वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! – वृंदा आशय
आत्मशोधा’कडे आत्मतेजाच्या मार्गाने नेणारा आणि आत्मरंगी रंगविणारा विलक्षण असा ग्रंथ म्हणजे
श्रीअरविंद यांचे ‘सावित्री’ हे महाकाव्य होय.

सावित्री (Savitri) हे महान योगी, कवी आणि तत्त्वज्ञ श्री अरविंद घोष (Sri Aurobindo) यांनी इंग्रजीत लिहिलेले एक अजरामर आध्यात्मिक महाकाव्य आहे. हे महाकाव्य म्हणजे महाभारतातील ‘सावित्री-सत्यवान’ या आख्यानाचा वापर करून मानवी आत्म्याच्या आध्यात्मिक प्रवासाचे व भविष्याचे केलेले प्रतीकात्मक वर्णन आहे
‘सावित्री’ महाकाव्याबद्दलची संपूर्ण व महत्त्वाची माहिती खालील मुद्द्यांमध्ये दिली आहे:
१. निर्मिती आणि रचना
- हे श्री अरविंदांचे सर्वात मोठे आणि अंतिम काव्य आहे.
- यात एकूण २३,८१३ ओळी असून ते निर्यमक छंदातील (Blank Verse) आहे.
- श्री अरविंदांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातील आध्यात्मिक अनुभूती आणि योगसाधनेचे सार यात मांडले आहे.
२. संकल्पना आणि अर्थ
- महाभारतातील सावित्रीच्या कथेचा वापर श्री अरविंदांनी एका प्रतीकात्मक (Symbolic) अर्थाने केला आहे.
- सावित्री: ही ‘दिव्य प्रकाश’ (Divine Grace) किंवा चेतनेचे प्रतीक आहे.
- सत्यवान: हा मानवी आत्मा किंवा सत्याचा शोध घेणारा जीवात्मा आहे.
- यम: हा अज्ञान, अंधकार आणि मृत्यूचे प्रतीक आहे. सावित्री सत्यावनाचा प्राण परत मिळवून मृत्यूवर विजय मिळवते, हे मानवी जीवनाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीचे प्रतीक आहे
३. मुख्य विषय
- हे काव्य मानवी अस्तित्त्व, अज्ञान, दुःख, वेदना आणि पृथ्वीवरील मानवी जन्माचा मूळ उद्देश स्पष्ट करते.
- यामध्ये मानवजातीच्या उज्ज्वल भविष्याची आणि दिव्य जीवनाची (Divine Life) रूपरेषा मांडण्यात आली आहे
४. मराठी अनुवाद
‘सावित्री’ या इंग्रजी ग्रंथाचे अनेक मराठी भाषेत अनुवाद झाले आहेत, जेणेकरून वाचकांना ते समजणे सोपे जावे.
- सावित्री (भावानुवाद): श्री अरविंदांच्या या महाकाव्याचा काव्यात्मक मराठी अनुवाद.
- सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक: हे पुस्तक विविध संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
- श्री अरबिंदो कृत सावित्री (निवडक): या निवडक संस्करणातूनही महाकाव्याचा गाभा समजून घेता येतो.
५. श्री अरविंद घोष – संक्षिप्त परिचय
- जन्म: १५ ऑगस्ट १८७२ (कोलकाता).
- कार्य: सुरुवातीला ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक जहाल क्रांतिकारक नेते होते.
- आध्यात्मिक प्रवास: तुरुंगवासानंतर राजकारणातून संन्यास घेऊन ते पाँडिचेरी (पुडुचेरी) येथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी ‘पूर्णयोग’ (Integral Yoga) या योगमार्गाची स्थापना केली आणि उर्वरित आयुष्य अध्यात्माला वाहून घेतले.
- (स्त्रोत AI)

https://www.facebook.com/share/p/19ALChWWTw

Our being must move eternity through Time;
Death helps us not, vain is the hope to cease;
A secret Will compels us to endure.
Our life’s repose is in the Infinite;
It cannot end,its end is Life supreme.
Death is a passage ,not the goal of our walk:
Some ancient deep impulsion labours on:
Our souls are dragged as with a hidden leash,
Carried from birth to birth,from world to world,
Our acts prolong after the body’s fall
The old perpetual journey without pause.
Savitri Book Two CantoSix Page 197
The Kingdom and Godheads of the Greater Life
•|ॐ|•
प्रिय सूर्या,
माझ्या राम वाटेवर
तू भेटलास मला
लिंबासोबतच्या पारंब्यातून
आणि भर माध्यान्हीही
माझं अनवाणी मन
चालत गेलं गारव्यातून
तुझं अंकुरणं, रूजणं
बहरत जाणं आणि राहणं
अनंतहस्ते तू व्यक्त करतो
शक्यता रूजण्याच्या
मग तू मला दिसशीलचना
मुक्तहस्ते आशीष देणारा कृष्ण!
