युवा पिढीला ऐकूया – त्यांना समजून घेऊया !

गोपाला
ये रे तू गोपाला
घेऊन गाय वासराला
ती गाय
आमची माय
वासरू ओढाळ
सांगे मनोजय
घेता परीक्षा ब्रह्माने
तू नटलास धेनुरूपाने
ऐकता तिची हाक करूण
बृहन्नडेचा झाला अर्जुन
करितो आम्ही तिचे पूजन
गोरस जिचा करितो पोषण
तिच्या कृपेने सात्त्विक सृजन
तिचे पूजन ; तुला समर्पण !
वृंदा आशय
सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वर्गातील ‘वक्तृत्व – स्वरूपविशेष’ या अभ्यासक्रमातील भागाचे वर्गात घेतलेले प्रात्यक्षिक. या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘माझं स. भु. – माझे विद्यार्थी’ ,आपल्या सगळ्यांसाठी करत आहेत दीपावली शुभचिंतन ! हे चिंतन आपण गोड करून घ्यावे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे ही आपल्याला नम्र विनंती.
विद्यार्थ्यांचं ‘चुकणं’ म्हणजे विद्यार्थ्यांचं ‘असणं’ असतं ; हा माझा ठाम विश्वास आहे. चुकत माकत विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोगच त्यांना खूप काही शिकवून जातात. त्यामुळे जसं वर्गात घडलं तसंच हे आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत कोणत्याही विशेष संस्करणाशिवाय ! हे सर्व विद्यार्थी आपल्या समाजाच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करतात. युवा पिढीला ऐकूया – त्यांना समजून घेऊया!
यामध्ये सहभागी आहेत प्रस्तावना – प्रा. वृंदा देशपांडे , दीपावली शुभेच्छा -प्राजक्ता दत्ता मोहिते,
वसुबारस – पूजा गंगाधर शिंदे, धनतेरस – ऋतुजा अशोक राऊत, नरक चतुर्दशी – वैष्णवी बद्रीनाथ शिंदे,
लक्ष्मीपूजन – जयश्री मच्छिंद्र भराडे, पाडवा – प्रा. वृंदा देशपांडे – जोशी, भाऊबीज – स्नेहल श्रीराम राजदेव
स. भु. विज्ञान महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या ‘दीपावली स्नेहमीलन’ कार्यक्रमात प्रास्तविक करताना प्रा. वृंदा देशपांडे – जोशी
शुभंकर अभय माकणीकर

पैसा हे साधन आहे धन नव्हे.
Health is wealth.
Time is money
तू कसा देवासारखा भेटलास !
यासारख्या आपल्या म्हणी आणि उत्कट उद्गार कदाचित हेच सांगतात.
ज्या गोष्टीचा अभाव असतो ती गोष्ट मौल्यवान असते आणि त्या त्या वेळेला ती संपत्ती होते, ही वस्तुस्थिती आहे. पैसा देखील वाम मार्गाने वाढला आणि अनाठायी खर्च झाला की आपण त्याला चंगळवाद म्हणतो, सकारात्मक अर्थाने श्रीमंती किंवा समृद्धी म्हणत नाही.
म्हणून आजच्या ‘धनतेरस’ च्या निमित्ताने कोणतं धन कमवायचं हे ठरवायला हवं.
एक प्रार्थना कुबेराला
नोटांवरचे आजोबा
नको ओळख बापूंना
मोल जाणून संपत्तीचे
उजागर कर रे मूल्यांना!
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु! 🙏
‘अतिथी देवो भव’ या नात्याने इथे स्वागत आहे डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांच्या लेखनाचे.
भाऊबीज
✍️डॉ.ज्ञानेश्वर थोरात
भ्रमणध्वनी:९८६०७६२४९०
भाऊबीज बहीण भावातील एक उदात्त, उत्कट आणि उत्कृष्ट अनुबंधाचा सण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने ‘रक्षाबंधन’ आणि ‘भाऊबीज’ ह्या महत्त्वाच्या उत्सवांनी प्रस्तुत नात्याची सर्वश्रेष्ठता अभिव्यक्त करण्याची सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त करून दिली आहे.एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्म घेऊन आपली बहीण शुभ विवाहानंतर लक्ष्मीच्या पावलाने तिच्या पतीचा गृहसंसार सर्वांगांने आणि सर्वांर्थाने सुंदर करण्याच्यासाठी रात्रीचा दिवस करते. तिच्या त्यागाला आणि सेवेला सीमा नसते. स्वतःच्या गावाचा, भावाचा आणि नावाचा त्याग करून ती पतीगृही गेली असली तरी तिचे आपल्याला सोडून जाणं तनाने असते ; मनाने कधीच नाही आणि म्हणून तिचं माहेर तिच्या सुखाचा ठेवा असतो. माहेरचा माणूसच काय; माहेरचे कुत्रंही तिला प्रिय असतं ,तिची ही मानसिकता खरंच कोणी भाऊ समजून घेतो का आज ? तिचं काम दिसतं नाही; याचा अर्थ ते असत नाही ;असा नाही , किंबहुना पतीच्या सर्व्हिसच्या तासांपेक्षा अधिक काळ ती व्यस्त असते.पतीगृही ती आपल्या आईवडिलांची प्रतिष्ठा सदैव उंचावते,अशा बहिणीचा अभिमान आपल्याला आणि तिच्या सासरला का नसावां ? भाऊ हा शब्द उलटा करून वाचला की उभा असा शब्दप्रयोग मिळतो,नाही का ? उभा ह्या शब्दाचा अर्थ आहे तत्परता. कधीकाळी तिचा पती आर्थिक, सामाजिक ,सांस्कृतिक दृष्टीने कमी पडला तर खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभा रहातो; त्याला म्हणतात भाऊ! अशा भावाचा अभिमान बहिणीला असणारच यात नवल ते काय ?
