विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

कृष्णोत्सव !

लेखन व संकलन _ वृंदा आशय




•| ॐ |•

अंतर्मौन

मी कृष्णाची कृष्ण माझा
उगाच का मग गाजावाजा

कृष्ण माझा सखा सोयरा
कृष्ण देई मज नित्यआसरा

कधी होते रे मी कृष्णाची आई
आवर पटकन म्हणत करते घाई

कधी होऊन जाते मी कृष्णाचे वासरू
अन् तोच सांभाळतो माझ्यातले लेकरू

कधी होते रे मी कृष्णाचा सुदामा
जो खेळाया नित्य जाय त्याच्या धामा

कधी होते मी कृष्णवेडी राधा
अर्पुनी त्याला विसरते जीवबाधा

कधी होते मी कृष्णाची सखी
राहते कृष्ण कृष्ण सदा मुखी

कधी होते मी कृष्णाची बासरी
मग प्राण फुंकून तो देई माधुरी

कधी विचारे त्याला सांग ना रे
कृष्णा मी तुझी नक्की कोण?

तूच सर्व काही अन् कोणी नाही
सांगे मजला ते उपजलेले अंतर्मोन

श्रीकृष्णार्पणमस्तु !


कृष्ण बासरी – कवी मुल्ला अल्ली अब्बास

ती

ती निघाली तेच आशा भोसले यांचे ‘तुमुल कोलाहल में’ हे गीत ऐकत. मात्र या गीताने मनाला स्पर्श केला नाही. तिला जाणवले आपण हे उगाचंच ऐकतो आहोत. चालता-चालता आज सूर्य उगवला तरी तिला काहीच वाटलं नाही. काहीच न वाटल्यामुळे ती दचकली. कदाचित मनात चरकली. पण चालत राहिली, विष्णु सहस्त्रनामाच्या तालात. मन थोडं विसावलं.
बागेत पोहोचली. झाडांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. तिला खात्री पटली. ती एकटी पडली. सभोवती असलेल्या एकमेकींशी बोलत होत्या. तिला तोंडही उघडावेसे वाटेना. यांत्रिक पद्धतीने तिचा व्यायाम सुरू होता. एक फुलपाखरु उडत गेलं. त्याच्या येण्यानं ती प्रफुल्लित झाली. क्षणभर त्याच्या आठवणीत आनंदी राहिली. क्षणभर झाडं जीवंत झाली. पुन्हा लगेच झोपली. तिला कळले ती परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. तिला लहानपणीचा ‘तळ्यात – मळयात’ खेळ आठवला. वा-यालाही कदाचित ते कळलं होतं. तो तिच्या अंगागावरुन फिरू लागला. स्वतःचं अस्तित्व दाखवत. ती मात्र या विचारात, “वारा पुढे ढकलतोय की मागे खेचतोय?”
..‌…. एवढ्यात विष्णु सहस्त्रनाम संपले. नेहमी जोडल्या जाणाऱ्या तिच्या हातांना कोणतीही गडबड नव्हती. मन निवांत होते. तिला कळले ती पुढच्या इयत्तेत गेली होती.
बातम्यांचा वेळ टळून गेला. ती शांत. जाणा-या रेल्वेविषयी तिला काहीच वाटलं नाही. आज श्वसन केलं नाही. ती म्हणाली ठीक आहे. परत जाताना दोन फुलपाखरं तिच्याजवळ बागडली. तिचं मन फुलपाखरू झालं नाही. कबुतर तर जणू तिचीच वाट पाहत बसलं होतं. ती मात्र त्याच्याशी बोलली नाही. खिशातला फोन काढावाच वाटला नाही तर कबुतराचा फोटो काढणं दूरच. वाटेतल्या लिंबानं तिला बसायला बोलावलं नाही. ती शांतपणे पुढे गेली.
घरात जाताना अंगठ्याएवढं गोल फळ दिसलं. तिचं बालमन झेपावलं नाही. उलट तिच्या प्रौढ मनाला वाटलं पृथ्वीही अशीच सगळ्या बाजूंनी पाहता येते.
एकादशी असल्यामुळे ती राजगि-याचा लाडू घेऊन माशांना खाऊ घालण्यासाठी निघाली. तीन टोपल्यात वाटेपर्यंत लाडू संपला. मुख्य टाकीत तिनं उगा शिंपडल्यासारखा केला. ती माशांसाठी ‘फिश फुड’ शोधू लागली. तिच्या मनातली एकादशी संपली होती. फिश फुडची बाटली दिसली नाही. ती त्रासली नाही. माहीत असल्यासारखं तिनं कुलूप उघडून आतून बाटली आणली. सगळ्याच माशांना ‘फिश फूड ‘ दिलं.

…… तिला कृष्णाने या वर्गात शिकवलं होतं, ज्याला – त्याला ज्याच्या -त्याच्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. आपण उगाचच आपल्या इच्छा – भावना त्यांच्यावर लादू नये. या पाठाला आत्मसात करून ती सूर्याच्या साक्षीने गच्चीत तिचा स्वधर्म साकारत होती.

श्रीकृष्णार्पणमस्तु!


🍁The Ascent of the Being 🍁
The being is here on the physical plane although in touch with the mental and vital. The being that is the individual consciousness has to ascend and become conscious of all the planes (vital, mental and those above the mental) until it reaches the Divine Oneness which is above all the planes and from which they emerge.
🌷 Sri Aurobindo (Letters on Yoga-4,page no.387)

संपूर्ण समर्पण मॉं !


यावर आपले मत नोंदवा