
•| ॐ |•
मनातल्या सरस्वतीला साक्षी ठेवून मी भाईजींना स्पष्टच विचारले, ” भाईजी, ‘शिक्षक’ या नात्याने माझी बांधीलकी नक्की कोणाशी आहे?”
भाईजींनीही तेवढेच नि:संदिग्ध उत्तर दिले, ” शिक्षकाची खरं तर प्रत्येक माणसाची पहिली बांधिलकी स्वतःची स्वतःशी असावी, म्हणजेच आपण आपल्याशी पूर्ण प्रामाणिक असावे. दुसरी बांधिलकी नि:संशयपणे ज्ञानक्षेत्राशी असावी. नीरक्षीरविवेक हाच तिथला खरा मार्गदर्शक. तिसरी बांधिलकी आपल्या शिक्षण संस्थेशी, त्यानंतर महाविद्यालयाशी असावी. ‘विद्यार्थिहित’ हेच या बांधिलकीचे प्रमाण असावे. विद्यार्थिहिताचा अर्थ कालसापेक्ष नव्हे तर शाश्वत कल्याणाशी संबंधित असावा.
शिक्षकाची उंची समाजाची उंची मोजण्याचा मानदंड ठरली तरच शिक्षकाला पिढ्या घडवता येतात; अन्यथा पिढ्यान् पिढ्या शिक्षणच दीनवाणे होऊन जाते.”
श्रीकृष्णार्पणमस्तु!

पापाला फुटते वाचा!…
झाकून किती झाकाल आपुले पाप ?
पापाला फुटते वाचा आपोआप ! ।।धृ०।।
धन-बल-सत्तेने, मग्रुर होता कैसे ?
का जबर व्याज ? बुडविता बळे का पैसे ?
लागेल दगाबाजास नरडिला चाप !
पापाला फुटते वाचा आपोआप ! ।।१।।
का श्रमिक-श्रमावर, बांडगुळापरि जगता ?
का पाण्यावरती, लोणी काढित बसता ?
झाकता पाप, गुदमरुनी लागे धाप !
पापाला फुटते वाचा आपोआप ! ।।२।।
प्रोत्साहन देता, का काळ्या बाजारा ?
खत-पाणी घाला, कशास भ्रष्टाचारा ?
का दूध पाजुनी, उशास घेता साप ?
पापाला फुटते वाचा आपोआप ! ।।३।।
आपुल्याच हस्ते, पाप-घडे का भरता ?
का बलात्कार अन् अत्याचार ते करता ?
कोसळेल माथी, कौरवापरी शाप !
पापाला फुटते, वाचा आपोआप ! ।।४।।
करणी परि, तैशी फळे प्राप्त ती होती !
नच घेई केव्हा, पाप पचवुनी नियती !
झाकून किती, झाकाल आपुले पाप ?
पापाला फुटते वाचा आपोआप ! ।।५।।
स्मरण गुरुवर्यांचे !
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।
ज्यांच्या ज्ञानापुढे, विद्वतेपुढे नतमस्तक व्हावे असे एकच व्यक्तिमत्त्व मला आतापर्यंतच्या आयुष्यात भेटले ते आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे ” श्री ब्रह्मानंद देशपांडे सर “. मी एक तालुक्याच्या ठिकाणावरून आलेली मुलगी – थोडीशी बुजरी, संकोची पण माझ्या सुदैवाने मला महाविद्यालयात खूप लवकर सरांचे मार्गदर्शन मिळाले आणि मी महिन्यातच सरांची लाडकी शिष्या बनले व महाविद्यालयात पुढील चारही वर्षे आंतरमहाविद्यालयीन – आंतरविद्यापीठ स्पर्धेत सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करण्याचे भाग्य मला लाभले याचे सर्व श्रेय माझ्या गुरूंना ब्रम्हानंद सरांना जाते!
