
तिला माहिती होतं
‘…तुका आकाशाएवढा’
तुका ज्याच्यामुळे आकाशाएवढा झाला आता त्यालाच ती विचारत होती तू का आकाशाएवढा?
आणि कदाचित आज तिला उत्तर मिळालं होतं – , ” तो आणि आकाश निराळे नाहीतच ; आणि म्हणून तो आकाशाएवढा!” तोच आकाश तोच पृथ्वी आणि म्हणून पृथ्वीवर स्वर्ग फुलण्याची शक्यता आणि क्षमता होती, आहे आणि राहील.
श्रीकृष्णार्पणमस्तु!
.

•| ॐ |•
कृष्ण प्रश्न
पहाटेची वेळ. तोंडातून आपसूक अभंग निघाला –
देवाचिये द्वारी | उभा क्षणभरी ||
तेणे मुक्ति चारी | साधियेल्या ||
माझ्या खट्याळ कृष्णानं विचारलं –
भक्त क्षणभर जरी उभा राहिला तर देव इतकं काही देतो ;
जर देव भक्ताच्या दारी क्षणभर उभा राहिला तर भक्त काय देईल?
मी उत्स्फुर्तपणानं म्हणाले –
भक्ताचिये द्वारी | देव उभा क्षणभरी ||
तेणे मोक्षास गोडी |लागेल जीवनाची ||
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
ती
कृष्णानं फक्त प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नानं तिचं भावविश्व मात्र मोहोरलं. जणू काही आज कृष्ण येणार, या आनंदातच ती तरंगत वावरू लागली. मन डोलू लागलं की सृष्टी बोलू लागते. आज तिला उडणारा पानघोडा सुद्धा फुलपाखरासारखा आल्हाददायक वाटला.
पूर्वरंग तिला खुणावू लागला. आकाशातली आभा तिला नारायणाचे वेध लावू लागली. ती उत्सुकतेने वाट पाहू लागली, सूर्याच्या उगवण्याची. खरंतर सूर्य रोजचाच ; पण ती मनाशी हसली आणि म्हणाली, ” खरं आहे. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते.”
श्रीकृष्णार्पणमस्तु!

आनंदाचे डोही | आनंद तरंग |
उभा पांडुरंग | देही माझ्या ||
घडे येथे सर्वथा| विठ्ठलाचा जप|
होई होई तप| जीवन अवघे ||
संत सारे येथे| तत्त्वे रुजवती |
वाळवंटीची भक्ती| अंतरी फुले ||
आनंदाचे डोही | आनंद तरंग
नांदे रे श्रीरंग | हृदयी माझ्या ||
वृंदा आशय

आनंदे पूजीला पंढरीचा राणा
होऊनी विठ्ठल उभा माझा कान्हा
कोणत्या एका उत्फुल्ल क्षणी,
उत्कटतेने फुलली ती रुक्मिणी
सांगे आला माझा कान्हा परतुनी
कुजबूजत सांगे ती जनीवनी !
