विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

अभिजात मराठी भाषा सप्ताह

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी एवढ्या जगत माय मानतो मराठी !

‘ज्ञानोत्सव’ संकेतस्थळाच्या सर्व रसिकांना दिनांक ०३ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर या कालावधीत साजऱ्या झालेल्या अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! यावर्षीची महत्त्वाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन हे विशेष पान आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘तरी न्यून ते पुरते | अधिक ते सरते’ अशी संत ज्ञानदेवांच्या शब्दात रसिकजनांना विनवणी करून प्रारंभ करते मायमराठीच्या उत्सवाला ! – वृंदा आशय


१. आदर्श जीवन कसे असावे याचा शाश्वत वस्तुपाठ देणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीची मूल्याधिष्ठित पायाभरणी करणाऱ्या श्रीरामांना मनोभावे वंदन करत; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची विनम्र आठवण करत ही काव्यरचना श्रीरामचरणी समर्पित !

श्रीरामा आर्त ऐक हाक श्रीराम

तुला प्रार्थिते तू कर एक काम

तूच वसतो माझ्या अंतरी

धनुष्य हाती कधी बासरी

पवित्र मम अंतर जाहले

राम कृष्ण हरी इथे विसावले

येथे कैसी नांदे अपवित्रता?

तरीही रावण हरे सीता !

आले रे मी तुझ्या सवे वनी

सत्याला मम मनी चिंतूनी

कधी राधा कधी रुक्मिणी

श्रीकृष्णासवे जी जनी मनी

का रे तिला करतो निरुत्तर ?

पंचकन्या स्मरे ती निरंतर !

वृंदा आशय


२, संत ज्ञानदेवांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती उत्सवाला स्मरून हे काव्य ईश्वरचरणी समर्पित करते.

आनंदाचे डोही | आनंद तरंग |
उभा पांडुरंग | देही माझ्या ||

घडे येथे सर्वथा| विठ्ठलाचा जप|
होई होई तप| जीवन अवघे ||

संत सारे येथे| तत्त्वे रुजवती |
वाळवंटीची भक्ती| अंतरी फुले ||

आनंदाचे डोही | आनंद तरंग
नांदे रे श्रीरंग | हृदयी माझ्या ||

वृंदा आशय

——————————————-


३. राज्यघटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु आहे. त्या अनुषंगाने एखादा लेख आपल्या पानावर असावा अशी फार इच्छा होती. प्रयत्नही केले. मात्र काही कारणाने कालपर्यंत संबंधित लेख मिळू शकले नाहीत. आणि आज हे पान आमचे रसिक वाचक आणि व्यासंगी लेखक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांच्याशी सामायिक करताच त्यांनी उत्स्फुर्तपणे रघुनंदन पायी गेला ! हा लेख मला वाचण्यासाठी पाठवला. लेख वाचल्यावर इतका अभिजात लेख ‘ज्ञानोत्सव’च्या या पानावर असावा, ” ही तो श्रींची इच्छा” , असा अर्थ मला प्रतीत झाला. लेखकाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करत सानंद प्रकाशित करत आहे –

रघुनंदन पायी गेला !

संपूर्ण जगाचा इतिहास अभ्यासला तर प्राचीन आणि अर्वाचीन कालखंडामध्ये आपल्याला काही आदर्श राज्यांचे मापदंड भारतीय इतिहासात पहावयास मिळतात .त्यापैकी प्राचीन कालखंडामध्ये प्रभू रामचंद्रांचे राज्य आणि अर्वाचीन कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आदर्श राज्याच्या परिमाणांच्या कसोट्यांवर पुरेपूर उतरते. ह्या दोन्ही राजवटींमध्ये ‘सत्तेपेक्षा सत्याला’ अधिक महत्त्व दिले जातं होते .सत्याचा आदर अंतरीच्या उमाळ्याने तर कधी ज्येष्ठांनी आणि वरिष्ठांनी लक्षात आणून दिल्याबरोबर सर्व ताकदीनिशी अंमलबजावणी करुन केला जाई. किंबहुना सत्याच्या प्रतिष्ठेसाठी सत्तेची प्रतिष्ठा पणाला लावली जायची.


