
पदोन्नती
सर्वसाधारणपणे पदोन्नती म्हणजे एक formality म्हणून आपण त्याकडे पाहतो. नोकरी करत असताना अमुक इतकी वर्षे झाली की आपोआपच माणूस वरच्या पदावर जातो; ही त्या मागची आपली धारणा आहे. एकूणच जगराहाटी पाहिली तर त्यात काही खोटं आहे असंही म्हणता येणार नाही. त्यामुळेच ही हक्काची पदोन्नती अकारण रोखणारे किंवा त्यातील सर्व प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात यासाठी आपले खिसे गरम करून घेणारे अनेक माणसंही आपल्याला आजूबाजूला दिसतात.
….. मात्र काही माणसं सर्वसाधारण व्यवहार नियमाला , जगरहाटीला आणि परिस्थितीला अपवाद ठरणारे असतात. त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे, प्रा. डॉ.गोरख प्रभाकर काकडे, हिंदी विभाग प्रमुख, सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र,
कालच त्यांची ‘प्राध्यापक’ या निवड श्रेणीमध्ये पदोन्नती झाली. त्यांच्या इथपर्यंतच्या डोळस, मेहनती, संघर्षशील आणि विलक्षण आशादायी, आत्मविश्वासयुक्त प्रवासासाठी ‘ज्ञानोत्सव’ तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
एरवी तुम्ही कोणत्याही प्राध्यापकाशी याबाबत जर बोललात, तर एक प्रतिक्रिया नक्की ऐकू येईल, ‘बाजार आहे सगळा.’ आपण प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो, अपरिहार्यता म्हणून प्रत्येक माणूस व्यवस्थेचा एक भाग होतो आणि कळत नकळत जी व्यवस्था आपल्याला नकोशी वाटते, जिला आपण नावं ठेवत असतो ती व्यवस्था पुढे घेऊन जाण्याचं काम आपणच करत असतो.
‘पानी में रहकर मगरमच्छ से बैर क्यों?’ अशी अत्यंत सावधगिरीची, व्यवहार चतुर वाटणारी भूमिका घेऊन आपण जगत असतो. ज्या गोष्टींचा आपल्याला तिटकारा वाटतो, ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत त्याला सामर्थ्यशाली नकार द्यायला माणसानं शिकलं पाहिजे. त्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद ठेवावी लागते, विलक्षण संयम बाळगावा लागतो, कदाचित व्यवस्थेच्या विरुद्ध जाणारा म्हणून आपला बळी जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ……. इतकं सगळं असलं तरी, मला प्रश्न पडतो, म्हणून काय आपण घाबरून जगायचं? स्वातंत्र्याचे आणि लढाऊ बाणा व्यक्त करणाऱ्या इतिहासाचे नुसतेच गोडवे गायचे? आणि आपलं वर्तन मात्र, ‘नोकरी करायची आहे ना बाबा’ या प्रवृत्तीची ठेवायची. त्यासाठी कोणत्याही तडजोडी करायला आपण तयार होतो. व्यवहाराच्या नावाखाली आम्ही आमची जीवनमूल्ये विकून बसतो ही वस्तुस्थिती आहे.
डॉ. काकडे सरांसारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोकच व्यवस्थेच्या विरोधामध्ये ठामपणाने आणि पाय रोवून उभे राहतात. कारण त्यांना पूर्ण विश्वास असतो, स्वतःच्या प्रामाणिकपणावर, नियम पालनावर, गुणवत्तेवर, मेहनतीवर आणि वाट पाहण्याच्या क्षमतेवरही! ‘कोणी वंदा कोणी निंदा’, मी माझ्या मार्गाने चालतच राहणार हा त्यांचा ठाम निर्धार असतो. ही माणसं चालतात, चालतंच राहतात. वास्तविक पाहता त्यांच्या चालण्यानं मानवी जग, मानवी अस्मिता एकेका टप्प्यावर पोहोचत जातात. त्यांचं कार्य आणि कर्तृत्व हे इतरांसाठी प्रेरक आणि दिशादर्शक ठरतं. आज शिक्षण क्षेत्रात असा माणूस सापडणं विरळाच. म्हणून आम्ही ‘ज्ञानोत्सव’तर्फे त्यांचं खास अभिनंदन करू इच्छितो!
स्वतःच्या नावाला सार्थ करणारी ही व्यक्ती अनेकांचे आयुष्य आजवर उजळत आलेली आहे. निर्मळ मनानं कोणालाही मदत करणं आणि ज्याला जे हवं ते लाभावं असं चिंतन करणं; हे लक्षण ‘ज्ञानमना’चं असतं. भारतीय संस्कृतीवर, संत साहित्यावर डोळस श्रद्धा ठेवणारा, कसलीही चिकित्सा करण्यासाठी न घाबरणारा आणि ही चिकित्सा देखील संशोधनाच्या शिस्तीत करणारा हा प्राध्यापक सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या अभिमानाचा विषय आहे.
ज्ञानोत्सवाच्या संस्थापक समितीचे सदस्य असलेल्या आणि ‘बंधू शोभे नारायण’ हे ब्रीद सार्थ करणाऱ्या आमच्या बंधुराजांना समृद्ध, सुसंस्कृत, सुशील, निरामय आयुष्य लाभो, त्यांचं कुटुंब सुखी होवो आणि मातापित्यांचे, गुरुजनांचे आशीर्वाद निरंतर लाभत राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
शुभास्ते पन्थान: !
वृंदा आशय
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏
यावर आपले मत नोंदवा