माय – माऊली सावित्री ती अनुबंध नात्यांचा काळीजकर्तृत्वाचा !



•| ॐ |•
सावित्री
ती प्रेमदायी ती बुद्धिवाही
ती आवाहक ती निर्णायक
ती सत्यवती ती कालजयी
राजा अश्वपतीची ती कन्या
सत्प्रीतीचा आवेग न् आशा
द्युमत्सेनाची सेवातत्पर स्नुषा
पाठपुरावा करून यमाचा
वाचवे जीव सत्यवानाचा
कहाणी जी देई राज्यभोग
झाला अरविंदांचा अंतर्योग
ही कसली हो दोन टोके
एक कथा अन् भिन्न झोके
कार्य येथे करते अंतर्दृष्टी
परमेशाची ती कृपावृष्टी!
श्रीकृष्णार्पणमस्तु !
विवाहसंस्कार
सस्नेह भेट
(माझ्या विवाहाच्या वेळी आदरणीय गुरुवर्य पोर्णिमाताई मंडलीक यांच्याकडून मला भेट मिळालेले हे विचारधन आजच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वासाठी सामाईक करत आहे.)
विवाहसंस्कार हा जगन्मान्य संस्कार आहे. एक स्त्री आणि एक पुरुष येथून पुढे एकत्रित राहाणार आहेत. त्यांनी कसे राहावे याचे संपूर्ण शिक्षण विवाह संस्कारातील मंत्रांमधून मिळण्याची व्यवस्था आपल्या पद्धतीत केली आहे. समाजाची, समाजातील अनेक घटकांची परवानगी घेऊनच आणि सर्वांसमोर प्रतिज्ञाबद्ध होऊनच दोघांनी एकत्रित राहायचे आहे, हा विवाहविधीतील मुख्य अर्थ आहे. ज्या दोघांना एकत्रित राहायचे त्यांनी या दोन गोष्टी नक्की करायला हव्यात तरच ते दोघे पती-पत्नी म्हणून एकत्रित राहू शकतील हा संपूर्ण जगातील विवाह पद्धतींना मान्य असणारा भाग आहे. विवाहाशिवाय दोघे एकत्रित राहिले तर त्या संततीला समाजात मान नसतो.
स्त्री पुरूषांनी एकत्रित राहाणे हा निसर्ग आहे. त्याला मर्यादांचे कोंदणात बसवून समाज जीवन स्थिर करणे हा विवाह संस्काराचा पाया आहे. पशुतुल्य जीवन न जगता संयमित, परिमित, जीवनातून मनुष्य जीवन घडवावे हा विवाह संस्काराचा विचार आहे.
विवाहाच्या अनेक पद्धती जगभर विद्यमान आहेत. पैकी भारतीय विवाह पद्धती सर्वात श्रेष्ठ, आदर्श आणि वैवाहिक संबंध उत्तम जपायला शिकविणारी आहे. आपल्या मंत्रांना, पद्धतीला नावे ठेवणारे आम्हीच करंटे आहोत. खर्च होतो म्हणून रजिस्टर विवाह करा म्हणून सल्ले देतो. आणि आमचे वैशिष्ट्य लक्षात घेत नाही. भारतीय
विवाह पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये–
एक स्त्री आणि एक पुरूष एकत्रित रहाणार तर साक्षीदार हवेत. रजिस्टर विवाह पद्धतीत रजिस्ट्रेशन अधिकारी, त्याच्या हाताखालचे दोन-चार लोक, आणि घरातील दोन चार जण एवढेच साक्षीदार असतात. याविरूद्ध भारतीय पद्धतीत अनुकुल असणारे ग्रह-तारे, नक्षत्रे, इष्टदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता, पूर्वज, अग्नि, ज्ञानी पुरोहीत, सर्व परिचित, सर्व आप्तेष्ट, सर्व मोठी माणसे, असे अनेक साक्षीदार असतात. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण आपल्याकडे कमी आढळते.
विवाहाचे मंगलकार्य ज्या घरात होणार आहे त्या घरी ग्रहशांती, गृहशांती करायची असे मंत्र आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी या तत्त्वज्ञानातून मनुष्य जीवनाचा विचार सर्वत्र मांडलेला आहे. मग ज्या व्यक्तीचे आयुष्य नव्याने सुरू होणार आहे त्याच्यासाठी विश्वातील सर्व कल्याणकारी शक्तींना पाचारण करणे, नऊ ग्रहांची शक्ती कृतज्ञतापूर्वक पूजन करून संस्कार्य व्यक्तीच्या मागे उभी करणे, घरातील दृश्य, अदृश्य शक्तींना तृप्त करणे आणि मंत्र सामर्थ्याने वातावरणातील अमंगलता काढून टाकणे अशा अनेक उद्देशांनी गृहशांती इत्यादी विधी केले जातात. (मंत्रांचे सामर्थ्य विषयाच्या लेखात या साऱ्या भावनिक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे.) मंत्रांनी अमंगलता, अस्थिरता जाऊन सर्वत्र शांतता स्थिरता निश्चित येते.
विवाहसमयी ज्या पत्रिका छापतो त्यात सर्वांना बोलावतो आणि त्यांचे शुभ आशीर्वाद, शुभेच्छा मागतो. आलेल्या प्रत्येकाचा मंगल भावच आपल्याला अपेक्षित असतो. शिव्या, शाप, दुष्टावा इत्यादीचा मागमूससुद्धा नको वाटतो. अदृश्य शक्तीसुद्धा वरदायी होवोत हा यामागील हेतू आहे.
