विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

किरणोत्सव ५ _ आमंत्रण

माझ्या मायमाऊलीचा उत्सव मी थाटामाटातच साजरा करणार, तडजोडीत नाही!

– संपादक वृंदा आशय


हे महाकवे,
तुमचा उत्सव साजरा करताना मला का आठवावेत विंदा? का आठवावेत बोरकर? खरं म्हणजे आठवावेत हो. पण तुम्हाला सांगू , काय आठवलं मला ? आठवलं विंदांचं ‘माझ्या मना बन दगड’ आणि बोरकरांचं ‘ज्ञानदेव गेले तेव्हा…’ हे गीत !
का मन उदास व्हावं? माझ्या माय माऊलीचा उत्सव जवळ येतोय आणि नैराश्य माझ्यात पसरत चाललंय. नाही , हे असं घडू नये. मला आठवावेत विंदा त्यांच्या गो. वि. करंदीकरपणासह त्यांच्या ‘अष्टदर्शने’सह ! त्यांच्या कारुण्यासह मला आठवावेत बोरकर आणि बोरकरांचे ज्ञानोबा त्यांच्या ‘पसायदाना’सह, त्यांच्या उदात्ततेसह ! मला आठवावे वसंत बापटांनी ‘शारदेला दिलेलं आमंत्रण’ आणि मला आठवावे त्यांचं ‘शिंग फुंकिले रणी’ कारण रणशिंग आम्ही फुंकलं नाही तर हतबल झालेल्या अर्जुनासारखे आम्ही हातपाय गाळून बसू आणि सध्या तर माझा कृष्णही उदास झालाय की हो!
हे महाकवे, तुम्ही दिलंत शब्दांचं दान, केलीत संस्कृतीला मूल्य प्रदान! तुम्ही लढलाय इंग्रजांशी, निजामांशी. हे महाकवे, त्या काळातही तुम्हाला होतं स्वातंत्र्याचं भान ! तुम्ही निर्मिलं ‘विशाखा’! हे महाकवे, स्वातंत्र्याच्या या काळात ‘विशाखा’ आठवून, ‘रणशिंग फुंकण्या’ऐवजी मी ‘बाशिंग’ बांधून का उभी आहे, मला सुद्धा कळत नाही!
हे महाकवे, मी म्हणणार नाही मला माफ कर. हे प्रभो,मला लढतं ठेव ! विजयी होता आलं नाही तरी हरकत नाही, तू मला आयुष्यातून साफ कर पण मी लढता लढता थांबू नये; कारण ही माझी मायमाऊली लढत आलेली आहे तिच्या जन्मापासूनच, तिचा उत्सव मी थाटामाटातच साजरा करणार!तडजोडीत नाही!

संपूर्ण समर्पण!

शुभं भवतु

वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻

कृष्णा ,

आज माझ्या आधी तू येऊन थांबला होतास. मला पाहताच प्रसन्न हसलास. मुक्त, स्नेहार्द्र आणि थंड वाहिलास. तुला वाटलं मला होईल आनंद, कारण तुला ठाऊक आहे माझा छंद ! पण उलटंच घडलं रे सारं. तुला पाहिलं आणि माझ्या डोळ्यातून घळघळ नाही खळखळ पाणीच वाहिलं. तुझ्या गळ्यात पडून मनसोक्त रडले रे मी ! तू भांबावलास, उदास झालास. मी गच्चीतून अंगणात येईपर्यंत तुझं सारंच रूप पालटलं. मी दरवाजा उघडला आणि रिकाम्या ओट्याने माझं मन अधिकच विषण्ण केलं. बाजूलाच होती रे फुलझाडं, तात्पुरतीच हलवलेली ; पण ती नेहमीच्या जागेवर नाही दिसली नि माझं काळीज हललं. माझं अंगण शांत, माझी सायली उदास आणि सायलीच्या पायाशी तू ही उदास ! खरं सांगू तू तिच्या पायाशी नाही रे तू तिच्या मुळाशी आहेस. सायली उदास झाली तरी तुला उदास होऊन कसं चालेल कृष्णा? तू मुळांना सामर्थ्य दिलं तरच सायली पुन्हा फुलेल ना, चंद्र तिच्याशी बोलेल ना ! असं सारं निराश , हतबल झालं, झाडाचं एकही पान नाही हललं तर मी कोणाकडे पाहायचं कृष्णा, कोणाकडे?

वृंदा आशय

🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻


हिरमुसलेली फुलं घेऊन
झाड आपलं उभंच आहे
त्याला ठाऊक आहे
फार फार तर काय होईल
एक जाऊन दुसरं येईल
फुलासाठी का खेद खंत
………………………….
काळ तर करत असतो
चावून चोथा झालेल्या
माणसांचा रवंथ……..

……. फुलांचं काय
मनावर घ्यायचं असतं
टोचलाच चुकून काटा
तर चुरगळून बाजूला
फेकून द्यायचं असतं!
हाच आहे निसर्गनियम
तरबेज झालोय आम्ही
की निर्ढावलोय आता
का पहिल्यापासूनच
आहोत असेच मुर्दाड
जीवाच्या आणि
टिचभर जीवनाच्या
कोत्या मनाच्या भीतीनं!

वृंदा आशय


||ॐ||

प्रिय भाईजी ,

तुम्ही शिकवलंत आम्हाला सत्य
दिलीत निर्भयता रुजवलीत मूल्य
जे रुजवलं ते अलवार उगवलं…

तुम्ही सत्यसूर्य तुम्ही कर्मधैर्य
तुम्ही होता हो एक नीतीपर्व
तुम्ही हो तुम्ही हो तुम्ही औदार्य!

तुमची साथ निरंतर
आणि इथली माणसं
जाणतात तुमचं अंतर

भाई, तुम्ही निश्चिंत राहा
झरोक्यातून येणारा प्रकाश
देतो साक्ष उज्ज्वल भविष्याची!

शुभं भवतु

वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻

आमंत्रण

ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातून फुटला असेल
ज्यांचा छंद राघवाच्या बाणासारखा सुटला असेल
ज्यांच्या जित्या फुप्फुसांना छिद्र नसेल अवसानघातकी
जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधून उठला असेल

ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहस्तंभाप्रमाणे
ज्यांच्या जिवात पोलादाचे उभेआडवे ताणेबाणे
ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरती
धरतीलाही स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाणे

सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल
त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल
मूर्तिमंत मृत्यूचीही आमनेसामने भेट होता
ज्यांच्या थडथड नाडीमधला ठोका मुळीच चुकला नसेल

ज्यांच्या अस्थी वज्रबीजे, नसांत उकळणारे रक्त
शारदेचे आमंत्रण… आज त्यांनाच आहे फक्त

कवी वसंत बापट (तेजसी काव्यसंग्रहातून )


मातृभूमीचा आणि मातृभाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे !

वंदे मातरम्!


यावर आपले मत नोंदवा