपूरला आले. ‘मानवी कल्याण’ ह्या एका विचाराने पुन्हा पुन्हा प्रकट होणारा प्रेमळ कनवाळू देव. केवळ मानवी उन्नतीसाठी त्यांनी 14 वर्षे कुरवपूर येथे वास्तव्य केलं. कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुका आहेत. इथे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तपश्चर्या केली. मग श्रीपाद श्रीवल्लभ येथील कृष्णा नदीत अदृश्य झाले. आजही ते गुप्त रूपात राहून कार्य करतात अशी श्रध्दा आहे. ज्याक्षणी नदीच्या किनारी आलो तिथून या श्रद्धेचा प्रत्यय येत गेला. मनात भेटीची ओढ अन् उत्साह ! कधी एकदा दुसऱ्या तीरावर पोहचू, असे झाले होते.
दर्शनासाठी जाताना नदीतून, गोलबुट्टीतून होणारा प्रवास फारच आनंददायी होता. ऐहिक प्रगतीचे काही वर्ष हरवून जावीत अन् कुठलीही कृत्रिमता नसणारे हे एक वेगळेच जग समोर असावे असे वाटले. केवळ नीरव शांतता, मधूनच मंदिराबाहेर असणाऱ्या पिंपळाच्या पानांची सळसळदेखील दत्तनाम जपतेय का असे वाटून गेले. मंदिरात आतल्या बाजूला गर्दीशिवाय, घाईशिवाय निवांत दर्शन म्हणजे पर्वणीच होती. थोड्यावेळ निःशब्द क्षण कितीतरी शब्दातीत अनुभव देऊन जातात ही जाणीव प्रगाढ करणारं गाभाऱ्यातील श्री दत्तमहाराजांचे दर्शन हीच दिव्यता मनात तेवत होती. बाहेर अंधार दाटून आला होता. खिडकीतून दिसणारे चांदणेसुद्धा ह्याच भक्तिमय दिव्य प्रकाशात न्हाऊन निघाले होते.
काही वेळात आम्ही श्री राघवेंद्रस्वामी मंदिरात पोहोचलो. भगवान विष्णूंचे भक्त श्री प्रल्हाद यांचा अवतार मानले जाणाऱ्या श्री राघवेंद्र स्वामी यांचे मंदिर. इसवीसन १५९५ मध्ये जन्माला आलेले श्री राघवेंद्र स्वामी हे संत आणि तत्त्वज्ञानी म्हणून ओळखले गेले . शास्त्र आणि भक्ती यांची सांगड म्हणजे त्यांची कारकीर्द.१६७१ साली त्यांनी जिवंत समाधी घेतली, पण पुढील ८०० वर्ष आत्मरुपात राहण्याचे वचन दिले.
मंदिराच्या परिसरात येणाऱ्या अनुभूती म्हणजे ह्या दिव्य ऊर्जेची साक्षच. समाधीसमोर कितीतरी वेळ थांबलो तरीही मन काही समाधानी नव्हते. मग सकाळी येऊन पुन्हा दर्शन घेतले. गर्दी तर होती पण तरीही दर्शन उत्तम झालं. मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूंनी चितारलेल्या पौराणिक कथा मंत्रमुग्ध करत होत्या. काही अनुभूती शब्दात मावत नाहीत.. तूटपुंजे शब्द ह्या स्थानांची महती सांगूच शकत नाहीत, हे मान्य करून पुढील प्रवास सुरू केला.
जंगलातल्या विलोभनीय रस्त्यांवर धावणाऱ्या चारचाकीत सुखद गारवा रेंगाळत होता. हाताशी वाचनासाठी पुस्तक होते..पण निसर्गाच्या विविध रूपात हरवून जाताना ‘सत्यम शिवम सुंदरम्’ हे जाणवत राहीले. पुस्तक हातात तसेच राहिले. हिरव्या रंगाच्या गर्द झाडात मी हरवून गेले. आजही हा रस्ता, हे अंतर, आजूबाजूचे घनदाट जंगल येथे असणारे हिंस्र पशु ह्याबद्दल वारंवार दिसणाऱ्या सूचना पाहून मनात एक विचार आला. इथे पोहोचणे पूर्वीच्या काळी किती कठीण असेल, तरीही भक्तीची इवली ज्योत देखील सूर्य होते..तसे हे ठिकाण अध्यात्मिक मार्गाचा प्रकाश मानावा इतके सुरेख. ध्येयाकडे जाणारी वाट इतकी सुंदर असावी तर प्रत्यक्ष मंदिर कसे असेल ह्या विचाराने मन भारावून गेले. निसर्ग सौंदर्याचा मोह अगदी देवालाही टाळता आला नाही..देवत्व जसे जगण्याची शिकवण देण्यासाठी अवतरित होत होते तसेच ते सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी प्रकट होत असावे असे वाटून गेले.
रस्त्यावर गाडीच्या मागे धावत येणारी वानरसेना हा या प्रवासात आलेला एक मजेशीर अनुभव होता. एक नाही,दोन नाही ह्या सेनेत किमान ५०- १०० वानरांचे एकत्रित गट होते. ह्या वानरांना पर्यटकांनी काही खाऊ घालण्यावर बंदी होती. एकंदर कडक निर्बंध होते. जंगलात पर्यटकांसोबतच प्राणी, पशु ह्यांची काळजी घेण्यासाठी जागोजागी पोलीस होते.
आता श्रीशैल्यं २ किलोमीटर राहिले असता,रस्त्याच्या एका वळणावर गाडी थांबली. साक्षी गणेश मंदिर आले होते.पौराणिक कथेनुसार स्वतः श्रीगणेश श्रीशैल्यं येथे येणाऱ्या पर्यटकांची नोंद ठेवतात. ही कथा एक जाणीवसुद्धा देऊन गेली,आपल्या सर्वच चांगल्या – वाईट कर्माचा साक्षी परमेश्वर आहे. हातून नित्य शुभ आणि पुण्यकर्म घडावेत ही मनोमन प्रार्थना केली. तिथून आम्ही श्रीशैल्यं येथे पोहोचलो.

