विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

नृसिंह जयंती विशेष

कृष्ण संदेश _ करी जो प्रार्थना त्यास लाभे करूणा !

कृष्ण संदेश

वाणि विद्यादायिनी नमामि त्वां!

जीवाहून जास्त मोल असलेल्या सीतेचा त्याग करणे राजा रामचंद्राचं प्राक्तन होतं. तर जीवच असलेल्या राधेला सोडून जाणं कृष्णाला भाग होतं. कारण मनुष्य अवतार घेतलेल्या या देवांच्या नियतीत ते आधीच लिहून ठेवले गेले होते. ….. तरीही, भारतीय संस्कृतीच्या उपासकांच्या नसानसातून वाहणारे राम-कृष्ण ‘प्रेमाचा’ संदेश देतात, ही मानवी जीवनाचे प्रतिनिधित्व करणारी विसंगती नव्हे काय?

….. हो. ही विसंगतीच. कारण त्यांनी धारण केलेला मानवी अवतार !

‘एक धागा सुखाचा
शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा
तुझीया आयुष्याचे’

हा मानवी जीवनाचा नियमच आहे आणि वरवर वाटणारी ही विसंगती जो सृष्टीचालक आहे तो मात्र सृष्टीच्या सुसंगतीसाठी निर्मित असतो किंवा या विसंगतीचा वापर एका महान सुसंगतीसाठी करत असतो; असे आपल्याला म्हणता येईल. मात्र ही महान सुसंगती आपल्या साध्या डोळ्यांना दिसू शकत नाही किंवा व्यग्र मेंदूला आणि व्यस्त मनाला आकलन देखील होऊ शकत नाही. ती कळणे आपल्या आवाक्यात नसते अशातला भाग नाही, मात्र त्यासाठी आवश्यकता असते, निरागस मनाची आणि निरामय जीवनाची! त्यासाठी आवश्यकता असते सृष्टीचा एक घटक म्हणून आपलं ‘व्यष्टीपण’ जपण्याची आणि याच धरतीवर ‘समष्टी’ जोपासण्याची!

कदाचित म्हणूनच कृष्ण म्हणतो….

” सृष्टी आहे तशी पाहुयात, दृष्टी विकसित करुयात.”

शुभं भवतु !

              वृंदा आशय 
     🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻


‘ओढ’ आणि ‘ओढ’

‘ओढ’ हा शब्द आपल्या सगळ्यांनाच अत्यंत परिचित असलेला असा आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द घेऊन आपण कृतिशील असतो. आज ‘ओढाओढ करणे’, ‘चढाओढ लावणे’ हे आमच्या बाजारकेंद्री जीवनाचे मध्यवर्ती सूत्र झालेले आहे. त्यामुळे आयुष्य ‘ओढत’ आपण जगत राहतो आहोत.

….. दुसरी ‘ओढ’ मात्र अतिप्राचीन आहे. चिरकालीन आहे. ती ‘हृदयाची ओढ’ आहे. सारी सृष्टी जिथे प्रेमवृष्टी करते त्या भारतीय संस्कृतीतली ती ‘ओढ’ आहे. माणसाला आत्मसन्मान देणाऱ्या आणि मित्रत्वाने उभ्या करणाऱ्या, जीवनाची ती अजोड जोड आहे.

