विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जनप्रेमार्थ ६ _ ज्ञानोत्सवचा प्रेमोत्सव

प्रेम म्हणजे प्रेम असते | तुमचे आणि आमचे सेम असते | त्याला उगाच शेम मानायचे नसते

त्यागाच्या पायावर ते क्षेम असते !

संपादक – वृंदा आशय

एक प्रश्न मम भोळ्या मनाला
प्रेमे कोण रक्षितो सायलीला?
माऊलीची कृपा उत्तरे त्याला
वंदितो निसर्गही गणरायाला!

वृंदा आशय
श्रीकृष्ण प्रकाशला अंतरी
देह सारा झाला बासरी
वेणुनादे सायली शहारली
ती लतिका अंतर्बाह्य बहरली
तिने धरिला हाती शंख
मिटविले सारे डंख
येथ पूजिली माता
सारे संकट सरेल आता !

वृंदा आशय

|| ॐ ||
माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो, तितक्याच सहजपणे प्रेमही व्यक्त करू शकला असता, तर जगणं खुप सोपं आणि सुंदर झालं असतं. कारण माणसाच्या निम्म्या समस्या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीचं व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात.
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏

मंडल आर्ट – अपूर्वा प्रशांत नाईक
•| ॐ |•
एक प्रार्थना…..
सूर्यास करिता नमन
आशीष देतो पवन
तो सृष्टीचा प्राण
हनुमंताचा रामबाण
साही सूर्याची कठोरता
देई पृथ्वीस शीतलता
पाहून मरूद्गणांची चपलता
ढळे भल्याभल्यांची अचलता
तो चंद्रमौळी तो जटाधर
गंगाधर तो उमेचा प्रियवर
संपवूनी हलाहल सार
होईल आता अमृतधर !
भोळ्या सांबा, तू ये रे शिवा
प्रसन्न हो ह्या थकल्या जीवा
ही प्रार्थना तुज कळकळीची
कळकळीची की अखेरची?
संपूर्ण समर्पण!
वृंदा आशय
|| श्रीहरिहरेश्वरार्पणमस्तु !||

जनमन

चढला फुलला वेल सायलीचा
लाभे त्याला आशीष माऊलीचा

लगडले माझ्या घराला रामचांदणे
की म्हणावे त्याला कृष्णनांदणे?

चांदणनांदण्यात सवे येतेच वनिता
कधी राधा-कृष्ण कधी राम-सीता

भारतीयांचे हे आराध्य दैवत
पाझरते जेथे सारे हृदगत

हे सार आपुल्या संस्कृतीचे
प्रतिबिंब उमटते जनमनाचे!

वृंदा आशय


शब्दवेध

‘ओढ’ आणि ‘ओढ’

हे दिव्य प्रेम जर आपल्याला अनुभवायचे असेल तर -ह्दयात अशी ‘ओढ’ निर्माण व्हावी लागते जिचे रोपटे इच्छेच्या बीजातून निघून ध्यासाच्या असीम अनंत आकाशापर्यंत गेले पाहिजे. संतांच्या भाषेत सांगायचे तर ‘तयाचा वेलू गेला गगनावरी’ असे घडावे लागते.

‘ओढ’ हा शब्द आपल्या सगळ्यांनाच अत्यंत परिचित असलेला असा आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द घेऊन आपण कृतिशील असतो. आज ‘ओढाओढ करणे’, ‘चढाओढ लावणे’ हे आमच्या बाजारकेंद्री जीवनाचे मध्यवर्ती सूत्र झालेले आहे. त्यामुळे आयुष्य ‘ओढत’ आपण जगत राहतो आहोत.

….. दुसरी ‘ओढ’ मात्र अतिप्राचीन आहे. चिरकालीन आहे. ती ‘हृदयाची ओढ’ आहे. सारी सृष्टी जिथे प्रेमवृष्टी करते त्या भारतीय संस्कृतीतली ती ‘ओढ’ आहे. माणसाला आत्मसन्मान देणाऱ्या आणि मित्रत्वाने उभ्या करणाऱ्या, जीवनाची ती अजोड जोड आहे.