प्रत्यक्ष विवाहाच्या मंगलदिनी सकाळी वधु-वरांना हळद लावण्याची पद्धत आहे. वधू वरांचे शरीर मिलन होणार आहे. जी दोन शरीर एकत्रित येणार ती निरोगी असावीत, त्वचा आरोग्यपूर्ण असावी. हळद लावल्याने त्वचेचे दोष नष्ट होतात. हळद अॅन्टीसेप्टीक आहे. रक्षण करणारी आहे. शरीर शुद्ध करणारी औषधी आहे. ‘शुद्ध त्वचा घेऊनच दोन शरीर एकत्रित आली तर असा आरोग्य वृद्धीचा विचार घेऊनच भारतीय विवाह पद्धती पुढे जाते. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तासन् तास वाया घालवून, सर्वांचा खोळंबा करून लग्नाला उभी राहाणारी आजची आधुनिक वधू सर्व आरोग्य वर्धन करणाऱ्या तत्त्वज्ञानाचा आधीपासून आधार घेईल तर तिच्या आरोग्यपूर्ण सौंदर्याला अधिक बहर येईल. शास्त्र म्हणून थोडी हळद लावण्यापेक्षा भरपूर व्यवस्थित हळद लावायला काय हरकत आहे?. ‘पी हळद हो गोरी’ असे म्हटलेच आहे.
विवाहाचे दिवशी देवप्रतिष्ठा करून म्हणजेच सर्व कुलदेवता (आधीच्या सर्व स्थानांचे महत्त्व लक्षात घेऊन) मांडवात प्रतिष्ठीत करायच्या, नांदीश्राद्ध करून सर्व पितरांचे आशीर्वाद घ्यायचे यातून संस्कार्य व्यक्तीचे सामर्थ्य वाढते.
विवाहापूर्वी वधूने ‘गौरी-हरा’ची पूजा करायची आहे. या ठिकाणी गौरी-हार असा उच्चार केला जातो. परंतु ही पूजा गौरी आणि शिवाची आहे. भारतीय संस्कृती त्याग आणि वैभवावर आधारलेली आहे. नवविवाहीत दांपत्यावर हे संस्कार केले जातात. विवाहापूर्वी गौरी आणि शिव या त्यागमय जीवन जगणाऱ्या आदर्श जोडप्याचे पूजन आहे. आणि रात्री सर्व समारंभानंतर लक्ष्मी नारायणाची वैभवाच्या जीवनाची पूजा आहे. त्यागाचे आणि भोगाचे हे संस्कार एकाच वेळी करणारी भारतीय विवाहपद्धती ऋषींनी किती कष्टांनी, संशोधनानी तयार केली असेल एवढे जाणले तरी पुरे. गौरी हराच्या पूजेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात प्रत्यक्ष शंकर पूजेसाठी कोठेही नाही. पार्वतीची अनेक रूपे आहेत. पैकी तिच्या अन्नपूर्णेच्या रूपाचा संस्कार येथे केला आहे. ही अन्नपूर्णेची पूजा आहे. सासरी जाणाऱ्या मुलीला महत्त्वाचे संस्कार आईकडून किंवा माहेरहून दिले जातात. ‘तुझ्या घरात तू अन्नपूर्णेसारखी उभी राहा. घरात येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदानाने तृप्त कर.’ हातात पळी घेऊन बसणारी अन्नपूर्णची छोटी मूर्ती वधूला व वराला हाच संदेश आणि संस्कार देत असते. घरातल्या लोकांना कष्ट करून जेवायला घालणे मुश्कील, अशा आजच्या गृहिणी बाहेरच्यांना काय जेवू घालणार? विकतचे पदार्थ सुद्धा लोकांना देणे मुश्कील झालेले आहे. समाजाचे चित्र बदलण्यासाठी त्यागमय जीवनाची शिकवण आज पुन्हा सर्वांना देण्याची गरज आहे. सायंकाळी वधूला घरी नेण्याआधी, ही सकाळी पूजा केलेली अन्नपूर्णा ‘अंबा शिंपून’ म्हणजेच उभयतांनी अंबेची पूजा करून मानाने घरी न्यायची व त्यागपूर्ण वैवाहिक जीवनाचा स्वीकार करायचा असा त्यामधील अर्थ आहे.
‘बाळकृष्ण’ जो मुलीला दिला जातो त्यामागे जो अर्थ आहे तो आणखीच विशेष वाटतो. तुम्ही उभयतांनी वैवाहिक गृहस्थाश्रमी जीवनात संपत्ती, वैभव, प्राप्त करायचे आहे आणि त्याच्या जोडीला संतती निर्माण करायची आहे. ती संतती कशी असावी हे एका बाळकृष्णाच्या मूर्तीतून स्पष्ट होते. माहेरून आईकडून मिळालेले दोन मौलीक संस्कार घेऊन मुलीने सासरी जायचे आहे.
विवाहसमयी वधूवरांसाठी मंगल-अष्टके म्हणली जातात. ती कशाला म्हणायची? त्यावेळी अक्षता कशाला टाकायच्या? तेच तांदूळ गरीबाला द्यावेत असे म्हटले जाते. भारतीय संस्कृती प्रतिकात्मक आहे. मनुष्य जीवनाच्या घडणीसाठी अनेक गोष्टींचा संबंध ऋषींनी एकत्र जोडला. उभयतांचे आयुष्य ‘अक्षत’ रहावे असा मनोभाव त्यातून प्रतीत होतो. हीच शुभेच्छा सर्वांकडून अपेक्षित असते. तांदूळ हा पदार्थ आपण सबंध खातो. असे अखंडत्व तुमच्या जीवनात येवो. म्हणून या अक्षता टाकायच्या. वधूवरांपर्यंत जरी त्या पोहोचल्या नाहीत तरी वातावरण चांगल्या इच्छांनी भरून राहाते. मंगलमय मंत्रांना अक्षतांची जोड दिली जाते. वधूवरांसाठी मंगलाष्टके म्हटली जातात. त्यावेळी अक्षता टाकल्या जातात त्यांचा थोडा विचार आपण केला.