कृष्णा नदीचा भवताल आणि हिरव्यागार नल्लामल्ला जंगलात स्थित दक्षिणेचा कैलास म्हणजे श्रीशैल्यम! कित्येक दिवसांपासून आम्हाला दर्शनाची ओढ लावणारे हे स्थळ ,मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि भ्रामराम्बा शक्तिपीठ.एखाद्या आध्यात्मिक स्थळाची ऊर्जा ह्या सर्व गोष्टींचे मूळच जणू! मल्लिका ह्या शब्दाचा अर्थ जाई, देवीसाठी वापरलेला हा शब्द आणि अर्जुन म्हणजे शिव.
हिंदू मंदिरे केवळ एक मूर्ती नसते..तिथली दगडातून चैतन्य घडवणारी सृजनशीलता भक्तीचे अनोखे रूप दर्शवते. फुलांची आरास, दिव्य मंत्र, धुपाच्या सुंगधात न्हाऊन निघणारे देवालय आणि त्यासोबत तेवणारे दीप मनातही एक विवेकदीप जागृत करत होते. दर्शन तर असतेच पण कला, ज्ञान आणि समरसता हे देखील ही ऊर्जास्थाने शिकवत असतात. ह्या साऱ्या वातावरणातून कुठेच जाऊ नये असे वाटत राहीले. काही क्षण तिथेच थांबावेत इतके सुंदर असतात.योग असा की अगदी गाभाऱ्यात जाऊन स्पर्शदर्शनम झाले. भारावलेल्या मनाने गाभाऱ्यातून बाहेर पडलो.
तिथून बाजूला काही पायऱ्या चढून गेलो. भ्रमरांबा देवीचे मंदिर होते. प्राचीन काळी अरुणासुर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून असा वर मिळवला की त्याला कोणत्याही चार पायांच्या किंवा दोन पायांच्या प्राण्याकडून किंवा कोणत्याही शस्त्राने मारले जाऊ नये. त्याला वर तर मिळाला पण वर मिळाल्यावर अरुणासुराने तिन्ही लोकांत अत्याचार सुरू केले. त्याने देवांनाही त्रस्त केले आणि मंदिरांमधून वेद आणि मंत्र म्हणणे दुरापास्त केले.
जेव्हा देवांनी मदतीसाठी माता पार्वतीला प्रार्थना केली, तेव्हा देवीने एका विशिष्ट स्वरूपात अवतार घेतला.अरुणासुर राक्षसाला हरवण्यासाठी देवीने हजारो भुंग्यांचे रूप धारण केले. हे भुंगे राक्षसाच्या शरीरात घुसले आणि त्यांनी राक्षसाला ठार मारले. भुंग्यांनी मिळून (जे चार किंवा दोन पायांचे प्राणी नव्हते) राक्षसाचा वध केला आणि त्रिलोकाचे रक्षण केले. शक्ती तर आहेच पण युक्तीचे महत्त्व सांगणारी ही कथा. ह्यासोबतच अजून एक कथा प्रसिद्ध आहे. भगवान शंकराने सतीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जे तांडवनृत्य केले तेव्हा सतीची मान इथे पडली म्हणून हे शक्तिपीठ देखील मानले जाते. देवी पार्वतीशिवाय प्रत्यक्ष शिवाला अपूर्णता वाटावी इतके परिपूर्ण नाते सांगणारी ही कथा प्रेमाची महती सांगणारीच. साऱ्या जगाची काळजी वाहणारी ही आई! तिचे रूप बघतच राहावे असे..
आपण किती भाग्यवान आहोत…देवसुद्धा आपल्याला माता पित्याच्या रूपात असतो..मग आपले हट्ट पुरवणे असो किंवा त्यांच्यासाठी यत्किंचित मागणे असो ,निरागसता किंवा अज्ञान असो. सर्व मान्य करून आपले हट्टदेखील पुरवले जातात. त्यांचे अदृश्य पण कणकणात अन् मनामनात असणारे अस्तित्व केवढा आधार ठरतात
देवत्वाची अनुभुती नियमित आपल्या जीवनात येतच असते.आपल्या आयुष्यात आई -वडिल असो की प्रेरणेच्या रूपात असणाऱ्या व्यक्ती असो किवा समाजात दुःखी मनांवर फुंकर घालणाऱ्या व्यक्ती.. आपल्या त्रासाची पर्वा न करता इतरांना सुख मिळावे यासाठी झटणाऱ्या व्यक्ती..आपल्या कर्माला देव मानणाऱ्या व्यक्ती.. ही शक्ती तो ईश्वरच देऊ जाणे! निसर्गाच्या सौंदर्याचा मोह अगदी देवालाही टाळता आला नाही.देवत्व जसे जगण्याची शिकवण देण्यासाठी अवतरित होत होते तसेच ते सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी प्रकट होत असावे असे वाटून गेले.
उगाच नाही इसवी सन १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज येथे ध्यानस्थ झाले होते. ही ऊर्जा मग दक्षिण मोहीम सुरू करण्यासाठीची शुभ संकेत ठरली. महाराजांच्या ह्या ऐतिहासिक भेटीची आठवण आणि त्यांच्या अतुलनीय कार्याचे स्मरण म्हणून श्रीशैलम येथे ‘छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र’ उभारले आहे. केवळ उभारले नाही तर एकंदर कार्यपट उलगडला आहे. महाराजांनी जिंकलेले दुर्गम गड ,त्यांचा एकूण जीवनपट येथे साकारला आहे. राजांच्या कार्यावर सर्वांगीण प्रकाश टाकणारे हे स्मृतिस्थळ बघून मनात उमटत राहिल्या श्री रामदास स्वामींच्या ह्या ओळी –
शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचे आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भूमंडळी ||
मागणे काही उरलेच नाही ..केवळ उरली कृतज्ञता आणि धन्यता!
लेखिका – प्रा. डॉ. सीमा ढगे – बंगाळे , वाणिज्य विभाग, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर.