अयोध्या नगरीत उषःकाल झाला होता. पशुपक्षी गीतं गात होते. अरुणोदयाची सारी चिन्ह क्षितिजावर प्रतीत होत होती. पिवळ्या तांबूस रंगाच्या छटा जणू काही नानाविध रंगांची उधळण करत होत्या.जंगलातही जाग आली होती. ओढेनाले खळखळ वाहत होते. अयोध्या नगरीत ब्रह्म मुहूर्तावर मंडळी जागी झाली होती.तरुण कुस्त्यांच्या आखाड्याच्या दिशेने धाव घेत होते. प्रौढांची स्नानांसाठी शरयुकडे पावले पडत होती. मंदिरामंदिरातून भुपाळ्यांचे स्वर निनादत होते. राज महालात राजा दशरथलाही जाग आली. त्याने आपली प्रात:विधी आटोपली. देवघरात जाऊन पूजा उरकली;कपाळी गंध लावला .राजवस्त्र परिधान केली आणि तो आरशासमोर उभा ठाकला. काय नवल? त्यांच्या कानाच्या वर एक केस पिकलेला त्याने पाहिला आणि जणू काही तो केस राजाला सांगत होता ,” महाराज, म्हातारपण जवळ येतं चाललंय आणि मृत्यूही फार लांब नाही.” संत तुकाराम महाराजांनी हा त्यांच्या मनातला भावनांचा कल्लोळ आपल्या प्रासादिक वाणीत रेखाटला आहे .”जरा कर्णमूळी सांगो आली गोष्टी | मृत्यूचिये भेटी जवळी आली|| आता माझ्या मना होई सावधान |पुण्याची जाण कार्यसिद्धी||” या उदात्त जाणीव जागृतीने राजा दशरथाने सिंहासनारूढ होताच मनोमनी निश्चय करून टाकला की लवकरच आपण आता सेवानिवृत्त व्हावं आणि राज्याचा कारभार श्रीरामाच्या खांद्यावर द्यावा. या संकल्पाची सिद्धी करण्यासाठी त्याने त्वरित मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. राजगुरू महर्षी वशिष्ठांनाही निमंत्रण धाडलं. भरलेल्या सभेत आपला मनोदय व्यक्त करताना राजा दशरश म्हणाला,
“मंत्रीगण हो, आजपासून कामाला लागा .प्रभू रामचंद्र लवकरच राजा व्हावा; सिंहासनारूढ झालेल्या रामचंद्राला पहाण्याचं भाग्य मला मिळावं आणि तुम्ही त्याचे साक्षीदार व्हावं; यासाठी कामाला लागा. राज्याभिषेकाची तयारी सुरू करा. बाकी सारी व्यवस्था राजर्षी वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल.”
राजा बोले आणि दल हाले; असं म्हटलं जातं ; ते काही खोटं नाही. साऱ्या प्रजाजनांच्या आनंदाला सीमा उरली नाही. गावोगावी दवंडी देण्यात आली. श्री रामचंद्र राजा होणार; ही शुभवार्ता लोकांच्या कानावर गेली.आनंदाला उधाण आलं होतं . पहाता पहाता सारी अयोध्या नगरी शोभायमान झाली. गुढ्या – तोरणे उभारून आयोध्येतील घरे सजली होती.उद्या राज्याभिषेक होणार होता .संपूर्ण अयोध्या नगरी जागी होती . रस्त्यांवर सडे टाकले जात होते. रांगोळ्या काढल्या जात होत्या. रथ सजवले जात होते .ढोल ताशे,टाळ ,विणा , मृदंग, सनई चौघड्याच्या निनादात श्रीरामाची भव्य मिरवणूक निघणार होती आणि प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता .इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदाने आबालवृद्ध बागडत होते.


राजवाड्याच्या महालात मात्र एक प्रकरण शिजवलं जात होतं. राजा दशरथाने कैकयीला दिलेले दोन वर मागून घेण्याची हीच वेळ आहे ; असा आग्रह दासी मंथरा कैकयीकडे धरत होती,”राणीसाहेब, वेळ दवडू नका. माझं ऐका. तुम्हाला हात जोडून आणि पाया पडून विनंती करते की राजा दशरशाने तुम्हाला देऊ केलेले दोन वर मागून घ्या. एका वराने अयोध्येचा राजा तुझा सुपुत्र भरत होईल आणि दुसऱ्या वराने प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनात जाईल. मी तुमची हितचिंतक आहे . तुमच्या सेवेत मी माझं जीवन खपवले आहे . मी तुमच्या प्रत्येक आज्ञेचे आजवर पालन केले आहे ,आता माझं फक्त एवढेच ऐका, हात जोडून आणि पदर पसरून मी तुम्हाला विनंती करते, ऐकाल ना?”


