विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

देवसंवाद !

मला तुझ्याशी गप्पा मारता येतात, यासारखा आनंद आयुष्यात दुसरा नाही रे. आज त्या निखळ आनंदातून तुझ्या भेटीला, तुझ्याशी खूप काही शेअर करायला – फक्त तुझी मी

सृष्टीचे हे कोवळेपण देवा व्हावे जगाचे सोवळेपण !
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

दत्त दिगंबर माझा दयाघन ।
चरणी ठेविले मी माझे मन ॥

त्रिभुवनाचा तूचि आधार ।
कृपेने करिसी उद्धार ॥

नाम तुझे घेता शांती येई ।
चित्त माझे चरणी लीन होई ॥

अनाथांचा तू नाथ दयाळू ।
धाव घेसी भक्तांसी तत्काळू ॥

असे म्हणे दास तुझा रे ।
राहीन चरणी सदासर्वकाळे ॥

ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
ll श्री गुरुदेव दत्तरुप ll

(दत्तरूप या फेसबुक ग्रुप वरून साभार )


कल्याणमस्तु !

जाग येता पहाटे देव अंतरी भेटे

चित्त होई शुद्ध मन होई प्रबुद्ध

स्व युद्ध घे विराम अंतरी प्रकटे राम

निर्मल निर्भय निर्झर वाहे कल्याणमस्तु वदतचि राहे !

वृंदा आशय

(‘नीरव मनातील देवरव’ या माझ्या काव्यसंग्रहातून )


हनुमान जी की २१ शक्तियाँ

१ } असीम बल :————

👉 पर्वत उठाने और महासागर पार करने की शक्ति।

२ } लघु रूप धारण :————

👉 सूक्ष्म से सूक्ष्म आकार में बदल सकते हैं।

३ } विशाल रूप { महिमा } :————

👉 ब्रह्मांड जितना विशाल रूप धारण करने की क्षमता।

४ } अजेयता :————

👉 किसी भी अस्त्र-शस्त्र से अप्रभावित रहने की शक्ति।

५ } अमरत्व का वरदान :————👉 चिरंजीवी होने का आशीर्वाद।

६ } उड़ने की शक्ति :————

👉 आकाश में स्वतंत्र रूप से विचरण कर सकते हैं।

७ } वेग ( अत्यंत गति ) :————

👉 वायु से भी तेज गति।

८ } बुद्धि और ज्ञान :————

👉 अत्यंत तेज बुद्धि और शास्त्रों का ज्ञान।

९ } भक्ति की शक्ति :————

👉 श्रीराम के प्रति अटूट और निष्कलंक भक्ति।

१० } निर्भयता :————

👉 किसी भी परिस्थिति में भय का अभाव।

११ } रूप परिवर्तन :————

👉 किसी भी रूप में बदलने की क्षमता।

१२ } अदृश्य होना :————

👉 आवश्यकता पड़ने पर अदृश्य हो सकते हैं।

१३ } दिव्य श्रवण :————

👉 दूर की आवाज़ें सुनने की शक्ति।

१४ } दिव्य दृष्टि :————

👉 दूर और सूक्ष्म चीजों को देखने की क्षमता।

१५ } रोग निवारण :————

👉 संजीवनी लाने जैसी उपचार शक्ति।

१६ } मनोबल :————

👉 अटूट आत्मविश्वास और धैर्य।

१७ } संकट मोचन :————

👉 भक्तों के संकट हरने की शक्ति।

१८ } आत्मसंयम :————

👉 इंद्रियों पर पूर्ण नियंत्रण।

१९ } वाणी की शक्ति :————

👉 प्रभावशाली और सत्य वाणी।

२० } तेज ( आभा ) :————

👉 दिव्य तेज और ऊर्जा का प्रकाश।

२१ } सेवा भाव :————

👉 निस्वार्थ सेवा और समर्पण की सर्वोच्च शक्ति।

👉 हनुमान जी की सबसे बड़ी शक्ति है —
|| भक्ति, विनम्रता और सेवा भाव

👉 यही कारण है कि वे केवल शक्तिशाली ही नहीं, बल्कि सबसे प्रिय और पूजनीय देवता भी हैं।



||जय श्रीराम || ||जय हनुमान|| ||बजरंग बली की जय||

काय होता तो पुण्यपर्वकाळ
तुम्हा लाभले श्रावणबाळ !
संपूर्ण समर्पण!