सावित्रीचं वडाला फार मोठं देणं
मला माहीत नाही रे खरंच
तिनं वडाला दिलं की वडानं तिला
पण अजरामर केलं त्यांनी परस्परांना
त्यासाठी सत्यवान मात्र मरणासन्न झाला
सत्याचं नेहमीच असं होतं का रे, सूर्या?
वृंदा आशय
दि. १ मे २०२६
संपूर्ण समर्पण!
•| ॐ |•
कृष्ण चिंतन
दि. १८ मे २०२६
आज सकाळी कृष्णाने जो गुगली टाकला होता तो काही माझी पाठ सोडेना. ‘एकमेकांची काळजी घ्यायची म्हणजे एकमेकांच्या काळाला जिंकायचं.’ केवढा व्यापक अर्थ सांगितला कृष्णानं ,’काळजी घेण्याचा’ !
आपल्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, बहिण भावांना, नवरा- बायको एकमेकांना, अन्य नातेवाईकांना आपण दिवसातून किमान आठ दहा वेळा तरी, ‘मला तुझी काळजी आहे’, ‘मला तुझी काळजी वाटते’, असं वेगवेगळ्या कारणांनी म्हणत असतो. मात्र या काळजीमध्ये कधी ‘काळाला जिंकून घेणं येतं’,असं मला तरी वाटत नाही. काळजी हा शब्द खरं म्हणजे आपल्यासाठी खूप कॅज्युअल आहे. कोणी काळजी करतो म्हणला की ‘इट्स ओके’ इतकंच म्हणून आपण पुढे निघतो. बऱ्याच वेळेला काळजी करणं हा त्या संबंधित व्यक्तीचा स्वभाव असल्यामुळे त्याला काळजी वाटते, ही वस्तुस्थिती आहे.
कृष्णानं सांगितलेल्या अर्थाचा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की, कदाचित जेव्हा काळ कठीण असतो, प्रतिकूल असतो अशा वेळेला ‘काळाला जिंकून घेणं’ हे त्याला अपेक्षित असावं. आपला व्यवहार मात्र याच्याउलट असतो. सर्व काही प्रतिकूल आहे असं दिसलं की आपण त्या माणसापासून लांब पळतो. एखाद्या रस्त्याने तो माणूस जाताना दिसला तर आपण रस्ता बदलून चालायला लागतो. त्यामागे अनेक कारणं असतात. व्यक्तीपरत्वे आणि प्रसंगपरत्वे तसंच संबंधित व्यक्तींच्या नात्यांपरत्वे या कारणांचं रूप – स्वरूप बदलतं असतं.
हे लक्षात आल्यानंतर तर मला अजूनच प्रश्न पडला. कृष्ण सांगतो त्या प्रकारची काळजी नक्की कोण घेत असेल? त्यासाठी सर्वात आधी समोर आली ती माय माऊली. आई आपल्या मुलाची-मुलीची जी काही काळजी घेत असते ती प्रतिकूल काळ असेल तर अधिकच तीव्रतेने आणि सूक्ष्म पद्धतीने (फार बारकाईने) त्या काळाला सामोरे जाते. तिच्या वात्सल्यापुढे काळ निश्चितच पराभूत होतो. आजच्या समाजातही आजूबाजूला आपल्याला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात.
पती-पत्नीच्या नात्यातून जेव्हा मी विचार करते त्यावेळेला मला थेट ‘सत्यवान’ आणि ‘सावित्री’ यांचीच आठवण येते. सावित्रीने खऱ्या अर्थाने काळाला जिंकून घेतलं होतं. माझी आजी कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीला नेहमी ‘जन्मसावित्री हो’ असा तोंड भरून आशीर्वाद देत असायची. त्या आशीर्वादामागची ऊर्जा या नात्याकडून काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे व्यक्त करणारी होती. आपल्या आजच्या काळामध्ये ‘आदर्श जोड्या’ म्हणाव्यात अशा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जोड्या समाजामध्ये असतील. आपली कुटुंबव्यवस्था इतकी मोडकळीला आलेली आहे की शेवटी, “जोडीदार ठरवायचं किंवा ब्रह्मगाठी बांधायचं काम जर स्वर्गात होत असेल तर तिथेही आजकाल व्यवस्थित काम चालत नाही की काय?” अशा लोक प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतात. (भाव तसा देव हे कृष्णाचं सांगणं मात्र लोक सोयीस्करपणे विसरतात.)