तिच्या लघवी बोलण्याचा नेमका परिणाम कैकयीवर झाला आणि तिने राजा दशरथाला आपल्या महालात उपस्थित राहण्याचा निरोप धाडला. लगबगीने राजा दशरथ कैकयीच्या महालात उपस्थित झाला. झोपेचे सोंग घेतलेल्या कैकयीला विनवू लागला, “उठा , राणीसाहेब उठा .विश्वातली सर्व सुखं आपल्या आयोध्येत उतरले आहेत . आपला जिवलग रामचंद्र उद्या मंत्रघोषात आयोध्येचा राजा होईल आणि तुम्ही अशा उदासवाण्या का ? उठा, चला, उठा.”


कैकयीने नेमकी वेळ साधली आणि राजा दशरथाकडे आपले संकल्पित दोन वर मागितले. रघुकुल रीत सदा चली आई|प्राण जाई पर वचन न जाई|| अशी रघुकूलाची रीत तिने राजाच्या लक्षात आणून दिली. राजा दशरथाने दिलेल्या वचनाला जागून दोन्ही वर देऊन टाकले. सकाळ झाली होती .अयोध्येत मंगल वाद्य वाजत होती. प्रभू रामचंद्राने मंगल स्नान करून राजवस्त्र परिधान केली होती. राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झाली होती, आपल्या माता पित्याच्या, गुरुजनांच्या आणि कुलदैवताच्या दर्शनासाठी तो निघाला होता आणि अशा वेळी ही वार्ता त्यांच्या कानावर आदळली. विलंब न करता त्याने भरजरी राजवस्त्र खाली उतरवली, वल्कले परिधान केली आणि सिंहासनाच्या दिशेने पडणारी त्याची पाऊले आता वनाच्या दिशेने पडत होती.आपल्या जन्मदात्या पित्याचे शब्द खरे करण्यासाठी आणि आईच्या मनोदय पूर्तीसाठी वनात रघुनंदन पायी गेला !


हे अघटीत कृत्य पाहून एक रामभक्त पुढे आला आणि त्यांनी आपला देह रामचंद्रांच्या चरणांवरती लोटून दिला आणि तो सद्गदित होऊन विनवू लागला , “प्रभू ,चला सिंहासनाच्या दिशेने चला. सिंहासनावर विराजमान व्हा. सारी प्रजा तुमच्या बाजूने आहे. बहुमत तुमच्या बाजूनी आहे.”
प्रभू रामचंद्राने त्याला आपल्या दोन हाताने पायावरून उचललं आणि प्रेमभराने आपल्या छातीशी लावून ते म्हणाले, ” भक्त राजा, बहुमत माझ्या बाजूने असलं तरी दोन मतं मात्र माझ्या विरोधात आहे.एक माता कैकयीचे आणि दुसरे दासी मंथरेचे.म्हणून मी सार्वमतात नाही. मला बहुमत नको; सार्वमत हवे आहे ;तेंव्हा कुठे हा राम अयोध्येच्या राजसिंहासनावर शोभून दिसेल; येतो मी. “
प्रभू रामचंद्र पाय उचलून चालू लागले.त्यांच्या पावलांचा मागवा घेत सीता निघाली होती आणि त्यांच्या मागे लक्ष्मण जड झालेली पावलं उचलून टाकतं होता.त्याच्या कानात कोणतरी कुजबुजत होतं, राम राज्यात बहुमतापेक्षा सार्वमत श्रेष्ठ असतं.