सरांचा, इतिहासाचा तास म्हणजे ज्ञानाची पर्वणीच असे!
“देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ” अशी काहीशी अवस्था आम्हां विद्यार्थ्यांची असायची! किती ज्ञान- माहिती डोक्यात साठवून ठेऊ असे होऊन जायचे! संदर्भ – माहिती एवढी सखोल असायची की वाटायचे की आपण बारावी तील इतिहास शिकतोय की MPSC परीक्षेची तयारी करतोय! 100 कौरवांच नावे तोंडपाठ सांगणारे ब्रम्हानंद सर म्हणजे प्रत्यक्ष विश्वकोश, एनसाइक्लोपीडिया जणू! आता वाटतंय सरांच्या मार्गदर्शनाखाली MPSC तयारी केली असती तर नक्कीच यश मिळाले असते हा विश्वास स्वतःवरच्या ज्ञानाचा नाही तर सरांच्या अध्यापन पद्धती वरचा, त्यांच्यावरचा आहे!
महाविद्यालयात जुलैमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिली वक्तृत्व स्पर्धा होती गांधीं जयंतीची! 2 आक्टोबर ची! मी माझ्या नेहमीच्या शाळेतील सरावाने भाषण स्पर्धेत नाव नोंदणी केली! ‘अज्ञानात आनंद असतो’ स्पर्धा कशा प्रकारे होते किती ताकदीचे स्पर्धक असतात, काहीही माहिती नसताना नोंदणी तर केली माझ्या अल्पबुद्धीने भाषण तयार करून भाषण अक्षरशः ठोकून दिले! अन् पुढे काय? परीक्षक कोण! प्रत्यक्ष ‘वाचस्पती समान ‘ असणारे ‘ब्रम्हानंद सर ‘ माझे सुदैव एवढेच होते की सरांना त्यावेळेच्या उत्तम स्पर्धकांपैकी माझा आत्मविश्वास ( आज वाटतंय किती दुबळा होता तो!) आवडला असावा व चक्क मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले! त्यानंतर सरांनी बोट पकडून बोलायला शिकवले त्याची कशाची तुलना होऊच शकत नाही! प्रत्यक्ष वाचस्पतीने अज्ञानी व्यक्तीवर कृपेचा वरदहस्त ठेवल्यावर परिवर्तन होणारचना! तसेच माझे ही झाले!
असे प्राध्यापक आजच्या काळात विरळेच! वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रतिनिधी निवडण्यापासून, भाषणाची तयारी करवून घेऊन जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये आपले महाविद्यालय अव्वल कसे राहील याची संपूर्ण तयारी अर्थात ब्रम्हानंद सरांची असायची! स्वतः पैसे खर्च करून कॅन्टीन मध्ये चहा पाजवून विद्यार्थ्यांची भाषणाची तयारी करून घेणारे प्राध्यापक तुम्ही कुठे पाहिले आहेत का?
माझ्या लग्नानंतरच्या पण काही आठवणी आजही ताज्या आहेत. लग्नानंतर माझे चुलत दिर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे – वरीष्ठ सचिव असल्यामुळे घरगुती कार्यक्रमात संपर्क येत होता. लग्नानंतर काही दिवसांनी अशाच एका कार्यक्रमात सर भेटले, मी माझ्या नणंदेसोबत होते, अचानक सर तिथे आले, मी माझ्या नणंदेशी ओळख करून दिली तर म्हणाले कसे ” ही माझी विद्यार्थिनी आहे पण खरं सांगतो, ही फार भांडकुदळ आहे, सारखी वादविवाद करते, अरे, मी वादविवाद स्पर्धेत सतत सहभागी असते, हे सांगण्याची विनोदी पद्धत सासरच्यां मंडळीच्या पचनी पडेल का नाही या भीतीने क्षणभर माझी ‘भीती ने गाळण उडाली ‘!
