विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

अभिजात मराठी आपली मराठी !

जीवनावर भाष्य करण्याची क्षमता निर्माण करते ती भाषा !



साहित्यातून कळलेले प्राण्यांचे माणूसपण

(पूर्व संकलनातून)

वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. अशा दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणांतच त्यांचे प्राण जातात. दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखविलेल्या या धर्यामागे ‘नवीन पिढीने तरी जगावे’ हा उद्देश असतो. एरवी भूक आणि तहानलाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानतो. पण प्रत्यक्षात प्राण्यांकडून ती कृतीत आणली जाते. माणसांसारखीच वानरेदेखील शेकोटी करतात. वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडे रचून शेकोटी तयार करतो. न पेटलेल्या या शेकोटीभोवताली ते अर्धाएक तास बसतात आणि मग आपल्या मार्गाने निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही, तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली, हे जाणून घेतलं तेव्हा वानरे डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात, असं आदिवासींकडून कळलं. वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतील लाकडं तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत नाहीत. ‘वानरांची लाकडे, चुलीला साकडे’ ही म्हण कदाचित यावरूनच पडली असावी. प्राण्यांचा अभ्यास करताना या गोष्टी मी कधी प्रत्यक्ष अनुभवल्या, तर काहींची माहिती गोळा केली. आणि ती या प्राणीकोशाच्या निमित्तानं छोटय़ा छोटय़ा प्रकरणांतून लोकांसमोर येणार आहे.

मुंगसाला पिलांसह रस्ता ओलांडायचा असेल तर घार आणि गरुडाची भीती असते. म्हणून आधी मुंगूस बाहेर येऊन डोकावतो आणि मग पिलांना कशा पद्धतीनं रस्ता ओलांडायचा याचे संकेत देतो. त्या पिलांची आई त्यांना शेपटी पकडायला लावते आणि मग इतर पिल्लं एकमेकांची शेपटी पकडून रस्ता ओलांडतात. अशा पद्धतीनं रस्ता ओलांडला तर हा कुणीतरी वेगळा आणि विचित्र प्राणी असल्याचा समज घार आणि गरुडाचा होतो. त्यामुळे ते त्यांच्या वाटय़ाला जात नाहीत आणि मुंगूस त्याच्या पिलांसह सुरक्षितपणे रस्ता ओलांडून पलीकडे जातात.

‘उंदीर चोरीही करतात’ असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल? उंदरांच्या नावाच्या शोधार्थ एकदा पारध्यांच्या वस्तीत गेला होतो. त्या ठिकाणी मला एक उंदरांसंबंधी तज्ज्ञ व्यक्ती भेटली. त्या माणसाने रात्री एक वाजता मला पाडय़ावर बोलावलं. अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असे म्हणून मी निघालो. त्याच्याकडे एक करंडी होती. ती करंडी डोक्यावर घेऊन तो एक किलोमीटपर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्याने करंडी उघडली. त्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल शंभर उंदीर होते. करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले. अर्ध्या तासाने ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक-एक कणीस होतं. पारध्याने त्या कणसांमधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला. त्या पारध्याने उंदरांना कणसाची चोरी करण्यास शिकवलं होतं. या उंदरांच्या बिळापाशी रानकोंबडीचे अंडे होते. तेवढे मोठे अंडे या उंदरांनी बिळापर्यंत ओढत आणलं. मेळघाटातले उंदीरही फार हुशार! अर्ध्या एकरात त्यांची बिळे आढळतात. त्या प्रत्येक बिळात दगडाचा एक पिलर उंदराच्या उंचीएवढा असतो. बिळातून बाहेर आल्यावर उंदीर त्या पिलरच्या आडून शत्रूपक्षी आहे का, हे पाहतो. शत्रूपक्षी असेल तर तो बिळात जातो आणि नसेल तरच तो बाहेर पडतो. ही सर्व माझी निरीक्षणे आहेत. ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.

मोराला पिसारा असतो. पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो. त्याला ‘मुकना मोर’ म्हणतात. मोरनाचीमध्ये या मुकन्या मोराला प्रवेश नसतो. हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी ‘मुकना हत्ती’ असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते. हत्तींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही. आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात. सर्वसामान्यांकरिता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे; परंतु या ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातील प्राण्यांबाबत वस्तुस्थिती आहे. प्राणीकोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास-दौऱ्यांत हे अनुभवायला मिळालं. ‘मुकना’ हा शब्दही त्यातूनच कळला. हत्तींच्या कळपाचं नियंत्रण हत्तीण करते. कळपातले इतर तिच्या मागे चालतात. काळविटांच्या कळपाचं नियंत्रणसुद्धा मादी काळवीटच करते. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानाने देते. कानाची पाळ ती उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो. आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याचजणांना माहिती नाही. लता मंगेशकर यांना आपण ‘गानकोकिळे’ची उपाधी देतो, ते चुकीचं आहे.

