विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

काव्य आदिशक्तीचे

राधा, रुक्मिणी, सीता यांनीच सांगावी आता गीता _

सर्व लेखन – वृंदा आशय


•| ॐ |•
कृष्ण संदेश
नाते प्रकृती आणि पुरूषाचे
प्रकृतीने पुरूषाच्या आज्ञेचे उल्लंघन करू नये आणि पुरूषाने प्रकृतीच्या इच्छेचा परम-आदर करावा.

ती श्रीरामांची सीता
ती कृष्णाची रुक्मिणी
ती तर देवाची भामिनी
ती आदिमाया ती आदिशक्ती
होऊन देवाची अर्धांगिनी
ती निर्माती होते सृष्टीकर्ती
अमंगल जे ते दूर सारते
होऊन ती शिवाची पार्वती
मंगल ते ह्दयाशी धरते
होऊन ब्रह्माची सरस्वती
लक्ष्मी होऊन विष्णुची ती
होते या सृष्टीची पालनकर्ती


श्रीहरिहरेश्वरार्पणमस्तु !



•|ॐ|•

ओ मेरे घनश्याम
कितनी प्यारी थी
आज अपनी शाम

ढलता हुआ सुरज
गया देकर नीरज
प्रसन्न हुई सॉंज

चलते चलते यूं ही
बुला रहे थे रामजी
झटसे लो मैं आयी

श्वेत वस्त्र पहनकर
कर रहे थे आराम
मन मे था भक्त काम

साथ थे लक्ष्मण भैय्या
और मेरी सीता मैय्या
कुलस्वामिनी और गुरुधाम

थे तैनात केसरीनंदन
कर के गणेशवंदन
निपटा रहे थे रामकाज

बड़ी कौतुक कृपादृष्टी
गुरूदत्तजी की प्रेमवृष्टी
आशीष करे देवकीनंदन

शीतल गंधित पवन
जैसे मलयगिरी से
लाया हो कोई चंदन !‌


श्रीराम आर्त ऐक हाक श्रीराम
तुला प्रार्थिते तू कर एक काम

तूच वसतो माझ्या अंतरी
धनुष्य हाती कधी बासरी

पवित्र मम अंतर जाहले
राम कृष्ण हरी इथे विसावले

येथे कैसी नांदे अपवित्रता?
तरीही रावण हरे सीता

आले रे मी तुझ्या सवे वनी
सत्याला मम मनी चिंतूनी

कधी जानकी कधी राधा रुक्मिणी

श्रीकृष्ण धरे जिला जनी मनी !


जनमन

चढला फुलला वेल सायलीचा
लाभे त्याला आशीष माऊलीचा

लगडले माझ्या घराला रामचांदणे
की म्हणावे त्याला कृष्णनांदणे?

चांदणनांदण्यात सवे येतेच वनिता
कधी राधा-कृष्ण कधी राम-सीता

भारतीयांचे हे आराध्य दैवत
पाझरते जेथे सारे हृदगत

हे सार आपुल्या संस्कृतीचे
प्रतिबिंब उमटते जनमनाचे!


|| ॐ ||

कृष्णाई

मुली वयात आल्या की
पदोपदी ‘आई’ होते अपमानित
लज्जित आणि कधी पराजितही
पण
आपण सगळ्यांनीच हे जाणलं पाहिजे
कपडे घालण्यावरून
दारं लावण्यावरून
एकटं राहण्यावरून
अनेक विषय असतात वादाचे
खास असे आई आणि मुलींचे
मुलीला वाटतो तो अट्टहास
आईची असते ती काळजी
काळीज चिरत जाणारी

आईला माहीत असतं
हे मुलीला कळणारच नाही
जोपर्यंत ती होत नाही आई
आईपण तिच्या वाट्याला यावं
तिच्या बाईपणाचा सन्मान करत
यासाठीच असतो आईचा हा अट्टहास !

आईला वाटते रात्रंदिवस काळजी
संस्कृतीने दिलंय गं कृष्णाचं संचित
मान्य आहे ते खरचं नसतं कधी सरत
सगळ्यांना पुरून उरतो
तो येतो जेव्हा धावत
पण हे संचित आपल्या वाट्याला यावं
यासाठी भाग्य लागतं ग
आणि त्यासाठी जपावं लागतं
आपलं बाईपण……

एकेकट्याच असतात
राधा आणि रुक्मिणी
युगानुयुगे चालते त्यांची कहाणी
कधीतरी त्या होण्याचा अट्टहास
गोपींनीही करून पाहिला
पण कृष्ण गेलाच ना
त्यांना सोडून……

म्हणून सांगते पोरी
तू आपली राहा बरी
कृष्ण होऊन आली आहे
तुझी आई तुझ्या घरी!


काळा माझा विठ्ठल
तो पंढरपुरचा बाणा
आहे मोठा स्नेहल
तो द्वारकेचा राणा

तो आला पंढरपूरला
जणू रुक्मिणीचा बहाणा
तेथे भेटला पुंडलिकाला
अन् झाला पतित पावना

सेवेत तल्लीन भक्त
दिली त्याला वीट
म्हणे थांब थोडा फक्त
लावले भक्तीचे तीट

सेवेला मायबापाच्या
देवही पाहा भुलला
हाकेला युगायुगांच्या
तो पावतच राहिला.


