विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जनहितार्थ ४ _ बाई आणि बाबा

सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

आणि

माझे जाज्ज्वल्य निष्ठेचे आजोबा कै. विठ्ठलराव देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निरंतर ऋणातच राहील – वृंदा आशय


सावित्री माय,

तुझे उत्सव होतील, तुला हार-तुरे वाहिले जातील, तुझ्यावर भाषणे तर अगणित होतील पण मला वाटते तुला आणि तुझ्यामुळे फुललेल्या, फुलत असणाऱ्या आणि भावी काळात फुलणा-या सावित्रीच्या लेकींना, रोजच्या जीवनात थोडं जपलेना तर तू अधिक धन्य होशील गं. तुलाही असंच वाटतं असेल ना गं, आई ?

– संपादक वृंदा आशय

सावित्री माय , बाई हणं सोपं नव्हतं ग, ….नाही ….. पण व्हावं गं ….एवढीच प्रार्थना !

Threads वरून साभार !



तिचे गाणे
©प्रतिभा मिस्त्री
शनिवार दि ३ जानेवारी २०२६
(सावित्रीबाई फुले जयंती
पूर्वी प्रसिद्ध कविता)

माझ्या सावित्रीचे आज गाते आहे तेच गाणं
तिच्या पाऊलांचे नाही कधी फिटतारे ऋण

दिल्या अक्षरांच्या वाटा माझ्या हातामधे पाटी
आज आभाळात माझ्या होई तारकांची दाटी

तिने घेतले ओटीत तिच्या जोतिबाचे दान
दाही दिशांत उजळे आज त्यांचे मायभान

मला तिला त्याला त्यांना साऱ्या सकळ जनांना
घडलेले जागरण साऱ्या चंद्र सूर्य तारकांना

आता चालायचे आहे दूरदूर पुढेपुढे
घेते जोगवा डोईशी गाते तिच्या दारापुढे

माय झालीस तेव्हा तू माझ्या लेकीची वो माय
आता तिच्या कुशीत जन्मे ज्ञान सूर्य माय

तुझ्या दाराशी टेकिते माथा मी गे माझे आई
तुझ्या दानाची ना फिटे ही अवघी पुण्याई

आता पलिते घे हाती येई जागरणासी
नव्या काळात दाटले नवे अंधार दाराशी

अक्षरांची वाट आज कुठे अडखळे माई
तुझी आणि जोतिबाची सय पुन्हा पुन्हा येई

नव्या अंधांरांनी आता लेक वेढलेली आहे
नव्या सूर्यांसाठी पुन्हा गाणे तुझे गाते आहे


३ जानेवारी
सावित्रीबाई फुले जयंती …..
🙏🏻🌹🙏🏻

बीज पेरले स्त्री शिक्षणाचे ;
रोप त्याचे करताना ,
सोसले घाव कितीक कशाचे
प्रवाहा विरुद्ध पोहतांना !

इवल्या इवल्या पानांतून
रोपटे आकारास आले ,
वृक्ष त्याचा गगनी भिडला ,
कसे त्यालाच ठावे !

गगनचुंबी या वृक्षाची
आम्ही चाखतो फळे ,
वृक्ष तो होताना
काट्यांची झाली फुले !

मुक्त असावे स्त्री जीवन
उन्मुक्तपणाचे गालबोट कशाला ?
मानवंदना हीच तयांना ,
त्या फुलांतील सावित्रीला !!

गीता गद्रे
टिमारनी (म.प्र.)
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻


हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पूर्णवेळ कार्यकर्ते – माझे आजोबा – कै. विठ्ठलराव देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !


आजोबा,

तुम्ही गेलात तेव्हा मी एवढी लहान होते की, तुम्हाला अनुभवल्याचे काहीच स्मरत नाही. मात्र तुमचे कर्तृत्वच एवढे अभिमानास्पद की जेव्हा जेव्हा तुमचा करारी फोटो पाहते तेव्हा तेव्हा तुमचा लढाऊ बाणा माझ्या रक्तातून सळसळत जातो. या जीवंत देणगीबद्दल मी तुमची चिरंतन ऋणी आहे. बाबा, तुमच्या या नातीला अभिमान आहे, एक लढाऊ बाई असण्याचा, तुमचा वारसा पुढे चालवण्याचा !

वृंदा आशय

————————————–जय हिंद !———————————————

यावर आपले मत नोंदवा