आताच्या काळात आपणच आपल्या प्रत्येक कृतीला नावे ठेवीत असल्याने. या शुभमुहुर्ताला, मंगलाष्टकांना, अंतरपाटाला फारसा अर्थ नाही म्हणून सर्वदूर म्हटले जाते. एकाच वेळी, शुभसमयी समाजातील सर्व आप्तेष्ट, ओळखीचे, सर्व देवता इत्यादी गोळा होऊन विश्वातील ग्रहगोलांच्या उत्तरा रचनेत वधू-वरांच्या वैवाहिक जीवनाचा शुभारंभ करून देतात. लग्नाला जेवायला एकवेळ गेले नाही तरी चालेल. परंतु अक्षता टाकून त्या एका विशिष्ट वेळेला शुभेच्छा व्यक्त करणे महत्त्वाचे आहे असा उत्तम संस्कार आज आपल्याकडे झालेला आहे. तो पिढ्यान पिढ्या रूजलेलाही आहे. सर्वांचे चांगले आणि चांगलेच विचार एका मुहुर्तावर एकदमच दोन एकत्रित राहू इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या भोवती उभे राहतात. त्यातून दोघांचे सामर्थ्यही वाढते. (रामनवमीला एकाच दिवसात लाखो लोक श्रीरामरायांचे दर्शन घेतात त्यादिवशी सायंकाळी मूर्तीचे तेज फारच वाढलेले आढळते. जनता जनार्दन आपला भक्तिभाव एकदम एकाच दिवशी त्या मूर्तीपाशी समर्पण करतो मग त्या दिवशी मूर्तीचे दर्शनही डोळे दिपवून टाकणारे असते.)
मंगलाष्टके होऊन दोघांच्याही गळ्यात पुष्पहार घातल्याबरोबर घरातील अनुभवी मंडळी वधू-वरांना काजळाचे बोट लावतात. दृष्ट लागणे, वाईट नजर लागणे, कोणाचेही वाईट विचार या दोघांपर्यंत जाऊ नयेत, अशा विचाराने ही कृती अनेक ठिकाणी सहज केली जाते. एरवी दोघेही रूपाने बेताचे असले तरी या विशिष्ट वेळेला सर्वांच्या शक्ती एकवटल्याने विशेष सुंदर दिसू लागतात. दोघांच्या मानसिक भाव भावनांवर सर्वांकडूनच प्रेम, आनंद, निर्मळतेचा वर्षाव झालेला असतो. एका विशिष्ट वेळेला ‘शुभमंगल सावधान’ म्हणून संस्कृतसारख्या समर्थ भाषेत आणि मायबोलीमध्ये (अष्टक म्हणजे आठ कडवी शुभआशीर्वाद, शुभेच्छा व्यक्त करणारी) संगीताच्या, नादब्रह्माच्या आधारे शुभेच्छा व्यक्त होतात. शुभ, आनंददायी वातावरण दोघांच्या भोवती निर्माण होते. त्यातून आतापर्यंत दोघांच्यात असणारे अंतर, अंतरपाट दूर होऊन संपवले जाते, आणि दोन शरीर मनांचे एकरूपत्व साधायचा प्रयत्न केला जातो. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती प्रतिकात्मक आहे. त्यातून अशा सर्व संस्कारांचा जन्म झाला. कशा कशाला नावे ठेवणार ? या सर्वांमधील भव्यता, दिव्यता दिसत नाही. समजून घ्यायची तयारी नाही मग दुसरे काय करणार ? आपण आपल्याला नावे ठेवीत बसणार. अक्षतांच्या रूपाने तांदूळ वाया जातात म्हणणारी मंडळी भारी भारी पत्रिका, शुभेच्छा कार्ड खरे म्हणजे वायाच घालवितात. नंतर पत्रिकांचा काय उपयोग ? असो.
खरे म्हणजे मूळ वैदिक मंत्रात मंगलाष्टकांचा विचार नाही. नंतर भास्कराचार्यांच्या काळात त्यांच्या मुलीच्या म्हणजे लिलावतीच्या विवाह निमित्ताने मुहुर्त या कल्पनेला गहत्त्व आले. समाजात जनता जनार्दनाने हा मुहुर्ताचा विचार मान्य केला आणि तेथून पुढे तो यशस्वीपणे उत्तम रीतीने रूजला. जे जे बुद्धीला पटेल ते नीट पारखून घ्यावे, आणि विचारपूर्वक स्वीकारावे, हीच तत्त्वज्ञानाची शिकवण आहे.
विशिष्ट मुहुर्ताला वधुवर एकत्रित आल्यानंतर विवाह संस्काराचा पुढचा भाग सुरू होतो. त्यामध्ये कन्यादान, अक्षतारोपणम्, मंगलसुत्र बंधनम्, विवाहयोग, सप्तपदी, धृवसप्तर्षी दर्शन, गृहप्रवेश होम असे सर्व विशेष विधी केले जातात. त्यामध्ये विशेषत्वाने विचार करायला लावणारा भाग म्हणजे विवाहहोम.