प्रिय कृष्णा,

एक पसायदान देतोस का रे?

     या मर्त्य जगामध्ये ‘देव’ आहे किंवा नाही यावर वाद घालणारे अनेक बुद्धिवादी तुला सहजतेनं सापडतील. देव सर्वत्र कसा आहे आणि देव कुठेच कसा नाही या दोन्ही गोष्टी इतक्या सबळ पुराव्यांनी आणि अचूकतेने सिद्ध केल्या जातात की तुला तुझ्यावरच शंका निर्माण झाली पाहिजे, इतकी आम्ही माणसं प्रगत झालेले आहोत.

लोक तुला भजतात रे, नाही अशातला भाग नाही. पण खरं सांगू का? त्यामध्ये ना निखळ भक्तीपेक्षा भीतीचा भाग अधिक असतो. माझं कसं होईल,  माझ्या लोकांचं कसं होईल या विवंचनेत असणारा माणूस, ‘तुझं कसं होईल’, याचा कसा विचार करू शकेल? शिवाय लोकांना जर या प्रश्नाचा विचार करावा लागला ना तर खरंच सांगते जगातून तुझी भक्ती वगैरे ताबडतोब संपुष्टात येईल.

एखादेच स्वामी विवेकानंद असतात रे जे निरागस बालक म्हणून तुझ्यावर श्रद्धा ठेवतात, कठोर चिकित्सक म्हणून तुला प्रश्न विचारतात आणि रामकृष्णांच्या सहवासाने धन्य होऊन काली मातेच्या मंदिरात कठीण परिस्थितीतही कोणत्याही भौतिक गोष्टींची मागणी न करता, सलग तीन वेळा

“शक्ती दे ,भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे” हीच मागणी करतात.

स्वतःच्या नावातील ‘विवेक’ आणि ‘आनंद’ ही दोन्ही पदं त्यांनी अक्षरशः सिद्ध केली आणि ते त्यानुसार जगले. आज ते युवकांचे चिरंतन प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात. बघ, त्यांना विचार कसं चाललंय म्हणून?

असो. साऱ्या जगाला सांभाळतोस तू; स्वतःची काळजी घे बाबा. तुझी रुक्मिणी ही तुझ्यावर रुसून निघून गेली. तिच्या शोधात पंढरपुरात जाऊन विठ्ठल झालास. तिथेही तुझं वेगळं मंदिर! बघ बाबा , विचार कर ; सोपं नसतं रे दुखावलेल्या स्त्रीला पुन्हा आपलंसं करणं. शेवटी १६,१०८ जणी तुझ्यासोबत असल्या तरी रुक्मिणी ती रुक्मिणीच, हे मी तुला सांगावं असं थोडंच आहे?

मला माहिती आहे रे, तूच कर्ता – करविता आहेस. कधीतरी तुलाही विसाव्याची गरज वाटत असेल ना. एरवी तर येतोसच, दुःखात आम्ही बोलवतोच तुला तेवढ्या आर्ततेने आणि हक्कानेही ! पण एक वर दे देवा, सुखाच्या क्षणीही तुझा कधीच विसर न व्हावा. कुंतीसारखं सतत दुःख मागावं, हे सामर्थ्य नाही रे माझ्यात. खरं सांगू का कृष्णा, खूप थकले रे मी आता. अनेक पातळ्यांवर एकाच वेळी तू लढायला लावलंस मला. खरं म्हणजे अनेक ठिकाणी तूच लढलास, मी हतबल झाले की तुझ्या गळ्यात पडून ढसढसा रडायचे. पहाटेच्या किलकिल्या अंधारात ते अश्रू कोणाला दिसू नयेत याची व्यवस्था तूच तर करत होतास. तुला माहिती आहे का पण, त्याची जाणीव ठेवत नाही रे कोणी! असो. मी काय इतरांसारखी तक्रारी करायला लागले तुझ्याजवळ ? वेडीच आहे मी सुद्धा.

तू मला भेटलास आणि माझं दुःख सुद्धा तू सुखरूप केलंस ही वस्तुस्थिती आहे. तुझी कृतज्ञच आहे रे मी. तुझ्याइतकं हक्कानं,  प्रेमानं कोण काळजी घेणार माझी? म्हणूनच मी आता तुझी होऊन गेले बघ. इतर कोणाशी आणि कशाशीही मला काही घेणं देणं नाही. 

पण गंमत सांगू का कृष्णा, असा विचार मनात आला की लगेच संत ज्ञानदेव समोर येतात त्यांचा ‘चिद्विलासवाद’ घेऊन. माऊलीच ती. त्यांच्या एका ओवीचा जरी डोक्यावरून हात फिरला ना की भाग्यरेषाच बदलून जातात बघ. म्हणून म्हणते तुला तू ये आपण दोघेही त्यांच्याचजवळ राहू आणि सुखी होऊ. माय मराठी पासून आणि माऊलींपासून कधी अंतर पडू नये एवढेच एक वरदान दे बाबा. मग मागायचं काही बाकी राहात नाही बघ.

तुझीच मी.





यावर आपले मत नोंदवा