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संत तुकारामकृत वैश्विक चिंतनाचे चिंतन
✍️प्रा.डॉ.ज्ञानेश्वर थोरात
संत तुकारामांची प्रज्ञा आणि प्रतिभा लोकोत्तर आहे. मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत थोर संतकवी आणि वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले सामाजिक आणि सांस्कृतिक भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर आणि सर्वमान्य आहे. त्यांची साहित्य निर्मिती अभंग छंदात वृत्तबद्ध असून “संत तुकारामांची अभंगगाथा” या साहित्यकृतीत उपलब्ध आहे .आशय आणि आविष्काराची विविधांगी, विपुल आणि विस्तृत साहित्य वस्तू सामर्थ्य शक्ती लाभलेली संत तुकाराम महाराजकृत “अभंगगाथा” महाराष्ट्रातील अबाल वृद्धांच्या काना मनाची धनी पुरवितो; हे एक साहित्य जगातील वास्तववादी वेगळेपण आहे . म्हणून पिंपळनेर निवासी संत निळोबांनी “जगद्गुरु तुका अवतार नामयाचा” अशा शब्दांत संत तुकारामांचे श्रेष्ठत्व अधोरेखित केले आहे. अर्थात हे भावनिक पातळीवरील विधान का वस्तुस्थितीचे निर्देशक ? या अंगाने आपण जेंव्हा विचार करत जातो तेंव्हा तुकोबारायांच्या साहित्य निर्मितीत जगाला मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य एकवटले आहे .आजचे जग सहकाराच्या तत्त्वाने गतिमान होईल आणि सर्वांगाने आणि सर्वार्थाने संपन्न होईल; असा विश्वास व्यक्त करताना संत तुकाराम महाराजांनी लिहिले आहे,” एकमेका सहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ||” जगातील समग्र सहकारी संस्थांचे हे ब्रीदवाक्य म्हणून विचारात घेतलं जाते. अर्थात त्याच्या अभिव्यक्तीची विविधता वेगवेगळ्या भाषेंत वेगवेगळ्या शब्दांत भिन्नत्वाने प्रत्ययाला आली तरी अर्थ मात्र एकच आहे. जगातील उदयोन्मुख समग्र मानव जातील प्रेरक आणि पूरक ठरणारा विचार संत तुकारामाने व्यक्त केला आहे. विज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात आधुनिक मानवी गरजांच्या परिपूर्तीसाठी सदा सर्वकाळ वास्तुनिष्ठ भूमिका कशी घ्यावी ;याचं वास्तववादी मार्गदर्शन त्यांच्या साहित्यात पाहावयास मिळते.
संत साहित्याचे अभ्यासक, संशोधक, कीर्तन प्रवचनकार आणि उपासकांनी संत तुकोबांच्या अभंग गाथेचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा ;आपल्या कृती,उक्तीला, आचार, विचाराला आणि लेखणी वाणीला विवेकाधिष्ठित अधिष्ठान प्राप्त करून द्यावे आणि उदयोन्मुख भारतीय समाज रचनेचे सुंदर स्वप्न पहावे; असे या साहित्यकृतीचे प्रधान प्रयोजन आहे. कारण समाजमनाला परतत्त्वाचे वेड आणि वेध लागावे इतकी “साहित्य वस्तू सामर्थ्य शक्ती” संत तुकाराम महाराजांच्या अभंग संहितेला लाभली आहे. महाराष्ट्रातील घराघरांतून,वाड्या वस्त्यांतून, मठमंदिरांतून, टाळ ,वीणा मृदंगाच्या सुस्वर तालावर विचारांचा सुसंवाद, साधणाऱ्या कथा कीर्तन,भजनादी कार्यक्रमातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची साधना अखंड चालू आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही त्यांच्या अभंगाचे सामूहिक सादरीकरणाचे दैनिक आणि नैमित्तिक कथा,कीर्तन, प्रवचन आणि भजन इत्यादी कार्यक्रम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात संत तुकाराम महाराजकृत अभंगांचे महत्त्वाचे स्थान आहे. ईश्वर साधनेला सदाचरणाची जोड देऊन व्यक्तिगत मोक्षापेक्षा समाज उद्धाराची सामाजिक बांधिलकी, हे ह्या अभंग साहित्याचे पारंपारिक उद्दिष्ट राहिले आहे. स्थळ काळ सापेक्षित्वाने ‘सकाळांशी येथे आहे अधिकार’, अशी उद्घोषणा करून ‘कलियुगी उद्धार हरीच्या नामे,’ असा आत्मविश्वास समाज मनात जागवण्याचं काम संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीने केले आहे.