प्रिय देवा,

आज मला विलक्षण आनंद आहे. आज या ‘कृष्ण पहाटे’ मी माझ्या बहिणीबद्दल – वर्षाबद्दल उत्कटतेने लिहीत आहे. कारण मला ठाऊक आहे देवा माझ्यापेक्षा सुद्धा ती तुझी अधिक लाडकी आहे. खरं म्हणजे तिचा पन्नासावा वाढदिवस थाटामाटात साजरा करावा ही आमची सगळ्यांचीच अंतरीची इच्छा. ती आमच्याबरोबर इथे आल्यानंतर ही इच्छा सहजच फलद्रूप होईल असं मला वाटलं होतं आणि तसं मी जाहीरही केलं होतं पण मला ठाऊक आहे तिची इच्छाशक्ती माझ्या काही पटीने फार मोठी आहे. तिने निक्षून सांगितलं माझ्या वाढदिवसाला काहीही करायचं नाही. आणि अक्षरशः सगळी परिस्थितीच अशी निर्माण झाली की मला काहीही करता आलं नाही. हरकत नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु!


देवा, ती इतकी साधी – भोळी, निरागस पण विलक्षण ठाम विचारांची आहे ना की मला वाटतं तू तिच्यातून मला प्रतीत होत राहतोस. खरं सांगू मला वाटतं ते तुझं एक ‘निरागस स्वप्न’ आहे. ती म्हणजे तू निर्माण केलेलं ‘सेवाभावाचं एक मूर्तीमंत स्वरूप’ आहे मी ‘जनी जनार्दन ‘असं म्हणत राहते. ती मात्र तसंच मानते आणि तसंच करते. तुला खरं सांगू देवा, तिच्याबद्दल मी विचार करते ना तेव्हा मला ‘पुंडलिक भाव’ आणि ‘श्रावण बाळ’ या दोघांचीही आठवण येते रे. एकाने मात्यापित्यांची सेवा करताना साक्षात विठ्ठलाला विटेवर उभं केलं आणि एकाने आई-वडिलांच्या सेवेसाठी प्राणत्याग सुद्धा भाग्य मानले.

तुझी सृष्टी किती विलक्षण आहे देवा ! काय एकेक माणसं निर्माण करतो रे तू. पण देवा, तुला एक विनंती करू का रे? तू जशी माणसं घडवतोस ना तसं त्यांच्या आजूबाजूला त्यांना समजून घेणारं जग का घडवत नाहीस? वर्षाबद्दल आम्हाला खूप जिव्हाळा आहे, आदर आहे पण ती इतकी निरागसतेने वागतेना की कधीकधी आम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडतो रे, हा इतका भोळा जीव आहे – याचं या व्यवहारी जगामध्ये कसं व्हायचं? आणि देवा तुला खरं सांगू , या व्यवहाराच्या चिंतेपोटी आम्ही तिच्यावर ओरडत राहतो, रागावत राहतो. तुला खरं सांगते देवा तिच्यावर अस रागवलंना की माझा जीव तीळ तीळ तुटतो. तुझ्यावरच रागावल्यासारखं वाटतं बघ. तुझ्यावर कसं रागावू रे आम्ही? आमचं सगळ्यांचं सर्वस्व आहेस. तुझ्या बळावरच आम्ही आमचं जीवन जगतो आहे. देवा पण खरं सांगते कधी कधी माझाच मला खूप राग येतो रे. सगुण आणि निर्गुण देवावरून मी जीव ओवाळून टाकते पण माणसातला देव भजायला का कमी पडते रे? देवा , तू वाढव ना माझी ताकद. या देवस्वरूप बहिणीला मला सतत प्रेमाने बोलता येऊ दे रे. तुला माहिती आहे देवा, तिची फक्त तेवढीच अपेक्षा असते. पण तुला सांगते देवा आमचं हे करंटं जग ती नाही पूर्ण करू शकत रे. आता मला सांग ती तशी आहे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तिला आम्ही कोणीही बोललो की नंतर आमच्यातल्या प्रत्येकालाच पश्चाताप होतो. कोणी तो मोकळेपणाने व्यक्त करतं, कोणी करू शकत नाही, इतकंच.

