विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

शोध कशाचा ? _ _ _

लेखन व संपादन वृंदा आशय


त्रिगुणाचे पहा। एकले हे ध्यान। ब्रम्हची सगुण। दत्तात्रय।। तयाचे चरणी। खडावा सुंदर। कटी पीतांबर। पिवळा शोभे।। सर्वांगासी पहा। चंदनाची उटी। तिलक लल्लाटी। केशराचा।। मुकुट पहा। सा-या नक्षत्रांचा। नयनी पहा त्यांच्या। चंद्र सूर्य।। ज्ञानदेव म्हणे। आवडते हे ध्यान। अधिक साधन। नलगे काही।।
🌿🌼दत्त दत्त जय।।


•| ॐ |•

🪷 सुप्रभात 🪷

आयुष्यातील बहुतांश नाती तुटणे अचानक घडत नाही.. संवाद कमी होतो, समजून घेणं कमी होतं नंतर बोलू म्हणता म्हणता अंतर वाढत जातं.

कुमुदताई गोसावी, पुणे.

संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक

🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻




•| ॐ |•

# शब्दवेध

स्वार्थ आणि सार्थ

‘स्वार्थ साधणे’ हा मनुष्याचा सहज स्वभाव आहे. अगदी लहान मुलांची भांडणे पाहिली तरी हे सहज लक्षात येते. घरात एरवी जी खेळणी पडून राहिलेली असते त्याच खेळणीसाठी दुसरे मूल घरात आले की जोरदार भांडणे, रडारड, आरडाओरड व्हायला लागते. एरवी निरागस वाटणा-या या मुलांची भांडणे शेवटी मोठया माणसांना सोडवावी लागतात. अशा मुलांना आपण जाणीवपूर्वक caring & sharing शिकवण्याचा प्रयत्न करतो. काही जणं ते सहज शिकतात काहींची मात्र ही सामाजिकीकरणाची प्रक्रिया अपूर्णच राहते. या अपूर्णतेसह वयानं मोठा आणि मनानं कोता होत जाणारा माणूस समाजाच्या वाट्याला येतो. कवी केशवसुत म्हणतात तसे –

विश्वाचा आकार केवढा ; ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!

संवेदनशीलतेशिवाय वाढत जाणा-या डोक्याच्या परिघातील विश्व मोठं विचित्र असतं. एक माणूस, एक कुटुंब, एक परिवार, एक कार्यालय, एक संस्था, एक गाव – एक शहर, एक जिल्हा, एक प्रदेश, एक राज्य, एक देश असा त्या माणसाशी, त्याच्या अस्तित्वाशी, त्याच्या कार्यस्वरूपाशी त्याचा संबंध असतो. या विश्वाशी संवेदनशीलतेची नाळ जोडली गेली तर ते विश्व सघन, समृद्ध होतं. त्याच्या अभावी तिथे वाळवंट निर्माण होतं. वाळवंटात ‘ओॲसिस’ सापडले तर बरं चालतं अन्यथा सर्वांच्याच वाट्याला रखरख येते. जिथे रखरख असते, तिथे वखवख असते. असमाधान असतं. आपला सभोवताल ‘अस्वस्थ’ असेल तर कोणीही ‘स्वस्थ’ राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

           भारतीय संस्कृती जेव्हा ‘स्वस्थ राहा’ असा संदेश देते तेव्हा तो ‘स्व’ विस्तारित होऊन ‘स्थित’ होणं अभिप्रेत असतं. ‘हे विश्वची माझे घर’ ही संस्कृती पेरणा-या आपल्या देशात ‘हे घरच माझे विश्व’ , ‘ मी फक्त माझा, नच कोणाचा’ अशी उलटी गंगा का वाहिली याचा शोध घेऊन तिचे शुद्धीकरण आणि विस्तारीकरण झाले तर स्वार्थ सार्थकी लागेल. कवी केशवसुतांचा ‘नवा शिपाई’ घडेल जो निश्चितच शिस्तीत गुणगुणत असेल –

खादाड असे माझी भूक

चतकोराचे मला न सुख

कुपातला मी नच मंडूक

विश्व कल्याणाच्या मार्गाने ही भूक वाढत जावो आणि कैवल्याच्या चांदण्यात तृप्त होवो, एवढीच इच्छा.

श्रीकृष्णार्पणमस्तु!



•| ॐ |•

कोणाच्यातरी शब्दावर
आपण जगत असतो
आपल्या मनानलं
दुसऱ्याला मागत असतो

खरंच असं का घडावं
आपल्याच प्रेमात
इतकं पडावं?

कोणी छान म्हणलं
की आपण खुश होतो
तसं नाही बोललं की
…उगाच उदास होतो

छान छान काय असतं?
अपुर्णत्वाच भान असतं !
कामातली एकरूपता टाकून
बाहेर आलेल मीपण असतं !

मी तदाकार झाला तर
सारं स्वतःलाच सुंदर दिसतं
तसं वाटत नाही तेव्हा
शाश्वताशी तेवढं अंतर असतं.

वृंदा आशय

श्रीकृष्णार्पणमस्तु!


यावर आपले मत नोंदवा