पु.शि.रेगे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने – दिनांक – १७ फेब्रुवारी – संपादक वृंदा आशय

उठा जागे व्हा रे आता …

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणें गंगौघाचें पाणी
कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग
आम्हां नाही नामरूप
आम्ही आकाशस्वरूप
जसा निळानिळा धूप
पूजेतल्या पानाफुला
मृत्यु सर्वांगसोहळा
धन्य निर्माल्याची कळा
गीत – कवी बा. भ. बोरकर


•|ॐ|•
तो क्षणगार वारा
करी स्पर्श हसरा
त्याचा तो थंडावा
आणे स्नेहार्द्र ओलावा
जणू पानापानातून
कृष्ण माझा बोलावा
निष्पर्ण झाडातूनही
तोच असा झिरपावा
तो तेजस्वी प्रकाश
ते निळे आकाश
येई पाऊले टाकत
कृष्ण माझा सावकाश
…………………..
माझा वाढता आवेग
‘तो’ घेई मनोवेग
प्रकटे तो क्षणात
कृष्ण माझा कणाकणात!
वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻
मी घट्ट मिठी मारते
वाऱ्याला, राधा होऊन
तोही क्षणभर स्तब्धावतो
जरा बावरून….
मी घाबरते
रागावलास काय, विचारते
तो स्वतःला सावरतो
सायलीला हलवून…
वृंदा आशय

•|ॐ|•
मी पाहिले रे देवा
ते कळीचे उमलणे
पानामागे लपूनी
हळूच पुढे येणे
होती आधी अबोल
तू स्पर्शूनी म्हणे बोल
उतरली ती आत खोल
दिव्य झाले तिचे बोल
मी पाहिले रे देवा
कळीचे उमलणे
तिच्या निमित्ताने
तुझे ते फुलणे….
वृंदा आशय 🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻
ही तो श्रींची इच्छा

तुम्ही हो तुम्ही हो तुम्ही औदार्य!
प्रिय भाईजी,
मन जरा डहुळलं की तुमच्या छत्रछायेत येऊन बसणं हा माझा आता छंद झाला आहे. श्वास कुठवर रोखावा, विश्वास कोणावर ठेवावा? अशा या काळामध्ये भाई, तुम्ही आजही तितक्याच आश्वासकतेने बोलत असता, बोलता तितक्याच आपुलकीने, तितक्याच आत्मीयतेनं म्हणून माझी पावलं आपसूक वळतात हो तुमच्याकडे. आज तुम्ही फार छान सांगितलंत मला. बोलता बोलता सहज म्हणालात , “मनाचं डबकं नको होऊ देऊ गं. उगी बारीकसा खडा पडला तरी डुचमळून जाईल असं. तुम्ही प्रवाही नद्या आहात, अखंड वाहणाऱ्या, जे जे येईल ते ते सोबत घेऊन जाणाऱ्या आणि पुन्हा नितळ होणाऱ्या! नदीचं ‘नदीपण] आणि बाईचं बाईपण यातलं साम्य तुला समजायला लागलंय आता. ही नदी शेवटी समुद्राला मिळत असते, ते विसरु नये माणसानं.
…… समुद्र कसा असतो विशाल, प्रशांत! त्याच्याकडे किनाऱ्यावरून पाहताना त्याचा आदी-अंत कधीच दिसत नाही. जेव्हा त्याला भरती येते तेव्हा तो उधाणलेला असतो, त्याच्या लाटा माणसांकडे धावत येतात. आणि जेव्हा त्याला ओहोटी लागते तेव्हा माणूस त्याच्या जवळ जवळ जाऊ शकतो तसं असावं गं माणसाने, म्हणजे समुद्र वाचता येतो. त्याच्या पोटात खूप काही असतं, ज्याला जे हवं त्याला ते देणारं समुद्रपाणी आहे ते. तो मीठ देतो हे कधीच विसरू नकोस. कृष्णानं रुक्मिणी कशी आवडते या निमित्ताने सांगितलेलं ‘मिठाचे महत्त्व’ आणि गांधीजींनी केलेला ‘मिठाचा सत्याग्रह’ मी तुला पुन्हा नव्याने सांगायला हवा, अशातली गोष्ट नाही. तू सरस्वती भुवनची विद्यार्थिनी आहेस. तुम्ही मुलींनी हे सगळं कोळून पिलेलं,चंदनासरखं उगाळलेलं आहे. तुमच्या जीवनातून ते जागोजागी व्यक्त होतंय मी पाहतो आहे ना सारं काही.
… चालायचंच. जगरहाटी आहे ही. तुम्ही मुली संसार करताना रहाटगाडगे वगैरे म्हणताना, तसंच काहीसं. पण मला एक बरं वाटलं. तू विद्यार्थिनी असताना म्हणाली होतीस, “आमच्या काळचे प्रश्न मला कळत नाहीत”, …पण आता तुला कळायला लागलेत. कळती झालीस म्हणायचं. या कळण्यावरच सगळी भिस्त आहे बघ माझी. एकदा ‘कळलं’ ना की मग माणूस ‘करत’ जातो आणि ‘करत गेलं’ की ‘घडत जातं’ घडत गेलं की बिघडलेलंही सावरता येतं.
समुद्र खूप मोठा असतो. त्यात खूप काही मावतं. पण या भरती ओहोटीच्या काळात तो बरंच काही किनाऱ्यावर आणून टाकतो आणि पुन्हा आत नेतो हे चक्र आहे, ते चालायचंच. मात्र जेव्हा एकदा त्सुनामी येते ना तेव्हा काय होतं….., मी कशाला सांगायला हवं तुम्हा पोरींना आता हे?
….. त्सुनामीची वेळ येऊ नये एवढी काळजी घेत जा, एवढेच सांगणं आहे माझं. बाकी तुम्ही शहाण्यासुरत्या आहातच. मी प्रत्यक्षात असलो काय, नसलो काय मला माहिती आहे, दिनकरनं तुमच्या मनात मला पेरून ठेवलंय. तुमचं मन जिवंत आहे आणि पुढच्या पिढ्यांना देत आहे, तोपर्यंत तरी मला कोणतीच काळजी नाही बघ. स्वतःची काळजी घे. ये आता.
भाई, तुमच्याशी बोलताना ती धिटुकली खार दिसली बघा. मला माहिती आहे, तुमची रामावर श्रद्धा नाही. त्यामुळे रामसेतूच्या कथेवर आणि खारूताईला मिळालेल्या रामाच्या आशीर्वादावर विश्वास असण्याचा प्रश्नच नाही. पण माझा आहे भाई. त्यामुळे तुमच्या कार्यातली तुमचा आशीर्वाद मिळालेली खारूताईच मानते मी स्वतःला.
” अगं धिटुकले, माझ्या श्रद्धा, विश्वासाच्या गोष्टी करतेस तर मग मला तुझं पटत नसेल तरी तू ते मानू नकोस, अनुसरू नकोस असं मी कधीच म्हणणार नाही, हे ही ठाऊक असेलच. किंवा कधीतरी तुझ्या काकाकडून ऐकलं असशीलचना.
“हो! हो भाई, म्हणून तर एवढी बिनधास्त गप्पा मारते मी तुमच्याशी.”
ते सगळं ठीक आहे. पण पु.शि.रेगेंना आदरांजली वाहण्यासाठी ग्रंथालयातून पुस्तकं घेऊन आलीस आणि माझ्यात, खरं म्हणजे तुझ्यातल्या माझ्यात किंवा आता तर तुझ्यातच म्हणावं लागतं,… इतकी गुंतून पडलीस. तुला माहिती आहे मला नाही आवडत हाती घेतलेल्या कामाकडे दुर्लक्ष झालेलं, ये आता.
या आदेशाने मी नि:शब्द पण अंतर्मुख होऊन परतते. कारण भाई म्हणतात तसं मला हे पृष्ठ पूर्ण करण्यास दोन दिवस अधिकचे लागले. शिवजयंती देखील होऊन गेली.
हे शिवराज्य व्हावे, हे रामराज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा पुन्हा एकदा फलद्रूप व्हावी एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना !
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु !


पुरुषोत्तम शिवराम रेगे उर्फ पु. शि. रेगे हे श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक होते. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. ‘सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती’ हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय आहे. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होते. त्यांच्या कवितांची इंग्रजी, जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत. कारण त्यांत भारतीय परंपरेतून आलेली स्त्रीविषयक जाणीव आणि या जाणिवेवर झालेले आधुनिकतेचे संस्कार यांचा एक हृद्य मेळ आढळतो. अशा या श्रेष्ठ कवीचे १७ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.
त्यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. व बी.एस्सीपर्यंत झाले. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले.
‘फुलोरा’(१९३७), ‘हिमसेक’(१९४३), ‘दोला’(१९५०), ‘गंधरेखा’(१९५३), ‘पुष्कळा’ (१९६०), ‘दुसरा पक्षी’ (१९६६) आणि ‘प्रियाळ’(१९७२) हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले.‘सावित्री’(१९६२), ‘अवलोकिता’(१९६४), ‘रेणू’(१९७३) आणि ‘मातृका’(१९७८) या रेगे यांच्या चारी कादंबर्या काव्यात्म व अर्थगर्भ आहेत.
लिलीची फुले – पु. शि. रेगे
त्रिधा राधा- पु.शि. रेगे

राधाSS………..
आकाश निळे तो हरि,
अन् एक चांदणी राधा, बावरी,
युगानुयुगीची मनबाधा
विस्तीर्ण भुई गोविंद,
अन् क्षेत्र साळीचे राधा, स्वच्छंद,
युगानुयुगीची प्रियंवदा
जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा
https://www.facebook.com/share/v/1LYr2s1fWv
त्रिधा राधा- पु.शि. रेगे, चित्रफित निर्मिती – स्मृतिगंध
हिरव्या पानात हिरवा पोपट
सांगे पाहे कोणाची वाट
………….
ही वनराई घनदाट
सांगा कोणासाठी हा थाट !
वृंदा आशय
यावर आपले मत नोंदवा