विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

मंत्र गायत्री मातेचा, कृपा नारायणाची !

गायत्री जयंती व निर्जला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

•| ॐ |•

कृष्ण चहाला आला

पहाट झाली. नेहमीसारखं दूध तापवायला घेतलं. सहज नजर बाहेर गेली. लिंबाच्या जवळचा आणि मागचा परिसर उजळलेला होता. कदाचित वॉचमन लाईट बंद करण्यास विसरले असावेत, पण मन अधिकच प्रसन्न झालं. सहजच मी माझ्याशीच बोलले, ‘प्रकाशाने अंधाराला शोधलं’. माझंच मला खुद्कन हसू आलं. कारण विनोबा भावे सांगतात, ‘अंधाराला प्रकाशासमोर कधीच नेता येणार नाही. प्रकाश आला की अंधार आपोआप नाहीसा होतो. ‘ मग मन विचार करू लागलं. ‘प्रकाशाने अंधाराला शोधलं ‘ असं का वाटलं असेल?
तेवढ्यात कृष्ण मागून आला आणि म्हणाला, ‘ प्रकाशाने अंधाराला सोडलं’ असं म्हणायचं असेल तुला. मी म्हणलं, “कृष्णा, तसंही असेल बघ कदाचित. कारण आम्ही लहानपणी जेव्हा बल्बमध्ये अभ्यास करायचो, त्या वेळेला प्रकाशाच्या मध्ये कोणी आलं तर म्हणायचं त्याला अंधार सोड बरं.”


कृष्ण : अच्छा ! म्हणजे लहानपणापासूनच तुला चुकीचं बोलायची सवय आहे तर ?


मी : (फुरंगटून) चुकीचं काय आहे यात?


कृष्ण : अगं , तेव्हा तुला म्हणायचं असेल ‘प्रकाश सोड’ ! म्हणजे तुझ्या वह्या पुस्तकांवर प्रकाश सोड असं.

मी : अय्या ! कृष्णा, खरंच की ! एवढ्या दिवसात कधीच लक्षात आलं नाही बघ.

कृष्ण : ‘काय धरावं, काय सोडावं’, हे कळलं पाहिजे आता.

मी : कृष्णा, धरा म्हणजे पृथ्वी. ती सारं काही तुझ्याच इच्छेने धरते आणि सोडते का रे ?

कृष्ण : ( आश्चर्याने आणि कौतुकाने पाहत होता ) हूं. चहा करा लवकर. मला पण घ्यायचा आहे आज.

कृष्णाला चहा घ्यायचा म्हटल्यावर माझा जीव आनंदून गेला. चहा करत करत एक दिवस भाईजींनी आणि एक दिवस स्वामीजींनी मला कसं चहाला बोलवलं होतं हे पण मी त्याला सांगितले.
कृष्ण म्हणाला, “मीही बोलवेल हो तुला. पण आज तू करते ना माझ्यासाठी?”
कृष्णासाठी चहा करायचा म्हटलं की इतर सगळं आपसूक गळून पडलं आणि मी चहामय झाले.

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!


गायत्री मंत्राविषयी कोश वाङ्मयातून

गायत्री (मंत्र): गायत्री छंदातील एक मंत्र. उपनयन संस्कारात ब्रह्मचर्याची दीक्षा दिल्यावर ज्या मंत्राचा ब्रह्मचाऱ्यास आचार्याकडून उपदेश होतो, तो मंत्र ‘गायत्री मंत्र’ होय. हा मंत्र संध्यावंदन करताना नित्य जपायचा असतो. ऋग्वेदात गायत्री छंदा-तील पुष्कळ मंत्र किंवा ऋचा आहेत. या मंत्राची देवता म्हणजे वर्ण्य-विषय ‘सविता’ देव आहे. गायत्री मंत्र हा सविता देवाच्या प्रार्थनेचा मंत्र आहे. म्हणून त्यास ‘सावित्री’ म्हणतात. त्याचा कर्ता म्हणजे ऋषी विश्वामित्र.

तो मंत्र असा,

तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।।

(ऋ. ३.६२.१०)

अर्थ : सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे, त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत. तो आमच्या विचारांना प्रेरणा देवो.