……… खरंतर ‘तिच्या’मुळे माणसाचं आयुष्य मधासारखं गोड आहे. तिची सोबत हे सृष्टीचं आदीम तत्त्व आहे. ‘प्रकृती’ आणि ‘पुरूष’ यांच्या एकरूपतेशिवाय आपली सृष्टी अस्तित्वातच येऊ शकत नाही. ‘एकोहम् बहुस्याम्’ या इच्छेच्या मुळाशी हेच तत्त्व आहे. ही प्रकृती सुद्धा कशी असते तर पंचमहाभूतांपासून आणि तीन सूक्ष्म तत्वांपासून तयार झालेली अष्टधा प्रकृती असते. मला वाटतं कदाचित त्यामुळेच या प्रकृतीचाच, या आदिशक्तीचा अवतार अष्टभूजा देवीच्या स्वरूपात आपण पाहतो.


शिवाय ज्या गृहलक्ष्मीला आपण देवीच्या स्वरूपात पाहतो ती देखील ‘अष्टभुजाधारी’ असावी अर्थात ‘बहुकार्यात्मक’ असं तिचं रूप स्वरूप आपण अपेक्षितो. मात्र देविसारखी विविध रूपे तिने व्यक्त करण्यापेक्षा तिचं स्वरूप कायमच ‘सौम्य’, ‘प्रेमळ’ आणि ‘त्यागमय’ असावं अशी पुरुषप्रधान दृष्टिकोनातून रास्त अपेक्षा आपला समाज सातत्याने व्यक्त करतो. या अपेक्षेच्या अनुषंगाने शतकानुशतके ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ ही भूमिका स्त्री बजावत आलेली आहे. कारण तिला नैसर्गिक ओढ असते तिच्या गृहसौख्याची!

आज मात्र ही गृहसौख्याची ओढ, कुटुंबाची स्थिरता आपल्याला अनेकविध कारणांनी धोक्यात आलेली दिसते. व्यक्ती – कुटुंब – समाज – प्रदेश – देश – विश्व अशी साखळी आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला दिसून येतं; ज्या विश्वाच्या कल्याणाची आणि विकासाची आळवणी आपण सातत्याने करत असतो त्याचा पाया असलेली व्यक्ती ही अत्यंत ‘व्यस्त’ आणि ‘त्रस्त’ झालेली आहे. ज्या व्यक्तीला मध्यवर्ती ठेवून विश्वाची स्वप्नं आपण पाहतो ती व्यक्ती जर स्थिर नसेल तर विश्व अस्थिर होणारच. भारतीय ज्ञानपरंपरेतून विचार करताना खरं म्हणजे हे सूत्र आपण ‘सृष्टी – समष्टी – व्यष्टी’ अशा उतरत्या क्रमाने मांडतो. मात्र पाश्चात्त्य ज्ञानपरंपरा स्वीकारून आणि त्याचबरोबर ‘बाजारकेंद्री अर्थव्यवस्था’ अवलंबून आज आपण हे सूत्र भारतीय दृष्टिकोनातून व्यस्त पद्धतीने म्हणजेच ‘व्यष्टी – समष्टी – सृष्टी’ असे स्वीकारलेले आहे. त्यामुळे आपसूकच आमचे ‘धर्म’, ‘अर्थ’, ‘काम’, ‘मोक्ष’ हे जे चार पुरुषार्थ आहेत या चार पुरुषार्थांमध्ये सुद्धा ‘अर्थ’ आणि ‘काम’ हे प्राधान्याने पुढे येऊन ‘धर्म’ त्या पाठीमागे सारलेला दिसतो. त्यामुळे आपसूकच ‘मोक्ष’ या संकल्पनेलाच आपल्या जीवनातून ‘मोक्ष’ मिळालेला आहे. ‘मुमुक्षत्व’ संपुष्टात आल्याने जीवनाची युक्तता घटलेली आहे. जिथे युक्तताच नाही तिथे उपयुक्तता कशी असेल? मात्र दुर्दैवाने हे आपल्या लक्षात येत नाही.