डॉ. ज्ञानेश्वर थोरात

परिचय
१)प्रा.डॉ. ज्ञानेश्वर थोरात
अभ्युदय, अमरनाथ नगर
मुपो. मंचर ता.आंबेगाव जि. पुणे ४१०५०३
भ्रमणध्वनी ९८६०७६२४९०

२)सुप्रसिद्ध व्याख्याते, किर्तन-प्रवचनकार, संत साहित्याचे साक्षेपी भाष्यकार

३)रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून इंग्लिश ,मराठी विषयाचे 29 वर्ष अध्यापन

४)पीएच.डी च्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक

५)राष्ट्रीय छात्र सेनेचे वरिष्ठ अधिकारी

६)”जीवन विकास”, “संतकृपा” मासिकातून सतत लेखन

७)प्रसिद्ध साहित्यकृती १)हरिनाम वेली २)वाग्विलासनी


४. निजामी राजवटीत मातृभाषेची सेवा करण्याच्या उद्देशाने १९१५ साली स्थापन झालेल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परंपरेला अभिवादन –


गोविंदभाई श्रॉफ यांचे स्मृतिस्थळ

१९१५ पासून मातृभाषेच्या सेवेत कार्यरत असलेल्या त्या अखंड धगधगत्या परंपरेला विनम्र अभिवादन !


अभिजात भाषेची संकल्पना – काही ठळक मुद्दे

डॉ. सतीश बडवे ( हेमांगी मासिकाच्या विशेषांकात लेखकाच्या प्रकाशित झालेल्या लेखातून..)

अभिजात मराठी भाषेच्या खुणा प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे आढळते. मराठीच्या या खुणा विविध ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आहेत. मराठी भाषा आणि साहित्याच्या खुणा बघितल्या की, मराठीची वैभवशाली परंपरा स्तिमित करणारी ठरते. समृध्द आणि सकस असणारी ही, आपली सशक्त परंपरा आहे. जिचा इतिहास प्राचीनतम आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला याचा अर्थ मराठीची ऐतिहासिक व सांस्कृतिक समृध्दी मान्य करण्यात आली. होता. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगु, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना यापूर्वी हा दर्जा दिलेला होता. २०१३ साली प्रा. रंगनाथ पठारे समितीने यासाठी अन्य मान्यवर सदस्यांच्या मदतीने परिश्रमपूर्वक हा अहवाल तयार केला होता. प्रा. हरी नरके, डॉ. श्रीकोत बहुलकर, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. नागनाथ कोत्तापले, सतीश काळसेकर, प्रा. आनंद उबाळे आणि काही शासकीय पदाधिकारी या समितीत होते.

अभिजात दर्जा त्याच भाषेला दिला जातो, जी भाषा केंद्र सरकारने दिलेले निकष पूर्ण करते. जे निकष असे आहेत: भाषेची प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषिक आणि वाङ्‌मयीन परंपरेचे स्वयंभूषण आणि प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले / असलेले नाते. या सर्व निकषांवर मराठी भाषा उतरली.

महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि आजची मराठी असा हा आपल्या मराठीचा प्रवास आहे. या तीन वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची तीन रूपे आहेत. अभिजात भाषेचा मिळालेला हा दर्जा भाषा संवर्धनासाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यासाठी राज्याला भरीव अनुदान देण्याची तरतूद आहे. त्यातून मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे, महाराष्ट्राच्या सर्व विद्यापीठांमधून मराठी शिकवण्याची सोय करणे, प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करणे, ग्रंथालये सशक्त करणे, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, विद्यार्थी यांना साह्य करणे इत्यादी कार्य होणे अपेक्षित आहे.


https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2025/08/blog-post_12.html

ते अमृताचे बोल – गुरुवर्य डॉ. सुधीर रसाळ सरांचे मराठी भाषेविषयीचे चिंतन



या सप्ताहाच्या निमित्ताने पस्तुरीवरून ऐका वृंदा आशयचे भाषेविषयीचे एक चिंतन : अभिजात मराठी भाषा सप्ताह

https://jagar-swatantryacha.blogspot.com/2021/10/blog-post.html

हे राष्ट्र देवतांचे – ग. दि. माडगूळकर यांच्या गीताचे रसग्रहण – वृंदा आशय – ब्लॉग पुन:प्रकाशनाचे प्रासंगिक निमित्त – जयंती – दि. ०१ ऑक्टोबर


माझ्या स.भु. मध्ये साजरा झालेला अभिजात मराठी भाषा सप्ताह

सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात अभिजात मराठी भाषेच्या चर्चेत रमलेले आणि ‘भाषा मरता देशही मरतो,संस्कृतीचाही दिवा विझे’ या कटू वास्तवाने अंतर्मुख झालेले विद्यार्थी प्रा. वृंदा देशपांडे – जोशी यांच्या समवेत.