विवाहहोमाला लाजाहोम (लाह्याहोम) म्हणतात. भारतीय तत्त्वज्ञानात आणि संस्कृतीत मनुष्य घडविण्याच्या योजनेत या मंत्राचा प्रथम क्रमांक लागेल इतका विचार त्यामागे मंत्र निर्माण करणाऱ्या ऋषींनी केलेला आढळतो. त्यातील प्रमुख तीन मंत्र म्हणजे भारतीय संस्कृतीचे सार आहे, विवाहसंस्काराचे सार आहे. विवाहासाठी जमलेल्या आप्तेष्टांवर वधू वरांवर आणि वधू वरांच्या घरच्या सर्व मंडळींवर एकदमच संस्कार करून प्रत्येकाला मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य या मंत्रात आहे. ज्या ऋषिमुनिंनी हे मंत्र रचले त्यांच्या बुद्धीमत्तेचे, अपार सामर्थ्यांचे कराल तेवढे वर्णन थोडेच आहे. कित्येक वर्षांपूर्वी रचले गेलेले हे वैदिक मंत्र मनुष्याचा उद्धार करायला, त्याचे जीवन सुखी करायला पूर्ण समर्थ आहेत. विवाह झाल्यावर सर्वांनी कसे वागावे याचे मार्गदर्शन या मंत्रात आहे. सासरचे माहेरचे सर्वजण या मंत्रांप्रमाणे वागतील, त्यातील गोष्टी समजून घेतील तर कुटुंबा-कुटुंबातील दुःखांचा कितीतरी प्रमाणात त्रास संपेल. या मंत्रातील प्रत्येक शब्द समजून घेतला व त्याचा ‘आचरणार्थ आचरणात आणला तर आज समाजाचे चित्र बदलून जाईल. सुप्रसिद्ध दिग्दर्शक कै. भालजी पेंढारकर हे भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक, समाज घडविणारे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी तयार केलेला ‘सासुरवाशीण’ नावाचा मराठी चित्रपट या विवाह होमातील तीन मंत्रांचे प्रत्यक्ष आचरण केल्यानंतर झालेल्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा आहे. कै. भालजींनी कदाचित या मंत्रांचा अभ्यास वगैरे करून त्या आधारे चित्रपट निर्माण केला नसेलही. परंतु ऋषींनी या वैदिक मंत्रातजे त्रिकालाबाधित असे सुखी, वैवाहिक जीवनाचे सत्य सांगितले आहे त्याचे मूल्य त्यांनी जाणले असेल. ऋषींनी सांगितलेले सुखी कौटुंबिक जीवनाचे रहस्य भालर्जीसारख्या द्रष्ट्याला, तपस्व्याला, समाज आणि राष्ट्र घडविणाऱ्या कार्यकर्त्याला सहजच उलगडले असेल. म्हणूनच त्यातूनच सासुरवाशीण चित्रपटाची निर्मिती झाली असेल. आधी आपण प्रत्यक्ष मंत्र आणि त्यांचा अर्थ यांचा विचार करू. नंतरच त्याचा चित्रपट कथेशी अर्थ जोडू शकू. लाजाहोमातील पहिल्या मंत्राने विवाहहोमात लाह्या टाकायच्या, दुसऱ्या मंत्राने अग्निप्रदक्षिणा करायची आणि तिसऱ्या मंत्राने अश्मारोहण करायचे. वरवर पहाता यातील गर्भितार्थ, आचरणार्थ फारसा लक्षात येणार नाही. काळजीपूर्वक विचार केल्यास मात्र सारेच सोपे आहे.
भारतीय संस्कृती प्रतिकात्मक आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम संपूर्ण भारतभर लाजाहोम व त्यात साळीच्या लाह्यांचे समर्पण हा लाजाहोमातील मुख्य विधी केला जातो. सर्वत्र तांदूळ, त्याच्या लाह्या उपलब्ध आहेत हे लक्षात घेऊन ‘माहेरच्या प्रेमपाशाच्या मुक्तीचा’ हा होम वधूला करायला सांगितला जातो. लाह्या होमात टाकायच्या मंत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. ‘देदिप्यमान अर्यमा नावाचा, ज्याला आजपर्यंत पुष्कळ कन्यांनी हविर्द्रव्याच्या योगाने संतुष्ट केले असा जो अग्नि तो ह्या वधूचे आई, बाप, बंधु, इत्यादिकांवरील प्रेम कमी करवून त्यांच्या कुळातून मुक्त करो. आणि माझे आई, बाप, बंधु इत्यादिकांवर हिचे प्रेम वाढवून माझे कुळ न सोडता मजविषयी अनुरक्त होऊन माझ्याकडे राहाण्याची हिला बुद्धी देवो.’ थोडक्यात सांगायचे तर माहेरच्या प्रेमपाशातून स्त्रीची-वधूची, मुक्तता व्हावी आणि सासरच्या प्रेमापाशातून मुक्तता होऊ नये ही अपेक्षा, प्रार्थना विश्वातील श्रेष्ठ अशा अग्रिशक्तीकडे करायची. त्यासाठी प्रतिकात्मक म्हणून लाह्या अग्नित समर्पण करायच्या. अग्निहोत्रात दोन चिमूट तांदूळ व दोन थेंब तूप याची आहुती दिली जाते. त्यायोगे एक मैलाच्या परिसरातील वायू प्रदूषण नाहीसे होऊन वातावरण शुध्द होते. तद्वतच विवाहप्रसंगी केल्या जाणाऱ्या होमामध्ये तीन ओंजळ लाह्या आणि तीन चमचे तूप, याची आहुती दिल्यावरही विवाहविधीच्या परिसरातील वातावरण शुध्द होऊन जाते.