मात्र आपल्या जुन्या पिढ्यांचा विचार केला तर कृष्णाची ही अपेक्षा त्यांच्या काळात पूर्ण करणारे अनेकजण आपल्याला आपसूक भेटतात. अशा जोड्यांच्या बाबतीमध्ये ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे’ हे वाक्य, त्यामधील विचार, मूल्य आपल्याला प्रत्यक्षात साकार झालेले दिसतात. काही ठिकाणी पतिराज देखील अगदी ‘माऊली’च्या भूमिकेत जाऊन आपल्या पत्नीची काळजी घेताना दिसतात. दीर्घ काळाच्या आलेल्या तद्रूपतेने पती-पत्नीचे स्वभाव, गुणधर्म, श्रद्धा हे एकमेकांकडे आपसूक हस्तांतरित झालेले दिसतात.अर्थात तिथे खरी प्रक्रिया असते ती विलीनीकरणाची आणि आत्मसातीकरणाची.
आणि अशा प्रकारची काळजी घेणारा तिसरा शिवाय सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आपल्या देशासाठी सीमेवर लढणारा सैनिक. डोळ्यात तेल घालून आणि प्राणांची बाजी लावून तो देशाचं संरक्षण करतो म्हणून आपण आपल्या घरी निवांत झोपू शकतो ही वस्तुस्थिती आहे.
याही पुढे जाऊन आपल्याला जाणवत देखील नाही पण आपले भोग भोगून आपल्याला नकळत संकटातून तारणारा असतो तो ‘सद्गुरु’. दुर्दैवाने आज अध्यात्मक्षेत्र देखील बदनाम झालेले आहे. मात्र मूळ भारतीय संस्कृतीमधलं अध्यात्मसंचित जर आपण तपासलं तर आपल्याला लक्षात येतं शतकानुशतकं याच ‘सद्गुरु’ कृपेने मानवी समाजाला तारलेले आहे. एकदा शिष्याचा स्वीकार केला की त्याचा तारणहार होणं हे गुरुचे कर्तव्यच मानले जात होते. अर्थात त्यासाठी शिष्याला देखील गुरूच्या कठोर परीक्षांना सामोरे जावे लागे. तारणहार होताना गुरु कोणतेही चमत्कार करत नव्हते तर जीवनातील हरत-हेच्या संकटात आपला शिष्य ताठ कण्याने उभा राहू शकेल अशा प्रकारचं शिक्षण देऊन त्याचं व्यक्तिमत्त्व घडवत होते. संकट हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या संकटकाळातही शिष्याची पुरेपूर परीक्षा झाल्यावरच गुरुबलाने, त्यांच्या तपोबलाने शिष्य तारला जाई. त्यासाठी शिष्याच्या मनात देखील आपल्या गुरुबाबत अविचल अशी श्रद्धा अत्यावश्यक असते. आपल्या गुरु – शिष्य परंपरेमध्ये माणसं खऱ्या अर्थानं पेरली जात होती ; त्यामुळे भारताचा उज्ज्वल इतिहास पाहायला मिळतो.
आज डागाळलेलं अध्यात्मक्षेत्र, संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं शिक्षणक्षेत्र आणि जीवनावरची श्रद्धा उडालेला मानवी समाज बघितला की भौतिक प्रगती हा आपला अंतिम टप्पा असूच शकत नाही याची पूर्ण खात्री पटते. अंतर्मन विकसित झाले तरच मानवाची आंतरिक प्रगती शक्य आहे. ‘अंतर्मन विकसनापासून’ आपले अंतर कमी झाले तर मानवी समाज प्रगतीकडे वळेल आणि हे अंतर वाढत गेले तर अधोगती अटळ आहे.
कदाचित हा कृष्णाच्या सांगण्याचा अर्थ असावा.
श्रीकृष्णार्पणमस्तु!
आत्मप्रदक्षिणा
माझी अंतरीची साद
आणि तू प्रतिसादशून्य
पुन्हा पुन्हा होई
मन हे विषण्ण…
विचारात साऱ्या
घालवले दिवस
जागवल्या रात्री
तू मात्र दक्ष
ना कुठेही सापडू
कागदोपत्री…
तुझी पदमर्यादा आणि
माझी उधाण पावलं
मनीच्या पावलांनी
मनसोक्त नाचवलं…
किती वेळ हा
खेळावा खेळ
आणि मीच माझं
व्हावं रे काळ
खेळ जो मांडला
पाहिजेच मोडला
खरंच पुरे आता हा
उपग्रह होण्याचा छंद
स्वत:नेच स्वत:ला
करून घेणे दंड
Satyawan must die
उमगावं यामागचं तत्त्व
घेऊन धरित्रीची क्षमता
फुलवावं सावित्रीचं सत्त्व
प्रवास तो उन्नत तेजोमय
जोपासे जो अंतर्देवालय
एकरेषीय नसते प्रगती
तिला हवी चक्रीय गती
पैलू उलगडतील सर्वस्वाचे
कळतील अर्थ अस्तित्वाचे
फिरावं कर्त़व्याच्या कक्षेत
गात पृथ्वीचं प्रेमगीत
थांबवावी आत्मवंचना
साकारून ती आत्मप्रदक्षिणा
उमगते मग कुब्जा अन् शबरी
आपसूकच आत जागतो श्रीहरी !