वर्ण व्यवस्थेने आणि जाती बंधनाने शतकानुशतके मूक राहिलेल्या सामान्य जनतेला परमार्थाची प्रतिष्ठा मिळवून देऊन त्यांच्या मनात “तुका म्हणे नोव्हे जातीसवे काम | ज्याचे मुखी राम तोचि धन्य ||” असा आत्मविश्वास जागविला. “उच्चनीच काही नेणे भगवंत | तिष्ठे भावभक्ती देखोनिया ||” असा क्रांतिकारक आणि भेदभाव रहित विचार प्रस्तुत करून सर्वसामान्यांची पारमार्थिक अस्मिता सुप्रतिष्ठित केली.नामसंकीर्तन हेच ईश्वर प्राप्तीचे सुलभ साधन असून ठायीच बैसोनिया एक चित्त केले की गोपाळ साधकाच्या चित्तात येऊन राहतो ; असा ईश्वर प्राप्तीचा सहज सुलभ मार्ग प्रतिपादन केला. त्यामुळे संत तुकाराम महाराजांचे अभंग आत्मसन्मानपूर्वक गाणारी एक नवी पिढी उदयाला आली आणि तिने पंडित्याचे प्रदर्शन करण्याऐवजी सामाजिक बांधिलकीच्या प्रगल्भ जाणिवेतून आध्यात्मिक जीवनमूल्यांचे दर्शन घडवले. त्यामुळे सदाचरण, सत्संगती, सर्वानुभूती समता इत्यादी सामाजिक मूल्यांची बहुजन समाजात रुजवून झाली आणि “जग अवघे देव |हीच उपदेशाची ठेव||” म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ असे ठणकावून सांगणारा निर्विवाद विचार प्रस्तुत केला.
संत तुकाराम महाराजकृत अभंग चिंतन आणि जनसामान्यांच्या पारमार्थिक उन्नतीसह अभ्युदयाची वाटचाल सुखकर व्हावी; आचार विचारांच्या समन्वयातून कर्तव्यतत्पर आणि सदृढ समाज व्यवस्थेची निर्मिती व्हावी ; म्हणून संत तुकाराम महाराजांचे अभंग विवेचन किती लक्षवेधक आहे; याचा प्रत्यय त्यांच्या अभंग गाथेतून आल्यावाचून राहत नाही. सुजान समाज निर्मितीच्या प्रक्रियेत संत तुकाराम महाराजांची भूमिका स्पष्ट आहे, “समाजातील दांभिकपण व मिथ्या ज्ञानाचे थोतांड तुकारामांसारख्या दृष्ट्या पुरुषाला पाहावणारे नव्हते. संत तुकाराम त्या विरोधात परखडपणे बोलतात . अर्थात त्यात समाजाच्या भलेपणाची दृष्टी आहे .त्यांच्या कीर्तनातील उपदेश, वैराग्य, ढळढळीत समाजसुधारक व दृष्ट्या समाजचिंतकाचा आहे. त्यात समाजाच्या भलेपणाची दृष्टी आहे .”म्हणून प्रस्तुत सारतत्त्व तत्वतः आणि मूलतः संत तुकारामकृत अभंगान्वये स्पष्ट होते.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती स्वतःचा देह परोपकारार्थ सदैव झिजवितात; अशा संत कार्याला उद्गार देताना संत तुकाराम महाराज प्रस्तुत विचारांचे वस्तुनिष्ठ आचरण करतात ; तेव्हा त्यांच्या कार्याचे मूल्यांकन करताना रामेश्वर भटांना महाराजांचा बहुजन हितकारी आदर्श लोक विलक्षण वाटतो आणि ते संत तुकाराम महाराजांविषयी “भक्तीज्ञाने आणि वैराग्य आगळा| ऐसा नाही डोळा देखियेला||” असे लक्षणीय उद्गार काढतात. संत तुकाराम महाराजांच्या पूर्व आयुष्यातील प्रखर विरोधक जेंव्हा सकारात्मक भूमिका घेतात ;तेंव्हा संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक कार्याचा, त्यांच्या समकालीन तथाकथित महाजनांवर आणि बहुजनांवर किती जबरदस्त प्रभाव पडला होता; याचा अंदाज दृष्टिगोचर होतो.