मारुती चितमपल्ली.


•| ॐ |•

श्री मॉं!

मुंगूस

मुंगूस. माझ्या आवडत्या प्राण्यांपैकी एक. जेव्हा जेव्हा मला मुंगूस आठवतं त्यावेळेला मी माझ्या बालपणात आणि थेट आजोळात पोहोचते. लहानपणी अन्वीला गेलो की, पाय धुवायला थेट मागच्या न्हाणीघरापाशी जायचो. तेव्हा एखादं मुंगूस झटकन इकडून तिकडे पळत गेलेले दिसायचं. त्या क्षणिक दर्शनानं हे बालमन नाचत उठायचं. दुपारच्या वेळेला घरामध्ये सामसूम झाली की ही मुंगसं हमखास त्या ठिकाणी येत होती. त्यामुळे माझ्याही नकळत मी त्या सुंदर दुपारची वाट पाहात बसायचे.

मला मुलं झाल्यावर त्यांच्यासाठी गोष्टीची पुस्तकं आणली, तेव्हा त्यांच्या पहिल्याच पुस्तकात मुंगूस आणि साप यांची पारंपरिक गोष्ट होती. मुलाला वाचवण्यासाठी प्राण पणाला लावणारे गोष्टीतील मुंगूस माझा या काळात अधिकच जवळचा मित्र न बनले तरच नवल. माझ्या सासरी पार्किंग मधून हळूच दाराखालून येणाऱ्या मुंगसांचे अधून मधून दर्शन घडत होते. त्यामुळे माझे मन हर्षोल्हासित व्हायचे.

मुलं मोठी झाल्यावर एकदा आम्ही आजूबाईच्या दर्शनाला गेलो होतो. का ते माहीत नाही पण तीन-चार वर्षांपूर्वीचा आमचा तो दर्शना दौरा, मनाला फारच सौख्य देणारा होता. आम्ही पोहोचलो तेव्हा दुपारची शांत वेळ होती. तिथेही मुंगसांचे दर्शन घडले. त्यांचा एक नवीनच पैलू तिथे मी अनुभवला. पेटत्या दिव्यातली वात घेऊन मुंगूस पळत होते. हा सोहळा मीच पहिल्यांदा पाहिल्यामुळे मुलांमध्ये मूल होऊन देवीइतकंच आनंदाने मी मुंगसांचंही दर्शन घेतलं. प्रवासाचा थकवा त्या दर्शनानं कुठल्या कुठे पळवला.

खूप दिवसांनी काल पुन्हा एकदा हा मुंगूसयोग आला. महाविद्यालयात मुंगसाचं छोटं पिल्लू इकडून तिकडे बागडताना पाहून माझ्या मनाने ही बागडून घेतले. अभ्यासक्रमात कदाचित मारुती चितमपल्लींची एक कथा अभ्यासाला होती. त्यामध्ये साप आणि मुंगूस यांची लढाई झाल्यावर सापाला मारून मुंगूस पळत पळत काही वनस्पतींची मुळं खात असलेलं एका इंग्रजी अधिकाऱ्याने पाहिलं आणि त्यातून ‘सर्पगंधा’ या आयुर्वेदिक वनस्पतीचे गुणधर्म प्रयोगशाळेत तपासले गेले. साप चावलेल्या रुग्णासाठी त्या वनस्पतीचा उपयोग औषधीमध्ये झाला, याबाबतची कथा आपसूकच आठवते. ती कथा मोठी रंजक होती.

मी मुंगसाबद्दल बोलायला लागले की माझी लेक मला हसते. कारण त्याचं वर्णनच मी तसं करते. मुंगूसाच्या पायामुळे त्यांना जमिनीवरून वर राहण्याची जी एक उपजत उंची मिळालेली असते ती पाहिली की मला माझ्या मुलाचा स्केटिंग बोर्ड, माझ्या घरातला जुना देवपाट असं काहीबाही आठवत राहतं, ते सांगताच, “आई, तुझं आपलं काहीतरीच हं ” असं म्हणून माझं बोलणं माझी लेक निकालात काढते.

मुंगसाबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात अनेक कल्पना असतात. मुंगूस दिसणं हा एक शुभशकुन मानला जातो. माझं मन मात्र या शुभ – अशुभाच्या जाळ्यात कधीच अडकलं नाही. त्या पल्याड जाऊन मिळणारा ‘आनंद क्षण’ हाच मला नेहमी महत्त्वाचा वाटत आला. मुंगसातला चांगुलपणा पाहिला की मला वाटतं सतप्रवृत्ती या सृष्टीमध्ये वेगवेगळ्या रूपाने वास करते. मुंगूस हे त्या सत्प्रवृत्तीचं एक प्रतीक असावे.

श्रीकृष्णार्पणमस्तु!

                                    संपूर्ण समर्पण मॉं! 

वृंदा आशय


•| ॐ |•

श्री मॉं!

शब्दवेध

‘नाराज’ आणि ‘राज’

रात्रीचे आठ वाजून गेलेले आहेत. जवळपास तासाभरापासून संपूर्ण वसाहतीचे दिवे गेलेले आहेत. त्यामुळे निवांत बसले आहे. बसल्या बसल्या ‘तुझसे नाराज नही जिंदगी’ या गझलेची आठवण झाली.
ही माझी आवडती गझल आहे. नैनितालला अरविंद केंद्राच्या युवा शिबिरामध्ये हेमंत दा यांनी गायली होती. अर्थात त्याच्या आधीपासूनच ही गझल मला आवडते. आम्ही औरंगपुऱ्यात राहत होतो. आमच्या समोरच ‘म्युझिक लव्हर’ हे दुकान होतं. त्यांच्यामुळे अनेक गाणी आमच्या कानी कपाळी सतत वाजायची. काही गाजायची. काही रुजायची. रुजलेल्या गीतांपैकी हे एक. पूर्वी दुःख झालं की मी आवर्जून ही गझल ऐकायचे. आता तसं काही कारण घडत नाही. कदाचित व्यवहारी जगामध्ये राहून कणखर झालेल्या मनाची ही कृपा असावी. त्यामुळे या गझलेचा आता मी खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकते.
तर या गझलेच्या निमित्ताने ‘नाराज’ आणि ‘राज’ हे दोन शब्द मनात आपसूक उगवून आले. ‘नाराज होणे’ हा भाव जवळपास प्रत्येकच व्यक्तीला फार चांगला परिचित असतो. कारण क्वचितच मनासारखं घडतं अशा जगामध्ये आपण मुखवटे लावून वावरत असतो. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःची नाराजी काय आहे, न आवडणं काय आहे हे फार चांगल्या रीतीने ठाऊक असतं. नाराज झालो तर पटकन सोडून द्यायला आपण व्यवहारात राहून शिकतो. नाराजपणामुळे हैराण आणि परेशान होणं आपल्याला परवडणारे नाही हे अनुभवाने आपल्याला शिकवलेले असते. त्यामुळे तोंड देखली का होईना पण नाराजी सुद्धा आपण हसत हसत स्वीकारतो.
‘ दुसऱ्याच्या सुखात माझं सुख आहे’ हा पूर्वीच्या सामाजिक जीवनात औदार्याचा भाग होता. ती आता एक राजरोस पळवाट झालेली आहे. ‘तू खुश आहेस ना, झालं तर मग’ हे परवलीचे वाटणारे वाक्य ‘झालं तर’ मध्ये काय काय लपवून ठेवत असेल हे सांगता येत नाही. तिथे स्वाभाविकच ‘राज को राज रहने दो’ या गीतामधल्या ओळी आणि त्याचबरोबर ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही अंजन घालणारी म्हण अशा दोन्ही गोष्टी सहजच आठवतात. ‘राजी खुशी’ मधलं ‘रहस्य’ हे बऱ्याच वेळेला गुप्त ठेवलेलं बरं असतं, ही व्यवहाराची शिकवण आहे.
‘राज’ या शब्दाचा या ठिकाणी ‘रहस्य’, ‘गूढ’ हा अर्थ अभिप्रेत आहे, मात्र व्यावहारिक दृष्ट्याच. साहित्यिक दृष्ट्या जेव्हा आपण रहस्याचा, गूढ
गोष्टींचा विचार करायला लागतो त्या वेळेला ‘रहस्य कथा’, ‘सीआयडी’ सारख्या मालिका सहजच समोर येतात. तिथलं रहस्य निराळेच.
आपल्या दैनंदिन जीवनात – व्यवहारी जगात जेव्हा या ‘राज’, ‘रहस्य’, ‘गूढ’ या शब्दांचा आपण वापर करतो तेव्हा साधारणपणे ‘घडू नये ते कोठे घडले’ अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असते. तिची फार वाच्यता होऊ नये म्हणून त्या रहस्यामध्ये सहभागी असलेले लोक, ‘राज को राज रहने दो’ अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात. मात्र एखादी गोष्ट जेव्हा षट्कर्णी होते तेव्हा तिला पसरायला वेळ लागत नाही हा सुद्धा व्यवहारी जीवनातलाच नियम आहे. त्यामुळे अशा प्रकारची रहस्ये मला तरी ‘ओपन सिक्रेट’ या शब्दाच्या अर्थाजवळ जाणारी वाटतात.