देवा, तिला घडवून खरं म्हणजे तू माणसाच्या तनमनाची,आरोग्याची फार मोठी काळजी घेतलेली आहेस बघ. तू तिला ‘निसर्गोपचार’ क्षेत्रातलं फार मोठे वैद्यकीय ज्ञान दिलेलं आहे. तुझ्या कृपेने तिने टेंडर केअर होम सारख्या फार चांगल्या शाळेमध्ये एका तपापेक्षा अधिक काळ काम केलेलं आहे. अरे केवळ तिच्यामुळे माझं लेकरू जेव्हा पहिलीत होतं ना तेव्हा स्टेजवर अप्रतिम पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाचं इंग्रजी मधून सूत्रसंचालन करू शकलं. देवा, मला वाटतं तू तिला एखाद्या जादूसारखंच तयार केलेलं आहे. तिचा निरागसभाव आणि बालकांचा निरागसभाव सारखाच असल्यामुळे, मला वाटतं ती त्यांच्यातच रमत असावी. कोणाच्याही घरी गेलं ना तरी मोठ्या माणसांशी फारसं बोलण्यात ती कधीच रमत नाही रे. तिला वाटतं आपला वेळ वाया गेला. तिला माणसांबद्दल प्रेम नाही असं नाही रे. पण माणसं काय करतात ; केवळ एकमेकांबद्दल बोलत राहतात आणि तेही तक्रारीच्या सूरात. तिच्यातल्या देवत्वाला हे नाही सहन होत. ती शक्य तितकं सकारात्मकतेकडे वळवण्याचा प्रयत्न करते. पण लोक वळतातच असं नाही. मग ती सोडून देते. काय करणार?असो. मला वाटतं मी पण आता इतरांसारखी गाऱ्हाणी करायला लागले.

तर देवा, खरं म्हणजे तुझे खूप खूप आभार मानण्यासाठी आजचं हे पत्र मी तुला लिहिती आहे. कारण तू मला इतकी सुंदर बहीण दिलेली आहेस. देवा, माझी बहीण – भावंडं पाहिली ना, की मला ‘देवघरात’ जन्माला आल्याचा आनंद मिळतो रे. विशाखा ताई आणि विवेक दादा माझ्यापेक्षा मोठे आहेत अर्थात वर्षाही मोठीच आहे, पण तिच्या निरागस बालभावामुळे मला खरंच तसं कधी वाटत नाही. तुला माहिती आहे, तिच्या एका वाढदिवसाला मी तिला माझ्या मुलांतर्फे भेटकार्डाद्वारे एक गंमतशीर संदेश दिला होता,

आमची मावशी खूपच हौशी
मोठी होईल कोणत्या वाढदिवशी?

इतकं बालपण ती जर या वयातही जगू शकत असेल, तर अजून काय हवं रे? पण देवा, आम्ही सामान्य माणसं आहोत रे. लोकसंख्या वाढते म्हणून, वाढलेल्या लोकसंख्येमुळे लोकांच्या अंगभूत गुणांना योग्य तो वाव मिळत नाही म्हणून लग्नच नाकारणारी वर्षा जेव्हा मी पाहते ना, तेव्हा खरंच हसावं की रडावं हेच कळत नाही? पण देवा आज कळतं ती तिच्या आत्म्याची हाक होती. कदाचित मला वाटतं ती स्वतः तिच्यातच पूर्ण आहे म्हणून आपण जे शिवशक्ती मिलन म्हणतो ना तिची तिला आवश्यकताच भासली नसावी. असो, तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु!