वृंदा आशय
दि. १८ डिसेंबर २०२२
श्रीकृष्णार्पणमस्तु !
•| ॐ |•
शब्दवेध
दि. १५ जून २०२६
‘ज्येष्ठ’ व ‘ज्येष्ठ’
आज अमावस्या आहे. मराठी पंचांगानुसार उद्या नवीन महिना सुरू होणार. तो आहे ज्येष्ठ. ज्येष्ठ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला जे दोन अर्थ प्रतीत होतात त्यातला एक म्हणजे मास किंवा महिना आणि दुसरा ज्येष्ठ माणूस, ज्येष्ठ व्यक्ती.
आज ज्येष्ठ व्यक्तींवर, वृद्ध व्यक्तींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातला दिन जागतिक पातळीवरती साजरा होत आहे. तेव्हा आजच्या आणि उद्याच्या निमित्ताने मला ‘ज्येष्ठ’ या शब्दाचा वेध घ्यावासा वाटला. माझ्या मते ‘ज्येष्ठ’ आणि ‘वृद्ध’ यांच्या वय पातळीमध्ये अंतर असावे. इथे मी ‘ज्येष्ठ व्यक्ती’ म्हणजे सर्वसाधारणपणे साठीच्या पुढे गेलेल्या व्यक्ती किंवा औपचारिक दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर कार्यालयीन कामकाजातून निवृत्त झालेल्या व्यक्ती , असं आपल्याला संदर्भापुरते समजता येईल.
आधी ‘ज्येष्ठ’ मासाचा विचार करूयात. कारण अधिक महिन्यामुळे त्याला बिचा-याला आधीच या वर्षामध्ये उशीरा प्रवेश मिळतो आहे. तेव्हा उद्या तो येण्याआधीच आपण आज त्याची दखल घेतली म्हणजे कदाचित त्यालाही जरा बरं वाटेल. ज्येष्ठ महिना हा धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. गंगा दशहरा, वटसावित्री पौर्णिमा हे सण तर ‘निर्जला एकादशी’ चा उपवास एरवी ज्येष्ठ महिन्यामध्ये येतात. यावेळेस गंगा दशहरा अधिक महिन्यामध्ये येऊन गेला. अधिक महिन्याला एक पर्यायी नाव मलमास असे देखील आहे. त्यामुळे मला आपलं ‘पापियों के पाप धोते धोते गंगा मैली हो गई’ या गीताची आठवण आली. मात्र खरंच गंगा मळत असेल का, पापमय होत असेल का असा विचार करताना मला आपली ती ‘कृष्णामाई’ सारखी संथ वाटते. ‘संथ वाहते कृष्णामाई काठावरच्या सुखदुःखांची तिजला जाणीव नाही.’ आपण आपला चैतन्य अलंकाराचा आधार घेत त्यांच्यावर मानवी भावभावनांचे आरोप करत राहतो. तर असो. ती बिचारी मळत जरी असेल तरी ‘सावित्री’ सारखी तेजस्वी कन्या याच महिन्यात येत असल्यामुळे हा महिना ‘सत्यवाना’सारखा तेजस्वी होतो. महाराष्ट्रीयन माणसांना एकादशीचे महत्त्व सांगण्याचं काहीच कारण नाही. नुकताच अधिक मास झाल्यामुळे तर आपण कृष्ण पुण्याची उजळणीत आपापल्या आयुष्यात केलेली आहे.
तेव्हा आता वळूयात ज्येष्ठ व्यक्तींकडे. मराठी पंचांगानुसार ‘ज्येष्ठ’ महिन्याचा क्रमांक तिसरा लागतो. याची सांगड ज्या वेळेला मी ‘ज्येष्ठ’ व्यक्तींच्या वयाशी घालते त्या वेळेला मला असे लक्षात येते, माणसाच्या वयाची समाजव्यवस्थेतील चार आश्रमांनुसार आपण विभागणी केली तर ‘तिसरा आश्रम’ अर्थात ‘वानप्रस्थाश्रम’ आणि ‘ज्येष्ठ’ महिन्याचा तिसरा क्रमांक असणे हा मला एक योगायोग वाटतो.