देवा,
तुझा लाभता संग
हे मन झाले नि:संग
वाहता तुझ्या चरणी
देह जाहला चंदनी
आता अखंड राहते
रे मी तुझ्या नंदनी !
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु !

कृष्णरेषा
माझ्या नशिबासवे बोलती
साऱ्या कृष्णरेषा …..
तोच काढतो, तोच खोडतो
तोच लिहितो गमभन
क्षणार्धात होऊन जाते
माझेच बाई कृष्णमन !
वृंदा आशय

उठवी अंगावर शहारा |
असा माझा कृष्णवारा ||
माझी व्यापीते रे मती |
देवा तुझी कृष्णगती ||
माझे जाणतो रे मन |
तो माझा कृष्णघन ||
मज करते संपन्न |
ते माझे कृष्णधन ||
मला लागला रे छंद |
असा घ्यावा कृष्णगंध ||
वृंदा आशय

शिव – वरदान
आज माझी सायली
उत्तरेला फुलली पुरती
अन् शिवाराधनेत…
ती झाली रे पार्वती !
श्वेत रंग मंद गंध
अस्तित्वच सुगंध
शिव भुलले…
सायलीला बोलले
जो कोणी तुला छेडेल
हा शिव त्यावर कोपेल
तू अशीच राहा सुखी
हसतखेळत उर्ध्वमुखी !
वृंदा आशय
यावर आपले मत नोंदवा