तुला सांगते देवा, तिनं मोठ्या हिरीरीने टीचर ट्रेनिंग कोर्स घेतलेले आहेत आणि ऑनलाईन घेण्याचा सातत्याने प्रयत्न देखील करत राहते. वैद्यकीय क्षेत्रातील शिबिर घेते. मात्र तिला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही रे. मला कळत नाही देवा, तुझं एक – भारतीय संस्कृतीचा विचार केला तर ‘ज्ञान विकू नये’ असं तू सांगतोस. इथे ती ‘ज्ञानसेवा’ करायला पूर्णपणे सिद्ध आहे तर तिच्याकडे फार जणांना तू पाठवतही नाहीस. असं का रे? मला खात्री आहे रे देवा, आमच्यापेक्षा तुला तिची अधिक काळजी आहे. माणसं कमी आली तर चालतील पण सद्भावाचीच माणसं तिच्याकडे वळावीत याची तू खूप काळजी घेतोस बघ. तुला माणसं आतून बाहेरून माहीत असतात. शेवटी तुझंच प्रॉडक्ट आहेत ना ते. आणि म्हणूनच तर आम्ही –

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट सारी दोघा पुन्हा नाही गाठ

यावर श्रद्धा बाळगत जीवन जगणारी माणसं आहोत.

देवा, मी तुझी नितांत ऋणी आहे. कारण तिला या घरात जन्माला घालून तू माझ्या आई-वडिलांना धन्य केलेले आहे; याची मला संपूर्ण जाणीव आहे. ती जाणीव तुला समर्पित करते आणि थांबते. शुभं भवतु!
श्रीकृष्णार्पणमस्तु!

वृंदा आशय


वर्षाला साहित्य फार मनापासून आवडते म्हणून आज खालील गोष्टी खास तिला भेट म्हणून

. साहित्य अकादमीद्वारे ‘महत्तर सदस्यता’ प्रदान करण्यात आलेले प्रख्यात उर्दू लेखक व कवी अब्दुस्समद ‘तपिश’ यांच्या ७ वेदांचा प्रमोद देशपांडे – पीडी यांनी केलेला मराठी अनुवाद-

https://www.facebook.com/share/p/1CSKWDoH2j/


२. शब्दवेध – वृंदा आशय

‘ओढ’ आणि ‘ओढ’

‘ओढ’ हा शब्द आपल्या सगळ्यांनाच अत्यंत परिचित असलेला असा आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द घेऊन आपण कृतिशील असतो. आज ‘ओढाओढ करणे’, ‘चढाओढ लावणे’ हे आमच्या बाजारकेंद्री जीवनाचे मध्यवर्ती सूत्र झालेले आहे. त्यामुळे आयुष्य ‘ओढत’ आपण जगत राहतो आहोत.

….. दुसरी ‘ओढ’ मात्र अतिप्राचीन आहे. चिरकालीन आहे. ती ‘हृदयाची ओढ’ आहे. सारी सृष्टी जिथे प्रेमवृष्टी करते त्या भारतीय संस्कृतीतली ती ‘ओढ’ आहे. माणसाला आत्मसन्मान देणाऱ्या आणि मित्रत्वाने उभ्या करणाऱ्या, जीवनाची ती अजोड जोड आहे.

……… खरंतर ‘तिच्या’मुळे माणसाचं आयुष्य मधासारखं गोड आहे. तिची सोबत हे सृष्टीचं आदीम तत्त्व आहे. ‘प्रकृती’ आणि ‘पुरूष’ यांच्या एकरूपतेशिवाय आपली सृष्टी अस्तित्वातच येऊ शकत नाही. ‘एकोहम् बहुस्याम्’ या इच्छेच्या मुळाशी हेच तत्त्व आहे. ही प्रकृती सुद्धा कशी असते तर पंचमहाभूतांपासून आणि तीन सूक्ष्म तत्वांपासून तयार झालेली अष्टधा प्रकृती असते. मला वाटतं कदाचित त्यामुळेच या प्रकृतीचाच, या आदिशक्तीचा अवतार अष्टभूजा देवीच्या स्वरूपात आपण पाहतो. शिवाय ज्या गृहलक्ष्मीला आपण देवीच्या स्वरूपात पाहतो ती देखील ‘अष्टभुजाधारी’ असावी अर्थात ‘बहुकार्यात्मक’ असं तिचं रूप स्वरूप आपण अपेक्षितो. मात्र देविसारखी विविध रूपे तिने व्यक्त करण्यापेक्षा तिचं स्वरूप कायमच ‘सौम्य’, ‘प्रेमळ’ आणि ‘त्यागमय’ असावं अशी पुरुषप्रधान दृष्टिकोनातून रास्त अपेक्षा आपला समाज सातत्याने व्यक्त करतो. या अपेक्षेच्या अनुषंगाने शतकानुशतके ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ ही भूमिका स्त्री बजावत आलेली आहे. कारण तिला नैसर्गिक ओढ असते तिच्या गृहसौख्याची!