संत तुकाराम समाजउन्नतीचा विचार मांडताना स्वतःच्या विचार विश्वाशी संदिग्ध नाहीत .”वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा| येरांनी वहावा भार माथा ||” अर्थात इतरांच्या मतमतांतराचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. ते अतिशय त्वेषाने आणि रोषाने म्हणतात, “तुका म्हणे सत्य सांगू |येवो रागे येती त्या ||” कारण घटपटाची पोकळ आणि शुष्क चर्चा करणे त्यांना आवडत नाही .भिन्नभिन्न विचार प्रणालीच्या आहारी गेलेल्या पंडिती विचारसरणीला ते धुडकावून लावतात. “बहुतांंच्या आम्ही न मिळो मतासी | कुणी कैसी कैसे भावनेच्या||१|| विचार करिता वाया जाये काळ |लटके ते मूळ फजितीचे ||२||तुका म्हणे तुम्ही करा घटपटा |नका जाऊ वाटा आमुचिया||३||” स्वतःच्या आचार विचारांशी संदिग्ध, संभ्रमित असणारे तथाकथित समाज सुधारक आपल्या कृती-उक्तींचा केंव्हा पालट करतील; हे सांगता येत नाही. म्हणून “एकविध आम्ही न धरू पालट | न सांडू वाट सापडली ||” असा महाराजांचा दृढ संकल्प होता .” यारे यारे लहान थोर | याती भलती नारी नर |करावा विचार |न लगे चिंता कोणाशी ||” अशी त्यांनी समाजातील सर्व घटकांना पंढरीच्या वाळवंटात संघटित करण्यासाठी साद घातली.अर्थात त्याची समाज संघटनेची प्रेरणा ,”बुडते हे जन न देखवे डोळा | येतो कळवळा म्हणोनिया||” या अशा जाती कुळातील आहे. हे निर्विवाद सत्य त्यांच्या अभंगातून प्रकट झाल्यावाचून राहत नाही.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील सुभाषितांमध्ये महाराजांच्या समाज हिताचा सर्वस्पर्शी आणि तत्त्वदर्शी असा धांडोळा घेतला जातो. जनमानसात संत तुकाराम महाराज प्रस्तुत सुभाषितांचे सत्व आणि महत्त्व किती खोलवर रुजले आहे , याचे प्रत्यंतर आपणाला ठाई ठाई आल्या वाचून राहत नाही.
” तुकारामांच्या चिंतनशिलतेचे, निरीक्षण चातुर्याचे, अल्पाक्षररमणीयत्वाचे व मराठी भाषेवरील प्रभुत्वाचे दर्शन घडवणारी सुभाषिते आपल्या मुखी, कानी इतकी रूळून बसली आहेत की त्यांचा कर्ता कोण हे आता आपल्या ध्यानीमनीही येत नाही. चिरंतन अनुभव आणि उत्कटता यांची सहज झालेली ही अभिव्यक्ती आहे.” प्रस्तुत विधानांची समर्पकता आणि सार्थकता उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करायची ठरली तर काही सुभाषिते येथे संदर्भाकरिता पर्याप्त आहेत “१)भिक्षापात्रा अवलंबणे| जुळो जिणे लाजिरवाणे|| उक्तीचे आणि कृतीचे दारिद्र्य तुकोबांना अपेक्षित नाही.२)तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे | येरा गबाळ्याचे कामं नोव्हे|| उदात्त आणि उत्कृष्ट कार्यासाठी क्षमतांचा विकास तुकोबा गृहीत धरतात. ३)नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ||” जीवनाचे विशुद्धीकरण सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला आवश्यक आहे.अर्थात त्यांच्या अभंगवाणीत