‘देशप्रेमी’ ही स्वरचित कविता सादर करताना बी.एससी. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रगती जगन गव्हाड

स.भु.च्या विद्यार्थ्यांची ग्रंथालय आणि वृत्तपत्र कार्यालय अभ्यास भेट
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभिजात मराठी गौरव दिनानिमित्ताने बलवंत वाचनालय आणि सामना या वृत्तपत्राच्या कार्यालयास विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी बलवंत वाचनालयाची ओळख करून घेत दाखल अंक, वर्गांक, पुस्तकांची नोंद, देवघेव विभाग, दुर्मीळ पुस्तके आदींची माहिती जाणून घेतली. सामना या दैनिकाची माहिती पंजाबराव मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. अवतीभवतीच्या घटना घडामोडी ते त्याची होणारी बातमी त्यानंतर संपादकीय संस्कार आणि संपादकीय विभाग आदींची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती यावेळी बलवंत वाचनालयाच्या ग्रंथपाल पगारे मॅडम यांनी वाचनालयाची सखोल माहिती दिली, यावेळी वाचनालयातील ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक कोल्हे एस. एस. डॉ. नागेश अंकुश, प्रा. राजेंद्र सपकाळ, प्रा. शाहू पाटील, प्रा. जागृती पांडे, निशा पांडे हे शिक्षक सहभागी होते. यावेळी महाविद्यालयतील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. .


सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे लेखन

Oplus_16908320

डिजिटल युगातील मराठी : परंपरेचा आणि तंत्रज्ञानाचा सेतू

भाषा म्हणजे फक्त शब्द नाहीत, त्या म्हणजे भावना, आठवणी आणि आपल्या मनाच्या छोट्या छोट्या गोष्टी. मराठी माझ्यासाठी केवळ मातृभाषा नाही — ती एक भावना आहे जी प्रत्येक “नमस्कार” मध्ये, प्रत्येक “काय झालं रे?” मध्ये जिवंत असते. लहानपणीच्या अंगाईगीतांपासून ते आजच्या शिकवणीपर्यंत, मराठी ही घराची, आपुलकीची आणि उबदारपणाची भाषा आहे. आज जग हजारो भाषांमध्ये बोलतं, पण मराठी अजूनही त्या सगळ्यांच्या मधोमध आपली शांत, गोड जागा ठेवते.

मराठीचा प्रवास खूप जुना आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या अभंगातून मराठीने भक्तीचा सूर घेतला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मराठीला जागृतीचा आवाज दिला. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, आणि वि. स. खांडेकर यांनी मराठीला हास्य, तत्त्वज्ञान आणि हृदय दिलं. पानांवर लिहिलेली, पुस्तकांत छापलेली, आणि आता मोबाईलच्या स्क्रीनवर टाईप होणारी — मराठीने प्रत्येक काळाशी जुळवून घेतलं आहे, कारण ती लोकांची, त्यांच्या भावनांची भाषा आहे.

आजच्या डिजिटल जगात मराठी हरवली नाही, ती बदलली आहे. ती रील्समध्ये नाचते, मीम्समध्ये हसते, आणि यूट्यूब, पॉडकास्टमधून नवी कहाणी सांगते. आजची तरुण पिढी मराठीला नवा स्पंदन देत आहे — परंपरा आणि टेक्नॉलॉजी यांचं सुंदर मिश्रण करून. प्रत्येक मराठी कॅप्शन, प्रत्येक छोटं वाक्य, प्रत्येक संवाद — या सगळ्यांनी आपली भाषा पुन्हा जिवंत ठेवली आहे.

कधी कधी मात्र थोडं वाईट वाटतं, जेव्हा लोकांना मराठी बोलायला लाज वाटते, कारण इंग्रजी “कूल” वाटतं. पण खरा आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या गोष्टींमध्ये अभिमान बाळगणं नाही का? आपण इंग्रजीत शिकू शकतो, काम करू शकतो, पण विचार, स्वप्नं आणि भावना मात्र मराठीच असतात. मातृभाषा वापरणं हे जुनं नाही, ते आपलं मूळ आहे. टेक्नॉलॉजीने मराठीपासून आपल्याला दूर नाही केलं — उलट तिला नवे पंख दिलेत.