आपल्या ज्ञानक्षेत्रामध्ये व जीवनव्यवहारामध्ये आपण ‘उपयुक्ततावादी’ आणि ‘सौंदर्यवादी’ अशी विभागणी करून जीवनाकडे पाहत असतो. ‘सत्यं शिवं सुंदरम्’ हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे ब्रीदवाक्य आणि त्याआधारे ‘सत्यमेव जयते’ यासारखे राष्ट्रीय बोधवाक्य जरी आपण स्वीकारलेले असले तरी या तीन तत्त्वांची आपण किती बुज राखलेली आहे, हे आपल्यापैकी प्रत्येकाला चांगले ठाऊक आहे. या चुकांना वेळीच स्वीकारून त्यात सुधारणा करण्याऐवजी आपण त्याला ‘शिष्टाचार’ ‘इकोसिस्टीम’ ‘प्रॅक्टिकल विज्डम’ यासारखी गोंडस नाव दिलेली आहेत. अर्थात आपल्या या कर्माची फळे आपण सर्वजण अपरिहार्यपणे चाखत आहोत. या फळांची सामूहिक कटू चव आपल्या गळी उतरेल तेव्हा कदाचित आपण पुन्हा एकदा परिवर्तनासाठी तयार होऊ. सध्या तरी अशा परिवर्तनासाठी कोणी एकटा- दुकटा तयार होतो, समूह गोळा करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला साम -दाम-दंड-भेद वापरून ‘ऑड मॅन आउट’ ठरवायला आपण चुकत नाहीत. अशा प्रकारच्या व्यक्तींना आपण हरत-हेने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या मागचा समूह हातोहात पसार होतो. अशी व्यक्ती समाजामध्ये पूर्णपणे ‘एकटी’ पाडली जाते, जुन्या भाषेत बोलायचं झालं तर ‘वाळीत टाकली’ जाते. या सर्व व्यवस्थेला पुरून उरू शकतील अशा सक्षम व्यक्ती असक्षम समाजामध्ये निपजतीलच कशा? ही व्यवहारातली लक्षणे दुर्लक्षित करून तात्विक पद्धतीने मात्र आम्ही सर्वच क्षेत्रात समाजाच्या निकस सृजनाला नावे ठेवत राहतो. मग इथे आपसूकच प्रश्न निर्माण होतो ज्या प्रगतीसाठी, ज्या विकासासाठी आम्ही आमच्या जीवाचा आटापिटा करतो आहोत किंवा किमानपक्षी तसे दाखवतो आहोत त्या विकासाची, प्रगतीची ‘ओढ’ आम्हाला खरोखर आहे का? की तिच्याअभावी आम्ही फक्त ‘ओढाओढ’ करत आहोत ‘चढाओढ’ लावत आहोत.


आपल्या जुन्या म्हणी आपल्याला हेच सांगतात ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल’, ‘इच्छा तिथे मार्ग’, यासारख्या म्हणी ‘संचिताचा अभाव’ पर्यायाने ‘क्रमबद्ध विकासाचा अभाव’ स्पष्टपणे अधोरेखित करतात. पण modern होण्याच्या नादात आपल्याला हे जुनं संचितच टाकाऊ वाटायला लागलं. ‘टाकाऊतून टिकाऊ’ निर्माण करण्याची शक्ती असलेली ‘पतितांना पावन’ करून खरी समता प्रस्थापित करण्याची मूलभूत क्षमता ही भारतीय संस्कृतीमध्येच आहे. मात्र दुर्दैवाने आजही आम्ही, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’, आणि ‘बंधुता’ ही तीन तत्त्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झालेली आहेत असंच शिकतो. वास्तविक पाहता जे भारतीयांच्या रक्तात आहे त्या घटकांची इतरांकडून उसनवारी करून इंजेक्शन घेण्याची आवश्यकताच काय? मग इथे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते आम्हाला ‘स्व-रूपा’ चा आजही विसर पडलेला आहे. किती काळ आम्ही मेकॉले यांच्या नावाने खडे फोडत बसणार? आमचे ‘स्व-रूप’ जोपर्यंत न्यूनगंडात विरघळत राहील आणि अहमगंडात अवास्तव फुलत राहील तोपर्यंत आमच्या हाती काहीही लागणार नाही.