……… खरंतर ‘तिच्या’मुळे माणसाचं आयुष्य मधासारखं गोड आहे. तिची सोबत हे सृष्टीचं आदीम तत्त्व आहे. ‘प्रकृती’ आणि ‘पुरूष’ यांच्या एकरूपतेशिवाय आपली सृष्टी अस्तित्वातच येऊ शकत नाही. ‘एकोहम् बहुस्याम्’ या इच्छेच्या मुळाशी हेच तत्त्व आहे. ही प्रकृती सुद्धा कशी असते तर पंचमहाभूतांपासून आणि तीन सूक्ष्म तत्वांपासून तयार झालेली अष्टधा प्रकृती असते. मला वाटतं कदाचित त्यामुळेच या प्रकृतीचाच, या आदिशक्तीचा अवतार अष्टभूजा देवीच्या स्वरूपात आपण पाहतो.
शिवाय ज्या गृहलक्ष्मीला आपण देवीच्या स्वरूपात पाहतो ती देखील ‘अष्टभुजाधारी’ असावी अर्थात ‘बहुकार्यात्मक’ असं तिचं रूप स्वरूप आपण अपेक्षितो. मात्र देविसारखी विविध रूपे तिने व्यक्त करण्यापेक्षा तिचं स्वरूप कायमच ‘सौम्य’, ‘प्रेमळ’ आणि ‘त्यागमय’ असावं अशी पुरुषप्रधान दृष्टिकोनातून रास्त अपेक्षा आपला समाज सातत्याने व्यक्त करतो. या अपेक्षेच्या अनुषंगाने शतकानुशतके ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ ही भूमिका स्त्री बजावत आलेली आहे. कारण तिला नैसर्गिक ओढ असते तिच्या गृहसौख्याची!

आज मात्र ही गृहसौख्याची ओढ, कुटुंबाची स्थिरता आपल्याला अनेकविध कारणांनी धोक्यात आलेली दिसते. व्यक्ती – कुटुंब – समाज – प्रदेश – देश – विश्व अशी साखळी आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला दिसून येतं; ज्या विश्वाच्या कल्याणाची आणि विकासाची आळवणी आपण सातत्याने करत असतो त्याचा पाया असलेली व्यक्ती ही अत्यंत ‘व्यस्त’ आणि ‘त्रस्त’ झालेली आहे. ज्या व्यक्तीला मध्यवर्ती ठेवून विश्वाची स्वप्नं आपण पाहतो ती व्यक्ती जर स्थिर नसेल तर विश्व अस्थिर होणारच. भारतीय ज्ञानपरंपरेतून विचार करताना खरं म्हणजे हे सूत्र आपण ‘सृष्टी – समष्टी – व्यष्टी’ अशा उतरत्या क्रमाने मांडतो. मात्र पाश्चात्त्य ज्ञानपरंपरा स्वीकारून आणि त्याचबरोबर ‘बाजारकेंद्री अर्थव्यवस्था’ अवलंबून आज आपण हे सूत्र भारतीय दृष्टिकोनातून व्यस्त पद्धतीने म्हणजेच ‘व्यष्टी – समष्टी – सृष्टी’ असे स्वीकारलेले आहे. त्यामुळे आपसूकच आमचे ‘धर्म’, ‘अर्थ’, ‘काम’, ‘मोक्ष’ हे जे चार पुरुषार्थ आहेत या चार पुरुषार्थांमध्ये सुद्धा ‘अर्थ’ आणि ‘काम’ हे प्राधान्याने पुढे येऊन ‘धर्म’ त्या पाठीमागे सारलेला दिसतो. त्यामुळे आपसूकच ‘मोक्ष’ या संकल्पनेलाच आपल्या जीवनातून ‘मोक्ष’ मिळालेला आहे. ‘मुमुक्षत्व’ संपुष्टात आल्याने जीवनाची युक्तता घटलेली आहे. जिथे युक्तताच नाही तिथे उपयुक्तता कशी असेल? मात्र दुर्दैवाने हे आपल्या लक्षात येत नाही.

