विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

गरज नेत्रदानाइतकीच दृष्टीदानाचीही !

……..देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार !



‌ ‌•| ॐ |•

देवा,
तुझे हे जग मर्त्य
उलगडून दाखवतोस
तूच एक एक सत्य !

माणूस – उत्कृष्ट निर्मिती
होता तुला रे हा गर्व
विसरला तो तुझे पर्व !

देतोस रे देवा तू सा-यास डोळे
पण का ठेवतो त्यांना दृष्टिहीन?
दृष्टी अभावी जग होते क्षीण !

स्पर्धा येथे त्यांच्यात्यांच्यात
कोण छोटा कोण मोठा; रिते
आईविण घर गाईविण गोठा !

सांग नादावेल आता कोणा वेणू?
कोण येई तुझ़्या मागे प्रश्न जिथे जन्मदात्यास का मायबाप म्हणू ?

प्रत्येकाला भाजायची असते पोळी
त्यासाठीच जो तो उभा तव्याजवळी
मग अजूनही तेच, ‘बळी तो कान पिळी’

प्रत्येकजण इथे शोधतो उन्नतीची संधी
त्यासाठी होतो मदारी व्यवस्थेचा नंदी
अंतरीच्या सद्गुणांना इथे प्रवेशबंदी !

मग सांग कसली प्रगती कसला विकास?
आपसूक संपत जाते जगण्याची आस
दृश्यअदृश्य प्रत्येक गळ्याभोवती फास!

कोणी जगतो कोणी मरतो कोणी तरतो
जगी जगून येऊन शेवटी तुलाच मिळतो
म्हणून का देवा तू राहतो एवढा उदास!

श्रीकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

उशिराने झालेली पहाट

खरं म्हणजे काही घरगुती कारणांमुळे आता बागेकडे फिरकणं होत नाही. आज मात्र आवर्जून यावंसं वाटलं. एरवी भल्या पहाटेच इकडे येत होते. त्यामुळे इथे उशिराने आले तरी मला आपली ती पहाटच वाटते. सूर्य त्याच्या पूर्ण तेजाने आकाशामध्ये नांदत होता. पिवळा सोनचाफा त्याच्या किरणांनी चमकत होता. कोणत्यातरी आनंदाने कबूतरं विहरत होती. गुलमोहराचे घोस मला खुणावून घेत होते. एका झाडाला स्वतःच्या प्रत्येक झुपक्याचे स्वतंत्र अस्तित्व दाखवणाऱ्या गुलमोहरांनीही मला खुणावलं. वारा चहुबाजूंनी स्वागत करत होता.

चालता चालता दोन-तीन कष्टकरी दादा भेटले. मेहनत, दूरदृष्टी कशी महत्त्वाची हे नकळत त्यांच्या संवादातून त्यांनी सांगितलं. आज सूर्याने ॐ नव्हे तर स्वस्तिक दाखवलं आणि त्याच वेळी जमिनीवर बागेत एकाकी पडलेल्या खेळण्याने एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं!

छायाचित्रांच्या संदर्भातील माझ्याच एका कृतीने मला दाखवून दिले, “अंतिमतः अज्ञानाचा आणि ज्ञानाचाही निरास होतो.”

श्रीकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

हे परमेश्वरा हे मायबापा….
नमो मुक्तिदाता नमो मुक्तिदाता !

कालचे आणि रे काळाचे प्रश्न
दाखवतो तू मज होऊन कृष्ण
कधी म्हणतो रुक्मिणी कधी सीता
राधा मानूनी ऐकवतोस तुझी गीता

सारे काही सांगतो खरे तेच बोलतो
निर्णयाच्या क्षणी मग हात का सोडतो?
म्हणतोस हे जग शिवशक्तीचा विलास
अन् तेच का रे देते नकार सुसंवादास?

सांगतोस तू ,’कृष्ण नाही उत्तर तो प्रश्न’
सांगतोस नाते चैतन्याशी या जीवनाशी
का रे घेतोस फारकत सहसंवेदनेशी ?
तूच कर्ता तूच भोक्ता मग कुठे सतर्कता?

सतर्काचे पेरत अर्थ नकोत तर्कवितर्क
त्यात हरवून जातोय रे जीवनाचा अर्क
नानारूपे नानारंगी तूच घेतोस हा भोग
अन् म्हणतोस हा अहंकाराचा कर्करोग

लपून बसतो, फुत्कारतो ‘मी’पणाचा सर्प
अस्तित्वाचा त्याच्या सर्वत्र येतो उग्र दर्प !
व्हावे आम्ही मुक्त – करुनी, तुला समर्पूनी
म्हणून घेतोस का रे छळून क्षणोक्षणी ?

छळणारा तू,
छळवणारा तू,
अन् पुन्हा तूच मुक्तिदाता!

नक्की कोणती सांगू
भावी पिढ्यांना तुझी कथा ?

श्रीरामकृष्णार्पणमस्तु !


आकाशवाणी – अमृतधारा – डॉ. निवेदिता सराफ – दृष्टी


श्रीकृष्णार्पणमस्तु !

यावर आपले मत नोंदवा