समाजाच्या स्थितीगतीचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळते; शिवाय समाजाला दिशा देण्याची आणि समाज व्यवस्थेची विपरीत अन् विकृत दशा समाप्त करण्याची ताकद या अभंग सुभाषितांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर्निहित आहे. म्हणून “तुकारामांची सुभाषिते साध्या भोळ्या माणसांपासून विद्वानांपर्यंत सर्वांच्या मुखी रूढ झाली ,याचं कारण केवळ रचनेचे सौष्ठव नव्हे, केवळ सुविचार नव्हे ,हे आपण पाहिले पाहिजे. संत तुकाराम आपला आशय सुभाषित वजा काव्यपंक्तींतून व्यक्त करतात ,तेव्हा त्याला चिरंतन सत्याचे अधिष्ठान असते. तो आशय केवळ प्रासंगिक वा केवळ तात्कालिक असत नाही” मध्ययुगीन मराठी साहित्यातील सामाजिक चिंतनाबरोबर परततत्त्व बोधाचे चिंतन प्रकर्षाने अभिव्यक्त केले आहे. स्वतःला ‘अणुरेणूया थोकडा,’ म्हणणारे तुकोबा त्यांच्या वचनांच्या आधारे आपण अभ्यासू लागतो, तेंव्हा ‘तुका आकाशाएवढा,’ असल्याचा अनुभव केवळ त्यांचाच राहत नाही तर तो आपलाही होऊन जातो. त्यासाठी त्यांनी केलेली धडपड विलक्षण जनहिताची होती; हे प्रतीत झाल्या वाचून राहत नाही. “बुडते हे जन न देखवे डोळा | येतो कळवळा म्हणोनिया ||” या सामाजिक धारणेने आणि धोरणाने त्यांनी ” माणसाचे सामाजिक जीवन शुद्ध असावे आणि मन निर्मळ व्हावे म्हणून आग्रह धरला. सामान्य माणसाचे सामाजिक जीवन शुद्ध झाले तरच अंतरीच्या परिपूर्णतेने सर्वांशी समरस होण्याचे भाग्य त्याला लाभेल.” त्यासाठी संत तुकारामाने सामाजिक आशय आविष्कार सर्वांना समजणाऱ्या भाषेत भावपूर्ण रीतीने उलगडून दाखवला आहे. बहुजन समाजासाठी अध्यात्माचा मार्ग खुला व्हावा ; म्हणून संत तुकाराम महाराज आयुष्याचा क्षण ना क्षण आणि शरीराचा कण ना कण जगाच्या कल्याणासाठी वेचताना दिसून येतात. त्यांनी समाजाची नैतिक उन्नती व्हावी, या तळमळीने केलेले कार्य समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सहाय्यक ठरणार आहे; हे आता निर्विवाद सत्य आजच्या जगाच्या लक्षात आले आहे. सर्वसामान्य माणसाला प्रभावित करणारे आहे.” माणसाचे अंतर्बाह्य जीवन अभंगातून प्रकट करताना समाजाच्या जीवन प्रवासी निगडित असलेल्या भक्ती, नैतिकतेचा मुख्य गाभा आहे ; या शक्तीदायी विचारांची रुजवण ,हे संत तुकाराम महाराजांचे भागवत संप्रदायातील फार मोठे योगदान आहे”
वारकरी संत विचाराचा प्रसार आणि प्रचार नितांत आवश्यक आहे वर्तमान काळाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर तो उच्चारांपेक्षा आचारातून अधिक व्यक्त व्हावा ; असा वस्तुनिष्ठ आदर्श संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीतून समाजासमोर ठेवला आणि “अनुभवे आले अंगा | ते ह्या जगा देत असे||” असा कृती-उक्तीचा सुमेळ घालून आदर्श समाज रचनेचे स्वप्न पाहिलं आणि ते सर्व शक्तिनिशी प्रत्यक्ष समाज जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला; या अंगाने संत तुकाराम महाराजांच्या व्यक्तीत्वाची आणि कर्तृत्वाची समीक्षा आपण करू जातो. कारण त्यातील सामाजिक मूल्यांची अपूर्वाई लोक विलक्षण आहे आणि म्हणून संत तुकारामकृत वैश्विक चिंतनाचे चिंतन अपूर्व आहे.
संदर्भ ग्रंथ:
१) संपादक डॉ.नारायण महाराज जाधव ” श्री तुकाराम महाराजांची गाथा” आनंदाश्रम प्रकाशन ,आळंदी देवाची २०२५
२) प्रा.डॉ. सुभाष बागल “संत तुकारामांचे अभंग :एक चिंतन” , कैलास पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर ,२०२४
३) डॉ. सदानंद मोरे,”तुकाराम दर्शन”
सकाळ प्रकाशन, पुणे.