आपल्या ज्ञानक्षेत्रामध्ये व जीवनव्यवहारामध्ये आपण ‘उपयुक्ततावादी’ आणि ‘सौंदर्यवादी’ अशी विभागणी करून जीवनाकडे पाहत असतो. ‘सत्यं शिवं सुंदरम्’ हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे ब्रीदवाक्य आणि त्याआधारे ‘सत्यमेव जयते’ यासारखे राष्ट्रीय बोधवाक्य जरी आपण स्वीकारलेले असले तरी या तीन तत्त्वांची आपण किती बुज राखलेली आहे, हे आपल्यापैकी प्रत्येकाला चांगले ठाऊक आहे. या चुकांना वेळीच स्वीकारून त्यात सुधारणा करण्याऐवजी आपण त्याला ‘शिष्टाचार’ ‘इकोसिस्टीम’ ‘प्रॅक्टिकल विज्डम’ यासारखी गोंडस नाव दिलेली आहेत. अर्थात आपल्या या कर्माची फळे आपण सर्वजण अपरिहार्यपणे चाखत आहोत. या फळांची सामूहिक कटू चव आपल्या गळी उतरेल तेव्हा कदाचित आपण पुन्हा एकदा परिवर्तनासाठी तयार होऊ. सध्या तरी अशा परिवर्तनासाठी कोणी एकटा- दुकटा तयार होतो, समूह गोळा करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला साम -दाम-दंड-भेद वापरून ‘ऑड मॅन आउट’ ठरवायला आपण चुकत नाहीत. अशा प्रकारच्या व्यक्तींना आपण हरत-हेने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या मागचा समूह हातोहात पसार होतो. अशी व्यक्ती समाजामध्ये पूर्णपणे ‘एकटी’ पाडली जाते, जुन्या भाषेत बोलायचं झालं तर ‘वाळीत टाकली’ जाते. या सर्व व्यवस्थेला पुरून उरू शकतील अशा सक्षम व्यक्ती असक्षम समाजामध्ये निपजतीलच कशा? ही व्यवहारातली लक्षणे दुर्लक्षित करून तात्विक पद्धतीने मात्र आम्ही सर्वच क्षेत्रात समाजाच्या निकस सृजनाला नावे ठेवत राहतो. मग इथे आपसूकच प्रश्न निर्माण होतो ज्या प्रगतीसाठी, ज्या विकासासाठी आम्ही आमच्या जीवाचा आटापिटा करतो आहोत किंवा किमानपक्षी तसे दाखवतो आहोत त्या विकासाची, प्रगतीची ‘ओढ’ आम्हाला खरोखर आहे का? की तिच्याअभावी आम्ही फक्त ‘ओढाओढ’ करत आहोत ‘चढाओढ’ लावत आहोत.
आपल्या जुन्या म्हणी आपल्याला हेच सांगतात ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल’, ‘इच्छा तिथे मार्ग’, यासारख्या म्हणी ‘संचिताचा अभाव’ पर्यायाने ‘क्रमबद्ध विकासाचा अभाव’ स्पष्टपणे अधोरेखित करतात. पण modern होण्याच्या नादात आपल्याला हे जुनं संचितच टाकाऊ वाटायला लागलं. ‘टाकाऊतून टिकाऊ’ निर्माण करण्याची शक्ती असलेली ‘पतितांना पावन’ करून खरी समता प्रस्थापित करण्याची मूलभूत क्षमता ही भारतीय संस्कृतीमध्येच आहे. मात्र दुर्दैवाने आजही आम्ही, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’, आणि ‘बंधुता’ ही तीन तत्त्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झालेली आहेत असंच शिकतो. वास्तविक पाहता जे भारतीयांच्या रक्तात आहे त्या घटकांची इतरांकडून उसनवारी करून इंजेक्शन घेण्याची आवश्यकताच काय? मग इथे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते आम्हाला ‘स्व-रूपा’ चा आजही विसर पडलेला आहे. किती काळ आम्ही मेकॉले यांच्या नावाने खडे फोडत बसणार? आमचे ‘स्व-रूप’ जोपर्यंत
न्यूनगंडात विरघळत राहील आणि अहमगंडात अवास्तव फुलत राहील तोपर्यंत आमच्या हाती काहीही लागणार नाही.

‘चूक स्वीकारणं’ ही ‘सुधारण्याची पहिली खूण आहे’, हे सांगणाऱ्या ‘हिंद स्वराज’ ला आम्ही विसरलो तर महात्मा गांधी आम्हाला कळतील कसे ? ‘सत्याचे प्रयोग’ करण्याची कुवत आमच्यात येईल कुठून? साधेपणातलं सौंदर्य जोपर्यंत आम्ही अनुभवत नाही तोपर्यंत

“It is very simple to be happy, but it is very difficult to be simple.”

हे घोकत राहण्याच्या पलीकडे आपण काय करणार?

🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻


https://www.facebook.com/share/p/1CffKoH1TE/








यावर आपले मत नोंदवा