वधुने स्वतःच्या भावाच्या हातून ओंजळीत लाह्या घ्यायच्या आणि वराने अलगद वधुची ओंजळ पकडून वरील मंत्र म्हणून दोघांनी मिळून अग्नीत लाह्या समर्पण करायच्या. माहेरचे नाते बंधन भावाच्या (म्हणजे स्वतःच्याच पिढीतील मंडळींच्या) हातून, त्याच्या मदतीने दूर सारायचे आणि सासरच्या प्रेम बंधनाचा सर्वांसमक्ष अग्निच्या शक्तीच्या मदतीने स्वीकार करायचा. या ठिकाणी खरे म्हणजे या संस्कृत मंत्रांचा अर्थ तरूण पिढीला समजत नाही हेच बरे. माहेरच्या प्रेमपाशातून मुक्तता आपण करून घेत आहोत हे जर नववधूला कळेल तर तिला दुःख होईल आणि कदाचित ती विरोधही करेल. पूर्ण समर्पणाची कल्पना येथे आहे. वर, अग्नीची प्रार्थना करतो आहे, वधूची नाही. म्हणजे अग्नीने वधूच्या ठिकाणी ही शक्ती निर्माण करावी अशी रचना मंत्ररचेत्यांनी केली. अवघड असणारी गोट विश्वशक्तीच्या आधारे शक्य करता येते ही जाणीव मंत्ररचेत्या ऋषींच्या ठिकाणी होती. हल्लीच्या मुली स्वतःच्या घरात सतत माहेरचेच मोठेपण गातात. सासरचे संबंध वाढविणे, प्रेम वाढविणे याऐवजी मी, माझे आईवडील, भाऊ, बहीण असेच कौतुक वाढते आहे. सारे खर्च माहेरी ! सासू सासरे यांना कोण विचारणार? लंपट नवरेही बायकांचे ऐकून स्वतःच्या घराला दूर करतात. समाजातील ही समस्या सुटली तर अनेक घरे सुखी होतील. जास्त प्रेम सासरी आणि माहेरची माणुसकी ठेवूनच मदत करणे अशी भूमिका, सारासार विचार सर्व येथे हवे.
माहेरचे प्रेमपाश सोडावे अशी अग्निला प्रार्थना करणाऱ्या वराचा विचार वधू करते आहे, तोच त्यानंतरचा अग्निप्रदक्षिणेचा मंत्र, वर म्हणायला सुरवात करतो. वधूला माहेर सोडावे लागणार या दुःखात ती मग्न असतानाच म्हणतो, “हे वधू, हे स्रिये मी सामवेद स्वरूप आणि तू ऋग्वेदस्वरूप आहेस, तसेच मी आकाशरूप आणि तू पृथ्वीरूप आहेस, उभयता आपण अग्नी व ब्राह्मण यांच्या समक्ष विवाह करू. नंतर प्रजा उत्पन्न करू, एकमेकांवर प्रीती करू. आपण रूप, स्वभाव इत्यादी गुणांनी एकमेकास आवडते होऊ. एकमेकांशी निष्कपटपणे वागून एकरूप मनाने शंभर वर्षे जगू.’
हे वाक्य प्रदक्षिणेपूर्वी वर उच्चारतो आणि अग्नि प्रदक्षिणा करतो. हातात हात घेऊन जगातील श्रेष्ठ अशा विश्वशक्तीच्या समोर म्हणजेच अग्निसाक्ष, दोघांनी एकरूपतेने रहाण्याचा संस्कार या मंत्रातून होतो. वधूला माहेर सोडतांना होणाऱ्या दुःखाला जरा दिलासा मिळतो. ‘माहेर सोडले तरी आपल्याला पतीचा भक्कम आधार आहे.’ यामुळे ती सुखावून जाते.
अम्रिप्रदक्षिणा पूर्ण करून दोघेही जागेवर आल्यावर ‘अश्मारोहणा’चा मंत्र म्हणून संस्कार केला जातो. विवाहाच्या तयारीत आणलेली, रूखवतावर ठेवलेली सहाण गुरूजी मागून घेतात आणि वधूच्या पाटापुढे ठेवून उजव्या पायाचा अंगठा त्यावर ठेवावयास सांगतात. प्रदक्षिणा झाल्यावर अश्म म्हणजे दगड, आरोहण म्हणजे आरूढ होणे. दगडावर उभे रहाण्याचा विधी आहे. सहाण जर उपलब्ध नसेल तर गुरूजी एखादा कोणताही दगडसुद्धा मागवतात आणि त्यावर वधूला उभे करून विवाह संस्कारातील सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणतात. हा ही मंत्र वरानेच म्हणायचा आहे.
‘हे वधू तू या पाषाण खंडावर, घडीव पाषाणावर आरूढ हो. पाषाणाप्रमाणे स्थिर हो, घट्ट हो. तुझ्यावर संकटे आलीच तर संकटकाळी त्याच्यासारखी मनाने घट्ट हो. तुझ्याशी शत्रुत्व करणाऱ्यांच्या छातीवर पाय देऊन तू घट्ट उभी रहा. तुझे अहित करणाऱ्यांना तुझ्या सद्वर्तनाने वश कर.’
सर्व मंत्र संस्कृतमध्ये म्हटले जातात. त्यांचा अर्थ कोणी समजावून देत नाही आणि घेत नाही हेच फार मोठे दुर्दैव आहे. अश्मारोहण मंत्राचा अर्थ समजून घेऊन त्यातून साधणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.