मराठी फक्त पुस्तकात नाही, ती आपल्या आईच्या “गुड मॉर्निंग” मेसेजमध्ये आहे, गाण्यांमध्ये आहे, आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत आहे जिथे शब्द अपुरे पडतात पण भावना बोलतात. मराठीचं रक्षण करायचं नाही — ती जगायची आहे, रोजच्या बोलण्यात, लिहिण्यात, आणि आपल्या जगण्यात. आपण ती पिढी आहोत जी भूतकाळ आणि भविष्य यांच्या मधोमध उभी आहे — आणि आपण काय बोलतो, त्यावर उद्याचं मराठी ठरणार आहे.

कारण या सगळ्या डिजिटल आवाजांमध्ये, एआयच्या भाषांमध्ये, अजूनही सर्वात जिवंत, उबदार आणि आपुलकीचा आवाज असतो — आपल्या मराठीचा. 🌼

-विशाखा दिनेश भालेराव


अचानकच, कसं शांत होऊन जातं !

कोणी सोबतचं दूर गेलं तर कसं शांत होऊन जातं!

निसर्ग आधी कानाचा ताबा घेतो मग मनाचा !

शांत असलं की सगळं काही ऐकू येतं. पक्ष्यांची किलबिल, झाडांच्या पानांचा आवाज तर उन्हाची चाहूलही, लेकरांचा, हसण्याचा, रडण्याचा, इथपर्यंत की मनं बोलताना सुद्धा ऐकू येतात आणि मन रडताना पण, मनात चालू असणारी विचारांची आरडा ओरड पण. जी नितळ पाण्यासारखी शांतता असते त्या मध्ये शांतता कमी, आवाज जास्त असतो. काही तरी सांगून जाणारा आवाज, त्या नितळ पाण्यासारख्या शांततेत सगळ्यांना सामावून घेणारा आवाज.

आता शांततेत ही फरकच !

गावाकडची शांतीची शहरत्याल्या शांतीला काय सर येणार? शहरातील आवाजाची एवढी सवय होऊन जाते की शांततेची ओळख ही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहजच होता येता पण शांततेत सहभागी होणं काही तरी वेगळंच आहे !


विद्याताई देविदास देशमुख

अत्यंत सोशिक, निर्भिड, सोज्वळ, कष्टाळू, प्रेमळ, साहसी व्यक्तिमत्व म्हणजे मा. शिराळकर मावशींच्या भजनी मंडळातील विद्याताई देशमुख. कैलासवासी देविदास देशमुख यांच्या सुविद्य पत्नी. तरुणांनाही लाजवेल असा विद्याताईंचा उत्साह वाऱ्याच्या गतीने चालणं आणि समोरच्याला जरब बसेल असा पहाडी परंतु सुरेल आवाज ऐकूयात त्यांच्याच आवाजात कवी ना. गो. नांदापूरकर यांची कविता.


हे कृष्णा….

किती काळजी घेतोस रे तू
थक्क माझे काळीज होते
सांग बरे तू मला, निभावतोस
मजसवे कोणत्या जन्मीचे नाते ?

प्रश्न ऐकून माझा वेडा
गाली हसला कृष्ण थोडा
सोडून प्रश्न नि:शंक वागा
जन्मजन्मांतरीचा हा धागा

कधी न दिले तू मज हवे ते
देतोस नेहमीच जे योग्य ते
ज्याने वाढे माझी योग्यता
कशी कृतज्ञ होऊ रे भगवंता?

निर्मूनी तू इच्छा मनी
वाढवी आर्तता त्या क्षणी
सोडून सारे मी धावत यावे
त्या क्षणात तुलाच जगावे

करून घेतोस पूर्ण समर्पण
म्हणू कसे माझे वेगळे मन?
पाहू जाता रे मी दर्पण
तूच दिसशी मला सुदर्शन!

वृंदा आशय

आर्त प्रार्थनेपासून, मनोभावे उपासना करत अद्वैतापर्यंत प्रवास करणाऱ्या अभिजात भारतीय संस्कृतीला विनम्र अभिवादन करत ही साहित्यकृती समर्पित ! वृंदा आशय

यावर आपले मत नोंदवा