या गायत्री मंत्राचा जप पापनाशाकरताही करावयास सांगितला आहे. ‘गायत्री पुरश्चरण’ नामक तीन वर्षांचे तप धर्मशास्त्रात सांगीतले आहे. या तपात या गायत्रीचा जप प्रतिदिन दीर्घकाल तीन वर्षे करावयाचा असतो. त्याच्या योगाने महापातकाचा नाश, विद्येचे तेज, वाचेची सिद्धी इ. फले प्राप्त होतात, असे सांगितले आहे. या मंत्राचा गूढ विशेष तात्त्विक अर्थ, जैमिनीय उपनिषदवाङ्मयात सांगितला आहे.

संदर्भ: पणशीकर, बासुदेवशास्त्री, संपा. मनुस्मृति, निर्णयसागर प्रेस, मुंबई.

नोंद लेखक – जोशी, लक्ष्मणशास्त्री, मराठी विश्वकोश, खंड ४


भारतीय संस्कृतीकोशाच्या खंड क्रमांक २ मध्ये गायत्री देवी व गायत्री मंत्र याबाबत माहिती मिळते. ती खालीलप्रमाणे

गायत्री हा सात छंदांमधील पहिला छंद आहे. ऋग्वेदात यालाच ‘गायत्र’ म्हंटले आहे. गो + त्रा या पदापासून ‘गायत्री’ हा शब्द बनलेला असून, वाणीचे संरक्षण करणारा छंद, असा त्याचा मूळ अर्थ आहे. गायत्री या स्त्रीलिंगी शब्दाची व्युत्पत्ती ‘गायन्तं त्रायसे’ गाणाऱ्याचे रक्षण करते म्हणून गायत्री, अशी दिलेली आहे. कृतकृत्य झालेली पृथ्वी गाऊ लागली, म्हणून पृथ्वीला गायत्री म्हणू लागले, असा उल्लेख शतपथ ब्राह्मणात (६.१.१.१) आढळतो.

बृहदारण्यकोपनिषदात या मंत्राची व्युत्पत्ती दिली आहे, ती पुढीलप्रमाणे-

गय म्हणजे प्राण व त्रै म्हणजे वाचवणे, रक्षण करणे, यावरून जी प्राणांचे रक्षण करते, ती गायत्री होय. जेव्हा आचार्य शिष्याला गायत्रीमंत्राचा पाठ देतो, तेव्हा तो त्या शिष्याचे अज्ञानापासून रक्षण करतो. (बृहदा. ५.१४.४).


अमृतमंत्र – गायत्री हा वेदवाङ्मयातील अमृतमंत्र आहे. या मंत्रात सवितृदेवीची तेजोमय आराधना आहे. सविता सूर्य हा तेज व ज्योती यांचा मूलस्त्रोत आहे. विश्वाचे जीवन त्याच्यावरच अवलंबून असते. सूर्यतेज ही मानवाच्या मानसिक क्रियांचीही प्रेरणा आहे. म्हणूनच त्या मंत्रात बुद्धीला प्रेरणा देण्याबद्दल प्रार्थना केली आहे. योगदर्शनात सूर्य हे आत्म्याचे प्रतीक मानलेले आहे. म्हणून सूर्यतेजाचा अर्थ आत्मतेज असाही होऊ शकतो. या मंत्राच्या द्वारे केली जाणारी सूर्योपासना जीवन, प्राण, मन, बुद्धी व आत्मा या सर्वांच्या कल्याणासाठी असते. साधनेच्या परंपरेत गायत्रीमंत्राला कामप्रद चिंतामणी मानलेले आहे. या मंत्राच्या विधिपूर्वक पुरश्चरणाने ओज, तेज व मंगल यांची प्राप्ती होते. गायत्री ही मानवाची करुणामयी माता आहे. ती आधिभौतिक व आध्यात्मिक मंगलांची अधिष्ठात्री आहे.


मूर्तिध्यान – गायत्रीमंत्राच्या पंचमुखी देवतेचे मूर्तिध्यान पुढील श्लोकात वर्णिलेले आहे-

‘मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणै-

र्युक्तामिन्दुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम् ।

गायत्रीं वरदाभयाङकुशकशा शुभ्रं कपालं गुणं

शङखं चक्रमथारविन्दयुगलं हस्तैर्वहन्तीं भजे ।।

‘मोती, पोवळे, सोने, नील यांच्यासारखी व धवलवर्ण अशी ज्यांची कांती आहे, अशा (पाच) मुखांनी युक्त, त्रिनेत्र, जिच्या मुकुटात चंद्रकला जडलेली आहे, जिच्या नावाच्या वर्णाना तात्त्विक अर्थ आहे, वरद व अभय या मुद्रा, त्याचप्रमाणे अंकुश, चाबूक, शुभ्रकपाल, दोरी, शंख, चक्र व दोन कमळे, जी आपल्या (दहा) हातांनी धारण करते, अशा गायत्रीची मी उपासना करतो.’