१) सासरी जाणारी वधू सासरी कशी वागेल हे इथे सूचक रीतीने सांगून ठेवले आहे. हा मंत्र रचणाऱ्या ऋषींना, मुनींना शतशः प्रणाम करावेसे वाटतात. ‘तुझ्या घरी स्थिर हो. अस्थिरता ठेवू नको. सत्शील, सत्चरित्र, सद्वर्तन ठेवूनच तू वाग. कोणाचाही उपमर्द करू नको. अपमान करू नको. तुला त्रास देणाऱ्यांना तू जिंकून घे. आपलेसे कर. शत्रुत्व ठेवू नकोस.’ वधूला या मंत्राने खूप धीर मिळतो.
२) हे मंत्रपठण, संस्कारकार्य चालू असताना सासरची सर्व माणसे, नातलग मांडवात हजर असतात. त्यांना जर या वाक्याचा अर्थ कळला तर ती कदाचित तिचा छळच करणार नाहीत. आधी रक्ताच्या नात्याची माणसे सुद्धा एकमेकांवर प्रेम करीत नाहीत. त्यातून सून म्हणजे दुसऱ्याची मुलगी. तिच्याबद्दल प्रेम वाटणे ही अगदी अवघड गोष्ट आहे. शारीरिक आकर्षणामुळे (कदाचित) नवरा बायको थोडेसे जमवून घेतात. पण घरातील अन्य मंडळींमध्ये व या नवीन मुलीमध्ये आपुलकी, प्रेम वाढण्यासाठी तिनेच प्रेमाने वागून सर्वांना आपलेसे करणे सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे. तिचा आत्मविश्वास वाढवून तिला धीर दिला गेला म्हणजे पुढचे सुरळीत चालू शकेल.
एका हाताने टाळी वाजत नसल्याने सर्व संस्कार लगेचच सासरच्या लोकांवर केले जातात. या मुलीला त्रास देऊन चालणार नाही. तिच्यावर प्रेमच करायला हवे. दुसऱ्याची मुलगी घरी आणणार. तिला आपला स्वतःचा मुलगा काय सांगतो आहे? तिच्याशी वाकडे वागणाऱ्यांशी तिने कसे वागावे ? म्हणजे कोणीच वाकडे वागू नये हे सासरच्या मंडळींना कळते.
३) अश्मारोहण करणाऱ्या वधुचा हात हातात घेऊन वर हा मंत्र म्हणतो म्हणजे त्यालाही तिच्याशी सरळच वागायला हवे. हा त्याच्यावरही संस्कार होतो.
एका मंत्रात अनेकांना सरळ वागायची सूचना देणारा हा लाजाहोमातील संस्कार आम्हाला अंतर्मुख करणारा ठरतो.
‘सासुरवाशीण’ सिनेमातील सून कर्तव्यदक्ष, प्रेमळ, सद्वर्तनी, हुशार, सालस, नम्र दाखविली आहे. सासू कजाग म्हणून तिला तिचा नवरा आपल्या आईकडे नेतच नाही. नवरा नाही म्हणतो तरी हट्टाने सासरी येऊन ती रहाते. सासू, नणंद, सर्वजण छळतात. तरी छळ न सोसता, सासूबाईंचा मान ठेवून, स्वतःच्या हुशारीने मोठ्या जावेची व स्वतःची, मोठ्या दीराची व पुतण्याची सासूच्या छळाच्या तावडीतून प्रेमाने सुटका करते. सारे घर एक करते. शिकलेल्या, शहाण्या समंजस मुलींकडून हेच अपेक्षित आहे. लाजाहोमातील तीनही संस्कार यशस्वीपणे अमलात आणणारी ही सून समाजाने जरूर अभ्यासावी.
आपली विवाह पद्धती टाकावू, जुनी, बुरसटलेली नाही. उलट विवाह होणार, दोघेजण एकत्रित रहाणार, त्यातून अनेक समस्या निर्माण होणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा या मंत्रांच्या अभ्यासाने, संस्काराने असे संघर्ष, समस्या संपल्या तर हवेच आहे. मंत्राने शंभर टक्के यश मिळणार नाही. पण काहीसा परिणाम होणारा हा एक प्रभावी मार्ग आहे.
सौ. पौर्णिमा विश्वासराव मंडलीक,
योग विद्या धाम, नासिक.
(भारतीय संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक )
।ॐ।
हृदयी अमृत नयनी पाणी
गेले काही दिवस ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ ही ओळ सातत्याने मनामध्ये घुमते आहे. लहानपणी निबंधामध्ये आईवर निबंध लिहिताना ही काव्यपंक्ती आवर्जून वापरली जायची. हळूहळू मोठं होत गेल्यावर ग.दि. माडगूळकर यांची पूर्ण कविताही वाचनात आली. तो संदर्भ आणि भारतभर असलेली स्त्रियांची परिस्थिती ही सर्वसाधारणपणे प्रत्येकाला ठाऊक असते. त्यामुळे ही ओळ मनामध्ये आली की स्त्रिया त्यांचं दुःख, त्याग, तिला बनवलं गेलेलं भोगवस्तू आणि तरीही आयुष्याच्या शेवटी वाट्याला येणारे एकटेपण अशी विचारांची साखळी अनेकांच्या मनात आपसूकपणे निर्माण होते.
गेल्या काही दिवसांमध्ये मात्र मला या दोन ओळी वेगळाच अर्थ प्रतीत करून देत आहेत. जिच्या हृदयी अमृत आहे, तिच्या डोळ्यात आलेले अश्रू दुःखाश्रू कसे असतील? ते केवळ आनंदाश्रूच असू शकतात. साऱ्या घरादाराला पेलणारी ती दुःखाला तीव्र नकार देते, उन्हाच्या झळांना आपल्या उंबरठ्यालाही स्पर्श करू देत नाही, लेकरांवरची तिची मायेची पाखर अधिकच दाट होत जाते. ती दुःख पचवते. दुःखाला पचवून सुखात रूपांतरित करते.