आज मात्र ही गृहसौख्याची ओढ, कुटुंबाची स्थिरता आपल्याला अनेकविध कारणांनी धोक्यात आलेली दिसते. व्यक्ती – कुटुंब – समाज – प्रदेश – देश – विश्व अशी साखळी आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला दिसून येतं; ज्या विश्वाच्या कल्याणाची आणि विकासाची आळवणी आपण सातत्याने करत असतो त्याचा पाया असलेली व्यक्ती ही अत्यंत ‘व्यस्त’ आणि ‘त्रस्त’ झालेली आहे. ज्या व्यक्तीला मध्यवर्ती ठेवून विश्वाची स्वप्नं आपण पाहतो ती व्यक्ती जर स्थिर नसेल तर विश्व अस्थिर होणारच. भारतीय ज्ञानपरंपरेतून विचार करताना खरं म्हणजे हे सूत्र आपण ‘सृष्टी – समष्टी – व्यष्टी’ अशा उतरत्या क्रमाने मांडतो. मात्र पाश्चात्त्य ज्ञानपरंपरा स्वीकारून आणि त्याचबरोबर ‘बाजारकेंद्री अर्थव्यवस्था’ अवलंबून आज आपण हे सूत्र भारतीय दृष्टिकोनातून व्यस्त पद्धतीने म्हणजेच ‘व्यष्टी – समष्टी – सृष्टी’ असे स्वीकारलेले आहे. त्यामुळे आपसूकच आमचे ‘धर्म’, ‘अर्थ’, ‘काम’, ‘मोक्ष’ हे जे चार पुरुषार्थ आहेत या चार पुरुषार्थांमध्ये सुद्धा ‘अर्थ’ आणि ‘काम’ हे प्राधान्याने पुढे येऊन ‘धर्म’ त्या पाठीमागे सारलेला दिसतो. त्यामुळे आपसूकच ‘मोक्ष’ या संकल्पनेलाच आपल्या जीवनातून ‘मोक्ष’ मिळालेला आहे. ‘मुमुक्षत्व’ संपुष्टात आल्याने जीवनाची युक्तता घटलेली आहे. जिथे युक्तताच नाही तिथे उपयुक्तता कशी असेल? मात्र दुर्दैवाने हे आपल्या लक्षात येत नाही.

आपल्या ज्ञानक्षेत्रामध्ये व जीवनव्यवहारामध्ये आपण ‘उपयुक्ततावादी’ आणि ‘सौंदर्यवादी’ अशी विभागणी करून जीवनाकडे पाहत असतो. ‘सत्यं शिवं सुंदरम्’ हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे ब्रीदवाक्य आणि त्याआधारे ‘सत्यमेव जयते’ यासारखे राष्ट्रीय बोधवाक्य जरी आपण स्वीकारलेले असले तरी या तीन तत्त्वांची आपण किती बुज राखलेली आहे, हे आपल्यापैकी प्रत्येकाला चांगले ठाऊक आहे. या चुकांना वेळीच स्वीकारून त्यात सुधारणा करण्याऐवजी आपण त्याला ‘शिष्टाचार’ ‘इकोसिस्टीम’ ‘प्रॅक्टिकल विज्डम’ यासारखी गोंडस नाव दिलेली आहेत. अर्थात आपल्या या कर्माची फळे आपण सर्वजण अपरिहार्यपणे चाखत आहोत. या फळांची सामूहिक कटू चव आपल्या गळी उतरेल तेव्हा कदाचित आपण पुन्हा एकदा परिवर्तनासाठी तयार होऊ. सध्या तरी अशा परिवर्तनासाठी कोणी एकटा- दुकटा तयार होतो, समूह गोळा करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला साम -दाम-दंड-भेद वापरून ‘ऑड मॅन आउट’ ठरवायला आपण चुकत नाहीत. अशा प्रकारच्या व्यक्तींना आपण हरत-हेने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या मागचा समूह हातोहात पसार होतो. अशी व्यक्ती समाजामध्ये पूर्णपणे ‘एकटी’ पाडली जाते, जुन्या भाषेत बोलायचं झालं तर ‘वाळीत टाकली’ जाते. या सर्व व्यवस्थेला पुरून उरू शकतील अशा सक्षम व्यक्ती असक्षम समाजामध्ये निपजतीलच कशा? ही व्यवहारातली लक्षणे दुर्लक्षित करून तात्विक पद्धतीने मात्र आम्ही सर्वच क्षेत्रात समाजाच्या निकस सृजनाला नावे ठेवत राहतो. मग इथे आपसूकच प्रश्न निर्माण होतो ज्या प्रगतीसाठी, ज्या विकासासाठी आम्ही आमच्या जीवाचा आटापिटा करतो आहोत किंवा किमानपक्षी तसे दाखवतो आहोत त्या विकासाची, प्रगतीची ‘ओढ’ आम्हाला खरोखर आहे का? की तिच्याअभावी आम्ही फक्त ‘ओढाओढ’ करत आहोत ‘चढाओढ’ लावत आहोत.