‘ओपन सिक्रेट’ या शब्दातील ‘गूढ’ सर्वपरिचित असते. ‘माहिती आहे पण त्याबद्दल बोलायचे नाही’ हा या रहस्याचा गाभा असतो. काही वेळेला हे रहस्य काही ठराविक लोकांना माहीत असते. त्या रहस्याची आवश्यकता, त्याचा दर्जा आणि तत्कालीन परिस्थिती यानुसार ते संबंधितांकडून राखले जाते किंवा फोडले जाते. निष्ठावानांच्या काळामध्ये ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या पद्धतीने ही रहस्ये सांभाळली जात होती. इतिहासामध्ये त्याची अनेक गौरवास्पद उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.
आजच्या काळामध्ये मात्र या ‘ओपन सिक्रेट’ ची व्याख्या फार निरळी होते. ते शब्दशः ‘ओपन सिक्रेट’ असते. सुरुवातीला काही जणांना माहिती असलेले हे रहस्य हळूहळू कर्णोपकर्णी होते. त्यामुळे त्यातले मूळ सत्य त-हात-हांनी बदलत जाते. जितक्या जास्त लोकांना ते माहिती होईल तितक्या लोकांच्या दृष्टिकोनातून आणि मनोवृत्तीतून मूळ सत्य रंगीबेरंगी होत जाते. साधारणपणे त्याबद्दल बोलायचे का नाही तर व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, घडणाऱ्या गोष्टी ज्या ठिकाणी घडतात त्याचे समाजातील स्थान, काही वेळेला सत्ता, पैसा अशा चुकीच्या गोष्टींचा दबाव अशी नानाविध कारणे त्या पाठीमागे असतात. तिथे गप्प बसणं हे व्यावहारिक शहाणपण ठरतं.
मग खरंच त्याबद्दल शहाण्या माणसानं बोलू नये, इतकेच.

वृंदा आशय

संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीकृष्णार्पणमस्तु!


•|ॐ|•

श्री मॉं!

माझ्या पल्याड…

माझ्या पल्याड जायचं आहे मला
माझ्या पल्याड
प्रवासात लागतो अंधाराचा गाव आणि
प्रकाशाची बेटं
स्वतःला ओलांडत ओलांडत असा शोधती आहे किनारा
जिथे नसेल अंधार आणि प्रकाशाला थारा
कदाचित चालता चालता पोहचेल की नाही याची भीती आणि चिंता वाटत असावी


माझंच मला हसू येत अशावेळी क्षणभर

ज्याला काहीच नको असतं त्याला चिंता तरी कशाला हवी म्हणून?
ही भीती आणि चिंताच
डोळ्यातलं पाणी घेऊन येतात धावून
आणि कधी कधी स्वतः सोबत साऱ्यांनाच नेतात वाहून
कदाचित म्हणून……..

पण हे परमेश्वरा खात्री आहे मला कदाचित शेवटचा टप्पा असावा हा माझा स्वतःच्या अस्तित्वाला ओलांडण्याचा त्याशिवाय पुन्हा संकुचित झाल्यासारखी मी वर्तुळाकार होणार नाही स्थिती

एकच विनंती हे वर्तुळ पूर्ण करू नको पुन्हा मला यात अडकवू नको
घेऊन चल आता तुझ्या कृपेने एक असं वळण देऊन
जिथून मी मला बघू शकेल खूप दूरवरून.

इतक्या दुरवरून की उल्कापात झाला तरी पाण्याचा थेंबही उडणार नाही
इतकं कोरडे होऊन!

संपूर्ण समर्पण मां!


प्रतिक्रिया व्यक्त करा