‘भोगले मी इतुके की मज हसावे लागले’ ही अगतिकता तिच्याजवळ नसते. भोगांना स्वतःच्या कर्तृत्वाने ती उपभोग्य करते आणि त्या उपभोगांचे सुख घरादाराच्या पदरात टाकते. ती माय माऊली आदिशक्तीचे संचित घेऊन आलेली असते. समुद्रमंथनातून निघालेले विष धारण करू पाहणाऱ्या शिवाच्या कंठाशीच ते विष थांबवण्याची तिची ताकद आहे. त्या विषाने तिचं घरदार उद्ध्वस्त करण्याचा विचार सुद्धा करू नये, एवढी असीम श्रद्धा आणि अफाट ताकद तिच्यामध्ये आहे.
दुःख तिच्या वाऱ्याला तरी उभे राहील काय? तिच्या डोळ्यात अश्रू असतील ते केवळ आनंदाचे, कृतार्थतेचे सार्थकतेचे, कृतज्ञतेचे !
संपूर्ण समर्पण!
‘ओढ’ आणि ‘ओढ’
‘ओढ’ हा शब्द आपल्या सगळ्यांनाच अत्यंत परिचित असलेला असा आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द घेऊन आपण कृतिशील असतो. आज ‘ओढाओढ करणे’, ‘चढाओढ लावणे’ हे आमच्या बाजारकेंद्री जीवनाचे मध्यवर्ती सूत्र झालेले आहे. त्यामुळे आयुष्य ‘ओढत’ आपण जगत राहतो आहोत.
….. दुसरी ‘ओढ’ मात्र अतिप्राचीन आहे. चिरकालीन आहे. ती ‘हृदयाची ओढ’ आहे. सारी सृष्टी जिथे प्रेमवृष्टी करते त्या भारतीय संस्कृतीतली ती ‘ओढ’ आहे. माणसाला आत्मसन्मान देणाऱ्या आणि मित्रत्वाने उभ्या करणाऱ्या, जीवनाची ती अजोड जोड आहे.
……… खरंतर ‘तिच्या’मुळे माणसाचं आयुष्य मधासारखं गोड आहे. तिची सोबत हे सृष्टीचं आदीम तत्त्व आहे. ‘प्रकृती’ आणि ‘पुरूष’ यांच्या एकरूपतेशिवाय आपली सृष्टी अस्तित्वातच येऊ शकत नाही. ‘एकोहम् बहुस्याम्’ या इच्छेच्या मुळाशी हेच तत्त्व आहे. ही प्रकृती सुद्धा कशी असते तर पंचमहाभूतांपासून आणि तीन सूक्ष्म तत्वांपासून तयार झालेली अष्टधा प्रकृती असते. मला वाटतं कदाचित त्यामुळेच या प्रकृतीचाच, या आदिशक्तीचा अवतार अष्टभूजा देवीच्या स्वरूपात आपण पाहतो.
शिवाय ज्या गृहलक्ष्मीला आपण देवीच्या स्वरूपात पाहतो ती देखील ‘अष्टभुजाधारी’ असावी अर्थात ‘बहुकार्यात्मक’ असं तिचं रूप स्वरूप आपण अपेक्षितो. मात्र देविसारखी विविध रूपे तिने व्यक्त करण्यापेक्षा तिचं स्वरूप कायमच ‘सौम्य’, ‘प्रेमळ’ आणि ‘त्यागमय’ असावं अशी पुरुषप्रधान दृष्टिकोनातून रास्त अपेक्षा आपला समाज सातत्याने व्यक्त करतो. या अपेक्षेच्या अनुषंगाने शतकानुशतके ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ ही भूमिका स्त्री बजावत आलेली आहे. कारण तिला नैसर्गिक ओढ असते तिच्या गृहसौख्याची!
आज मात्र ही गृहसौख्याची ओढ, कुटुंबाची स्थिरता आपल्याला अनेकविध कारणांनी धोक्यात आलेली दिसते. व्यक्ती – कुटुंब – समाज – प्रदेश – देश – विश्व अशी साखळी आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला दिसून येतं; ज्या विश्वाच्या कल्याणाची आणि विकासाची आळवणी आपण सातत्याने करत असतो त्याचा पाया असलेली व्यक्ती ही अत्यंत ‘व्यस्त’ आणि ‘त्रस्त’ झालेली आहे. ज्या व्यक्तीला मध्यवर्ती ठेवून विश्वाची स्वप्नं आपण पाहतो ती व्यक्ती जर स्थिर नसेल तर विश्व अस्थिर होणारच. भारतीय ज्ञानपरंपरेतून विचार करताना खरं म्हणजे हे सूत्र आपण ‘सृष्टी – समष्टी – व्यष्टी’ अशा उतरत्या क्रमाने मांडतो. मात्र पाश्चात्त्य ज्ञानपरंपरा स्वीकारून आणि त्याचबरोबर ‘बाजारकेंद्री अर्थव्यवस्था’ अवलंबून आज आपण हे सूत्र भारतीय दृष्टिकोनातून व्यस्त पद्धतीने म्हणजेच ‘व्यष्टी – समष्टी – सृष्टी’ असे स्वीकारलेले आहे. त्यामुळे आपसूकच आमचे ‘धर्म’, ‘अर्थ’, ‘काम’, ‘मोक्ष’ हे जे चार पुरुषार्थ आहेत या चार पुरुषार्थांमध्ये सुद्धा ‘अर्थ’ आणि ‘काम’ हे प्राधान्याने पुढे येऊन ‘धर्म’ त्या पाठीमागे सारलेला दिसतो. त्यामुळे आपसूकच ‘मोक्ष’ या संकल्पनेलाच आपल्या जीवनातून ‘मोक्ष’ मिळालेला आहे. ‘मुमुक्षत्व’ संपुष्टात आल्याने जीवनाची युक्तता घटलेली आहे. जिथे युक्तताच नाही तिथे उपयुक्तता कशी असेल? मात्र दुर्दैवाने हे आपल्या लक्षात येत नाही.
