विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

द्वंद्वातीत

वृंदा आशय

डाव्या – उजव्याचा ना आता भेद
मनास अन् मानण्यास गेला छेद !

•| ॐ |•
अनादी, अनंत परमेश्वर देश, वेश, भाषा, रूप या सर्वांच्या पल्याड जाऊन सारखाच आहे. एकच आहे. असीम कृपामयी आहे.
गणरायासाठी गायल्या जाणाऱ्या चराचरीमध्ये फारच सुंदर वर्णन आहे –
स्वयंप्रकाशा काय तुजपुढे निरांजन ज्योती,
विसर्जन तुला कोठे विसवू नांदविशी कोटी !


🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻

हे गणराया…

अनादी तू अनंत तू
परि सामाविशी
साऱ्या रुपात तू

निर्गुण तू निराकार तू
भक्तांस्तव होशी
सगुण साकार तू

बुद्धिवंत तू शक्तिमंत तू
तरी सांभाळशी साऱ्या
अज्ञानी, दुर्बला तू

गणराया, तव मूर्तीचे
पूजन – विसर्जन
डोळ्यांमध्ये घालीते अंजन

घडावे, जैसा मिळे आकार
रंगात त्या रंगुनी
करावा धन्य मूर्तिकार

बोलवे जो आदराने
जावे तेथ संयमाने
देईल ते घ्यावे प्रेमाने

जाऊ तेथले व्हावे
पाहूणचार घ्यावे
कृपादृष्टीने रक्षावे

जेथ सृजन पूजन
असतेच विसर्जन
मात्र शाश्वत कृपाघन !

वृंदा आशय


•| ॐ |•

कृष्ण कृपेने शमली वासना
कृष्णच झाला माझी तृष्णा…
कृष्ण कृपेने असे हो घडते
निर्गुणातच सगुणाचे भागते!

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!


कर्ता !

तो अपेक्षितो
फक्त स्वीकार,
मग तोच देतो
सारे आकार;
आणि तो मात्र
निर्गुण-निराकार!

..निर्गुण ..निराकार !

त्याला नाही सांगावं लागत
काय हवं, काय नको..
तो जे करेल त्याला,
आपण फक्त म्हणायचं ‘हो’ !

तो ओळखतो, मापात जोखतो
त्याला अपेक्षित फक्त होकार !
मग होतो भक्ताचा स्वीकार,
अन् आयुष्याला परिपूर्ण आकार!

अनेकांच्या मनी,
तो दंतकथांचा धनी !
त्याच्याबद्दल खूप वदंता
..तो दिसतो…तो नसतो !

व्यापून राहणा-या अवघ्या चराचरा, शोधू कशी तुला निर्गुण निराकारा !


•| ॐ |•

होता वासनाक्षय | ना उरले भय
मन होई निर्भय | निराकार ते ||

शोध कशाचा | अंधार की प्रकाशाचा
पेटता अंतर्ज्योती | कळे खेळ भासाचा

जे निर्गुण निराकार | तेचि सगुण साकार
कळे सारासार | हा आकार एकत्वाचा ||

श्रीकृष्णार्पणमस्तु!


द्वंद्वातीत

माझ्या जाणीवांचा
तू घडवतो प्रवास
प्रवासात साऱ्या
असतोस आसपास

कृष्णा तुला पाहता
गवसते रे मज
सख्याची तरलता
गुरुची तन्मयता

जे कळे न मजला
देतोस समजावून
जमे न जे मजला
घेतोस रे करून

विकसित करशी
माझी जाण…
द्वंद्वातीत होऊन
दिसे सारे समान

तूच कार्य अन्
तूच कारण
वाढू दे हे प्रेम
अकारण…

वृंदा आशय


•| ॐ |•

कृष्णा तुझाच आता जडला छंद
न दिसती मज यशोदा आणि नंद

कृष्णा मनातले विरले बघ सारे प्रश्न
सर्वत्र गवसे एकच उत्तर कृष्ण-कृष्ण

कृष्णा मला आता मिळाला आराम
हृदयी प्रकटले रे साक्षात श्रीराम !

कृष्णा आता नाही कोणतीही पृच्छा
दिसेनात सूर्य-चंद्र विरली ती राधेच्छा

रमत होते डोळे पाहूनी विविध रूपं
कृष्णा, आता या जीवा तुझेच अप्रूप!

कृष्णा तूच तुला नित्य समर्पिते
झाले रे झाले आकाश हे रिते !

रितेपणात का ऐकू येते बासरी
जीवनाची ही कोणती माधुरी?

संपूर्ण समर्पण !

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!


यावर आपले मत नोंदवा