गायत्री व थिऑसफी डॉ. ॲनी बेझंट व श्री. लेडबीटर

यांनी गायत्रीमंत्राचे संशोधन केले होते. अनेकविध प्रयोग करून त्यांनी त्या मंत्राचे अदृश्य सृष्टीत कोणते परिणाम होतात, त्याविषयी माहिती दिली आहे. तिचा सारांश असा-गायत्रीमंत्र हा ध्वनीचा मंत्र नसून त्याचा परिणाम अर्थावर अवलंबून असतो. म्हणजे अर्थाकडे लक्ष देऊन हा मंत्र जपला तरच त्याचा परिणाम होतो. गायत्रीजपाच्या आधी प्रणवाचा उच्चार करायचा असतो. त्या उच्चाराने माणसाच्या सूक्ष्म देहातल्या द्रव्यांचे कण शिस्तबद्ध होतात व अंतरंगात प्रविष्ट होणारी मंत्रशक्ती सुव्यवस्थितपणे आत येऊ शकते.

गायत्रीच्या अर्याकडे लक्ष ठेवून जप केल्याने सूर्यापासून एक तेजोधारा निघते व ती जपकर्त्याच्या अंतरंगात प्रवेश करते. मग ती नानारंगी प्रवाहांनी माणसाच्या शरीरातून बाहेर पडते. ही रेषा शुभ्रवर्णी व किंचित सोनेरी असते. तिचे शरीरातून बाहेर पडणारे प्रवाह सात असतात. त्यांचे रंग भिन्न असतात व त्यांचा आकार केवड्याच्या मोठ्या पाना-सारखा असतो. हे प्रवाह ज्वालारूप असतात. त्यांचे टोक जवळ येणाऱ्या माणसाच्या मेंदूला किंवा हृदयाला स्पर्श करून तिथे तेज निर्माण करते. अनेक माणसांनी सामुदायिक जप केल्यास प्रत्येकासाठी एकेक स्वतंत्र रेषा सूर्यापासून न येता सबंध समुदायाकडे एक रुंदसा प्रवाह येतो. तो प्रवाह समुदा-यातली माणसे नकळत जणू वाटून घेतात. गायत्री मंत्र हा माणसाच्या प्रगतीला अशा अनेक प्रकारे साहाय्य देतो. त्यामुळे जपकर्त्याच्या बुद्धीला व सद्भावनांना उत्तेजन मिळते. या मंत्राने माणसाच्या भोवतीचे वातावरण उच्च श्रेणीचे होते.


वरील माहितीसाठी वापरलेले संदर्भग्रंथ

१. मराठी विश्वकोश, खंड ४

२. भारतीय संस्कृतीकोश, खंड २

३. भक्तिकोश – भारतीय उपासना, संपा. शंकर वासुदेव अभ्यंकर


रामकृष्णहरी !

•| ॐ |•

उमलता कमळ
फुलली सायली
भेटतो विठ्ठल
पावलो पावली!

निर्जलेच्या आधी
केले सारे जलमय
उभा माझा कृष्ण
करी सारे प्रेममय

गेले कडक ऊन
आली ती सावली
आनंदली लेकरे
तृप्तावली माऊली!

संपूर्ण समर्पण!
श्रीकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

शब्दांसाठी यावे | शब्दांसाथी यावे|
शब्द गाता गाता | आपण शब्द व्हावे||

शब्दांपाठी जावे | जीवभावे जगावे |
शब्द घेता देता | शब्दांपल्याड जावे ||

शब्दांपल्याड माहेर | तेथ ‘परा’चे घर |
भावसमृद्ध ते होऊन | आकाश व्हावे ||

                            श्रीकृष्णार्पणमस्तु!

प्रिय कृष्णा,

तुझे नि माझे चित्त जुळलेले

तव कृपेने मज ते कळलेले

आकाशी तेजोमय नक्षत्र तारे

मंद घनगंभीर आज वाहते वारे

मी पाहते मी ऐकते जे घडते सारे

अमंगलावर बसले मांगल्याचे पहारे

शांत होते मॉं सरस्वती, विद्येची देवता

उत्सुक ती ही आता इथे रामस्वागता !

संपूर्ण समर्पण!

श्रीकृष्णार्पणमस्तु !



यावर आपले मत नोंदवा