आपल्या ज्ञानक्षेत्रामध्ये व जीवनव्यवहारामध्ये आपण ‘उपयुक्ततावादी’ आणि ‘सौंदर्यवादी’ अशी विभागणी करून जीवनाकडे पाहत असतो. ‘सत्यं शिवं सुंदरम्’ हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे ब्रीदवाक्य आणि त्याआधारे ‘सत्यमेव जयते’ यासारखे राष्ट्रीय बोधवाक्य जरी आपण स्वीकारलेले असले तरी या तीन तत्त्वांची आपण किती बुज राखलेली आहे, हे आपल्यापैकी प्रत्येकाला चांगले ठाऊक आहे. या चुकांना वेळीच स्वीकारून त्यात सुधारणा करण्याऐवजी आपण त्याला ‘शिष्टाचार’ ‘इकोसिस्टीम’ ‘प्रॅक्टिकल विज्डम’ यासारखी गोंडस नाव दिलेली आहेत. अर्थात आपल्या या कर्माची फळे आपण सर्वजण अपरिहार्यपणे चाखत आहोत. या फळांची सामूहिक कटू चव आपल्या गळी उतरेल तेव्हा कदाचित आपण पुन्हा एकदा परिवर्तनासाठी तयार होऊ. सध्या तरी अशा परिवर्तनासाठी कोणी एकटा- दुकटा तयार होतो, समूह गोळा करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला साम -दाम-दंड-भेद वापरून ‘ऑड मॅन आउट’ ठरवायला आपण चुकत नाहीत. अशा प्रकारच्या व्यक्तींना आपण हरत-हेने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या मागचा समूह हातोहात पसार होतो. अशी व्यक्ती समाजामध्ये पूर्णपणे ‘एकटी’ पाडली जाते, जुन्या भाषेत बोलायचं झालं तर ‘वाळीत टाकली’ जाते. या सर्व व्यवस्थेला पुरून उरू शकतील अशा सक्षम व्यक्ती असक्षम समाजामध्ये निपजतीलच कशा? ही व्यवहारातली लक्षणे दुर्लक्षित करून तात्विक पद्धतीने मात्र आम्ही सर्वच क्षेत्रात समाजाच्या निकस सृजनाला नावे ठेवत राहतो. मग इथे आपसूकच प्रश्न निर्माण होतो ज्या प्रगतीसाठी, ज्या विकासासाठी आम्ही आमच्या जीवाचा आटापिटा करतो आहोत किंवा किमानपक्षी तसे दाखवतो आहोत त्या विकासाची, प्रगतीची ‘ओढ’ आम्हाला खरोखर आहे का? की तिच्याअभावी आम्ही फक्त ‘ओढाओढ’ करत आहोत ‘चढाओढ’ लावत आहोत.
आपल्या जुन्या म्हणी आपल्याला हेच सांगतात ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल’, ‘इच्छा तिथे मार्ग’, यासारख्या म्हणी ‘संचिताचा अभाव’ पर्यायाने ‘क्रमबद्ध विकासाचा अभाव’ स्पष्टपणे अधोरेखित करतात. पण modern होण्याच्या नादात आपल्याला हे जुनं संचितच टाकाऊ वाटायला लागलं. ‘टाकाऊतून टिकाऊ’ निर्माण करण्याची शक्ती असलेली ‘पतितांना पावन’ करून खरी समता प्रस्थापित करण्याची मूलभूत क्षमता ही भारतीय संस्कृतीमध्येच आहे. मात्र दुर्दैवाने आजही आम्ही, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’, आणि ‘बंधुता’ ही तीन तत्त्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झालेली आहेत असंच शिकतो. वास्तविक पाहता जे भारतीयांच्या रक्तात आहे त्या घटकांची इतरांकडून उसनवारी करून इंजेक्शन घेण्याची आवश्यकताच काय? मग इथे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते आम्हाला ‘स्व-रूपा’ चा आजही विसर पडलेला आहे. किती काळ आम्ही मेकॉले यांच्या नावाने खडे फोडत बसणार? आमचे ‘स्व-रूप’ जोपर्यंत न्यूनगंडात विरघळत राहील आणि अहमगंडात अवास्तव फुलत राहील तोपर्यंत आमच्या हाती काहीही लागणार नाही.
‘चूक स्वीकारणं’ ही ‘सुधारण्याची पहिली खूण आहे’, हे सांगणाऱ्या ‘हिंद स्वराज’ ला आम्ही विसरलो तर महात्मा गांधी आम्हाला कळतील कसे ? ‘सत्याचे प्रयोग’ करण्याची कुवत आमच्यात येईल कुठून? साधेपणातलं सौंदर्य जोपर्यंत आम्ही अनुभवत नाही तोपर्यंत
“It is very simple to be happy, but it is very difficult to be simple.”
हे घोकत राहण्याच्या पलीकडे आपण काय करणार?
वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻
यावर आपले मत नोंदवा