वृंदावनात भाऊबीजेचा सण होता.त्यानिमित्ताने घरात मेजवानी तयार करण्याचं काम चालू होतं. श्रीकृष्णाला भाजी कापण्याचे काम देण्यात आलं होतं. अत्यंत प्रेमभराने श्रीकृष्णाने ते काम स्वीकारले होते.परंतु सवय नसल्यामुळे अचानक विळीचे तीक्ष्ण पाते भाजीतून बोटांवर आले आणि त्याने श्रीकृष्णाच्या करंगळीचा छेद घेतला. रक्ताची धार लागली होती. लक्षात येताच रुक्मिणी, सुभद्रा, सत्यभामेसह सर्वांनी घरभर चिंधी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.परंतु द्रौपदीच्या हे लक्षात येताच क्षणी तिने आपल्या डोईवरील भरजरी शालूचा कोपरा फाडला आणि त्याची चिंधी करून तात्काळ श्रीकृष्णाचे बोट बांधले. श्रीकृष्णाविषयी साऱ्यांच्याच प्रेमाची परीक्षा त्या प्रसंगातून झाली होती. श्रीकृष्ण हे विसरला नाही .
कालचक्र गतिमान झालेलं होत. एकदा दुर्योधनाने भर सभेत द्रौपदीला खेचून तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या राजसभेत द्रोणाचार्य, कृपाचार्य , भीष्माचार्य याशिवाय द्रौपदीचे पाचही पती उपस्थित होते परंतु ‘किंकर्तव्यमूढ झालेल्या पतींकडून आणि उपस्थित आचार्यांकडून दुर्योधनाला आवरलं जात नाही; हे लक्षात येताच द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला.
‘कृष्णा धाव रे लवकरी| संकट पडले भारी |
हरि तू आमचा कैवारी| आले संकट निवारी ||
‘ खडकाला पाझर फोडणारी तिची आर्त किंकाळी श्रीकृष्णापर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही .इकडे वैकुंठात श्रीकृष्ण जेवायला बसला होता.ताट रुक्मिणी विस्तारित होती. स्वयंपाक घरात अन्य कोणीच नव्हते. कितीतरी काळानंतर दोघांना एकांत सापडला होता आणि रुक्मिणी लडिवाळपणे श्रीकृष्णाला आग्रह करत होती ,एकांतात रंगलेले भोजन आणि मधून मधून होत असणारे शृंगारिक संवाद त्या दोघांच्या जीवनात आनंदाची पर्वणी होती. तेवढ्यात कानावर द्रौपदीचा धावा आला आणि त्याच क्षणी श्रीकृष्णाने हातात उचललेला घास पुन्हा ताटात ठेवून दिला आणि क्षणार्धात तो भरल्या ताटावरून उठून द्रौपदीच्या लाज रक्षणासाठी धावला. का? काय ?कुठे? हे रुक्मिणीला सांगायला सुद्धा त्याच्याजवळ वेळ नव्हती.कवीने लिहिले आहे,
“रक्षावे भगिनीस असे बांधवाने | जसे रक्षीले द्रौपदीस श्रीकृष्ण माधवाने ||”
किती सुंदर आहे ,नाही का ? हा प्रसंग आपण नेहमी ऐकतो परंतु त्याचा अन्वयार्थ लावायला मात्र नेहमीच कमी पडतो. आपल्या बंधूची जखम बांधण्यासाठी आपला नवा कोरा शालू फाडून टाकणारी द्रौपदी आणि द्रौपदीच्या संकट निवारण प्रसंगी भरल्या ताटावरून उठून जाणारा श्रीकृष्ण आपल्यासमोर येतो, त्यावेळेला भावा बहिणीच्या प्रेमाची गरिमा अधिक अधोरेखित होते.
संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील या सणाच्या दिवशी घडलेला एक प्रसंग खूप काही सांगून जातो.एकदा संत तुकाराम महाराजांची अर्धांगिनी जिजाबाईने तिचा बंधू तिला ओवाळणी घालण्यासाठी त्यांच्या घरी उपस्थित झाला होता,तिने त्यांचे सुहास्य वदनी स्वागत केले.त्या निमित्ताने स्वादिष्ट भोजन करण्याचा बेत आखण्यात आला. अतिशय लगबगीने जिजाबाईंने स्वयंपाक तयार केला. एकाच पंक्तीत आपल्या पतीला आणि जिवलग भावाला तिने भोजन परोसले .संत तुकाराम महाराज हरिनाम घेता घेता ताटात आलेले सारे पदार्थ मिटक्या मारून खात होते परंतु त्यांचा मेहुणा मात्र जड हाताने आणि कसं तरी समोर वाढलेलं पोटात ढकलत होता .पुन्हा आग्रह झाला तर ‘नको ताई, नको ताई’ असं म्हणून विनयाने नकार देत होता. एकदाची जेवणे उरकली; भांडीकुंडी झाली आणि जिजाबाई जेवणासाठी बसली. देवाचं नाव घेतलं आणि तोंडात घास घेतला तेंव्हा लक्षात आलं; कोणत्याच पदार्थात मीठ नाही. कसे ते चवदार लागणार? म्हणून तर आपला भाऊ मन लावून जेवला नसावा ? तिला खंत वाटली.माझ्या पतीच्या समोर माझ्या भावाने पदार्थात मीठ नसल्याचे माझ्या लक्षात आणून का दिले नाही, कारण तिच्या पतीच्या समोर आपल्या बहिणीची उणीव काढणे; कदाचित हे तिची प्रतिष्ठा न राखण्यासारखे होईल, हा विचार मनी मानसी बाळगून कोणत्याही पदार्थात मिठाचा कण नसतानाही त्याने कोणतीही नाखुशी दाखविली नसावी,हेच वास्तव होते. भावाचे प्रेम असं असतं. ते बऱ्याचदा शब्दातून व्यक्त होत नाही.
अमेरिकेतील शिकागो शहरात ११ सप्टेंबर, १८९३ रोजी भरलेल्या जागतिक सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या भावनांना उद्गार दिला. त्याची सुरुवातच ‘सिस्टरस् अँड ब्रदर्स् ऑफ अमेरिका’ अशा शब्दांनी केली होती अर्थात सिस्टरस् या शब्दप्रयोगाचे उपयोजन ब्रदर्स् या शब्दाच्या अगोदर करण्यामागची भूमिका तिथल्या माता भगिनींच्या लक्षात आली. साता समुद्रा पलीकडून एक संन्याशी आपल्या देशात येतो काय आणि आपल्याला पुरुषांपेक्षा अधिक दर्जा देऊन आपल्याला भगिनी म्हणून संबोधतो काय ; हे त्यांना नवलपूर्ण होतं आणि म्हणून तब्बल दोन मिनिटं टाळ्यांचा कडकडाट उपस्थित सारा समुदाय अनुभव होता. स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आणि आपलं उर्वरित आयुष्य भारताच्या सेवेसाठी समर्पित करण्याच्या निश्चय आणि निर्धाराने स्वामी विवेकानंदाच्या जीवनात आलेल्या मार्गारेट एलिजाबेथ नोबलला स्वामी विवेकानंदांनी त्यांचा उदात्त हेतू लक्षात घेऊन सिस्टर निवेदिता अर्थात भगिनी निवेदिता नावाने संबोधित केले.मार्गारेट एलिजाबेथ नोबलने सुद्धा आयुष्यभर भगिनी निवेदिता या नावाची गरिमा उंचावली. यमीचे यमावरील प्रेम ,गौरीचा गणेशावरील प्रेम, संत ज्ञानदेवांचे मुक्ताईवरील प्रेम काय सांगून जातं आपल्याला? किमान या दिवशी तरी या पुराणकथांचा आपण योग्य अर्थ नको का लवायला? आपली सख्खी बहीण असू द्या किंवा मानलेली बहीण असू द्या.आपली भगिनी ,आपल्या नव्या गाडीत आणि आपण नेसविलेल्या नव्या साडीत आपल्याला पहाणे नाही का आवडणार ? ओवाळणीच्या रूपाने तिच्या ताटात भरभक्कम रक्कम ठेवताना आपल्याला दिव्यानंद नाही का होणार ? मजबूरीने नव्हे तर मजबूतीने तिचा मानसन्मान नाही का आपण वाढविणार ? निरंजनाच्या ज्योतीने आपल्याला ओवाळताना आणि गोड प्रसादाचा घास भरविताना *”ईडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो”* ह्या तिच्या प्रेमळ वचनांचा नाही का आपण सकारात्मक अर्थ लावणार ?
——————————
भाऊबीजेनिमित्त ; ‘भरजरी ग पीतांबर’ या काव्याच्या रसग्रहणाचा खालील लिंकवरून अवश्य आनंद घ्या – वृंदा आशय
नातं टिकलं तर फुलतं; सुटलं की सुकतं! नातं सुकवू नका; सुखवू द्या. नातं जपा आणि जपू द्या!
दिवाळी शुभेच्छांच्या निमित्ताने नात्यांवर एक चिंतन व्यक्त करणाऱ्या वृंदाआशयच्या या व्हिडिओला आपण पस्तुरीवर अवश्य भेट द्यावी, ही नम्र विनंती.
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु! 🙏
यावर आपले मत नोंदवा