असे हे ब्रम्हानंद सर आपल्या ज्ञानाने सर्वांना ब्रम्हानंद देणारे, नाव ही किती समर्पक “ब्रम्हानंद” ! ज्ञानमहर्षी, विनोदमहर्षी, सहजपणे सर्वांमध्ये मिसळणारे, एक हाडाचे शिक्षक असे कोणी होणे नाही “त्या सम ते”. सरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर दर जुन-जुलै मध्ये वेरूळ-अजिंठा सहल काढायचे! त्यांचे अनेक विद्यार्थी तिथे ‘ मार्गदर्शक’ (Guide) म्हणून कार्यरत आहेत, पण त्यांचे गुरू प्रत्यक्ष ‘ब्रह्मानंद सर’ जेव्हा वेरूळ- अजिंठा लेण्यांचे वर्णन करत असतील तर काय वर्णन करत असतील कल्पना करा! एक- एक शिल्प व चित्र जणू जिवंत होऊन आपल्याशी बोलत आहे असे वाटायचे! एक-एक तास एकच शिल्पाची-चित्राची माहिती ते सांगत, केवळ अवर्णनीय -स्वर्गीय! हजारो रुपये देऊनही ती माहिती आज कोणी नाही देऊ शकणार!
सरांशी संबंधित एक वेगळा अनुभव! माझ्या भाच्याच्या लग्नानिमित्त आम्ही लोणार (बुलढाणा) गेलो. अर्थात तेथील जगप्रसिद्ध उल्कापाताने तयार झालेले तळे पाहिले. तिथे मुक्कामी राहिलो, दुसरे दिवशी तेथील पौराणिक मंदिरं पाहिले, त्यातील सूर्य मंदिर अद्भुत आहे, जगप्रसिद्ध कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या तोडीचे काकणभर त्यापेक्षा सरसच पण प्रसिद्धी पासून कोसो दूर असणारे. अर्थात सुदैवाने आम्ही ते मंदिर पाहण्यासाठी एका मार्गदर्शकाची मदत घेतली होती, ज्यांनी त्या मंदिराबद्दल एक पुस्तिका काढली होती, आणि तो जीव तोडून सर्वांना, “पुरातत्त्व विभागाला सांगत होता की ते मंदिर कोणार्कच्या सूर्य मंदिरापेक्षा कसे श्रेष्ठ आहे, पुरातत्त्व विभागासाठी किती महत्वाचा ठेवा आहे, मला त्यांची ती सांगण्याची पद्धत, अद्भुत तर वाटली आणि कुठे तरी ‘ब्रह्मानंद सरांशी’ साधर्म्य साधणारी वाटली, का वाटली? का वाटावी हे ही एक कोडेच आहे, कुठे, छ. संभाजीनगर, सरस्वती भुवन महाविद्यालय आणि किती दूर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार!
खरे आश्चर्य तर पुढेच आहे, एवढे सखोल माहिती देणारे ‘मार्गदर्शक पाहून मी सहज म्हणाले माझ्या सरांना असेच ज्ञान आहे, पुढे चौकशीनंतर स्पष्ट झाले की ते ‘मार्गदर्शक’ सरांचे विद्यार्थीच आहेत! अद्भुत योगायोग!
अशीच एक आठवण सरांची, मी कधी कधी वादविवाद स्पर्धा महत्वाची असेल, प्रतिष्ठेची असेल तर सुट्टी किंवा परीक्षेचा काळ असेल तर सर घरीही बोलवायचे, घरी गेल्यावर त्यांच्या सुविद्य पत्नी खाण्यासाठी काही तरी द्यायच्या तर कधी सर ‘ ड्रायफ्रूट द्यायचे वर म्हणायचे ” खा, तुला गरज आहे याची’ वर विनोदाने म्हणायचे तुझा जन्म 1970-72 च्या दुष्काळातील आहे त्याशिवाय एवढी बारीक कशी असशील त्यांचा विनोद बोचणारा नसायचा, सहजसुंदर असायचा!
अशा या ज्ञानमहर्षी, विनोदमहर्षी, एक शुद्ध मन असणारा सच्चा मनाचा व्यक्ती मला गुरू म्हणून लाभले हे माझे भाग्य समजते, पूर्वजन्मीची पुण्याई! ब्रह्मानंद देशपांडे सरांच्या स्मृतीस शतशः प्रणाम!
कायम गुरुवर्यांच्या ऋणात असणारी शिष्या –
उर्मिला श्रीराम रामदासी
(सुमेधा सुनिल कुलकर्णी)
•| ॐ |•
शब्दवेध
‘क्षण’ आणि ‘शिक्षण’
खरं म्हणजे परवा संध्याकाळपासूनच ‘क्षण’ आणि ‘शिक्षण’ हे दोन शब्द मनामध्ये घर करून बसले होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा विचार करताना हे शब्द मनामध्ये रुजत गेले. दहावी बारावीच्या निकालाने हे शब्द मनामध्ये नव्याने उगवून आले. आज वेध त्या शब्दांचा –
क्षणाचा आणि शिक्षणाचा संबंध काय याचा विचार करताना अनेकविध पैलू, अनेक वेगवेगळे विचार माझ्या मनामध्ये आपसूक येत जातात. क्षणाच्या अनुषंगाने शिक्षणाच्या काही व्याख्याही त्यातूनच सूचत गेल्या –
क्षणाक्षणाला नव्यानं शिकत जावं हे सांगतं ते शिक्षण.
प्रत्येक क्षण न् क्षण विद्येचा कण वेचावा हे सांगतं ते शिक्षण.
क्षणाक्षणांना परिवर्तित करू शकेल अशी ताकद विकसित करतं ते शिक्षण.
क्षणाक्षणांना होणारं परिवर्तन स्वीकारू शकेल अशी स्वीकारक्षमता वाढवतं ते शिक्षण.
जीवन क्षणिक आहे याचं भान देतं ते शिक्षण.
क्षणभरही दुःखी आणि निराशावादी होऊ नये हे शिकवतं ते शिक्षण.
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥
असं क्षणांचं आणि कणांचं महत्त्व मनामध्ये रुजवणाऱ्या क्षणांमध्ये मी हरवून गेले. परमेश्वर तुम्हाला दररोज २४ हिरे देतो, त्याचं तुम्ही काय करता ? हा गुरुवर्य ब्रह्मानंद देशपांडे सरांचा प्रश्न माझ्या मनामध्ये निनादत राहतो आणि
‘सावधान चौबीसों घंटे
अरे चक्र के है कहते ‘
या राष्ट्रभानाशी त्याला आपसूक जोडत जातो.
तिथूनच मग मला माऊली संत ज्ञानदेवांचे ‘अवधान दिजे’ हे आवाहनही आठवायला लागते आणि मग वाटतं
“क्षणाक्षणाला सावध राहून राष्ट्रीय कर्तव्य करण्यास शिकवणारे आणि विश्वमंगल्याचे भान विकसित करणारे ते शिक्षण.”
आपण आपल्या विचारांमध्ये गुंग व्हावं आणि एकदम घड्याळाच्या खणखणीत टोलाने आपल्याला वास्तवात आणावं तसंच माझं काहीसं झालं. जेव्हा मी विचार करत होते आज माझं शिक्षण हे खरंच देतं का, विद्यार्थ्यांमध्ये पेरतं का?
वर्षभर अभ्यासक्रम पूर्ण करणे, विविध उपक्रम घेणे, एखाद्या कारखान्यातून भराभर वस्तू बाहेर काढाव्यात तशा शिक्षणाच्या क्षेत्रातून वर्षानुवर्षे पिढ्या बाहेर काढणे, त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ‘गुणवत्ता’ नसेल तर त्याला ‘गुणभत्ता’ देऊन वाटेस लावणे आणि परिस्थितीच्या नावाने बोटं मोडणे याव्यतिरिक्त शिक्षक म्हणून मी काही करतो का , हा प्रश्न मला आता छळायला लागला आहे.
एक क्षण थांबून शिक्षणव्यवस्थेने आता विचार करायला हवा –
“आम्ही विद्यार्थी पास करतो आहोत पण शिक्षणव्यवस्था नापास होती आहे का, समाजाला रसातळाला नेण्यासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून कारणीभूत ठरते आहे का” ?
मला वाटतं ज्या क्षणात हा विचार मनात निर्माण होईल, हृदयात रुजेल आणि कृतिमधून अंकुरेल त्या ‘क्षणाचा’ आणि ‘शिक्षणाचा’ अधिक दृढ व निकोप संबंध असेल.
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
आत्मबोध
उठल्यावर कसं म्हणून
जेव्हा झोपेतही असते
फक्त तुझीच चाहूल
देवा, तुझं अस्तित्व
कधीच नाही वाटलं हूल
तुझ्यावर माझी नितांत श्रद्धा
मला माहीत नाही रे खरंच
काय मोठं असतं श्रद्धा की निष्ठा
पण खरं सांगू,
माझ्यासाठी ‘विश्वास’ हा शब्दही
पुरेसा होता त्यात ‘श्वास’ होता तोवर
असो,
देवा, या निमित्ताने तुझ्यासोबत
एक प्रवास घडला
अबोध ते आत्मबोध
अबोल ते आत्मबोल
अन् गवसले देवा मला
एक रत्न अनमोल !
संपूर्ण समर्पण.
शुभं भवतु!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
वापर मातृभाषेचा
शिक्षणक्षेत्रात जेव्हा जेव्हा औपचारिक मूल्यांकनाच्या बाबी समोर येतात तेंव्हा तेंव्हा एक वाक्य सर्रासपणे ऐकू येते, “मराठी भाषेमधून काहीही लिहायचे नाही. सगळं इंग्रजी भाषेत तयार करा.” महाविद्यालयाचे Naac च्या प्रक्रियेसाठी अहवाल तयार करणे असो, किंवा ‘स्वायत्तते’च्या प्रक्रियेकडे जाणं असो ; पदावरती कार्यरत अधिकाऱ्यांची ही भूमिका ठाम असते. त्या पाठीमागचे कारण देखील उघड आहे. ती एक उत्तम अशी सोय असते. परराज्यातील माणसं, संस्था आमचं मूल्यांकन करणार, तेव्हा त्यांना आमची भाषा समजत नाही ही पहिली अडचण. गुगलवर इंग्रजी भाषेमधून काही उत्कृष्ट नमुने सापडतात आणि ते ‘कॉपी-पेस्ट’ करणं सोपं जातं ही दुसरी सोय. हिंदी भाषेमधून काम केलेलं चालत असलं आणि सगळ्यांना ते समजत असलं तरी चित्रपटाच्या पलीकडे जाऊन संप्रेषणासाठी म्हणून स्वतःची हिंदी भाषा विकसित करावी ही ‘राष्ट्रभाषा’ म्हणून तिचा स्वीकार करणाऱ्यांची देखील मानसिकता नाही.
आजच्या काळात इंग्रजी भाषेला आपला विरोध असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. इंग्रजी भाषेसाठी वारंवार ब्रिटिशांची आणि त्यांच्या सत्तेची आठवण काढली पाहिजे याचीही मला आवश्यकता वाटत नाही. मात्र स्वतःची ‘मातृभाषा’ आणि ‘राष्ट्रभाषा’ बाजूला ठेवून जेव्हा आम्ही आमच्या मूल्यांकनाचा विचार करायला लागतो ; त्या वेळेला सहाजिकच आपल्या संस्कृतीतील मूल्य देखील आपण तितक्याच सहज पद्धतीने बाजूला ठेवण्याची स्वतःची तयारी करून घेतो, ही धोकादायक वस्तुस्थिती आहे. भाषा ही विचारांची देण घेऊन येते ती मूल्यगर्भ अशा संस्कृतीतून आणि संस्कृतीचे वहन करणारी भाषा आम्ही नाकारतो तेव्हा आमच्या विचारधारा, आमच्या परंपरा, आमची मूल्यनिष्ठता ही सगळीच गहाण ठेवायला आम्ही तयार होतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
NEP च्या माध्यमातून भारतीयत्वाचा घोष करायचा , भाषांचा उद्घोष करायचा आणि काम मात्र इंग्रजी भाषेतून आणि सत्तेचा अंकुश दाखवत गुलामी मानसिकतेतून करायचं, ही सारीच विचित्र अशी विसंगती आहे. त्यामुळेच फार पटकन आपल्या संस्थेचे ‘व्हिजन – मिशन’ हे आर्थिक गाभा असणारे असावे या निर्णयावर आपण येऊ शकतो. ‘विद्यार्थी हा ग्राहक आहे’, ही मानसिकता जिथे स्वीकारली जाते तिथे आपण ‘ज्ञाना’ला भर बाजारात उभे करतो. भारतीय संस्कृतीतील मूल्य मात्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला ‘नि:शुल्क’ पद्धतीने दिलं गेलेलं किंवा ‘स्वेच्छाशुल्क’ घेऊन दिलं गेलेलं ज्ञान ‘अमूल्य’ असतं हे शिकवते. पूर्वीच्या काळी त्याला ‘गुरुदक्षिणा’ या संज्ञेने ओळखलं जात होतं. दुर्दैवाने आपण त्यावर भाष्य करताना फक्त बुरसटलेले असे धार्मिक, पारंपरिक अर्थ लावतो आणि क्षणात त्याला निकालात काढतो. पैशांशिवाय कार्य होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र पैसा हे ‘साधन’ आहे याचा विसर पडतो आणि तोच ‘साध्य’ होतो तेव्हा by hook or crook ही मानसिकता प्रचंड वेगात विकसित होण्याला वेळ लागत नाही. …. आणि मग आपल्याला प्रश्न पडायला लागतात समाजामध्ये ‘मूल्यहीनता’ का वाढत आहे ?
आईला – ‘मातृभाषा’ आणि ‘मातृभूमी’ यांना बाजूला ठेवून जेव्हा आम्ही जगायला लागतो तेव्हा ते जगणं पोकळ होत जातं हे भारतीयांना पटवून देण्याची आवश्यकता पडू नये.
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!
•| ॐ |•
शब्दवेध
भाव – किंमत – मूल्य
सहजच मनामध्ये विचार आला वरील तीन शब्द जर आजच्या पिढीला दिले तर या शब्दांबाबत त्यांचं मत काय असेल? कदाचित हे शब्द कोणाला समानार्थी वाटतील. कोणी सांगेल एक शब्द बोलीभाषेतला, एक शब्द व्यवहारातला आणि एक पुस्तकी भाषेतला आहे.
या शब्दांचा विचार करताना माझ्या मनामध्ये मात्र विविध प्रकारच्या अर्थछटा फुलत जातात. ‘भाव’ हा शब्द बघितला तर लक्षात येतं त्याला ‘वस्तूची किंमत’ आणि ‘मनातला भाव’ अशा दोन स्वच्छ आणि स्पष्ट अर्थछटा आहेत. भाव, अभाव, बेभाव, दुजाभाव असे अनेक विविध शब्द संदर्भानी आणि वेगवेगळ्या अर्थाने आपण वापरतो. विविध म्हणी आणि वाक्प्रचारांच्या माध्यमातूनही या शब्दाला बराच ‘भाव’ असल्याचं लक्षात येतं.
‘किंमत’ हा शब्द वस्तूच्या विनिमय दराच्या अनुषंगाने आपण सर्वसाधारणपणे वापरतो. तसेच तो ‘महत्त्व’ या अर्थी देखील वेळोवेळी अधोरेखीत करतो. एखाद्याला एखाद्या गोष्टीची किंमत आहे / नाही हे आपण सहजतेने सांगत असतो. आत्ता मनामध्ये विचार आला ‘किम् मत’ अशा पद्धतीने संस्कृतच्या अंगाने या शब्दाची फोड केली तर आपले मत काय असा काहीसा अर्थ त्यातून ध्वनित होऊ शकतो. मात्र या अर्थाला आजच्या काळात फारशी किंमत शिल्लक आहे असे मात्र म्हणता येणार नाही. उलट ‘मता’ला वस्तू बनवून या वस्तू विनिमयाचा दर मात्र सहजतेने ठरवला जाऊ शकतो.
‘मूल्य’या शब्दाचा विचार करताना अगदी स्वाभाविकपणाने इंग्रजी शब्दातला ‘व्हॅल्यू’ हा शब्द आपल्यासमोर उभा राहतो. ‘मूल्य’ हा शब्द माझ्या मनात मात्र वेगवेगळे शब्द ध्वनित करून जातो. ‘मूळ’ , ‘मूल’ , ‘मोल’ , ‘मूल्य’ अशी एक शब्दांची मांदियाळी माझ्या मनामध्ये जागते. अर्थशास्त्रामध्ये ‘मूल्य’ ही एक आर्थिक संज्ञा आहे. मी साहित्याची अभ्यासक असल्यामुळे अगदी स्वाभाविकपणे ‘जीवनमूल्य’, ‘वाङ्मयमूल्य’, ‘सौंदर्यमूल्य’ अशा अनेक संज्ञा माझ्या मनात फेर धरतात.मी या ठिकाणी ‘मूल्य’ या शब्दाचा ‘जीवनसंज्ञा’ म्हणून विचार करत आहे.
‘मूल्य’ म्हणजे काय याचा विचार करताना , ‘जे तत्त्व मूळाकडे नेते ते मूल्य’ असे मला वाटते. सहाजिकच मूल्याधिष्ठित, मौल्यवान यासारखी शब्दसंपदा या व्याख्येमागे उभी राहते. आयुष्यात माणसाला अनेक वेळा तडजोडी कराव्या लागतात. त्याशिवाय व्यवहारात जगणे अशक्य आहे. मात्र तडजोडी किती कराव्यात, कुठपर्यंत कराव्यात याचा जेंव्हा आपण विचार करतो तेंव्हा प्रासंगिक, व्यावहारिक तडजोडी ठीक आहेत मात्र ‘मूल्यांशी तडजोड करू नये’, याबाबत सुज्ञ लोकांचे एकमत असलेले आपल्याला दिसून येते. याचे कारण जोड द्यायला गेलो तर ‘तड’ वाढतच जाते आणि मूळ ढाच्यालाच ‘तडा’ जातो अशी परिस्थिती, ‘मूल्यांशी तडजोड’ केल्यावर निर्माण होते. त्यामुळे अशा संदर्भातला निर्णय अत्यंत सावधगिरीने, सुस्पष्ट पारदर्शकतेने आणि धाडसाने घ्यावा लागतो.
अशा निर्णयामुळे आयुष्याची फार मोठी ‘किंमत’ मोजून ज्या ‘भाव’नेने परंपरेने ‘मूल्ये’ कालप्रवाही ठेवून जोपासलेली असतात, ती ‘अनमोल’ ठरवायची की ‘मातीमोल’ करायची हे निश्चित होत असते.
श्रीकृष्णार्पणमस्तु!
आई, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष कधी होआवे?
संपूर्ण समर्पण आई !
यावर आपले मत नोंदवा