आपल्या जुन्या म्हणी आपल्याला हेच सांगतात ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल’, ‘इच्छा तिथे मार्ग’, यासारख्या म्हणी ‘संचिताचा अभाव’ पर्यायाने ‘क्रमबद्ध विकासाचा अभाव’ स्पष्टपणे अधोरेखित करतात. पण modern होण्याच्या नादात आपल्याला हे जुनं संचितच टाकाऊ वाटायला लागलं. ‘टाकाऊतून टिकाऊ’ निर्माण करण्याची शक्ती असलेली ‘पतितांना पावन’ करून खरी समता प्रस्थापित करण्याची मूलभूत क्षमता ही भारतीय संस्कृतीमध्येच आहे. मात्र दुर्दैवाने आजही आम्ही, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’, आणि ‘बंधुता’ ही तीन तत्त्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झालेली आहेत असंच शिकतो. वास्तविक पाहता जे भारतीयांच्या रक्तात आहे त्या घटकांची इतरांकडून उसनवारी करून इंजेक्शन घेण्याची आवश्यकताच काय? मग इथे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते आम्हाला ‘स्व-रूपा’ चा आजही विसर पडलेला आहे. किती काळ आम्ही मेकॉले यांच्या नावाने खडे फोडत बसणार? आमचे ‘स्व-रूप’ जोपर्यंत न्यूनगंडात विरघळत राहील आणि अहमगंडात अवास्तव फुलत राहील तोपर्यंत आमच्या हाती काहीही लागणार नाही.

‘चूक स्वीकारणं’ ही ‘सुधारण्याची पहिली खूण आहे’, हे सांगणाऱ्या ‘हिंद स्वराज’ ला आम्ही विसरलो तर महात्मा गांधी आम्हाला कळतील कसे ? ‘सत्याचे प्रयोग’ करण्याची कुवत आमच्यात येईल कुठून? साधेपणातलं सौंदर्य जोपर्यंत आम्ही अनुभवत नाही तोपर्यंत

“It is very simple to be happy, but it is very difficult to be simple.”

हे घोकत राहण्याच्या पलीकडे आपण काय करणार?

🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻


३.



४.

https://youtu.be/nnQGyKWZMBA?si=ed1-Bk0H-LsUHobO

मला कळलेली वर्षा


५.

छायाचित्र – वर्षा देशपांडे

•|ॐ|•

नाही तेथ चांदणी
म्हणून का उदासला
काळोख्या रात्री का
चंद्र कासाविसला

अंधार असा का दाटे
जो देई प्रकाशा छेद
आता ऋषीमुनींनी
गावेतच नवीन वेद

का त्या अंधाराला
लागले पापडोहाळे
यावेच रे तू प्रकाशा
खणून सारी पाळेमुळे

का रे सांग उदासली
ही माझी जननी
कोणते गुपित लपवते
ही काळोखी रजनी

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!


६.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळो तुझे आकाश तुझ्या आयुष्यात राहो प्रकाश प्रकाश !

श्रीकृष्णार्पणमस्तु !


यावर आपले मत नोंदवा