विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

मुलाफुलांचे पान _ शिकावे अनुभवातून !

१. ‘स्पेस ऑन व्हिल्स’

कालपासून सरस्वती भुवनच्या परिसरामध्ये इस्रोची बस उभी आहे. ‘स्पेस ऑन व्हिल्स’ अशी मोठी अक्षरे लिहिलेली ही बस आपले लक्ष वेधून घेते. ‘अंतराळ’ आपल्याकडे फिरायला आले आहे ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही!


बसच्या पायऱ्या चढून आत गेले की एक वेगळेच जग आपल्यासमोर येते. वेगवेगळे सॅटेलाइट्स , चंद्रयान, मंगळयान आपल्याला बघायला मिळतात. ही सारी नावे आमच्या बच्चे कंपनीने नक्कीच ऐकलेली असतील.
ही बस आपल्या शहरामध्ये दहा दिवस वेगवेगळ्या शाळांमध्ये भेट देणार आहे. तेव्हा तुम्ही तिला भेट द्यायला विसरू नका बरं का !

आमच्या सगळ्या शाळांचे विद्यार्थी या बसमधल्या अंतराळात फिरून आले. त्यांचे उत्सुक आणि उत्साही चेहरे पाहून मला तुमची आठवण आली. तुम्हाला बस कशी वाटली ते नक्की कळवा.

ISRO – Indian Space Research Organization

भारतीय अंतराळ संशोधन संस्था


. Caring & Shairing

https://drive.google.com/file/d/1UKdnB3_VgrdBaKpsxBPBOjObom-mUd87/view?usp=drivesdk

वरील लिंकवर गायीचा गोठा दिसेल. हा व्हिडिओ वेगळ्या वेळी काढलेला आहे. त्यामध्ये कुत्र्याचा फक्त आवाज येतो.

खरं म्हणजे तुम्हा मुलांची मला परवापासून आठवण येत आहे. याचं कारण आहे बकरीचं एक छोटं पिल्लू. आमच्या घरासमोर एक गोठा आहे. त्या गोठ्यामध्ये गाय – बैल – शेळ्या आणि कुत्रा असे सगळे गुण्यागोविंदाने नांदतात.


परवा भाजी निवडल्यानंतर त्याच्या हिरव्या दांड्या, शिल्लक राहिलेले एक दोन टमाटे आणि दोन पोळ्या असं त्या गोठ्यात देण्यासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे मी कुंपणातून ते आत टाकलं. मोठ्या शेळ्या धावत आल्या. सगळ्यात पाठीमागे बकरीचं ते छोटं पिल्लू होतं. तेही पळत आलं. पण अर्ध्यातच थांबलं. तिथे कुत्रा झोपलेला होता. त्याला त्याने पायाने उठवलं. मग कुत्राही जे टाकलेले आहे ते खाण्यासाठी आला.


शेळ्यांना जेव्हा बाहेर फिरायला नेलं जातं तेव्हा सर्वात पुढे हा कुत्रा त्यांचं संरक्षण करत असतो. आपल्या संरक्षकाची काळजी घ्यावी हे त्या बकरीच्या पिलाला कोणी शिकवलं असेल?


३. बागेतली गंमत

https://drive.google.com/file/d/1bDsIA02xijQPpL85_itOdzEyAaN__zVG/view?usp=drivesdk

वरील लिंकवर दोन सरडे तुम्हाला भेटण्यास येतील .

आमच्या घराजवळ एक बाग आहे. मी त्या बागेमध्ये फिरायला जाते. तिथे दोन छोटी मुलं खेळायला येतात. मी घसरगुंडीच्या मागे व्यायाम करत होते. त्या छोट्या मुलीला मी म्हणलं, “तुला खेळायचं असेल तर चढ वर. मी सरकते बाजूला.” ती मुलगी फक्त गोड हसली. थोड्याच वेळात घसरगुंडीवर समोरच्याच बाजूने चढली आणि तिथूनच खेळली. तिचेच अनुकरण तिच्या लहान भावाने केले.
आपण दुसऱ्याला डिस्टर्ब न करता आपला आनंद घ्यावा हे त्या चिमुकलीने मला शिकवले.


४. कमळाचे फूल

https://drive.google.com/file/d/1Ae5VmtWc3W-7l2k0cK70gObnRg_Ge7c2/view?usp=drivesdk

वरील link click केल्यावर तुम्हाला कमळाच्या फुलाचा एक व्हिडिओ दिसेल. त्यावर तीन वाक्ये मनाने लिहून आईला अवश्य दाखवा.


पुन्हा भेटू.