बदलत्या काळानुसार वानप्रस्थाश्रमाचा अर्थ ‘संसारातील आपले लक्ष काढून घेणे’ असा होतो. माणसाच्या वयाची ‘१०० वर्षे’ जर आपण गृहीत धरली तर पहिली २५ वर्षे ‘ब्रह्मचर्याश्रम’ , त्यानंतर पुढची २५ म्हणजेच वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत ‘गृहस्थाश्रम’, त्यापुढची २५ म्हणजे ७५ व्या वर्षापर्यंत ‘वानप्रस्थाश्रम’ आणि ७५ पासून पुढचे उर्वरित सर्व आयुष्य म्हणजे ‘संन्यासाश्रम’ असे गृहीत धरण्यास हरकत नसावी. वानप्रस्थाश्रमामध्ये घरातल्या जबाबदा-या, निर्णयांसह ‘सून – मुलगा’ यांच्यावर सोपवून द्यावेत. मात्र हवा असेल तिथे सल्ला देखील अवश्य द्यावा. या नात्यामध्ये मैत्रभाव विकसित व्हावा. संन्यासाश्रमामध्ये ‘आता उरलो उपकारापुरता’ अशी भावना असावी.
थेअरी आणि प्रॅक्टिकल यामध्ये नेहमीच अंतर असते. या अवकाशामध्ये या दोन पिढ्यांच्या मधल्या समस्या निर्माण व्हायला लागतात. ‘घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच’ ; हे विसरूच नये. आवश्यकता असते ती ते प्रश्न समस्यांमध्ये रूपांतरित होण्यापूर्वीच जाणून घेण्याची, त्याप्रती संवेदनशील राहून ते सोडवण्याची. मनमोकळेपणाने असे केले तर जटील समस्या उद्भवत नाहीत. दुर्दैवाने आजकाल प्रश्न आहे का नाही असा प्रश्न पडावा इतक्यात जटील समस्या समोर ‘आ’वासून उभी राहिलेली दिसते. काळाच्या या गुहेमध्ये प्रवेश करण्याची कोणाचीही हिंमत होत नाही आणि मग प्रश्न सोडवण्याऐवजी माणसंच सोडली जातात. मला तरी आज जितक्या काही म्हणून आपल्या मानवी समाजाच्या समस्या आहेत त्याच्या मुळाशी हीच मुख्य समस्या वाटते. जिथे हा प्रश्न सोडवला जातो तिथे माणसं बऱ्यापैकी आनंदानं नांदत असतात. आयुष्यामध्ये निखळ आनंद नसला तरी सुखाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न विविध तडजोडी करून केला जातो ही वस्तुस्थिती आहे आणि ते घडणे आवश्यक आहे. या तडजोडी कमी शिकलेल्या माणसांमध्ये चटकन होतात, दुर्दैवाने या निष्कर्षावर मला स्वतःला माझ्या अनुभवांवरून यावे लागलेले आहे. खरं म्हणजे मी स्वतः शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे हा निष्कर्ष स्वीकारताना मला त्रास होतो. मात्र सत्य कटू असते, ते पचवता आले पाहिजे ; अशी मी माझ्या मनाची समजूत काढते.
उच्चशिक्षित माणसांमधल्या अडचणी सुटल्या तर फार उशिरा सुटतात. याचे कारण शिकलेल्या त्या सर्वांचा ‘अहंकार’ मध्ये आडवा येतो. खरं म्हणजे ‘अहम्’ ला ‘स्वतः’ला आकार देण्यासाठी ‘अहंकारा’चा फार मोठा उपयोग आहे. मात्र याचा उपयोग जेव्हा आपण दुसऱ्याचा आकार बिघडवण्यासाठी करतो तेव्हा अहंकार हा ब्रह्मास्त्राप्रमाणे विनाशक ठरतो. मग ते घर असू द्या, कार्यालय असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रातील व्यावसायिक संबंध असूद्यात ; मला वाटते हे चित्र सर्वत्र दिसते. त्याला देश,भाषा, वेश, धर्म, लिंग कशाचाही भेदभाव नाही. ‘समता’ आणि ‘समानता’ स्वीकारण्यात आणि प्रस्थापित करण्यात अनेकांचे जन्म गेले. ती या विघातक क्षेत्रामध्ये मात्र माणसाने कोणी न सांगता स्वीकारलेली आहे.