मित्रानो, निसर्ग आणि ईश्वर या दोन संकल्पना वरवर पाहता वेगळ्या वाटत असल्या, तरी खोलवर विचार केल्यास त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे जाणवते. सृष्टीचा कण अन् कण ज्या शक्तीने व्यापलेला आहे, तिलाच आपण ईश्वर म्हणतो आणि ती शक्ती ज्या रूपात आपल्या डोळ्यांसमोर प्रकट होते, त्याला आपण निसर्ग म्हणतो संतांनी म्हटल्याप्रमाणे
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत म्हणजेच सृष्टीतील प्रत्येक सजीवात आणि निर्जीवात ईश्वराचे अस्तित्व आहे निसर्गाकडे पाहिले की ईश्वराच्या अस्तित्वाचे पुरावे पावलोपावली मिळतात. पहाटेच्या वेळी होणारा सूर्योदय त्यातील रंगांची उधळण आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व पाहताना एखाद्या महान चित्रकाराच्या हाताची हीं जादू असल्याचा भास होतो अथांग समुद्र,उत्तुंग हिमालय आणि घनदाट जंगले मानवाला त्याच्या कमजोरीची जाणीव करून देतात. जेव्हा आपण एखाद्या शांत रात्री आकाशातील अनंत ताऱ्यांकडे पाहतो, तेव्हा या अफाट विश्वाचा कोणीतरी एक नियंता नक्कीच आहे, ही श्रद्धा दृढ होते पक्की होते निसर्ग हा ईश्वराचा सर्वात मोठा ग्रंथ आहे. झाडाकडून आपण परोपकार शिकतो झाड स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्याला सावली देते आणि दगड मारणाऱ्यालाही गोड फळ देते. वाहणारी नदी आपल्याला सांगते की,अडथळे कितीही आले तरी प्रवाहासारखे पुढे जात राहावे ऋतूंचे चक्र आपल्याला जीवनातील सुख-दुखाच्या अनित्यतेची जाणीव करून देते. ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी केवळ मंदिरात जाण्याची गरज नाही निसर्गाच्या सानिध्यात एकांतात बसणे ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे मात्र आजचा मानव या ईश्वरी रूपाला विसरत चालला आहे. विज्ञानाच्या प्रगतीत आपण निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण प्रत्यक्षात आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत. निसर्गाचा समतोल बिघडवणे म्हणजे ईश्वराच्या रचनेत हस्तक्षेप करण्यासारखे आहे. जेव्हा निसर्ग कोपतो, तेव्हा मानवाची सर्व शक्ती तोकडी पडते शेवटी, निसर्ग आणि ईश्वर यांच्यातील नाते हे चैतन्याचे नाते आहे. निसर्ग हा ईश्वराचा देह आहे, तर ईश्वर हा निसर्गाचा आत्मा आहे. जर आपल्याला ईश्वराला खऱ्या अर्थाने अनुभवायचे असेल, तर प्रथम निसर्गावर प्रेम करायला शिकले पाहिजे. निसर्गाचे रक्षण करणे हीच ईश्वराची खरी सेवा ठरेल. ज्या दिवशी मानवाला प्रत्येक झाडात, फुलात आणि प्राण्यात ईश्वरी अंश दिसेल, त्या दिवशी हे जग खऱ्या अर्थाने नंदनवन होईल. निसर्ग हाच आपल्या जीवनाचा आधार असून तोच ईश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार आहे त्यामुळे ईश्वरा चा अनमोल ठेवा आपण सर्वांनी सुरक्षित ठेवला पाहिजे त्याची जपणूक केली पाहिजे कारण त्याला बघितल्या वर बनवणाऱ्याची आठवण जरूर येते कारण ईश्वराचे खरे रूप हा निसर्ग आहे.
श्रीपाद श्री वल्लभ प्रसन्न
(हा लेख वरील फेसबुक लिंकवरून घेतलेला आहे . धन्यवाद.)
श्रीकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा