जपा निसर्गाला, जपा स्वत:ला ! _संपादन आभाई (वृंदा आशय)
झाडे, पाने, फुले, पक्षी माझ्याशी जे बोलले, ते मी आज तुम्हाला सांगितले. का सांगितले ? कारण काल ५ जून रोजी होता जागतिक पर्यावरण दिन !

लिंबाच्या झाडामध्ये उगवले पिंपळपान !
असं कसं? असं कसं ?
विचारती मुले हलवून मान !

बाळांनो, माझ्या अंगणात कमळाची फुले उमलतात. एकदा काय झालं? कमळाची कळी अगदी शेजारच्या पानाच्या उंचीवरच उमलायला सुरुवात झाली. मी जेव्हा कौतुकाने तिचा व्हिडिओ काढायला गेले ना तर तिच्या शेजारचं पान अगदी स्तब्ध झालं आणि कॅमेरा थोडासा दूर नेताच ते पुन्हा वाऱ्यावर डोलायला लागलं. त्यामुळे क्षणभर माझ्या मनाला वाटलं, लहान मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध फोटो काढलेला आवडत नाही ना.
तसेच काहीतरी या पाना-फुलांचे असावे. ते तुमच्यासारखेच निरागस असतात. त्यामुळे तुमची आणि त्यांची मैत्री लवकर होते नाही का ?

फुलणाऱ्या फुलांचं कौतुक तर व्हावंच. पण असते एखादी कळी जी जाते बळी! मात्र तिची दखल तरी घ्यावी. सांगावं तिला,” तू नसलीस तरी आम्हाला होती हवी!” बाळांनो मुक्या कळ्यांना सांभाळत जावे. त्यांना कधीच तोडू नये. ‘श्यामची आई’ श्यामला हे खूप छान समजावून सांगायची बरे का. साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक तुम्ही वाचले का रे बाळांनो ?

मुलांनो हे कशाचे चित्र आहे ?
मला खात्री आहे बरे तुम्ही अगदी डोळे मिटून सांगताल, ‘मोबाईलचे’ !
अगदी बरोबर !
तर मुद्दा काय ? मोबाईल खूपच आवश्यक असेल तेव्हाच वापरायचा !
का ?
बाळांनो, त्याच्या जास्त वापरामुळे आपल्याला त्रास होतो. आपण विसरभोळे होतो. आपली चिडचिड होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याचा त्रास होऊन चिमण्या आता अंगणात येत नाहीत. चिऊताई शिवाय माझ्या बाळांना करमेल कसे ? म्हणून ….

ये गं ये गं चिऊताई तुझ्या बाळाला मी दाणा देई !


हे आहे माझे आवडते पुस्तक आहे. तुम्ही वाचले का ? नसेल वाचले तर लवकर वाचा. तुम्हाला गंमत माहिती आहे का ? हेच पुस्तक तुम्हाला ऐकता सुद्धा येईल ! कसे ?

सुखी राहा !
यावर आपले मत नोंदवा