‘तरुण उसळते रक्त’ आणि अनेकविध कारणांनी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या नाहीत म्हणून ‘वानप्रस्थाश्रमातला असमाधानी माणूस’ असा विलक्षण संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. इथे अडचण निर्माण होते ‘नमते घ्यायचे कोणी?’ खरं म्हणजे युद्ध हे नेहमी समस्तरियांमध्ये होत असते. पण इथे मात्र वयाने लहान आणि मोठे असलेले एकमेकांमध्ये भांडत असतात. पारंपरिक शहाणपणानुसार लहानांनी माफी मागावी आणि मोकळे व्हावे हा जगण्याचा नियम आहे. क्षमा मागितली तर शत्रूला देखील अभय द्यावे , हे आपली संस्कृती आणि परंपरा सांगते. इथे मात्र आपलीच माणसं असल्यामुळे, उघडपणे कोणीच कोणाचे शत्रू नसल्यामुळे फार मोठी अडचण निर्माण होते. तक्रार करताही येत नाही आणि प्रश्न सोडवतही येत नाही अशा द्विधा स्थितीमध्ये माणूस अडकून जातो. ‘आपलेच दात अन् आपलेच ओठ’ , ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशा अनेकविध म्हणी ही स्थिती स्पष्ट करू शकतात. घरातले कोणते लोक कोणत्या स्थितीमध्ये आहेत हे त्या त्या घरातील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वावर आणि तिथल्या रीतीभातींवर अवलंबून असते. रीतीभाती या मूल्यसंस्कृतीमधून विकसित झालेल्या असतात. ‘दुधावरची साय’ म्हणजेच नातवंड हे दोन पिढ्यांमधला फार महत्त्वाचा असा दुवा असतो. या नातवंडांवर जेव्हा समजदार होण्याची वेळ आलेली मी पाहते ; तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या एका ललित लेखामध्ये , ” मोठ्यांचे प्रश्न छोट्यांना कळायला लागले (आणि ते समजून वागायला लागले) तर जगातले बाल्य नष्ट होईल.” या अर्थाचे जे विधान केलेले आहे ते मला प्रत्ययाला येताना दिसते. इथे माझ्या मनाला इंगळ्या डसल्यासारख्या वेदना होतात. मी आता त्याही कौशल्याने बाजूला ठेवायला शिकले आहे. मात्र, “मोठ्यांनो मोठे व्हा, ही नम्र विनंती मला आवर्जून करावी वाटेल ; जगातलं बाल्य संपू नये, कळी उमळण्यातलं सौंदर्य हरपू नये यासाठी.”
ज्येष्ठ व्यक्तींसमोर हे नाते जोपासण्याचे जसे एक आव्हान आहे, तसेच दुसरे आव्हान आहे ; तंत्रज्ञानाशी सामना करण्याचे. ज्ञान विज्ञानाच्या पाठोपाठ आलेल्या तंत्रज्ञानाने आज आमचे आयुष्य व्यापून टाकलेले आहे. अनेक सोयी सुविधांचा उपभोग त्यामुळे आपण घेत आहोत. यंत्र असावे की नसावे , त्याचा वापर किती करावा, हे आमचे बाळबोध प्रश्न सोडवण्याइतकी आमची वैचारिकता प्रगल्भ झालेली नसतानाच, तंत्रज्ञानाने आमच्यावर हल्लाबोल केलेला आहे. आज तंत्रज्ञान आपल्या जगण्याच्या मुळाशी जाऊन बसलेले आहे. त्यामुळे ते वापरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. भ्रमणध्वनीला आपले सहावे इंद्रिय म्हणून स्वीकारून आपणही सर्वजण काळाला प्रतिसाद देत आहोत. या माध्यमातून खरं चाललंय आणि बरं चाललंय तोपर्यंत ते वापरण्यास काहीच हरकत नाही. पण एकदा यामध्ये खोटं शिरलं की उद्ध्वस्त होण्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. मल्लिका अमरशेख यांचे ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ या शीर्षकाचे आत्मकथन आहे. इथे वेगवेगळ्या संदर्भांनी प्रत्येकालाच उद्ध्वस्त व्हावे वाटले तर समाजाचे काय व्हावे ? समाजव्यवस्थेने दिलेल्या मातृऋण, पितृऋण , गुरुऋण – कर्तव्याच्या या तीन भक्कम आधारांना आम्ही कधीच निकालात काढले आहे. स्वतःचीच बाळे स्वतःच्या आयुष्यातला अडसर ठरताच फार सहजतेने (की निर्दयपणाने) आपण त्यांचा काटा काढू शकतो हे आम्ही वारंवार सिद्ध केलेले आहे. त्या मानवी संवेदनशीलतेकडून कोणती अपेक्षा करावी? आयुष्य संपवणं असो किंवा तळमळत जगायला भाग पाडणे असो ‘क्षणात मारायचं’ की ‘कणाकणानं मारायचं’ याची निवड केल्यासारखं आपण जगतो आहोत. जे व्हिडिओ कॉल आपण प्रत्यक्ष अंतर मिटवण्यासाठी ‘आभासी भेटी’सारखे वापरत होतो ते आता आपल्याला ‘डिजिटल अरेस्ट’ करायला लागलेत. बँकेच्या रांगेत उभं राहणं नको म्हणून डिजिटल व्यवहार आम्ही करायला लागलो आहोत. मात्र कोणता ओटीपी आम्हाला कधी आपटवेल आणि आटपवेल याची खात्री देता येत नाही ही आर्थिकदृष्ट्या निरक्षरांची आणि साक्षरांची सारखीच अवस्था आहे. आपल्या नावे सोशल मीडियावर कोणीही फेक अकाउंट उघडू शकते, त्या आधारे फसवणूक करू शकते, तंत्रज्ञानाने तुम्हाला कितीही सुरक्षित असल्याची खात्री दिली तरी तुम्ही स्वतःसाठी डिलीट केलेले मेसेज इतरांना कळतात तिथे अन्य कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा? तंत्रज्ञान सोयीचे आहे सुरक्षित मात्र निश्चितच नाही ; या ठाम मतापर्यंत मी त्यामुळेच पोहोचलेली आहे. माहितीच्या या भस्मासुराने वयाचे, अनुभवाचे शहाणपण कधीच गिळून टाकले आणि ‘तुम्हाला काहीच समजत नाही’ असे मत असणारे ‘टीन एज’ आपल्यासाठी परमनंट करून टाकले. आम्ही मनाने ‘टीन एजर्स’ च राहिलो तर ज्येष्ठ कधी होणार ? क्षमा कोणी कोणाची मागायची? माफी कोणी कोणाला द्यायची?
…… कदाचित त्यामुळेच पुन्हा एकदा आपल्याला ‘कृष्णज्ञान’ खुणावत आहे भस्मसुरासारख्या वाढलेल्या तंत्रज्ञानाला आणि त्यावर पोसलेल्या माणसाच्या अहंकाराला काबूत ठेवण्यासाठी. माणसाला पुन्हा एकदा माणूस करण्यासाठी!
शुभं भवतु !
श्रीकृष्णार्पणमस्तु!
•| ॐ |•
कृष्णचांदणं !
आज सकाळी मी दूध तापवत होते. ते काही लवकर तापेना. मग म्हणलं जरा चष्मा आणि मोबाईल हातात घ्यावा. मात्र चष्मा कालपासून सापडत नाही, हे लगेच आठवलं. सरळ कृष्णाकडे गेले. त्याला हात जोडून म्हणलं कृष्णा, प्लीज देना माझ्या चष्मा. लगोलग त्याच्या समोरच्या खुर्चीवर माझा चष्मा सापडला. चष्मा सापडला आणि लाईट गेले. मी म्हणलं धेत्तेरेकी ! दृष्टी मिळाली तरी अंधार ! मग मी ठरवलं चला कृष्णाचीच गप्पा मारूयात. त्याला विचारलं –
मी : कृष्णा, अंधार काळा का असतो रे?
कृष्ण : तो माझ्यासारखा असतो म्हणून.
मी : कृष्णा काहीतरीच काय! ‘तू अंधार नाही आधार आहेस बरं’.
कृष्ण : आधार असतो तर तुला एवढे दिवस रडवत ठेवलं असतं का?
मी : जाऊ दे रे कृष्णा ! तेवढाच माझा संयम वाढला ना.
कृष्ण : मला नाही वाटत तसं.
मी : काय?
कृष्ण : तुझा संयम वाढला म्हणून!
मी : खरंच?
कृष्ण : हो. लाह्या तयार होताना कशा तडतड उडतात तशीच तू उडतेस अजूनही, चिडली म्हणजे.
मी : हे बघ कृष्णा माझं उडणं असो, रडणं असो की पडणं असो ; जे काही आहेस ना ते तूच आहेस त्यामुळे मला काही त्याची चिंता नाही.
कृष्ण : हे बरं आहे तुझं. सगळं आपलं माझ्यावर ढकलायचं आणि मोकळं व्हायचं.
मी : जे आहे ते आहे.
कृष्ण : बरं गं बाई. रागवू नको आता.
मी : कृष्णा, माझा अंधारही तूच, आधारही तू आणि धारही तूच !
कृष्ण : धार कसली बुवा? मला आपली फक्त गोकुळातल्या गाईंच्या दुधाची धार ठाऊ़क आहे. आहा ! काय धारोष्ण दूध प्यायचो आम्ही.