‘चूक स्वीकारणं’ ही ‘सुधारण्याची पहिली खूण आहे’, हे सांगणाऱ्या ‘हिंद स्वराज’ ला आम्ही विसरलो तर महात्मा गांधी आम्हाला कळतील कसे ? ‘सत्याचे प्रयोग’ करण्याची कुवत आमच्यात येईल कुठून? साधेपणातलं सौंदर्य जोपर्यंत आम्ही अनुभवत नाही तोपर्यंत

“It is very simple to be happy, but it is very difficult to be simple.”

हे घोकत राहण्याच्या पलीकडे आपण काय करणार?

                                      वृंदा आशय 

🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻

लिलीच्या फुलांमधून घडणारं कृष्णाचं दर्शन घ्यायला कदाचित तुम्हालाही नक्कीच आवडेल. कवी पु.शि. रेगे यांच्या’ लिलीची फुले’ या कवितेमधून घडणारं प्रेमाचं संवेदनशील दर्शन, ये हृदयीचे ते हृदयी करण्याची प्रेमाची ताकद, आणि विरहातही तितकंच तरल राहणारं हे प्रेम आजच्या पिढीसाठी कदाचित आठवं आश्चर्य ठरू शकेल. कारण दुर्दैवाने आज प्रेमातील त्यागाची जागा उथळ भोगाने घेतली आहे. भारतीय संस्कृतीमधील त्यागाचा पाया ज्याला कळू शकत नाही, त्याला प्रेम तरी काय ढेकळं कळणार? त्यामुळे आज प्रेम ही भावना प्रेमळ न राहता आक्रमक झालेली, समाजाच्या अनुभवास येत आहे. प्रेम पुन्हा एकदा ‘प्रेमळ ‘ व्हावं, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना!

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!

‘आनंदमठ’ ही कादंबरी हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यसंग्रामात एक तेजस्वी व अढळ स्थान मिळवून बसलेली आहे. या कादंबरीत प्रथम प्रकाशित झालेले व लोकांसमोर प्रगट रीतीने आलेले गीत ‘वन्दे मातरम्’ हा या कादंबरीचा प्राण आहे. बावनकशी सुवर्णाच्या कोंदणात एखादा उत्कृष्ठ हिरा शोभावा तसे ‘वन्दे मातरम्’ गीत ‘आनंदमठ कादंबरीत शोभून दिसते. ‘वन्दे मातरम्’ या अमर गीतामुळे ‘आनंदमठा’ची लोकप्रियता आणि उपयुक्तता सहस्र पटींनी वाढलेली दिसेल.

संपूर्ण वंदे मातरम् वाचण्यासाठी भेट द्या –
देश हा देव असे माझा – ज्ञानोत्सव 🪔 https://share.google/ABTDQD31Oo1aluKkG

सत्य, सुंदर, मंगलाची नित्य हो आराधना !

मराठी संस्कृतीला लाभलेले एक तेजस्वी वरदान – वि. वा. शिरवाडकर

https://share.google/8Ntuks9QMljDwnIrA

प्रेम कुणावर करावं ?

कुसुमाग्रज – प्रेमयोग

प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं

प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं,
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं।
प्रेम कुणावरही करावं।

प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं,
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं,
बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं,
यमुनेचा डोह जहरुन टाकणा-या कालियाच्या फण्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातीलअद् भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
गोपींच्या मादक लीलांवर करावं,
पेंद्याच्या बोबडया बोलावर करावं,
यशोदेच्या दुधावर,
देवकीच्या आसवांवर,
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं,


ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं

प्रेम
चारी पुरुषार्थांची झिंग देणा-या जीवनाच्या द्रवावर करावं,
आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणा-या स्वतःच्या शवावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्या संस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ….. !


हे भाग्य प्रदान करणा-या गीतकारांचे आणि संगीतकारांचे आम्ही ऋणी आहोत .

प्रेम करावे सृष्टीवर | माणसाच्या निखळ दृष्टीवर ||
उजळवून सारी सृष्टी | सूर्य करे कृपावृष्टी ||
चंद्र आहे माझी आस | देवा जावो ती पूर्णत्वास ||

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने माझी (कवी प्रमोद देशपांडे ) ‘आजची कविता’ आहे मायकल डोनगी यांची ‘The Present’. आज दिवसभरात मी या कवितेचे मराठी, हिंदी आणि उर्दू अनुवाद पोस्ट करणार आहे. मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता नक्कीच आवडेल. माझ्या सर्व वाचकांना आणि मित्र-मैत्रिणींना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा!

सुरुवात ‘भेट’ या मराठी अनुवादाने –

https://www.facebook.com/share/r/17vye93Bzu


सूर्यान्योक्ति

✍️ डॉ.ज्ञानेश्वर थोरात

——————————

मराठी साहित्यात ‘मराठी

 भाषेचा शिवाजी’ म्हणून कविवर्य विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांचा लौकिक सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहे. त्यांची विद्वत्ता विविध आणि विपुल काव्यवृत्तांमध्ये निबद्ध झाली आहे . त्यांच्या काव्यातील गेयता आणि छंदबद्धता रसिकांना मोहात पाडल्यावाचून रहात नाही .येथे पर्याप्त शब्दांत प्रगाढ अर्थवाही मराठी  काव्यरचनेचे पाऊल संस्कृत काव्यरचनांच्याही पुढे पडले आहे ; हे वास्तव अलक्षित करता येत नाही .त्यांची सूर्योन्योक्ति शार्दूलविक्रीडित वृतात लिहिली आहे .

“देखूनी उदया तुझ्या द्विजकुळे, गाती अती हर्षुनी |

शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती,गिर्यांतरीं जाउनी|

देशी ताप परी जसा वरिवरी,येशी नभी भास्करा |

अत्युच्चीं पदिं थोरही बिघडतो,हा बोल आहे खरा ||”

कवी सूर्याला उद्देशून म्हणतो , ” तुझा उदय पाहून द्विजकुळे तुला उद्देशून सूर्यनमस्कारादि द्वादश मंत्र आणि स्तोत्र अतिशय उत्साहाने आणि सुहास्य वदने गातात .किती आस्था आणि आदर त्यांच्या विशुध्द गायनातून ओसंडत असतो ! परंतु तू जसजसा आकाशात वर वर चढू लागतो ;म्हणजे तुझ्या वाटचालीत प्रगती होत जाते ; तसतसे तुझे तपमान वाढू लागते आणि त्या तापदायक उष्णतेने त्रस्त होऊन जंगलातील शार्दूल म्हणजे सिंह आणि इतरही हिंस्त्रप्राणी गिरीकंदरात दडून बसतात , तुझ्या उष्णतेने अंगाची होणारी लाहीलाही त्यांना सहन होत नाही .तू आकाशात माथ्यावर येतो ; तेंव्हा तू सर्वोचपदी विराजमान झालेला असतो आणि तुझी प्रखरता आणि तापदायकता अधिकच असह्य होते , आग ओकत असतो तू ! तुझ्या दर्शनमात्रे डोळे दिपून जातात .असे तुझे तापदायक उच्च पदी असणेच ; तुझ्या पतनाला कारण होते . हळूहळू तू मावळतीकडे जाऊ लागतो , तुला उतरती कळा लागते .अरे , भास्करा , तेंव्हा तुझा होत असलेला अस्त पहावत नाही . ‘अत्युच्चींपदीं थोरही बिघडतो’ हा वाडवडिलांचा बोल मात्र खरा ठरतो.”


‘राष्ट्राय स्वाहा, इदं न मम’ – अर्थात यह जीवन राष्ट्र के लिए समर्पित है, मेरा कुछ भी नहीं।

https://www.facebook.com/share/1EkuUqZuqF/


वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् !

https://share.google/8z61XnNk6oAJcMmLS

स्त्रोत- आठवणीतील गाणी


उत्तिष्ठ भारत – देश के लिए बली

https://www.facebook.com/share/186fxfoRG2/


ज्येष्ठ कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
जन्म – १६ ऑगस्ट १९०४ मृत्यू -१५ फेब्रुवारी १९४८

सृष्टी समष्टी आणि व्यष्टी यांच्यावर ज्याला प्रेम करता येते त्याचे जीवन कधीच दु:खी-कष्टी होत नाही.


यावर आपले मत नोंदवा