(कृष्णाच्या चेहऱ्यावरचा तो तृप्ततेचा भाव मलाही तृप्त करून गेला.)
मी : अरे मी म्हणती आहे ती धार दोन प्रकारची! एक जिभेची आणि दुसरी भक्तीची !
कृष्ण : या दोन धारांचा एकमेकांशी काय संबंध ?
मी : अरे कृष्णा, धारदार जीभेवर तुझं नाव ठेवलं ना की तिथून अमृत पाझरायला लागतं बघ.
कृष्ण : अमृत ?
मी : हो ! अमृतच ते. मृत पेशींनाही संजीवनी देणारं !
कृष्ण : अगं ते समुद्रमंथनातून निघत असतं.
मी : तू काय माझं कमी मंथन केलंस का?
कृष्ण : मी काय केलं बुवा आता?
मी : गेल्या सात वर्षांमध्ये सात जन्मांचे अनुभव आणून पदरी घातलेस माझ्या.
कृष्ण : …. पण पदर फाटू नाही दिला. भरजरीच केला ना ?
मी : कृष्णा, म्हणून तर तुझ्यासोबत नि:शंकपणे चालत राहते.
कृष्ण : …..आणि नि:संग होत राहतेस. तथास्तु!
कृष्ण तथास्तु म्हणाला, आणि त्या गडद अंधारातही माझ्या भोवती मात्र कृष्णचांदणं पसरलं !
श्रीकृष्णार्पणमस्तु !
स महात्मा सुदुर्लभ:
✍️ डॉ.ज्ञानेश्वर थोरात
स्वतःचे मानवी जीवन सुखी संपन्न व्हावं, ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ; ही तर एक उपजत मानवी प्रवृत्ती आहे परंतु ह्या प्रवृत्तीचे उदात्तीकरण करून इतरांच्या सौख्य, समाधान, समृद्धीसाठी जगण्याची अपूर्वाई लोकविलक्षण असते.अर्थात अशा कृतीने आणि वृत्तीने स्वतः जगताना आणि इतरांना जगवताना उदात्त विचारांना घट्ट धरून चालावे लागते , भोगवादी दुनियेत हा प्रवास बहुधा एकाकी करावा लागतो.महायोगी श्री अरविंद लिखित “सावित्री” ह्या महाकाव्यातील दोन कडव्यांची समर्पकता येथे चपखलपणे अभिव्यक्त होते . महापुरुषाचा जीवनप्रवास अधोरेखित करताना महाकवी लिहितो,
Whoever is too great,
must lonely live ;
Adored he walks
In mighty solitude;
Vain is his labour
to create his kind
His only comrade
Is the strength within.
अर्थात महापुरुषाला जगावे लागते एकटे आणि एकाकी तरीही त्या एकांताच्या सामर्थ्याने तो आपल्या पायवाटेला सजवतो , तिची पूजा बांधतो कारण तेथे विचारांची मूर्त कृतिरूपं साकार होणार असतात.स्वत:ची प्रतिकृती (प्रतिमा ) निर्माण करण्याचे परिश्रम विफल करून मानव जातीच्या कल्याणार्थ तो स्वतः ची काया चंदनापरी झिजवतो आणि सफल होतो.त्याची सांगाती असते ,त्याची अंतर्निहित विचारशक्ती.
त्या एकाकी प्रवासात त्याला प्रसंगी मिळतातही मुठभर अनुयायी परंतु
त्याच्या देहरुपी जाण्याने हजारोंची गर्दी उसळते त्याच्या अंत्यदर्शनासाठी , जयंती , पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आणि पालखी सोहळे , मंदिर ? त्याला नको नको असणारं सारेकाही करण्यासाठी.
विचारांना स्वीकारणं आणि तद्वत आचार करणं, एमपीएससी, युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षा हजार पटीने खडतर असतो अशा महापुरुषांचा प्रवास ! ‘विरळा ऐसा कोणी ,तुका त्याच्या लोटांगणी ‘ अर्थात अशा सत्पुरुषांच्या संख्यात्मक गणतीसाठी परिमाण हाताची बोटे वापरावी लागतात आणि गुणात्मक गणतीसाठी परिमाणं उपलब्ध नसतातमुळी .तेव्हा श्रीकृष्णला त्यांच्याविषयी भगवद्गीतेत उद्गार द्यावा लागतो ,” स महात्मा सुदुर्लभ:” अर्थात असे महात्मे खूप दुर्मिळ असतात.

https://share.google/0rLkFBrVTgDucXRwP
यावर आपले मत नोंदवा